आपला भारत देश हा खेड्यांचा देश आहे. येथील ७०% लोक खेड्यात राहतात. खेड्यातील बहुतांश लोक गरीबीचे, दारिद्र्याचे, हलाखीचे, कष्टमय, भटक्या स्वरूपाचे जीवन जगतात, जगत असतात. शहरांप्रमाणे खेड्यातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सार्वजनीक रस्ते, आरोग्यासाठी दवाखाने, वीज, शिक्षण घेण्यासाठी उच्च दर्जाच्या शाळा, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सार्वजनीक गटारी, रोजगाराच्या सोयी-सुविधा अशा मूलभूत सुविधा नाहीत. यावरून असे लक्षात येते की, किंवा खरे पाहिले तर असे जाणवते की, गरीब, वंचित, दुर्लक्षित, शोषीत, पिडीत, अन्यायग्रस्त, दिन-दुबळे यांना आवाज निर्माण करणार्या म्हणजेच ध्वनी निर्माण करणार्या साधनांची अडचण, समस्या, अडथळे मुळीच नाही. खरी अडचण, समस्या, त्रास, अडथळे आहे ते म्हणजे श्रेष्ठ-कनिष्ठ, उच-निच, गरीब-श्रीमंत, स्पृश्य-अस्पृश्य, जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद, वर्णभेद, व्यंग भेद, पोषाख भेद, भाषा भेद असा भेदाभेद करणार्यांची.
दैनंदिन जीवनात त्यांना खरी समस्या, अडचण, त्रास, अडथळे आहे ते म्हणजे दररोज वापरल्या जाणार्या निकडीच्या व जीवनोपयोगी वस्तूंच्या किंमतीमध्ये सातत्याने होणार्या दर वाढीची, महागाईची, विकृती लोकांच्या दृष्टीची, त्यांच्या प्रती असलेल्या असंवेदनशील मनांची, त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणार्यांची, त्यांना संधी न मिळाल्याची, त्यांच्या सुखदु:खांशी समरस न होणार्यांची, त्यांना हिनतेच्या दृष्टीकोनातून बघणार्यांची, त्यांच्या गरीबीचा, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेणार्यांची, त्यांच्याशी अनीतीने वागणार्यांची, त्यांच्याविषयी कळकळ न वाटणार्यांची, त्यांना समजून न घेणार्यांची, त्यांच्या मनाशी खेळणार्यांची, त्यांच्याशी अविश्वासपूरक, बेपर्वाईने वागणार्यांची, त्यांच्यावर हुकूमत गाजवणार्या अविवेकी विचारांची, त्यांना क्षुद्र समजणार्यांची, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांना गैर मार्गाला लावणार्यांचा, स्वार्थ भावनेतून त्यांच्यावर आक्रमक होणार्या वृत्तीची, त्यांच्या हाताला काम न देणार्या यांत्रिक साधनांची आणि विशेष म्हणजे शिक्षणाचे खाजगीकरण झाल्याची व बेरोजगारीची.
उपरोक्त उल्लेखीत असलेल्या समस्या, अडचणी, अडथळे गरीब, वंचित, दुर्लक्षित, शोषीत, पिडीत, दुर्बल व हलाखीचे, कष्टमय जीवन जगणार्या समाज घटकांना चांगले जीवन जगण्याची संधी देत नाही. त्यांच्याप्रती असलेल्या या भेदाभेदीमुळे त्यांच्या विकासप्रक्रियेत अडथळे, समस्या, अडचणी निर्माण होतात. मानवी दृष्ट्या त्यांना समृध्द जीवन जगता येत नाही. त्यामुळे या लोकांकडे सुप्त गुण, कौशल्ये, क्षमता असूनही त्यांना विकासाची अपेक्षित पातळी गाठता येत नाही. हा समाज घटक देश विकासातील मानवी बल असूनही त्यांना देशाला प्रगत, विकसित करण्याची फारशी संधी मिळत नाही किंवा दिल्या जात नाही.
यावरून उपरोक्त समस्या, अडचणी, अडथळे खर्या अर्थाने त्यांच्यासाठी गोंगाट, कर्कश आवाज आहे, असेच म्हणावे लागेल का? शेवटी या समाजघटकाला मदतीचा, नैतिकतेचा, भावनेचा, संवेदनशील मनाचा, शिक्षणाचा आधार व अधिकार मिळाल्यास, भेदाभेदीची, असमानतेची भिंत बाजूला सारल्यास, त्यांना मानवी दृष्टीकोनातून जपल्यास आणि संधी दिल्यास हा समाज घटक सुध्दा वैयक्तीक, सार्वजनीक आणि देश विकासातील अनमोल आणि मूल्यवान राष्ट्रीय संपत्ती ठरू लागतो नव्हे तर ठरतो.
- -संतोष मो. मनवर