मुंबई : कुपोषण ही समस्या देशाला दीर्घकाळापासून भेडसावत आहे. गरीबी आणि अन्य कारणांमुळे लहान वयात मुलांना आणि मातेला योग्य आहार न मिळाल्याने ही समस्या उद्भवत आहे. गरीबीमुळे लाखो मुलांना आणि मातेलाही पोषक आहार मिळत नसल्याने जन्मत: कुपोषणाची शिकार ठरणार्या बालकांचे प्रमाण मोठे आहे. याबाबतीत नुकतीच माहितीच्या अधिकाराखाली सरकारने दिलेल्या आकडेवारीवरुन ही परिस्थिती गंभीर असल्याचे समोर आले आहे. त्याहूनही गंभीर म्हणजे सर्वाधिक कुपोषित बालकांची संख्या महाराष्ट्रात आहे.
एका वृत्तानुसार, माहिती अधिकाराखाली विचारण्यात आलेल्या प्रश्नाच्या उत्तरात महिला आणि बालविकास कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३३ लाखांहून अधिक कुपोषित बालकं असून, त्यापैकी निम्म्यापेक्षा अधिक मुलं अतिकुपोषित आहेत. महाराष्ट्र, बिहार आणि गुजरात या तीन राज्यांमध्ये कुपोषित बालकांची संख्या सर्वाधिक असून, यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. २0११ मधील जनगणनेनुसार देशात एकूण ४६ कोटीपेक्षा अधिक मुलं आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत अतिकुपोषित बालकांच्या संख्येत तब्बल ९१ टक्के वाढ दिसून आली आहे. नोव्हेंबर २0२0 मध्ये ही संख्या ९ लाख २७ हजार होती, ती ऑक्टोबर २0२१ पर्यंत १७ लाख ७६ हजार झाली आहे.
महाराष्ट्रात कुपोषित बालकांची संख्या ६ लाख १६ हजार इतकी असून देशात कुपोषित मुलांच्या संख्येत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. यापैकी अतिकुपोषित बालकांची संख्या तब्बल ४ लाख ५८ हजार आहे, तर १ लाख ५७ हजार बालकं मध्यम कुपोषित आहेत. या यादीत बिहार दुसर्या स्थानावर असून, तिथे एकूण ४ लाख ७५ हजार बालकं कुपोषित आहेत, त्यामध्ये अतिकुपोषित बालकांची संख्या १ लाख ५२ हजार आहे, तर ३ लाख २४ हजार बालकं मध्यम कुपोषित आहेत. तिसर्या स्थानावर असलेल्या गुजरातमध्ये एकंदर ३ लाख २0 हजार बालकं कुपोषित असून त्यापैकी १ लाख ६५ हजार बालकं अतिकुपोषित तर १ लाख ५५ हजार बालकं कुपोषित आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ अनुपम सिब्बल यांनी म्हटले आहे. कुपोषणामुळे कोणत्याही आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे बालकांमधील कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी गर्भारपणापासून उपाययोजना करणे आवश्यक आहे.
—–