आमचं बडनेरा आमचं मालगुडी..!

    काहींसाठी बडनेरा, काहींसाठी बीबीचं बन्नेरा तर कांहीसाठी नुसतं बडनेर.ते कांहीही असो पण बडनेराचं आपलं एक अस्तित्व आहे.ते अस्तित्व दुसर्या कुठल्या शहरामुळे नसून बडनेराची स्वतःची अशी एक ओळख म्हणून. श्रीराम जयराम जयजयराम अशी आरोळी उच्च आणि सुरेख स्वरात ऐकू आली तर आमच्या बडनेराचे सर्वांना परिचित आणि पूजनीय व्यक्तिमत्व गुरूवर्य श्री.शास्त्री महाराज आलेच म्हणून समजा.गावाला त्यांनी दिलेला गुरूमंत्र म्हणजेच श्री राम जय राम जयजयराम.त्यांच्या चरणांना व काठीला स्पर्श करण्यासाठी रस्त्यातला प्रत्येकजण उत्सुक असायचा व त्यांचा आशिर्वाद घेतल्यानंतरच पुढची दिनचर्या सुरू करायचा. आमच्या पाठीवर काठीने नाजूकशी टपली मारून ते शिष्यप्रेम acknowledge करायचे.

    बडनेराला बीबीचं बन्नेरा असंही नाव होतं.बीबी ची गढी आता जमीनदोस्त झालेली आहे आणि ती जुनी विरासत सुद्धा आता नाहीशी झालेली आहे.ईस.१७७२ मध्ये निजाम दौलत शाह बेगम ऊर्फ बीबी ने ही रियासत पेशवे सल्तनतेत विलीन केली असा त्रोटक इतिहास सापडतो. घरी कोणी आवडता पाहुणा आला तर विरंगुळा म्हणून त्याला आम्ही रेल्वे स्टेशन ची एक फेरफटका मारून आणायचो.पाहुणा गावाकडचा असल्यास त्याला बडनेरा स्टेशन, मोठी रेल्वेलाईन,कोळश्यावर चालणारे प्रचंड मोठे कर्णकर्कश आवाज करणारे काळेकुट्ट रेल्वे ईंजीन पाहून अगदी धन्य वाटायचे.दहा नये पैसे प्लॅटफॉर्म तिकिट होती पण ती आम्हाला परवडण्यासारखी नसल्याने आम्ही स्टेशनचे त्याकाळचे वैभव यार्डातच दुर उभे राहून न्याहाळायचो. कोळसा चोरांच्या टोळीचा पाठलाग करणार्या शिपायांची शिट्टी ऐकू आल्याबरोबर आम्ही सुद्धा घराकडे धूम ठोकायचो. अर्ध्या बडनेराचा रोजगार अख्ख्या रेल्वे च्या भरंवशावर होता असे म्हटले तर वावगे ठरू नये.

    बडनेराचे दुसरे आकर्षण म्हणजे इथली काॅटन मिल. मिल ची भव्य वास्तू तिच्या चिमणीद्वारे कैक किलोमीटर वरून आपले अस्तित्व अधोरेखीत करायची.कित्येक एकरांमध्ये पसरलेली ही मिल स्वातंत्र्यानंतरच्या काळात अमर्याद मुद्द्यांचा विषय बनलेली होती. मिलचा भोंगा म्हणजे तत्कालीन अचूक वेळ दर्शविण्याचे एक प्रभावी साधन होते.ज्यांच्या मनगटाला हेन्री सॅडोझ चे ब्रांडेड घड्याळ असायचे असे महाभागही मिलच्या भोंग्यासोबत आपल्या घड्याळीची वेळ तपासून बघायचे व करेक्शन करून घ्यायचे.रंजल्या गांजल्यांच्या रोजगाराचा प्रश्न ही मिल सोडवण्यात अग्रेसर होती. गावाच्या उत्तरेला नव्या वस्तीत कित्येकांचे श्रद्धास्थान असलेले सुप्रसिद्ध झिरी मंदिर आहे .हिरव्यागार निसर्गरम्य परिसरात असलेले श्री दत्तात्रयांचे झिरी मंदिर अनेक भाविकांचे पर्यटनस्थळ आहे.इथला श्री दत्तजयंतीचा उत्सव अनुभवण्यायोग्य आहे.

