गरोदरपणातले नऊ महिने हा महिलांच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा काळ असतो. आई होण्याचा आनंद अनुभवत असतानाच स्त्रियांना विविध शारीरिक बदलांनाही सामोरं जावं लागतं. गरोदरपणात शारीरिक बदल होतातच शिवाय महिलांच्या त्वचेवरही परिणाम होतो. जवळपास ९0 टक्के महिलांना बाळंतपणानंतर त्वचेशी संबंधित समस्यांना सामोरं जावं लागतं. नवा जीव जन्माला घालणं कोणत्याही महिलेसाठी सोपं नसतं. तिला बरीच भावनिक, मानसिक आणि शारीरिक स्थित्यंतरं अनुभवावी लागतात. या काळात काही महिलांचं वजन वाढतं. काही गुंतागुंत निर्माण होते. त्यातही गरोदरपणात आणि त्यानंतर त्वचा तसंच केसांच्या संरचनेत बरेच बदल झाल्याचं दिसून येतं.
बाळंतपणानंतर त्वचेचा पोत टिकवून ठेवणं खूप आव्हानात्मक असलं तरी हे बदल कायमस्वरुपी टिकणारे नसतात, ही त्यातल्या त्यात समाधानकारक बाब म्हणता येईल. थोडी काळजी आणि उपायांनी तुम्ही पुन्हा उजळ त्वचा प्राप्त करू शकता. गरोदरपणात उद्भविणार्या त्वचेच्या काही समस्यांवर एक नजर टाकू या.
मेलास्माला मास्क ऑफ प्रेगनन्सी असंही म्हटलं जातं. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सचं प्रमाण वाढल्यामुळे त्वचा काळपट दिसू लागते. गाल, कपाळ, डोळे, तोंडालगतच्या त्वचेचा काळपटपणा खूप वाढतो. हायपरपिगमेंटेशनची समस्या निर्माण होते. उन्हामुळे ही समस्या वाढू शकते. ही समस्या सोडवण्यासाठी गरोदरपणात सन्सस्क्रिनचा भरपूर वापर करावा.
हार्मोन्समधल्या बदलांमुळे त्वचेवर मुरूमं येऊ लागतात. एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सच्या पातळीतल्या बदलांमुळे त्वचेवर सीबमची निर्मिती अधिक प्रमाणात होते आणि त्वचेवरची रोमछिद्रे बंद होतात. गळा आणि मानेसह चेहर्याच्या खालच्या भागावर याचा अधिक परिणाम जाणवतो. ही मुरुमं सौम्य ते तीव्र स्वरुपाची असू शकतात. अनेक प्रसंगी चेहर्यावर वेदनादायी लाल चट्टे पडू शकतात. मुरूमांचा हा त्रास काही दिवसांनंतर कमी होतो. अर्थात मुरूमांचा हा त्रास प्रत्येक महिलेला होतो असं नाही. गरोदरपणात काही महिलांची त्वचा उजळते. गरोदरपणातल्या त्वचेच्या समस्यांवर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय उपचार करू नयेत. काही गोळ्यांमुळे गर्भाला त्रास होऊ शकतो.
गरोदरपणात पाणी कमी प्रमाणात प्यायलं जात असल्याने त्वचा कोरडी पडू लागते. डिहायड्रेशनचा त्वचेवर वपरित परिणाम होता. त्यामुळे या काळात महिलांनी भरपूर पाणी प्यावं. नारळाचं पाणीही लाभादायी ठरू शकतं. एस्ट्रोजेनच्या पातळीत वाढ झाल्यामुळे चेहर्याच्या रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे त्या कोळ्याच्या जाळ्यासारख्या दिसतात. बाळंतपणानंतर ही समस्या दूर होते. इतर औषधोपचारांसोबतच गरोदरपणात त्वचेची विशेष निगा राखायला हवी. यामुळे बर्याच समस्यांना आळा बसू शकतो. अंगावर पुरळ उठल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं.