माझी आई इंदिरा नारायण कामत

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

“प्रेम स्वरूप आई, वात्सल्य सिंधू आई” महान कवी श्री माधव ज्युलियन यांनी केलेले हे वर्णन माझ्या आईशी हुबेहूब जुळत आहे. माझी आई प्रेमाने भरलेली व वात्सल्याची सिंधूच होती. आईला आम्ही “आत्या” म्हणत असू. माझे मामा, मावशी तिला आत्या म्हणायचे तेच आमच्या तोंडवळणी पडले. गोव्याच्या सावर्डेे जिल्ह्यात, काकोडा नावाचा गाव आहे. तेथे माझ्या आईचा जन्म झाला. आई धरुन सर्व अकरा भावंडे. काही मामा,मावशा माझ्या मोठ्या भावाहून लहान आहेत. माझ्या आईने स्वतः आई झाल्या नतंरही आपल्या आईची बाळंतपणे काढली होती. लहानपणी ती वडिलांची खूप लाडकी होती, कारण सर्व भावंडात ती हुशार होती. वडिलांना दुकानाच्या व शेतीच्या कामात मदत करायची. तिचे खेळ सुध्दा मुलांसारखेच होते. नदीत पोहणे, झाडावर चढणे, सायकल शर्यत लावणे, लगोरी, विटीदांडू व टाबुल फणा या सारख्या खेळात ती तरबेज होती.

वयाच्या पंधराव्या वर्षी तिचे लग्न तिच्याहून बारा वर्षांनी मोठा असलेल्या “नारायण कामत” म्हणजे माझ्या वडिलांशी झाले व विमलची “इंदिरा” होऊन ती कुंडई गावात आली. नवरा बायकोचा जोडा लक्ष्मीनारायणाचाच वाटतो असे लोक म्हणायचे. रंगाने गोरी, रूपाने उजवी माझी आई खूपच सूंदर दिसायची म्हणे. तिच्या नावाप्रमाणे ती विमल होती. सासरी तिचे खूप कोड-कौतुक झाले. हुंड्या बद्दल राग रोष आत्या कडून कधी ऐकला नाही. म्हणजे सासर चांगलं व माहेर ही साधारण म्हणजे, दोन्ही कुटुंबें समजुतदार असावीत.

आईला वयाच्या सोळाव्या वर्षी मोठा मुलगा झाला व त्या नंतर दोन वर्षांनी दुसरा मुलगा (आबा, जो नंतर आत्याचा आधार स्तंभ बनला). दोन्ही मुले राजबिंडी, रूपवान व गुणवान असल्याने राम-लक्ष्मण म्हणून त्यांचे खुप कौतुक व्हायचे व त्या बरोबर इंदिराचे सुध्दा कौतुक झाले. आत्याने तिला कधी सासूरवास झाल्याचे सांगितले नाही. उलट आजी आजोबां बद्दल ती चांगलंच सांगायची. माझ्या आजी आजोबांना मी काही बघितलेले मला आठवत नाही. माझे व माझ्या अगोदरच्या चारही भावंडांची नावे आजोबांनीच ठेवली होती म्हणे. आजोबा एकपाठी व दूरदृष्टीचे होते. त्यांना मुलांचेे पाय पाळण्यात दिसले असतील. ज्या प्रमाणे त्यांनी आमची नावे ठेवली होती, त्याप्रमाणे काहींनी ती खरोखरच सार्थ करून दाखवली.

पांच मुलांच्या जन्मापर्यंत इंदिरेचे सगळे सुरळीत चालले होते. तिची बाळंतपणे घरातच झाली. फक्त एक वैजिणबाई (दाई) यायची. पण सहाव्या बाळंतपणात मूल पोटातच दगावलं. त्यावेळी माझी आई मृत्यूच्या जबड्यातून सुटली व देवाच्या कृपेने वाचली, पुढील येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्यासाठी. त्या नंतर एका मागोमाग एक अरिष्टे येऊ लागली. सासू-सासऱ्याचे आजारपण, त्याची सेव-सुश्रुषा, त्यातच एका नंतर एक त्यांचा मृत्यू. बाबा दुकान सांभाळून कंपनीची नाटके करायचे. त्यांची जागरणे व्हायची. यामुळे त्यांची तब्बेत बिघडू लागली. त्यांनी स्वतःची काळजी घेण्यात दिरंगाई केली. आजारपण वाढलं. त्याना टी. बी. झाला. घराचे वासे फिरले. परिस्थिती बिघडू लागली. कामकाज बंद पडलं. घरांत तिचा तिच्याच वयाचा दीर होता. त्याचे शिक्षण बेताचे होते. नोकरी धंदा नव्हता. दूकान ही सांभाळणं त्याला जमलं नाही. पाच मुलांबरोबर दिरालाही आईला मुलासारखंच सांभाळावं लागलं.

