महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म ११एप्रिल १८२७ ला सातारा जिल्ह्यातील कडगुण येथे झाला. जोतीरावांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती.गोविंदरावांना उदरनिर्वाहासाठी अहोरात्र झगडावे लागेल. त्यांनी पुण्याला येऊन भाजीपाल्याचा व फुलांचा व्यवसाय केला .त्यांचे उपनाव गो-हे होते. पण फुलांचा व्यवसाय मुळे लोक त्यांना फुले म्हणू लागले.
तो काळ अतिशय धकाधकीचा होता. परकीय सत्ता भारतात राज्य करीत होती. तसेच भारतातील समाजव्यवस्था विषमतेने बरबटली होती. सारीकडे अन्यायाचा आगडोब भरला होता. अशा कठीण परिस्थितीत गोविंदरावांनी मुलाला १८४१ला एका स्कॉटिश मिशनच्या इंग्रजी शाळेत घातले तेव्हा. ते चौदा वर्षांचे होते. या शाळेत खऱ्या अर्थाने ज्योतिरावांना मानवतावादाचे शिक्षण मिळाले.
समाजव्यवस्थेचे दहाक चित्र समजले अस्पृश्यतेच्या हाल-अपेष्टा शुद्राचे कष्टमय जीवन, स्त्रियांची विटंबना, शोषण ,शेतकर्यांची दैनावस्था इत्यादी समस्येकडे त्यांनी डोळसपणे पाहिले. त्यांच्यावर थाॅमस पेन या विचारवंताच्या “मानवाचे हक्क” या पुस्तकाचा मोठा प्रभाव पडला. त्यांना अभ्यासांती कळले की या सर्व समस्यांना कारणीभूत जर काय असेल तर येथील अज्ञानी धर्मग्रंथ, समाज ,व्यवस्था व राजव्यवस्था होय.
या सर्व समस्यांवर आळा बसवायचा असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. रूढी परंपरेच्या चक्रव्यूहात सापडलेल्या समाजाची सुटका करायची असेल तर ज्ञान मार्ग दाखवावा लागेल. त्यांना शिक्षण दिले पाहिजे. म्हणून स्वतःच्या पत्नीला शिक्षित करून समाज शिक्षणाचा पाया घातला. १जानेवारी १८४८ ला भिडे वाड्यात भारतातील पहिली मुलींची शाळा काढून स्त्री शिक्षणाची सुरुवात केली. स्त्री शिक्षणाबरोबरच अस्पृश्य बहुजनाला शिक्षणाच्या प्रवाहात आणून भारतात नव्या शिक्षणाचा क्रांतीपर्वाचा पाया घातला. म्हणून जोतीराव हे भारतीय ज्ञान क्रांतीचे आद्य जनक ठरतात. शेतकऱ्याचा असूड, या ग्रंथाच्या शिक्षणाविषयी उपोद्घात विचार मांडताना म्हणतात की, विद्येविना मती गेली ,मतीविना नीती गेली ,नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले ,इतके अनर्थ एका अविद्येने केले ..!
जोतीरावांच्या कार्यात सावित्रीबाई त्यांची सावली झाल्यामुळे आज स्त्री शिक्षणाचे आद्य जनक सावित्रीबाई झाल्या. स्वतःला हाल अपेष्टा सहन करून ज्ञानाची ज्योत पेटवली व समाजाला उजेडाचे चांदणे दाखवले. त्या चांदण्याचा प्रकाश स्त्रीचा मेंदू पटलावर पडल्याने स्त्रीदास्य श्रृखंला गळून गेली व आज ती स्वाभिमानी झाली.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी फक्त शिक्षणासाठी कार्य केले नाही तर समाजातील वाईट चालीरिती वर आसूड ओडले .तृतीय रत्न, छत्रपती शिवाजी राजे पोवाडा, ब्राह्मणांचे कसब ,गुलामगिरी ,शेतकर्याचा असुड, इशारा ,सार्वजनिक सत्यधर्म अशा नव्या ग्रंथाची निर्मिती करून प्रस्थापितांची मक्तेदारी समाप्त केली. बहुजनाला फसवणाऱ्या भाकड ग्रंथाची चिरफाड करून भारतीय समाजाला नव्या ज्ञान मार्गाकडे नेण्याचे क्रांतिकारी कार्य त्याने केले. १४सप्टेंबर १८७३ ला सत्यशोधक समाजाची स्थापना करून नव्या मूल्य गर्भ विचारांची पेरणी केली .देवधर्म माणसाला कसे फसवतात यावर चिंतन केले. शेवटच्या क्षणापर्यंत ते समाजासाठी देशासाठी झटले. बहुजनाला नव्या लढाईला सज्ज केले. शिवाजी महाराजांच्या विचारांची ध्वजा जगतात फडकवली. अशा थोर ज्ञानक्रांती जनकाचे २८ नोव्हेंबर १८९० ला महानिर्वाण झाले. त्यांनी समाज उन्नतीचा जो वसा घेतला तो यशस्वी करुन दाखवलेला आहे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे मिळून शिक्षणाची नवी ध्येय धोरणे आखून आपल्याला फसवणाऱ्या सर्व शक्तींचा बिमोड केला पाहिजे. हीच राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना खरी आदरांजली ठरेल.
- संदीप गायकवाड
- नागपूर
- ९६३७३५७४००