नंदीबैल आणि भटक्या संस्कृतीचा वारसा

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

लोकसंस्कृतीचे निखळत चाललेले घटक आजही गावोगाव भटकंती करताना दिसत आहेत. भटके फिरस्ते दरवर्षी सुगीच्या हंगामात गल्लोगल्ली गावोगाव फिरस्ती करतात.

गोल गोल चामड्याला,

दांडकं हे घासतंय,

बघ बघ सखे कसं,

गुबूगुबू वाजतंय….

या लोकगीताची आठवण होईल, असे बोल वाजवित हे फिरस्ते गावोगाव हजेरी लावतात. पूर्वीच्या काळात करमणूक साधने खूप कमी होती. त्यावेळी लोकांचे मनोरंजन करणारे हे फिरस्ते हवे हवेशे वाटत. काळ बदलला,  बदलत्या काळाबरोबर करमणुकीची साधने बदलली. रेडिओ, टीव्ही आली, टेपरेकॉर्डर वाजू लागले, पडद्यावर चित्रपट आले,  आणि मोबाईल आला आणि लोकसंस्कृतीचा हा मुख्य घटक हद्दपार होतोय, अशी स्थिती आहे. बैल म्हणजे महादेवाचे वाहन,  बैल हा शेतकऱ्यांचा सोबती. मात्र औद्योगिकीकरणाने हा बैलांची संख्या कमी होतेय. आणखी काही वर्षानी हा नंदी पूर्वी औत ओढायचा हे पुढल्या पिढीला सांगावे लागेल. काळ कितीही बदलला तरी लहान मुलांना आजही नंदीचे आकर्षण आहे.

सुगीच्या हंगामापासून माघ महिन्यापर्यंत हे फिरस्ते गावोगाव फिरतात. नंदीबैल समाजातील महिला सुया, पिना,   दाभण,  दातवण,  कुंकू,  काळं मणी,  कंकवा,  फणी विक्री करतात. मात्र, बदलत्या काळानुरुप त्यांचा हा फिरता विक्री व्यवसाय आज संकटात सापडला आहे. केवळ नंदीबैल सोबत घेऊन हे फिरस्ते आपला उदरनिर्वाह करतात.

सांग सांग भोलानाथ,

पाऊस पडेल काय ?,

शाळेभोवती तळे साचून,

सुट्टी मिळेल काय…?

या बालगीताची आठवण करुन देणारा हा नंदीबैल आहे. नंदी बैलाला कोणाताही प्रश्‍न विचारला तरी तो मान डोलवून होय किंवा नाही अशी साचेबद्ध उत्तरे देतो.

नंदी तुळजाभवानीचा आहे का ? असे विचारल्यावर नाही नाही… असे मानेने सांगतो. नंदी गणपतीचा काया ? म्हंटल्यावर नकारार्थी मान हलवतो. नंदी महादेवाच काय? असे विचारताच होकार देतो. पुर्वी या खेळाला गल्लीत मानाचे स्थान होते.

● हे वाचा –महाराष्ट्रातील सौंदाळा गावचा निर्णय: शिवीगाळ केल्यास रु.५०० चा दंड

नवीन पिढीची पाठ…

परंपरागत नंदी बैल व्यवसाय पूर्वीप्रमाणे राहिला नाही. भविष्य ऐकणारी पूर्वीची पिढी आता राहिली नाही. धान्य पूर्वीप्रमाणे जमत नाही. सुया, पिना, दातवण व्यवसाय तर बंदच झाला आहे. नवीन पिढीतील मुले या व्यवसायात येण्यास तयार नाहीत.

बैलाचा खेळ दाखवून, लोकांची करमणूक करून पोट भरणारी महाराष्ट्रातील जमात. ही जमात तमीळनाडूमधून महाराष्ट्रात आली. पश्चिम महाराष्ट्रात त्यांना ढवळा नंदीवाले म्हणतात तर इतर भागात तिरमाळी वा तिरमल म्हणतात. तिरूपती देवस्थानच्या डोंगराला “तिरुमैल” असे नाव आहे. नंदीवाले मूळचे तिकडचे असल्यामुळे त्यांना “तिरमल” हे नाव मिळालेले असावे. त्यांची मातृभाषा तेलगूसदृश्य असून त्यांच्या भाषेत मराठी, हिंदी शब्दांचे मिश्रण आढळते. व्यवहारासाठी ते सांकेतिक भाषेचाही वापर करतात. पाटील नंदीवाले, ढवळा नंदीवाले, कोमटी नंदीवाले आणि भांडी विकणारे नंदीवाले या चार प्रकारात नंदीवाल्यांचा समाज विभागला आहे. प्राचीन काळी धर्म तारण्यासाठी प्रत्यक्ष परमेश्वराने नंदीचे रुप घेतल्याचे दिसून येते. एकनाथांनी एका भारुडात धर्मोद्धारासाठी अवतार धारण करणारा लीलालाघवी परमेश्वरच नंदीच्या रूपात नटविला आहे. नंदी हे शंकराचे वाहन असल्याने आपल्या खळावर साक्षात परमेश्वर शंकर आल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये होते.

