कवयित्री शितल राऊत यांच्या नुकताच ‘पिवशी’ हा पहिला काव्यसंग्रह गौरव प्रकाशन, अमरावती द्वारा प्रकाशित झाला. मुळात ‘पिवशी’ हे शीर्षक वाचताक्षणी डोळ्यांपुढे बालपणीचा काळ तरळतो. प्रत्येकाच्या आजीच्या कमरेला मोठ्या दिमाखात विराजमान झालेली ती पिवशी आठवते. त्या पिवशीमध्ये ठेवलेल्या वस्तूचे जसे प्रचंड आकर्षण प्रत्येकाला होते अगदी तसेच या कविता संग्रहातील प्रत्येक कविता वाचतांना वैविध्यपूर्ण विषयाच्या आशयघन कविता वाचकाच्या अंतर्मनाला सुखाणाऱ्या आहेत.
महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य तथा युवा कादंबरीकार मा. पुष्पराज गावंडे यांची लाभलेली प्रस्तावना व राठोड सरांनी तयार केलेले सुबक व सुंदर मुखपृष्ठाने पिवशीला सोन्याची झालर चढविण्याचे काम केले आहे.
कवयित्री शितल राऊत ह्या व्यवसायाने शिक्षक आहेत. गेले दहा वर्ष त्या आपल्या पेशा सांभाळून साहित्यक्षेत्राची निष्ठेने सेवा करत आहेत. अगदी याचेच प्रतिबिंब त्यंच्या कवितेत तंतोतंत प्रतिबिंबीत होण्याचा वाचकाला वारंवार प्रत्यय येतो. आपल्या लिखाणात संसाराचा गाडा हाकतांना अध्यात्माची सांगड घालण्याची त्यांची चुणूक वाखाणण्याजोगी आहे.
मुळात कवयित्री शितल राऊत यांचा स्वभाव संवेदनशील आहे. त्यांची संवेदनशीलता कधी हिरव्या निसर्गाला टिपते तर कधी आईचे अश्रू अलगद झेलून आपल्या लेखणीतून बोलीभाषेच्या माध्यमातून समाजापुढे मांडते.
‘माय’ या वऱ्हाडी कवितेत पूर्वीची घर सांभाळणारी आई आणि आजची नोकरी करणारी आई रेखाटतांना त्या व्यक्त होतात,
- काय बदलले सांगा?
- बाईची जागा फक्त
- काल होती वावरात
- आज जाते आपीसात
कवयित्री स्वतः स्त्री असल्याने व गृहिणी, आई,शिक्षिका या भुमिका स्वतः निभावत असल्याने या कवितेत सुचण्यापेक्षा सोसण्याची भावना अंतर्मनात घर करून जाते.
या काव्यसंग्रहातील कविता वाचतांना देशभक्तीपर कविता,शालेय कविता,स्त्री सुलभकविता,शेतीविषयक कविता,पारमार्थिक कविता,सामजिक कविता, जीवनविषयक दृष्टिकोन सांगणाऱ्या कविता, मुक्तछंद, अष्टाक्षरी,अभंग आणि वऱ्हाडी कविता अशा सर्वच प्रकारचे मिश्रण असल्याने कवितासंग्रहाला दिलेले ‘पिवशी’ हे नाव खऱ्या अर्थाने सार्थक झाल्याचे समाधान वाटते.
मनातील देशभक्ती व्यक्त करतांना कवयित्री स्वातंत्र्य नावाच्या कवितेत अतिशय मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या आहेत. स्वातंत्र्य ही कविता संपूर्ण भारतीयांची प्रातिनिधित्व करणारी ठरते. आपल्या लिखाणातून सकारात्मकतेचा संदेश देत ‘दिस जाईल निघून’ या कवितेत वाचकांच्या मनात नवचैतन्याचा झरा निर्माण करतांना त्या लिहितात,
- नको जाऊ तू हरुन
- गेलं सगळं सरून
- देव पाहतो वरून
- येई संकटी धावून
- पक्षी चोचीत धरून
- दाना आणतो दुरून
- तोच देई चोच दान
- जो राखतो संतुलन
साहित्यातून समाजभान जपत कर्मयोगी गाडगे महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे चालवण्याची ताकद कवयित्री शितल राऊत यांच्या लेखणीतून स्पष्ट जाणवते. अगदी बालपणापासून घरातील आध्यात्मिक वातावरणाचा लिखाणावर प्रभाव पडलेला आहे. ‘संतवाणी’ या कवितेत वाचकाला त्याची प्रचिती येते.
- संतवाणी सांगे। उद्धार जगाचा।
- जल्लोष नामाचा। करोनिया॥
- जैव जंतू दया। असू द्यावी ध्यानी।
- सम भाव मनी ठेऊनिया॥
कधी दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या बापाच्या भुमिकेत,कधी कास्तकारच्या भुमिकेत, कधी माणुसकीचे लेणे लेऊन तर सामाजिक प्रश्नावर घणाघाती वार करणारी,स्त्रियांच्या भावनांचे प्रतिनिधित्व करणारी शितल राऊत यांची पिवशी सर्वार्थाने यशस्वी झाल्याचे दिसते. सर्व वाचकांना ही पिवशी आवडेल हा विश्वास व्यक्त करून कवयित्री शितल राऊत यांच्या साहित्यिक वाटचालीस अनंत शुभेच्छा देऊन त्यांच्या ‘भरारी’ कवितेतील खालील ओळींनी समारोप करतो.
- उंच भरारी घे नभी
- बळ आणुनी पंखात
- झेप घ्यावया आकाशी
- झेल तू कष्टाची रात
- पिवशी मूल्य:- १०० रुपये
- गौरव प्रकाशन अमरावती
- (पुस्तकासाठी 9422156996, 9422156697 या क्रमांकावर संपर्क करावा)
- -प्रविण जगन्नाथ बोपुलकर
- पनवेल मुंबई