बौद्ध संस्कृती आणि संस्कार
बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्याऐंशी हजार स्तूप निर्माण करून बुद्धाची शिकवण व धम्म अधिकाधिक पुढे आणला गेला. विविध धम्मसंगीतिच्या माध्यमातून धम्मक्रांतीला अधिक मजबुती आली. अवशेषांच्या माध्यमातून स्तूप, विहार, त्रिरत्न, चक्र, तोरण यातून बौद्ध संस्कृती विकसित झाली. सम्राट अशोकाने तर धर्म राज्य अफगाणिस्तान, पाकिस्तान, सिलोन पर्यंत प्रस्थापित केले होते. इसवी सन सातव्या शतकाच्या काळात संपूर्ण जंबुद्वीपात बौद्ध विद्यापीठाच्या माध्यमातून बौद्ध धर्माचा प्रचार होऊन बौद्ध संस्कृती प्रस्थापित झाली होती. लोकांच्या जीवनात आमूलाग्र बदल झालेला होता. मात्र पुष्पमित्रांने बृहद्रस्थाचा तसेच नालंदा सारख्या बौद्ध विद्यापीठांचा नाश केल्यावर बौद्ध धर्म भारतातून नामशेष जरी झाला होता, असे असले तरी बौद्ध धर्म इतर देशात पसरलेला होता. तेथे बौद्ध संस्कृती व संस्कार उदय झालेले पाहावयास मिळते.
ही संस्कृती त्यांच्या खानपान, रहनसहन व व्यवहार व व्यवसायातून दिसून येते जापानी कला, तिब्बती श्रमण परंपरा, बुद्ध विहारे, बुद्ध प्रतिमा, प्रणिपात साधना तसेच चिनी परंपरा पूजा, नम्रता व सम्यक आजीविका, सिलोन मध्ये महेंद्र व संघमित्राने बोधिवृक्षांचे रोपण करून बौद्ध धर्म फैलवला. बोधिवृक्षांची पूजा करणे, वंदना पठण इ. मधून संस्कृती पहायला मिळते.
भारतातून बौद्ध धर्म संस्कृती व संस्कार जरी नष्ट झाले असले तरी काही बौद्ध विद्वान व प्रचारकांच्या माध्यमातून थोडाफार बौद्धधर्म जिवंत दिसून येतो. एकोणिसाव्या शतकात अनागारिक धम्मपाल यांनी सिलोन मधून कलकत्ता व बुद्धगयाला आल्यावर त्यांनी महाबोधी च्या माध्यमातून कार्य सुरू केले. चंद्रमणी, सुमंगल कुशीनगर मध्ये कार्य करीत होते. धर्मानंद कोसंबी, राहुल सांस्कृत्यायन, जगदीश काश्यप, भिक्षु धर्मरक्षित, डॉ.भदंत आनंद कौसल्यायन, भिक्षु संघरक्षित हे कार्य करीत होते. सयाजीराव गायकवाड यांनी सहकार्य केल्यामुळे पाली भाषा व बौद्ध धर्म धर्मानंदाच्या माध्यमातून दिसून येत होता. विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यामुळे लाखो लोक बौद्ध झाले आणि महान अशी धम्मक्रांती झाली. साऱ्या बौद्ध जगाचे लक्ष भारताच्या दिशेने लागले. विदेशी बौद्ध बांधव भारतीय बुद्धाकडे व भारतीय बौध्द स्थळांचा परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी येऊ लागले. एवढेच नाही तर भारतीय बौद्धांना भरभरून मदत करू लागले. भारतीय बौद्ध विदेशात जाऊन विदेशी संस्कृतीचा अभ्यास करू लागले अशा प्रकारे बौद्ध संस्कृतीची देवाण-घेवाण होऊन बौद्ध धर्माला भरभराटीचे दिवस येऊ लागले.
बौद्ध संस्कृती व संस्काराचा शोध घेतल्यास असे दिसून येते की भारतीय बौद्धांच्या सामाजिक कार्यामधून ही संस्कृती दिसून येते. घराघरात बाबासाहेब व बुद्धांचे फोटो, सुंदर पुजास्थान पाहायला मिळतात. प्रचारकांचा ही फोटो पाहायला मिळतो. बाबासाहेबांचे अनुयायी विविध संस्कृतीतून आल्यामुळे त्यांच्यावर त्या संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळतो. असे असले तरी ते बौद्ध संस्कृती काय आहे याचा शोध घेऊन त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीत असतात. विविध देशातील तसेच सम्राट अशोक कालीन संस्कृतीचा प्रभाव अधिक दिसून येतो. सांस्कृतिक पातळीवर राहणीमानात महिला पुरुष विशिष्ट कार्यक्रम प्रसंगी शुद्धतेचे प्रतीक म्हणून सभेत वस्त्र परिधान करतात. गळ्यात महिला अशोकचक्र किंवा बौद्ध चिन्हे, पुरुष बुद्ध बाबासाहेबांचे लॉकेट वापरतात. अन्य देशात ज्याप्रमाणे त्यांचे एक आदर्श पुरुष मानतात. घरावर, वाहनावर ध्वज, नावे, बौद्ध विहार अशोक कालीन स्तूपांची सारखे किंवा बौद्ध चिन्हे चक्र वेदिका, स्तंभ, वज्र, प्राणी, ड्रॅगन, बुद्ध शिकवणीचे भित्तिचित्रे इत्यादी निर्माण करतात. सांस्कृतिक पातळीवर बुद्ध, बोधीसत्वावर गाणे, नृत्य सादर करून बुद्धाबद्दल श्रद्धा भाव व्यक्त करतात. बुद्धाचा धम्म खोलवर रुजविण्यासाठी काही संस्थाद्वारे धम्मशिबिराच्या, विपश्यनेच्या माध्यमातून धम्म रुजवितात. त्यांनी स्तूप, शिबीर केंद्रे निर्माण केली आहे. अशोक कालीन पाणवठे, शेती, रस्ते, दवाखाने, केंद्रे निर्माण करून बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. जेतवन, पगोडा, चौका, नागलोक, बुद्धभूमी, ड्रॅगन पॅलेस, शांती स्तूप, धम्मकुटी तसेच बुद्धगयेतही अनेक देशांतील बुद्ध विहारे आहेत. त्यामधून जगभर ही संस्कृति फैलावत असते. पौर्णिमा, अमावस्या, बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती अशा इतर कार्यक्रमातून पंचशील, अष्टशील, आर्य अष्टांगिक मार्ग, दहा पारमिता, ध्यान, विपश्यना विधी च्या माध्यमातून आचरण संस्कृती पहावयास मिळते.