Toggle panel: Link Suggestions

● हे वाचा –सुतारपक्षास (Woodpecker) जंगलचा डॉक्टर का म्हणतात?

नंदीवाल्यांचा मुख्य व्यवसाय नंदीबैलाचा खेळ करून दाखविणे हा आहे. नवीन खरेदी केलेल्या बैलाला नंदीबैलाचे शिक्षण देणे, नवीन बैलाला त्यांना हवे त्या इशाऱ्यावर, ढोलकीच्या ठेक्यावर नाचायला शिकविणे ह्या बाबी शिखर शिंगणापूर येथील गुरव करतात. शिक्षण देऊन बैल तयार झाला म्हणजे त्याला सजवतात, गळ्यात घंटांची माळ, पायात झांजरे, शिंगाला पितळी शेंब्या व रंगीबेरंगी कपड्याचे लोंबते गोंडे, पाठीवर झूल अथवा पडशी झाकून टाकण्यासाठी रंगीत कपडे आणि कपाळावर गणपतीचा, मारुतीचा किंवा महादेवाचा पितळी टाक अशा प्रकारे सजवलेल्या बैलाला नंदीबैल म्हणतात. हा नंदीबैल घेऊन गावोगाव भटकंती करीत ह्या जमातीचे लोक फिरतात. नंदीवाल्याने अंगात अंगरखा घातलेला असतो. काहींनी त्या अंगरख्यावर कोट घातलेला असतो. कंबरेला एक पंचा शेल्यासारखा गुंडाळलेला असतो. डोक्याला रंगीत फेटा बांधून पाठीवर त्याचा सोगा सोडलेला असतो. गावाच्या चौकात तेथील लोकांना नंदीबैलाचे कला कौशल्य ते दाखवतात. गुबूगुबू असा आवाज करीत ते नंदीबैलाला मन हलवून, उजवा किंवा डावा पाय उचलून होय नाही असे भाकित वर्तवण्यास सांगतात. हवामान, पीकपाणी यासंदर्भात होरा प्रकट करण्याचे कामही नंदीबैलवाले करतात. नंदीबैल पोटावर उभा राहतो, एखादया सुचविलेल्या नावाच्या माणसास ओळखतो. नंदीबैलाबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये आस्था असते.  या आस्थेपोटी ते नंदीवाल्याला दान देतात. नंदीबैलाच्या पोटाखालून लहान मूल गेलं तर त्याचं आयुष्य वाढतं अशी समजूत आहे.

नंदीबैलवाले भविष्य सांगण्याचा व्यवसायही करतात. लग्न जमवताना हुंडा देणे अथवा घेणे या समाजाला मान्य नाही. सर्व लग्न पावसाळ्यात होतात. या काळात त्यांची लग्नकार्य होतात. एकदा पत्नी म्हणून स्वीकारलेल्या स्त्रीला कसल्याही सबबीवर सोडून दिले जात नाही. नंदीवाले गुढीपाडवा, नागपंचमी, बेंदूर, शिमगा व दिवाळी हे सण प्रामुख्याने साजरे करतात. हसोबा, नाथबाबा, धावजीबाबा आणि महाकाली ही त्यांची प्रमुख कुलदैवते आहेत. नंदीवाल्यांच्यात जातपंचायतीला महत्वाचे स्थान आहे. भटकंतीच्या काळात माणूस मेल्यानंतर अडचण येते; त्यामुळे तीन दिवसापेक्षा जास्त दिवस एका गावावर नंदीवाल्यांना राहता येत नाही.

(संदर्भ : पाटील, पंढरीनाथ, भटके भाईबंद, पुणे, १९९०.)

Tags: #महाराष्ट्रातील भटक्या जमाती, #नंदीबैल परंपरा, #नंदीबैल आणि लोकसंस्कृती, #नंदीबैल व्यवसाय,#महाराष्ट्रातील लोकपरंपरा

● हे वाचा – शारीरिक शिक्षणाचे महत्त्व..!

Leave a comment