रोज असता तुम्ही विचारात,जाणीवेत, कृतीतही , असलाच पाहिजे तुमच्यामुळेच तर आहे हा सारा आत्मविश्वासाचा वावर. आज देशातील समग्र महिलावर्गास लाभलेली सारी सुखं, स्वावलंबन, दृष्टी-दृष्टिकोन आणि विचार तुम्हीच दिलेत! तुम्हीच केल्यात विकसित आमच्या विचार आणि ज्ञानकक्षा…
क्रांतीबा आजोबा, त्या प्रतिकूल सनातन काळ्या करंट्या काळात कैक वर्ष पुढे बघण्याचे द्रष्टेपण, इथल्या मूलभूत प्रश्नाला भिडण्याचे, समतेसाठी ठाम उभे राहण्याचे, विचार कृतीत आणण्याचे, व्यवस्थेला हादरे देण्याचे, सारे सोसूनही मागे न हटण्याचे, घरापासून बदलाची सुरुवात करण्याचे, पुरुष असून मातृह्र्दयी पुरुष होण्याचे, काळाला आणि दुष्टांना झुकवण्याचे, अक्षर ओळख करून अवघ्या स्त्री वर्गाचा उद्धार करण्याचे, दांभिकाना पुरून उरण्याचे, असत्याचा मुखवटा टराटरा फाडण्याचे, सनातन वर्चस्वाला घाम फोडण्याचे, पुरुषसत्ताक अव्यवस्थेला बदलवण्याचे, पारंपरिक कर्मठ अविचारांना गाडण्याचे, अलौकिक स्त्री शिक्षणाचा इतिहास घडवण्याचे, पत्नीवर निस्सीम प्रेम करत प्रेमाचा खरा अर्थ जगाला सांगण्याचे, शब्द आणि कृतीत शत प्रतिशत उतरविण्याचे आणि आज नसूनही प्रत्येक विवेकी मनमेंदूत ठाण मांडून बसण्याचे अद्वितीय धैर्य, शौर्य, औदार्य, कर्तृत्व, नेतृत्व, दातृत्व केवळ तुमच्याठायीच आहे, होते आणि राहील.
तुम्ही आणि माई आजही देताय प्रेरणा आम्हास! संकटं कितीतरी आली पण तुम्ही डगमगला नाहीत, लढत राहिलात इथल्या अंधश्रद्ध, शोषक आणि कर्मठ बेरकी रूढीवाद्यांशी अगदी निर्भीडपणे. तुमचा प्रवास कमालीचा प्रतिकूल खडतर पण तुम्ही जिंकलात जिद्द, निश्चयाच्या जोरावर आणि नेस्तनाबूत केलीत इथल्या मुठभर लोकांची शिक्षणातील एकांगी मक्तेदारी…संधीच मिळत नव्हती युगानुयुगे तर कसे सिद्ध करणार होतो आम्ही स्वतःला? आणि तुमच्या कष्टाने संधी मिळाली तर साऱ्याच क्षेत्रात करू शकलोय स्वतःला सिद्ध, आमची क्षमता, कुवत आकळत गेली आम्हाला, लढतोय, झुंजतोय, कोसळतोय , कोलमडलो जरी पुन्हा नव्याने उभे राहतोय , हे तुमच्या आख्ख्या प्रवासातून शिकलोय हे की, सत्य, स्वच्छ, आणि समाजहिताच्या, न्यायाच्या बाजूचे असाल तर चालत राहा अविरत, भय,भ्रम निर्माण केले जातील चारित्र्यहनन होईल आणि व्यक्तिगत हल्लेही होतील तरी राहा अविचल , होऊ नका विचलित. विचलित झालात तर विरोधक जिंकेल त्यामुळे आपल्या ध्येयावर रहा स्थिर, भक्कम !
मेंढरं नाही आम्ही ‘मेंदू’ असलेला ‘माणूस’ आहोत ह्या आमच्या मानसिक गुलामीच्या जोखडाची जाणीव करून दिलीत तुम्हीच प्रथम. ग्रहगोल त्यांच्याच कक्षेत फिरतात, त्यांच्या माणसाच्या जगण्यावर कसला आलाय परिणाम? दगड-गोटे, पूजाविधी, दान-दक्षिणा म्हणजे तुमच्या शोषणाची साधनं आहेत, तुमच्या घामाच्या पैशावर कष्ट न करता विनासायास ऐतखाऊ जगण्याचे ब्राम्हणी षड्यंत्र आहे हे तुम्हीच सिद्ध केलेत. कपोलकल्पित कर्मकांड नाकारून वास्तवात जगायला शिकवणारे तुम्हीच. युगायुगांच्या गाफील निद्रेतून तुम्हीच केलेत आम्हाला म्हणून तर ते मुठभर आजही करतात तुमचा रागराग, उपेक्षा; कारण तेच बापडे आले नाहीत अजूनही नीटसे ‘माणसांत’!
