लग्नासाठीच्या अनोख्या प्रपोजलची अनोखी लव्ह स्टोरी..!

    हायवेवर ‘उत्कर्षा मॅरी मी- सौरभ’ असं होर्डिंग लावून लग्नाची मागणी

    संपूर्ण विश्वाची शक्ती संचारलेल्या अडीच अक्षरी शब्दामुळे प्रत्येकाचं अंग शहारलं जातं. एक हुरुप व नवचैतन्य निर्माण होतं. ती चाहूल न जाणता प्रत्येकाच्या मनाला हवीहवीशी वाटते. ती वेगळी दुनिया आपलीशी वाटायला लागते. त्यामुळे प्रेम या अडीच अक्षरी शब्दाच्या जाळ्यात कळत नकळत का होईना प्रत्येकजण कधी ना कधी गुंतत जातो. या जाळ्यातून सुटका करायची म्हटलं तर तारेवरची कसरतच असते. असंच काहीसं कोल्हापूरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील उत्कर्षा यांच्या बाबतीत घडलं.

    कोल्हापूर येथे सगळेच विषय एकदम हार्ड असतात. मग, त्या शर्यती असो वा मारामारी. मग कोल्हापूरकर प्रेमात कसं मागं राहतील? लग्नासाठी प्रपोज करण्याच्या आजपर्यंत अनेक पद्धती आपण पाहिल्या आहेत. मात्र कोल्हापुरातल्या एका तरुणाने भल्या मोठ्या होर्डिंगद्वारे त्याच्या प्रेयसीला प्रपोज केलं आहे आणि त्या मुलीने सुद्धा त्याला होकार दिल्याची घटना घडली आहे. एवढंच काय तर मुलीच्या आणि मुलाच्या घरचे सर्वजण तयार सुध्दा झाले आहेत. या अनोख्या लव्ह स्टोरीच्या या होर्डिंगची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

    मुलाने आपल्याला अशा पद्धतीने प्रपोज करावं की याआधी कुणी तसं केलंच नसेल, अशी इच्छा अनेक मुली बोलून दाखवतात. तसा प्रयत्नही अनेकजण करतात. त्यामध्ये काही अनोख्या पद्धतीने केलेले प्रपोज अनेकांच्या लक्षात राहतात. अशाच अनोख्या पद्धतीने कोल्हापुरातल्या सौरभ कसबेकरने उत्कर्षा हीला चक्क मोठं होर्डिंग लाऊन प्रपोज केलं आहे. महत्त्वाचं म्हणजे त्या मुलीने सुद्धा त्याला होकार दिला आहे. एव्हढंच काय तर सुरुवातीला नकारघंटा वाजविलेल्या त्या मुलीच्या घरचे सर्वजणसुद्धा यांच्या नात्यासाठी तयार झाले आहेत.

    कोल्हापुरातील सौरभ कसबेकर आणि सांगलीमधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र, जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाले, तेव्हा सौरभच्या घरच्यांनी त्याला त्याच्या मनात कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर मागणी घालू असं त्याला सांगितलं.

    मग या पठ्ठ्याने तात्काळ कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी होती आणि ती त्याला आवडायची असं सांगितलं. त्यामुळे त्यांनी रीतसर तिच्या घरी लग्नासाठी मागणी घालायचे ठरवले. नंतर ठरल्याप्रमाणे सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी मागणी घातली. उत्कर्षाच्या घरच्यांचे सुद्धा काही दिवस होय नाही, होय नाही हेच सुरू होते.

    उत्कर्षाकडून सुद्धा अद्याप होकार आला नव्हता. अनेक प्रयत्नानंतर शेवटी घरचे सुद्धा तयार झाले. मात्र लग्नासाठी अनोख्या पद्धतीने तिला प्रपोज करायचे असे सौरभने ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर-सांगली रोड वर एका होर्डिंगद्वारे प्रपोज करायचे ठरवले. या नियोजनानुसार सौरभने चक्क हायवेच्या शेजारीच भलंमोठं होर्डिंग लावलं आणि उत्कर्षाला प्रपोज केलं.

    या होर्डिंगचे आणि सौरभ-उत्कर्षाचे प्रपोज करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या या अनोख्या प्रपोजची चर्चा सर्वत्र रंगली असून अनेक प्रेमवीरांनाही नवीन आयडीया मिळाली आहे. येत्या २७ मेला त्यांचे लग्न ठरवण्यात आले आहे. त्यामुळे ते दोघेही खूप आनंदी असल्याचे म्हटले आहे. नांदा सौख्यभरे असे म्हणत संपूर्ण कोल्हापूरकर त्यांना शुभेच्छा देत आहेत.

    होर्डिंगची कल्पना जणू
    प्रियकराच्या मनी रुजले
    प्रेयसीच्या होकाराने तर
    सौरभचे जीवनच उत्कर्षाने भरले

    शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
    कमळवेल्ली, यवतमाळ
    भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

Leave a comment