बाबासाहेब आंबेडकरांनी नवदीक्षित बौद्धांसाठी बौद्ध संस्कृतीचा ठेवा दिला आहे. तो जतन करणे गरजेचे आहे. त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या. प्रतिज्ञेच्या माध्यमातून ते म्हणतात कि इतर संस्कारित देव-देवता सोडून बुद्धांना श्रद्धा भाव व्यक्त करावा. बौद्ध धर्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेच आचार कर्म होणार नाही हे करावे. पुढे त्यांनी म्हटले आहे की ‘पंचशील आर्यअष्टांगिक मार्ग तसेच दहा पारमितांचे, शील-समाधी-प्रज्ञा व समानतेचे आचरण बौद्धांनी करावे. पुढे ते म्हणतात सर्व मनुष्यमात्राला समान असे पहावे. विसावा हिस्सा धर्म कार्यासाठी दान करावा. दर रविवारी बौद्ध विहारात जावे, वंदना करावी. बाबासाहेबांनी सिलोनवरून वंदना आणली त्याचे कमीत कमी पठाण व्हावे. आर्यअष्टांगिक मार्गाचे व्यवहारात पालन करावे. प्राणीमात्रावर दया करावी. सम्राट अशोकाने प्राण्यांकरता पाणवठे, दवाखाने उघडले होते तसा प्राण्याविषयी करुणा भाव करावा. बाबासाहेबांनी बौद्ध संस्कृतीचा आदर्श घालून देताना त्यांनी मिलिंद महाविद्यालय स्थापन करताना स्तुपांची निर्मिती केली. तेव्हा आपले विहार, शाळा, कॉलेज त्यावर बौद्ध संस्कृती दिसावी. स्वतःची-मुलांची, घरांची, संस्थेची नावे बुद्धिस्ट असावी, बाबासाहेब बौद्ध स्थळे, लेण्यांना भेट असे, तसे बौद्धांनी बौद्ध स्थळांना भेटी द्याव्या. पाली बौद्धांची बोली भाषा होती तेव्हा पाली भाषांचा बौद्धांनी अभ्यास करावा. त्यासाठी त्यांनी डिक्शनरी, व्याकरण, वंदना तयार केली. धर्मग्रंथाचे पठण करावे म्हणून ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ लिहिला. मिलिंद प्रश्नाचे विहारातून वाचन व्हावे. उपोसथ करावे. बौद्धांनी सर्व उत्सव साजरे करावे. जन्म, मृत्यू, विवाह, गृहप्रवेश, नामकरण, प्रतिष्ठापना, उद्घाटन, जयंती, स्मृतिदिवस प्रसंगी संस्कार विधी बौद्ध पद्धतीने व्हावे.
बौद्ध साहित्यातील उल्लेखाप्रमाणे पाहिल्यास बुद्ध काळात स्वतंत्र ‘गणराज्य’ पद्धती होती व आदर्शवत राज्यकारभार सुरू होता. उदा. ‘वज्जी गणराज्य’ पाहिल्यास ते एकोप्याने रहायचे, एकत्रित पणे निर्णय घ्यायचे, स्त्रियांना व वृद्धलोकांना मान दिला जायचा, धार्मिक स्थळांची काळजी घ्यायचे, धम्म आचरणाने श्रेष्ठ किंवा अरहंतांचा मान राखीत होते. आचरणाच्या दृष्टीने ‘सिगालोवाद सुत्ताचा’ उपदेश मौलिक आहे. यामध्ये मुलांचे आईवडीलाविषयीचे कर्तव्ये दिली आहे. गुरू-शिष्य, पती-पत्नी, आप्तमित्र, मालक-सेवक, साधुसंत, रोगी यांच्या विषयी कसे वागले पाहिजे हे सांगितले आहे. बाबासाहेबांनी ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथामध्ये महामंगल सुत्ताचे 38 मंगल दिलेले आहे. यामधून व अशा इतरही सुत्तामधून बौद्धांची आचार संस्कृती व संस्कार दिसून येते.
- -हर्षभद्र,
- वर्धा
- मो. 7620065027