    पूर्वेला सहा किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध कोंडेश्वर तीर्थक्षेत्र बघितले नाही तर बडनेराची भेट अपूर्णच रहाते.इथले शिवलिंग उपासकांच्या श्रद्धेचे ओजस्त्रोत आहे.झिरी प्रमाणेच कोंडेश्वरला मोठ्या प्रमाणात निसर्गरम्य परिसर लाभला आहे.टेकडीच्या पायथ्याशी कोरीव दगडांनी साकारलेले महादेवाचे प्राचीन मंदिर आहे.मुख्य मंदिराच्या बाहेर कोरलेल्या हत्तींची संख्या कित्येकदा मोजली तरीही चूकच ठरते हे बाळगोपाळांसाठी एक अनाकलनीय गूढ आहे. इथूनच झुळुझुळू वाहणार्या ओढ्याचे रूपांतर पुढे रायगोईच्या छोट्या नदीत होते.श्रावणातल्या सर्व सोमवारी इथे भाविकांची प्रचंड गर्दी उसळते. इथले अमर मंडळ व्हाॅलीबाॅल साठी प्रसिद्ध आहे. हे मंडळ खूप जुने आणि प्रतिष्ठित आहे.संध्याकाळी चंट मुले व्हाॅलीबाॅल खेळतांना आढळली तर ती अमर मंडळाचीच ग्वाही देतात.

    बडनेराला सांस्कृतिक क्षेत्रात हिंदीभाषिक रामायण संस्कृती चा वारसा लाभला तो मुख्यत्वेकरून भागीरथ भैयांनी घेतलेल्या ध्यासा मुळे. त्यांना साथ दिली मोतीराम व इतर सहकार्यांनी .इतर ठिकाणी दसर्यामध्ये रामायण उत्सव आणि समापन रावणदहनात होते. बडनेरा याला अपवाद आहे.इथे दिवाळीला रामलीला आणि दिवाळीच्या दुसर्या दिवशी रावणदहन उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा होतो. रामायणाची कंपू पंधरा दिवस ठाण मांडून बसलेली असते.

    अब तु भये सियाराम
    मेरी मान मना

    हे ठेक्यावर घेतलेले प्रार्थनेचे स्वर रात्री कानी पडले की समजायचे रामलीलेचा अध्याय सुरु झालाय.शो सुरू होण्याआधी आपापले गोणपाट टाकून जागा पकडण्याची मोठीच कसरत असायची. संपूर्ण बडनेराचे आध्यात्मिक मनोरंजन भागीरथ भैया रामायणाद्वारे न चुकता दरवर्षी करायचे आणि हे मनोरंजन अविरतपणे पन्नास वर्षांपासुन सुरू आहे.बडनेरावासी ह्या अविट कार्यक्रमाची वर्षभरापासून वाट बघायचे.सावता मैदानावर पुढील प्रत्येक क्षणाची उजळणी होत असताना प्रेक्षकवर्ग रामलिला रटाळ झाली म्हणून कधीच उठून गेले नाहीत.

    भागीरथ भैया चे पायपेटी ह्या वाद्यावर चांगलेच प्रभुत्व होते.त्यांच्या सुरेल व पहाडी आवाजाने संपूर्ण परिसर रामायणमय होऊन जायचा.सर्वांना खिळवून ठेवण्याची प्रचंड किमया त्यांना गवसली होती.हाराच्या कार्यक्रमात म्हणजे कमर्शिअल ब्रेक मध्येच काय ते प्रेक्षक मंडळी थोडे हलके होउन यायची. बाहेरगावी असलेला बडनेराचा रहिवासी दिवाळी मध्ये सुरू असलेल्या रामलीले दरम्यान हमखास घरी परतायचा.बडनेराला बरीच मान्यवर मंडळी लाभली.यादी बरीच लांब आहे परंतु त्यातल्या त्यात शक्य होतील तेवढे मात्र नक्कीच आठवायला हवेत.