तुम्ही, माईने, फातिमाबीने दिलेलं ‘अक्षरांचं दान’ झिरपत गेलंय आज शेवटच्या माणसापर्यंत. कित्ती कित्ती झिजलात, राबलात आमच्यासाठी क्रांतीबा, शाळा उभारल्या, खस्ता खाल्या, झोप उडवून घेतली, अनाथ पोरं सांभाळली, राहतं घर सोडलं, नाडल्या-पिडल्या आई-बहिणीला विश्वास-हक्काचा निवारा दिलात. खरंच, कोणत्या मातीचे आणि मतीचे बनला होतात क्रांतीबा तुम्ही? अन्यायाचा प्रतिकार करता यावा म्हणून ,’गुलामगिरी’ नाकारता यावी म्हणून ,’शेतकऱ्याचा आसूड’ रोखता यायला हवा म्हणून ‘अखंड’पणे झिजलात आम्हा साऱ्यांसाठी. भारताच्या आधुनिक समाजक्रांतीचे जनक बनलात. करोडोंची प्रेरणा, स्फूर्ती , बळ, ऊर्जा बनलात. तुमचे स्थान आणि योगदान अढळ आहे आणि राहील. डोकं शाबूत असणाऱ्या इथल्या प्रत्येक माणसाचे, शेवटच्या स्तरातील लेकराचे तुम्ही ‘हिरो’ आहात आणि राहालच जोवर इतिहास, सृष्टी , पृथ्वी आणि माणूस अस्तित्वात आहे तोवर….थोर उपकार आहेत तुमचे या देशावर, आमच्यापरिने तुम्ही दिलेली वैचारिक शिदोरी आणि समाजक्रांतीचे तत्व प्रामाणिकपणे जोपासत, रुजवत राहूच क्रांतीबा! इथे शिक्षित काय आणि अशिक्षित काय? सारेच सारखे झालेत अलीकडे माणसं आडनाव, गाव-शिव पाहून चट्कन विभागणी करतात तसेच महामानव जातीपातीत वाटून घेण्याची ह्या मूर्ख लोकांत स्पर्धाच लागलेली दिसतेय, अर्थात ही कीड आजची नाही पूर्वापारपासून नासवते आहे त्यांचे मेंदू. आपण समता सांगायला जावी तर हे आपल्याला ‘देशद्रोही’ असल्याचे प्रमाणपत्र देऊन मोकळे होतात अर्थात हा ‘प्रमाणपत्र वाटपाचा’ मक्ता पुन्हा ‘त्यांनीच’ घेतलाय ज्यांना ह्या देशाच्या हितात, प्रगतीत आणि स्वातंत्र्यात कधीच स्वारस्य नव्हतं हे अधिक हास्यास्पद आहे. आताशा त्यांचा मागासपणाचा राग येत नाही तर करुणाच अधिक वाटते. मागून आलेले लोक वैचारिक प्रगल्भ झालेत आणि हे बापडे अजून पुराणातच जगत आहेत.
आपण सारे समान आहोत म्हणत तुम्हीच पहिला हादरा दिलात इथल्या स्वार्थ, धूर्त, लबाड चालीरिती लादणाऱ्या सडक्या-कुजक्या मेंदूना, बहुजन प्रतिपालक, कल्याणकारी शिवाजी राजांची समाधी शोधून काढलीत प्रथम तुम्हीच, दिलीत नांदी धडकी भरवणारी इथल्या प्रतिगामी स्वार्थी भामट्यांना, बाबासाहेबांचे गुरू झालात सर्वार्थाने! म्हणून आमचे आजोबा आहात आणि बाबासाहेब ‘बाप’, आजी साऊमाय आणि रमाईतच त्यागी,सोशिक,समंजस ‘माय’ दिसते आम्हाला. ‘जिजाऊ’ आमची पणजी आणि शिवबा आणि शाहू महाराज प्रेरणा स्थानं आहेत आणि राहतील सदैव…..बापरे केवढा मोठ्ठा वैचारिक अलौकिक, थक्क करणारा काव्यात्म प्रवास आहे हा! हा विचार वारसा कृती-उक्तीतून जपू, चालवू अन पुढच्या पिढीत खात्रीशीर रुजवू निदान एवढेतरी तरी करूच शकतो आम्ही…..आणि करूच! तुम्हाला विनम्र अभिवादन!! कोटी कोटी प्रणाम !!!
#क्रांतीबा ज्योतिबा फुले जन्मदिवस
#अभिवादन महामानवा!
-डॉ.प्रतिभा जाधव,नाशिक
११ एप्रिल २०२२