घरखर्च व औषधपाणी डोईजड व्हायला लागले. अशा बिकट परिस्थितीत तिला माहेरच्यांनी सुध्दा जवळ केले नाही. आईवर अशी परिस्थीती होती तेव्हां, तिचे माहेर सुख-संपन्न होते. बहिणी चांगल्या घरी व भाऊ ही चांगले कमावते होते. पण सगळ्यांनी तिच्याशी अबोला धरला. ज्या भावंडांचे तिने आपल्या मुलांप्रमाणे संगोपन केले होते ती माजोरी व कृतघ्न निघाली. पण तिच्या चुलत्यांनी व चुलत भावंडांनी तिला मदतीच थोडा हात ‌दिला. इथं मला आवर्जून सांगावसं वाटतं की, जसा दक्षाने पार्वतीचा अपमान केला होता तसाच किंवा त्याहून जास्त अपमान इंदिरेचा तिच्या आई-वडिलांनी व भावंडांनी केला होता. पण ह्या पार्वतीचा महादेव आजारी असल्याने काही करू शकला नाही. पार्वतीहून श्रेष्ठ माझी आई मूग गिळून गप्प राहिली. आपल्या ‌नवऱ्याकरता व मुलांकरिता सगळ्या लोकांनी केलेले अपमान गिळत राहिली.अशा परिस्थितीत तिने आपल्या मोठ्या मुलाला व मोठ्या मुलीला नणंदेकडे मुंबईला शिक्षणासाठी ठेवले. त्याचे तरी भलं होऊ दे या आशेवर. आई -बाबा नेहमी त्यांचे ऋणी राहिले. आजारी नवरा, दिर व तीन मुलांना घेऊन ती संसाराचा गाडा हाकू लागली.

वडिलांना मडगांवच्या संँनोटरी सरकारी हाँँस्पिटलात ठेवले होते. त्यांची दोन ऑपरेशन झाली होती. एक फुफुस काढून टाकण्यात आले होते. अशा वेळी माझ्या आईवर जी आपत्ती आली होती तशी कोणावर ही येऊ नये रे परमेश्वरा! माझी आई खरंच महान! अशा प्रचंड संकटांना ती एकटी सामोरी गेली. त्यावेळी तिचे वय जेमतेम तीस पस्तीस असावं. ऐन तारुण्याचे वय, नवरा आजारी, मरणाच्या दारावर, लोकांच्या वाईट नजरा. पण, त्या सगळ्यांचा सामना तिने अत्यंत धैर्याने केला. जसे सावित्रीने सत्यवानाला यमाच्या हातातून परत मिळवले तसेच माझ्या आईने मरणाच्या दारातून माझ्या बाबांना परत घरी आणले.

त्या कालावधीत माझ्या आईने ज्या हालअपेष्टा सहन केल्या, धावपळ, पायपीट,‌ उपास-तपास केले व देवाचा धावा जो केला त्याहुन सावित्रीने सुध्दा कमीच केला असेल. त्यावेळी तिने जे भोगले, निभावले, जे कष्ट उपसल ते बघून लोकांनी तोंडात बोटे घातली. खरोखरच माझी आई एका योध्या सारखी परिस्थितीशी लढली व शेवटी जिंकली.त्यावेळी तिने केलेले नवस फेडण्यात तिने आपले उर्वरित आयुष्य खर्च केले. तीन वेळा तिने सोळा सोमवारचे व्रत केले होते. बाकीची व्रते व आठवड्याचे वार होतेच. देव-धर्म, पूजा-अर्चा, सोवळे-ओवळे हे सगळे करत असताना तिने घरातल्या बाकीच्यांना काही उणे केले नाही. पहिल्यांदा घरातल्या लोकांची जेवणे-खाणे आटपून नंतर ती स्वतःचा देवधर्म करायची. तर कधी भल्या पहाटे उठून आपली पूजा-अर्चा करायची व नंतर घरातल्या लोकांचे करायची. आठवड्याचे पाच दिवस तिचे उपवास असायचे. तसेच पूर्ण श्रावण महिना, नवरात्री ह्या कालावधीत उपवास करायची व पोथ्या वगैरे खूप वाचायची.

माझ्या लहानपणी पाहिलेली आई मला अजूनही आठवते. ती खूपच सुंदर होती. रंगाने गोरी, चाफेकळी नाक, घारे डोळे, काळे कुरळे केस, नाजूक ओठ लिपस्टिक न लावताच लावल्या सारखे भासायचे, मानेवर गोल केसांचा आंबाडा, त्यावर मोगरी व अबोली फुलांच्या वेण्या, कपाळावर मेण लावून गोलाकार केलेले कुंकू. तिची कुंकूवाची पेटी खास असायची लाकडाची, त्याच्यावर नक्षी काढली होती. कडीने उघडली की झाकणाच्या आतल्या बाजूला आरसा होता. ती पेटी उघडली की तो तिरका त्या पेटीवर ठेवायची. आत मेण(काळे) व कुंकूवाचे दोन छोटे करंडे, काजळाची डबी व कुंकू नीट करण्यासाठी एक लहानसा कपडा असायचा. आई पावडर कुंकू करत असताना मी तिच्याकडे निरखून पहायची. कपड्याचे बोट फिरवून ती आपलं कुंकू गोलाकार करायची. याचे मला नवल वाटायचे व संधी मिळताच मी पण तसा टीळा लावायचा प्रयत्न करायचे. पण मला जमतच नव्हते. उलट माझं कपाळ काळं व लाल झाल्याने आईला मात्र तिची पेटी उघडल्याचे कळायचे.

माझी आई चापून चोपून नऊवारी साडी नेसायची. मागचा कासोटा तिचा नेहमी सरळ असायचा. जरीच्या साडीचा असेल तर जास्तच छान दिसायचा. कपाळावर गोलाकार कुंकू, नाकात चमकी, कानात मोत्यांच्या कुड्या व गळ्यात काळ्या पिडुकांच(मणी) मंगळसूत्र किती सुंदर दिसायची माझी आई! बाबांचे आजारपण मला आठवत नाही. पण,आई मला कधी भावा बरोबर घरी ठेवून तर कधी मला घेऊनच कुंडई ते मडगांव हॉस्पिटलच्या फेऱ्या करायची. तो कालावधी माझ्या आईच्या आयुष्यातला अत्यंत कठीण गेला.

तो कालावधी आईच्या आयुष्यातला अत्यंत कठीण काळ होता. पण शेवटी बाबा बरे होऊन घरी आले.बाबा आपली पाठ कधीच उघडी ठेवत नसत.”बघू बघू तुम्हाला कुठं लागलं”असं मी म्हटलं की कधी तरी मला ते दाखवायचे त्यांच्या पाठीवर टाक्यांचे वण पाहून मला खूप भीती वाटायची. ‘बापरे!बाबा तुम्हाला दुखतं का?’असे मी विचारल्यावर बाबा गोड हसायचे व म्हणायचे ‘आता अजिबात दुखत नाही.’ त्या वळावर हात लावायला बाबांनी मला कधीच दिले नाही. ते आम्हा मुलांपासून जरा लांबच रहायचे. त्यांच्या सगळ्या वस्तूही आई वेगळ्याच ठेवायची आम्ही पहिल्यांदा दुकानाच्या घरातच राहत होतो. पण आता ते मोडकळीला आलेले. ते दुरूस्त करणे कठीण होते. म्हणून, आमच्या मोठ्या वडिलोपार्जित घरात राहावयास आलो. त्यावेळी बाकीच्या घरच्या लोकांनी आम्हाला विरोध केला. त्या घरात प्रत्येकाची वेगवेगळी कुंटुबें उठणं,बसणं,नहाणीघर,स्वंपाक घर वगैरे वेगळं,फक्त समोरचा मोठा दरवाजा व एक चौकी सगळ्यांना ये जा करण्यासाठी फक्त होती.लांबचे नातेवाईक व जवळचे चुलते सुध्दा आमच्यांशी भांडायला आले. पण बाबानी जिद्द पकडली, “माझं घर कोण मला हाकलतो? तुमचा आमचा काही सबंध येत नाही व मी आता पूर्ण बरा झालो आहे. मला दुसरीकडे जाणे परवडत नाही.

मी माझ्याच घरात राहणार,अशा वेळेला सगळ्या घरच्या लोकांनी आम्हाला वाळीत टाकले. कोणी बोलेनासे झाले. त्या सगळ्यांनी त्यांची जाण्या येण्याची वाट ही मागील दारातून केली.घरचा चौघांचा गणपती सुध्दा मागील दारी पुजेला बसवला. ऋषी पंचमीच्या दिवशी गोव्याची प्रथा आहे की,एकमेकांच्या घरी गणपती बसवलेले बघायला जायचे. गणपतीची जागा रिकामी असू नये म्हणून बाबांनी पुढच्या चौकीवर जी नेहमीची जागा त्यावर गणपती पूजला. एका घरात दोन गणपती म्हणून गावात र्किती सुध्दा झाली. नंतर कालांतराने मागील दारीचा गणपती पुढच्या चौकीवर आला. बाबा जिंकले.

आम्ही जेव्हां मोठ्या घरी आलो तेव्हां आईला जास्त त्रास सहन करावा लागला. सभोवतालचा व आर्थिक सुध्दा. आर्थिक भार थोडा हलका करण्यासाठी आईने वेगवेगळे उपक्रम सुरु केले. जसे लहान मुलांचे कपडे,दुपटी,बायकांची पोलकी,लोणची,पापड,शेवया मसाला इत्यादी. सगळं स्वतः आई कुटायची,कांडण, दळण,शिलाई ती सुध्दा हाताने करायची.कांडण दळण या मध्ये आबा मदत करायचा.व राखण करायचे काम माझ असायचं(पापड).

अशा वेळी बाबांनी विड्या बनवण्याची कल्पना काढली. व छोट्य विड्या बनवण्याचा कारखाना आमच्या घरात सुरू झाला. घरातली सगळीजणं ते काम करायला लागले. कुड्याची पाने जंगलातून आणणे , सुकवणे ,पाणी मारणे,एकावर एक रचणे,नरम झाल्यावर कापणे व नंतर तंबाखु घालुन विड्या वळणे. 50 विड्याचे एक अशी बंडले बांधणे. या विड्यांच्या कारखान्यात आबांचा सिंहाचा वाटा होता. गावांत कोणी विड्या घेत नसत.म्हणून आबा भाड्याच्या सायकलची रपेट करून लांब लांबच्या गावात त्या विकायचा व रात्री दमून भागून घरी यायचा. येताना थोडं धान्यही घेऊन यायचा नंतर आई शिजवायची व सगळी आवडीने खायची.

या वेळी घरात पैसा अडका नव्हता पण, एकमेकांवर एवढं प्रेम होते की,सगळी एकमेकांना जपायची. एकमेकांची काळजी घ्यायची. एकमेकांच्या पोटाचीही काळजी घ्यायची. माझी आई तर एवढी चलाख की, पानावर भात वगैरे वाढताना (भात तपेलीत वहायचा) जरा सुध्दा आवाज करायची नाही. समोर जेवणाऱ्या माणसाला तपेलीतल्या भाताचा अंदाज लागू द्यायची नाही. शेवटचे डावल सुध्दा वाढताना खट्ट असा आवाज होऊ द्यायची नाही. पण आईचा शाम (आबा) बरोबर हेरायचा ,पुर पुरे पोट भरलं म्हणायचा तर कधी पानात टाकुन उठायचा. तेवढंच आईच्याही पोटात जाऊ दे म्हणून.अशा वेळेला सगे सोयर व घरचे जरी आमचे शत्रू बनले तरी खालच्या जातीचे लोक म्हणजे गावडे,फडते,झलमी,इ. आमच्या जवळ आले. आणि हे सगळं माझ्या आईमुळे.

माझ्या आईचा स्वभाव प्रेमळ,बोलका व हसतमुख चेहरा होता. तिच्याशी जराशी ओळख झाली की,ते तिच्याशी ओळख कायम ठेवायचे. यामुळे आईचे खूप लोकांशी ओळखीचे नाते झाले. एवढ्या बिकट परिस्थितीत सुध्दा आईन कुणाकडे हात पसरले नाहीत. जे काय असेल तेवढ्या तुटपुंज्यात ती करायची. भयंकर मानी होती. उपास काढले पण लाचारी पत्करली नाही. व हे सगळे खालच्या जातीच्या लोकांना माहित असल्याने ते लोक आईला कपडे,दुपटी,पोलके शिवायची कामे देऊ लागले. तसेच आई दळण कांडण करताना त्या बायका येऊन आईला अधून मधून मदत करायच्या. आई ही दिलदार होती. कुणीही तिच्याकडे आलं की त्यांना चहा द्यायची. घरात खायला काही असेल तर ते ही द्यायची तसेच लोणचं , पापड, पाण्यातली कैरी इत्यादी द्यायची. गरीबीत सुध्दा तिची दानी वृती होती. व याचमुळे ती सर्वांना आवडायची.
आई गव्हाच्या पीठापासून शेवया बनवायची. त्या एवढ्या बारीक व एकसारख्या करायची की,तशा शेवया मोठ्या घरांतल्या बाकी कोणाच्याही व्हायच्या नाहीत. पावसाळ्यात त्या शेवयांचा गोड, तिखट शिरा व्हायचा. तर कधी गोड खीर बनायची तशीच माझी आई कापसापासून आरतीच्या बारीक वाती करायची. 720 वाती म्हणजे एक जोडवे.

तुळशीच्या लग्नात प्रत्येक सुवासिन आपले जोडवे लावत असते. त्या करिता माझी आई आपल्या चार सूना,तीन मुली व त्यांच्या सासवांकरता जोडवी करूनपाठवायची. तसेच तिने नवऱा व मुलांकरता नवस केलेले म्हणून लक्ष लक्ष वाती “श्री नागेश”(आईचा माहेरच कुलदेवत)नागेशी देवळात जाऊन लावल्या होत्या. माझी आई मुलांचे व बायकांचे कपडे शिवायची. कपडे शिवूंन झाल्या नंतर जो थोडासा कपडा रहायचा त्यापासून आई वेगवेगळ्या कलाकृतीचे (पोळेर)लहान मुलांच्या गोधड्या शिवायची. तसेच मोठ्या करता कौल्च शिवायची.तशा प्रकारचे कौल्च तिने सगळ्या मुलांना, मुलींना, जावयांना,नातवंडांना व ,नात जावयाला(माझ्या) सुध्दा करून ठेवला.जुन्या साड्यांपासून ती जाड जाड गोधड्या शिवायची. हाताने शिवायची पण,मशीनच्या टाक्यासारखे तिची शिवण असायची त्या शिलाईत सुध्दा तिचे कला कौशल्य होतेच. चौकोन,त्रिकोण,शंकरपाळी,लाडू,इ.लाल हिरव्या रंगाची गोधडी व त्यावर सफेद रंगाच्या धाग्याने केलेली शिलाईची कला खरोखरच दृष्ट लागण्या सारखी होती. अशा सर्वांना गोधड्या शिवून दिल्या. आमची सर्वांची पांघरूणे तिने शिवलेल्या गोधड्याच होत्या. माझ्या आईची ही कला कौशल्य माझ्या दोन्ही मुलींनी घेतलेली आहे.

माझी आई कधीच दुपारची झोपत नसे. तर कधी रिकामी बसायची नाही. तिचे हात सतत काही ना काही करत असायचे. वाती वळणे,शिवण करणे, गोधड्या शिवणे, माडणे,पोथी वाचणे,पेपर, कहाणी, कांदबऱ्या,नाही तर जप माळ ओढून नामस्मरण करणे चालूच असायचे. माझी आई जास्त शिकलेली नव्हती. तिला फक्त सही करता यायची. पण तिचं वाचन खूप दाडंग होतं. दासबोध,ज्ञानेश्वरी,शिवलीलामृत,गुरूचरित्र इ. सर्व देवांच्या पोथीची ती पारायणे करायची व श्रावण सोमवारी संपूर्ण शिवलीलामृत ती एकाच ठिकाणी बसून वाचायची. मलाही जमत व कळत नव्हतं ,तसली संस्कृत व जोडाक्षरे ती स्पष्ट वाचायची. तिला अशिक्षित म्हणणे म्हणजे लाजिरवाणेच!!

1962 साली डिसेंबरला गोवा स्वतंत् झाला.व माझ्याआईच्या संसाराला वेगळी अभिमानाची कलाटणी मिळाली. बाबांना सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाली. गावच्या लोकांंनी आक्षेप घेतला. पण त्यांना झूगारून बाबा लांबच्या गावी जाऊन शिकवू लागले. ऩतर मोठी मुलगी हीअकरावी चांगल्या गुणांनी पास होऊन गोव्याला आली. व तिनी ही शिक्षिकेची नोकरी पत्करली. आता सगळ बेतातंच पण छान होऊ लागलं. आई बाबा नाटक सिनेमाला जाऊ लागले. बाबांना आवड होतीच पण आईला ही ती आवड निर्माण होऊ लागली. इथं मला खास सांगावसं वाटतं की मी माझ्या आईबाबांना कधीच एकमेकावर रागावल्याचे,चिडल्याचेआवाज चढवल्याचे,भांडल्याचे पाहिले नाही. त्याचे नितांत प्रेम होते. दोघेही एकमेकांना खूप जपत होते. आईच्या मते तिचा पती परमेश्वर होता व बाबांची ही आई रूकमिणीच होती. आई बाबा कधी भांडल्याचे माझ्या लक्षांत नाही. त्या दोघांनी कधीच एकमेकांना दुखावले नाही. हा ! दुसऱ्यामुळे कधी वाद झाले पण, आपआपसांत कधीच नाही. एक अत्यंत सुंदर,आर्दश जोडपं होतं माझ्या आईबाबांचे.

मध्यंतरी आबांना मोठ्या भावाने मुंबईला बोलावून घेतले. पण त्याचा कल शिक्षणापेक्षा कामधंद्याकडे जास्त गेला. त्यातच त्याने एवढी प्रगती केली की सर्व चकित झाले. तल्लख बुध्दीच्या माझ्या भावाला वेळीच शिक्षण मिळाले असते तर? पण तो कुठेच कमी पडला नाही. आज कामत घराण्यात जे वैभव प्राप्त झाले ते त्याच्याच मुळे. त्याची बायको,माझी वहिनी ही तेवढीच समजूतदार. माझ्या आईचे खूपसे चांगले गुण तिने घेतलेले आहेत. बाबा नोकरीतून निवृत झाल्यावर दोघां तिघांची लग्न झाल्यानंतर सगळी मुंबईला आली. माझी आई सुध्दा मराठी,हिंन्दी व गुजराथी भाषा व लोकांत समरस झाली. मोडके तोडके बोलू लागली व आपल्या स्वभावानुसार माणसे जोडू लागली. काळ बदलला तशी माझी आई ही बदलली. सोवळं -ओवळं स्वतः पुरतंच ठेऊ लागली.

माझ्या आईबाबांना सगळयांनी एकत्र रहावं अस फार वाटत होतं पण, मुंबईत ते फार कठीण होतं. माझा मोठा भाऊ वहिनी दुसरीकडे रहायला गेले. त्या कालावधीत बाबांनी माझे लग्न उरकलं. आईला ते आवडलं नव्हते. पण बाबांच्या हट्टी स्वभावामुळे व तिचा भांडखोर स्वभाव नसल्यामुळे ती गप्प राहिली. माझ्या लग्नाला एक वर्ष होतंय तेवढ्यात बाबांना स्लो पँरलीसिह झाला. बोलणं व एका हाताची हालचाल कमी होऊ लागली. आई व माझ्या धाकटयाा बहिणीने त्याची खूप सेवा केली. शेवटी तर आबानी घरी नर्स पण ठेवली होती. डाँक्टर वेळोवेळी येऊन उपचार करत होते. पण उपयोग झाला नाही. दहा फ्रेब्रुवारी 1978 ला 6 वाजता सायंकाळी बाबांची प्राणज्योत मालवली. माझी आई खूप खचली. पण शेवटी नियती. माझ्या आईने बाबांचे काहीच कमी केले नव्हते तिच्या सारखी पतीसेवा करणारी बाई विरळच असेल.