    डाॅ.दिवाणजी, सुदाम देशमुख ह्यांच्यासारखी सुप्रसिद्ध ध्येयपिपासू काॅमरेड मंडळी बडनेराचे गौरवशाली नागरिक आहेत.निस्वार्थ मनाने त्यांनी देशसेवा केली व जनसामान्यांना सचोटीचे धडे दिले. डाॅ.मुरलीधर देव जनमानसातील देवमाणुस होते.त्यांच्याकडे येणारा पेशंट कधीच फी ची काळजी करणारा नसायचा.हाताला विलक्षण गुण असलेला हा औलीया बडनेरावासीयांची सेवा करण्यातच धन्यता मानायचा.हभप.गोडबोले बुवा आणि हभप.महादेवबुवा बडनेरकर ह्यांनी आपल्या गोड निरूपणातुन अध्यात्माकडे कल असलेल्या जनतेला मंत्रमुग्ध केले व बडनेराचे नावलौकिक गाजविले. जुन्या मंदिरातील श्रीराम जन्मोत्सव सोहळा हभप.गोडबोले बुवांहस्ते साजरा व्हायचा.

    पुरुषोत्तमभाऊ येते हे नांव कुणाच्याच विस्मरणात जाणार नाही.निख्खळ व निस्वार्थपणे राजकारण (विरोधाभास) कसे खेळले जाउ शकते ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे येते भाऊ.वास्तविक पाहता येते भाऊ राजकारणापेक्षा समाजसेवेत तल्लीन आणि तत्पर असायचे ते राजकारणात सक्रिय असताना देखील.

    सामाजिक एकात्मतेचे एक वाखाणण्याजोगे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे शेख वजीर शेख कालू.ह्यांच्याकडे हिंदू सणवार अगदी विधीवत साजरे व्हायचे.शेख वजीर जुन्या राममंदिरात श्रीरामनवमीच्या प्रवचनांमध्ये किराणा व्यवसाय सांभाळून न चुकता हजेरी लावायचे. बडनेराला व्हिंटेज वस्तूंचा सुद्धा वारसा लाभलेला आहे.बशीर ठेकेदार चा एकुलता एक हिरव्या रंगाचा ट्रक, देशपांडे वकीलसाहेबांची राजदूत फटफटी, देव वकीलांची मोपेड, वाठाची चक्की आणि जनाभोईंची आकाशी रंगाची फियाट कार ह्या गोष्टी आता व्हिंटेज कॅटॅगिरी मध्ये मोडलेल्या आहेत .त्यांना मानाचा RIP सलाम.

    सकाळी नाश्त्याच्या वेळेला कंपासपुर्यातल्या गाडेच्या हॉटेलमधील गरमागरम आलूबोंड्यांसोबत चमचमीत लाल रस्सा खाता खाता रस्सा झोंबलाच तर दातीर च्या हाॅटेलातील पेढा आहे ना मदतीला.तो जहाल तिखटाचा दाह नक्कीच कमी करतो.दुपारी नव्या वस्तीतील तुफान मेल हाॅटेल चा मस्त खमंग आणि घट्ट बादशाही चहा तरतरी आणतो आणि रात्री अशोक हाॅटेल च्या लस्सीची अवीट गोडी.ती तर चाखायलाच हवी.गोडबोलेच्या वाडीशेजारील कुंकू कारखाना आता गार्डन रेस्टॉरंटमध्ये रुपांतरीत झाल्याची खबर आहे कारण हल्ली कुंकवाची मक्तेदारी जाऊन त्याची जागा स्टिकर बिंदी ने अगदी नकळत घेतली आणि बाजारात कुंकवाची मागणी घटल्याने म्हणा अथवा अन्य काही कारणाने कुंकू कारखाना ओस पडला.अन्यथा कुंकू कारखाना सुद्धा माझ्या पर्यटनाच्या यादीत होता.

