” आरसा गमावलेली माणसं ! “

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    कवयित्री विद्या जाधव यांचा आरसा गमावलेली माणसं हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. कवयत्री विद्या जाधव या पेशाने शिक्षिका आहे. समाजामध्ये दररोज वेगळ्या प्रकारच्या घटना घडतात, अनेक प्रसंग पाहायला मिळतात या सगळ्याचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी केलं आहे.समाजाचं, निसर्गाचं,मानवाचं, मानवी संबंधांचे बारकाईने निरीक्षण केले आहे.त्याचं प्रतिबिंब आपल्याला त्यांच्या कवितांमधून पाहायला मिळतं आहे.मानवी जीवनाचे वेगवेगळ्या प्रकारचे पैलू त्यांच्या कवितांमधून व्यक्त होतात. त्याचप्रमाणे मानवी जीवनामधील अनेक नाती अगदी सोप्या शब्दात त्यांनी उलगडून दाखवली आहेत. समाजातल्या बऱ्या वाईट घटनांचे प्रतिबिंब त्यांच्या कवितेतून व्यक्त होत आहे. अनेक असणाऱ्या ज्वलंत समस्या आणि त्यावर त्यांनी परखड भाष्य केले आहे.

    मुळातच कवयत्री शिक्षिका असल्यामुळे त्यांचं मन संवेदनशील आहे. या संवेदनशील मनातून अनेक संवेदनशील कवितांची निर्मिती झाली आहे .समाजातल्या अनेक घटकांचा एक शिक्षिका या नात्याने त्यांचा नित्य संबंध येत आहे आणि या संबंधातून, निरीक्षणातून कवितांची निर्मिती झाली आहे. स्वतः त्या एक स्री असल्यामुळे स्रियांची अनेक सुख दुःख त्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतात . स्रियांच मन संवेदनशील असल्यामुळे फुलं ,निसर्ग, प्राजक्त याविषयी त्यांना वाटणारी हळुवार संवेदनशीलता त्यांच्या कवितेमधून व्यक्त होते. त्यांच्या कवितासंग्रहात एकूण एकूण 77 कविता आहेत. कवितासंग्रहातील सगळ्याच कविता आशय संपन्न आहेत.

    कष्टाचे मोल माझ्या रे
    बाप भिजलेल्या घामा
    भाव मिळणा त्याचा रे
    पिकवलेल्या या राना

    नशिबाच्या रेघा या त्यांच्या पहिल्याच कवितेतून शेतकऱ्याच्या जीवनातील दुःख त्यांनी अगदी मार्मिक शब्दात व्यक्त केलं आहे.

    लेखणी माझी धारदार
    लखलखती जणू तलवार
    करते ती साऱ्यांवर वार
    प्रश्नांचा करून भडिमार

    माझी लेखणी या कवितेमधून कवी लेखक यांच्या लेखणीतील ताकद त्यांनी अतिशय समर्पक शब्दात मांडली आहे.

    पाकळी जपलेला सुगंध
    फुलातून उडून गेला
    जन्मदात्याचा काळजाचा तुकडा
    आश्रमात सोडून गेला

    आयुष्याच्या धडा या कवितेमधून समाजातील ज्येष्ठांची होणारी अवहेलना अगदी योग्य अशा शब्दात मांडली आहे. कविता वाचताना माणसाचं मन हेलावून जाते.

    बुद्धीची स्पर्धा तर केव्हाच
    मागे पडली
    पडेल तुला भ्रांती आहे
    मी विश्व क्रांती

    क्रांती या कवितेमधून पुरुष प्रधान संस्कृती ला एक चपराक देण्याचे काम केले आहे. स्री प्रत्येक पातळीवरील पुरुषांशी बरोबरी करते याचं सुंदर वर्णन कवयित्रींनी केलेले आहे.

    घेऊ नका कसला घास
    घ्या फक्त एकच ध्यास
    गर्भ कळ्यांना घेऊ द्या
    तुम्ही फक्त मोकळा श्वास

    गर्भ कळी या कवितेमधून मुलीचं घरात असणं किती सुंदर आहे हे मांडलं आहे आणि त्यामुळे होणारी स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे असा मोलाचा संदेश कवितेमधून व्यक्त होतो.

    एखाद्या सावळ्या रंगाच्या स्रीची
    आता होते त्यांना सावळ बाधा
    आणि काळयारंगाचे तर विचारूच नका
    सारखी टोमणे बाधा
    हे मात्र कशी असले काळे कुळे नकटे चपटे बुटके
    सुकडे काडी पहिलवान
    यांचा मात्र सगळीकडेच तुरा बांधा

    माणसं अशीच असतात या कवितेमधून स्रीच रूप रंग आणि समाजाची मानसिकता यावर प्रखर भाष्य या कवितेत केले आहे .समाजाची स्रियांकडे पाहण्याच्या मानसिकतेवर जोरदार प्रहार या कवितेत केला आहे.

    ममतेच्या पुरामध्ये
    सैर वाहत मी होते
    आईच्या कुशीत हळूच
    जाऊन निजत होते मी

    बालपण या कवितेत बालपणाची आठवण आणि मज्जा मांडली आहे पण ज्यांच्या नशिबी अनाथ बालपण येते त्यांची व्यथा आपण या कवितेतून मांडली आहे.

    आताच्या प्रत्येक शब्द न शब्द आठवतो
    तिची प्रत्येक आठवण मनाला हुरहुरून जाते
    पण आता काय फायदा
    जेव्हा कदर करायची तेव्हा कदर केलीच नाय

    न समजलेली आई या कवितेमधून आपण आईला गृहीत धरतो आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आई गेल्यानंतर होणारी मनाची भावना या कवितेमधून मार्मिक पद्धतीने व्यक्त केली आहे.

    माझ्या अंगणी
    झुलतो मैत्रीचा झुला..

    मैत्रीचा झुला या कवितेतून मैत्रीच सुंदर वर्णन केले आहे मैत्रीचा झुला हे कवितेचे शीर्षक बरंच काही सांगून जातं.

    नित्यनेमाने आलो पंढरी
    काय हा खेळ मांडला उरी
    जग बुडण्या आली महामारी
    देवा तार तू आम्हा परी

    वारी 2020 या कवितेमधून भक्त आणि पंढरीच्या विठुराया यांच्या मधील भावना मांडली आहे.

    माझं माझं म्हणत
    सार आयुष्य कष्टायच
    एक दिवस सारे घबाड दुसऱ्याच्या नावावर देऊन जायचं
    म्हणून माणसा आनंदाने जगुन घे जरासा

    आनंदाने घेत आनंदाने जगुन घे जरासा या कवितेमधून मानवी जीवनाची क्षणभंगुरता व्यक्त केली आहे. मानवाने जीवनाचा उपभोग योग्य पद्धतीने घेऊन जीवनाचा आनंद लुटला पाहिजे असा मोलाचा सल्ला या कवितेतून मिळतो.आरसा गमावलेली माणसं हे वेगळे शीर्षक असलेल्या काव्यसंग्रहात आपल्याला वेगळ्या प्रकारच्या कविता वाचायला मिळतात. कवयित्रीच्या निरीक्षणाला चिंतनाची जोड आहे त्यामुळे केवळ शब्दांच्या खेळात न राहता प्रत्येक कवितेतून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या कवितासंग्रह मधील सर्व कविता असे संपन्न आहेत. कोणताही कवी कविता लिहित असताना त्यातून समाजाला काहीतरी बोध मिळावा हा त्याचा उद्देश असतो. कविता लिहित असताना त्याने समाजातील अनेक घटकांना केंद्रित केलेले असते. समाजाचं निरीक्षण चिंतन करण्याची एक वेगळी दृष्टी कवीकडे असावी लागते. या कवितासंग्रहात समाजातील अनेक वाईट गोष्टीवर कवितेच्या माध्यमातून प्रहार केले आहे. वाचकाला विचार करायला भाग पाडले आहे. या कवितासंग्रहात कवितेच्या माध्यमातून जे चिंतन मनन त्याचा फायदा समाजाचं सामाजिक नैतिक पर्यावरण उंचावण्यास नक्कीच मदत होणार आहे.

    प्रा. कुंडलिक कदम
    लेखक, व्याख्याते
    तळेगाव ढमढेरे.
    तालुका. शिरूर
    जिल्हा. पुणे
    ——————————
    पुस्तकाचे नाव. आरसा गमावलेली माणसं
    कवयित्री. विद्या प्रशांत जाधव
    प्रकाशक …परिस पब्लिकेशन पुणे
    पाने,96
    किंमत.. 150 रुपये

Leave a comment