मुलांनी व सूनांनी तिला सावरले. सुरूवातीला आई शांतच असायची. तिचा बोलका स्वभाव पण ती गप्पच असायची. काय तिच्या मनात चाललं होतं ते माहीत नाही. कुणाशी बोलली नाही. पुस्तक किंवा पेपर सारखी वाचत असायची. देव देव सुध्दा कमीच झाला होता. नंतर हळूहळू सावरली मुलांचे वैमव ही वाढत जाऊ लागले. गोव्याला “पेट्रोल पंप ” घेतला. “गोवा दाल बेसन मिल “आबांनी स्वतः च्या बुध्दीमतेच्या जोरावर काढली. आईचा आनंद ओसडून वाहू लागला. आबांनी काही चांगलं केलं ,त्याच चांगलं झालं की तिला धन्य धन्य वाटायचे. धाकट्या मुलीचे व मुलाचे सुध्दा लग्ने झाली. सगळ्या सुनांना साभांळून घेतलं. आता सासू -सुना म्हटले की, थोडी थोडी कुरबूर व्हायचीच! पण शेवटी सगळ्यांना आपुलकी व माया ही तेवढीच होती. माझ्या आईची आवड व तिचा उत्साह कौतुकास्पद होता. तिने आपल्या सात ही मुलाची नहाणी धुणी केली. तसेच आपल्या काही भावंडाची व आम्हा भावंडाची मुले या सगळ्यां नातवंडाना सुध्दा तिने तेवढ्याच ऊत्साहाने नाहू -माखू घातले. ते ही अत्यंत प्रेमाने व आवडीने करायची. तिने नातवंडांकडे कधी दुजा -भाव केला नाही. सगळ्यां नातंवडाची आजी ही तेवढीच लाडकी होती.

माझ्या दुसऱ्या मुलीच्या वेळी ती व माझी धाकटी बहीण माझ्याकडे रहायला आली होती. आईने माझ्या सोसायटीच्या अख्या लोकांशी मैत्री केली होती. माझ्या शेजाऱ्यांशी तिची दोस्ती माझ्याहून जास्त झाली होती. तिच्या मरणाच्य बातमीने सगळी सोसायटी हळहळली होती. आपल्या मुलांचे फोफावणारे वैभव ती पहात होती. त्यांच्या गाडी – घोड्यातून ती फिरली. जशी परिस्थीती बदलली तशी दुरावलेले माहेरचे भाऊबंध सुध्दा जवळ आले. आईच्या स्वभावानुसार अडी अडचणीत आपल्या कुवतीनुसार ती त्यांना मदत ही करू लागली. मागचा राग रोष,अपमान सगळे विसरून ती त्यांची परत आत्या झाली. वैभव प्राप्त झाल्यावर सुध्दा माझी आई गर्विष्ट झाली नाही. उलट जास्त दानी झाली. ती पूर्वी होती तशीच आपल्या भावंडावर,सुनांवर,नातवंडांवर,व सगळ्यांवर प्रेम करतच राहिली.

माझी आई खूप हौशी होती.नाटक-सिनेमा व वेगवेगळ्या धर्म स्थळांना भेटी द्यायची तिला आवड होती. पण या सगळ्या तिच्या इच्छा पुऱ्या झाल्या नाहीत. माझ्या आईने जेवढे हाल,यातना,अपेष्टा भोगल्या,जेवढे कष्ट उपसले त्या मानाने, जेव्हा सुखाचे दिवस आले तेव्हा जेवढे भोगायचे तेवढं तिला मिळाले नाही. आणखी थोडी जगली असती तर ते उपभोगता आले असते. माझ्या वडिलांना मुलांचे वैभव लाभले नाही. आईला थोडेसे मिळाले. पण सर्वांना हवी हवी अशी वाटणारी माझी आई देवालाही हवीशी वाटली. 1990 साली भाऊबीजेच्या दिवशी माझ्याकडे सगळ्या भावांनी एकत्र यायचे ठरवले. माझ्या आईचीच इच्छा होती ती. पण नियतीला ती मान्य नव्हती. भाऊबेजेच्या सकाळीच तिला ह्दयाचा तीव्र झटका आला व त्याच रात्री 12.40 ला माझी आई यमाला ओवाळायला गेली.

आयुष्यभर सतत कष्ट उपसणाऱ्या माझ्या आईला थोडे सुखाचे दिवस येताच देवाचे आमंत्रण आले व आम्हा सर्वांना पोरकं करून ती गेली. पण तिची जिद्द, चिकाटी, हिंमत स्वाभिमान,कनवाळू व प्रेमळ स्वभाव,कोणत्याही परिस्थीत ताठ मानेनं जगण्याची वृती हे सगळं आम्हां मुलांच्या अंगी मुरवून गेली.अशी आई जन्मोजन्मी आम्हाला लाभावी अशी ईश्वर चरणी प्रार्थना. अशी होती माझी प्रेमळ आई !

    ।। मातृ देवो भव ।।


    सौ. शोभा वागळे
    मुंबई
    8850466717

Leave a comment