    वार्षिक परिक्षांदरम्यान येणारा कमलीवाले बाबांचा उर्स हा सुद्धा बडनेराच्या सांस्कृतिक अंगाचे एक प्रदर्शन आहे.त्याच वेळेस कव्वालीचा शानदार मुकाबला असायचा.शकीला बानू भोपाली ने जिंकलेला प्रसिद्ध कव्वालीचा मुकाबला असो अथवा अब्दुल रफ चाऊस सोबतची हुकमी जुगलबंदी असो,बडनेरातील कव्वाली दर्दींना ही एक मेजवानी असायची.रात्री सुरू झालेली कव्वाली सकाळी सात वाजेपर्यंत अव्याहत चालायची. होल्टेकावरील ढंडार चा कार्यक्रम हा एक उत्कृष्ट लोकनाट्याचा प्रकार.ढंडार चा व्हेन्यू अगदी ठरलेला होता.नेहमी ढंडार होल्टेकावरच यायची.काही लोकं याला कलापथक असेही म्हणायचे. ढंडार कलारसिक ला विशिष्ट प्रेक्षक वर्ग लाभला होता.

    “कायची लावली बे लेका त्वा ढंडार ?”

    असा अथवा तत्सम लोकल संबोधनपर वाक्प्रचार ढंडार हूनच प्रचलित झाला असावा असा एक अंदाज. कंपासपुर्यातला मोठा बैल पोळा हा खासकरून गुढी साठी फेमस होता. साहेबी वर्दीतील देहनकर ज्युनिअर आणि गुढी आल्यानंतरच प्रेक्षकांची प्रतिक्षा संपुष्टात यायची व पोळा फुटायचा.बैलांसोबतच धनीसुद्धा तोवर ताटकळत थांबायचे असा सर्वसाधारण नियम होता.सिताराम गायकी ची दिवाळीतील गवळण कोणीच विसरू शकणार नाही.सितारामजी आणि देवराव गवळण ह्यांचे खूप जुने समीकरण होते.पारंपारिक वेशभूषा करून ही गवळण आणि मंडळी बासरी आणि ढोलकीच्या तालावर नाचतगाजत प्रत्येक गौप्रेमींच्या घरी हजेरी लावायची. बारीपुर्यात हनुमान जयंती चे गाडे ओढणे हा बडनेराचा धार्मिक आस्था जपणारा सार्वजनिक कार्यक्रम.अत्यंत प्राचीन परंपरा लाभलेला हा कार्यक्रम आजतागायत सुरू आहे.लहानपणी आम्ही सुद्धा ह्या गाड्यांमध्ये बसून बराच डाव केलेला आहे.

    संस्कार केंद्राने बडनेरावर बर्याच अंशी चांगले संस्कार केले.परिणामी दारू घेतल्यानंतरचा सार्वजनिक कार्यक्रम क्वचितच दृष्टीक्षेपात पडायचा.दारूबंदीवरचा कार्यक्रम म्हणजे ब्लॅक अॅड व्हाईट हिंदी सिनेमा चे रोड च्या मध्यभागी सिनेमा प्रदर्शन. *परिवार* आणि *सीमा* हे शिनेमे आम्ही पन्नास साठ वेळा तरी रोडवर अगदी मोफत बघितलेले असतील. त्याकाळात पिक्चर स्क्रिन म्हणजे पांढरे कापड असायचे.कापडाच्या दोन्ही बाजूला मग दाटीवाटीने प्रेक्षक वर्ग बसायचा अगदी गुण्यागोविंदाने.कारण शिनेमा फुकटात असायचा. मराठी शाळेची प्रभातफेरी हे एकात्मतेचे प्रतीक होते.विद्यार्जनाचे ते जणूकाही एक शक्तीप्रदर्शन असायचे. सपाटे कंपनीची दिंडी मिरवणूक म्हणजे वारकरी पंथाचा वारसा दिंडी द्वारे जतन करायची परंपरा.त्यांचे हे ईश्वर नामस्मरणाचे कार्य अजूनही अविरत सुरू आहे. काळाच्या ओघात गावात सुद्धा बदल झालेत आणि आता अगदी नव्या रुपात आमचे बडनेरा गाव सुसज्ज आहे.

    ..कुछ पल तो गुजारीये बडनेरामे..!
    -किशोर हजारे
    नागपूर
    9765263375

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment