छोटंसं गाव खयवाडी
चारपाच हजार लोकसंख्येचं छोटंसं गाव.आमच्या गावातील मारूतीचं मंदिर म्हणजे एक सिसीटिव्हीच होतं. भरचौकात मौकेशीर जागेवर असलेल्या मंदिराच्या ओट्यावर लोकांचा जत्था बसलेलाच रहायचा.गावच्या बजाराच्या मुख्य रस्त्यावर हनुमंताचं हिरव्यागार सिमेटात बांधलेलं व समोर मोठी टिनाची सपरी असलेलं हे एकमेव मोठं मंदिर होतं.बऱ्याच लोकाईच्या घरी इलेक्ट्रीक नसल्याने दुपारच्या जेवणानंतर आरामासाठी दहापाच माणसं मस्त थंड ओट्यावर व फरशीवर झोपलेली असायची.खुंटा बुढा,सुरपा बुढा ,किसना बुढा,शेजव बुढा, ढौकल बुढा,उकरडा बुढा,शादिकचा बाप,दसरथ भाऊ इ.मंडळी पीका पाण्याच्या गोष्टी करत निवांत सावलीत बसलेली असायची.काही दिवसभर नातवंडाना सांभाळायची.पाराच्या खाली शालीकराम म्हाली. वस्तरा कैची एक पोतं घेऊन बसलेला असे.
उन्हायात याच शालिकराम म्हाल्याले कटींग दाढ्या करून गावातल्या लोकांची लग्न सराई असे.कोणाला अक्षीद देणं.जेवणाची आमंत्रण देणं अशी अनेक कामं लगन वारासार म्हणजे बिदागरी होईस्तोवर करायला लागायची. समोर नालीच्या थंड सांडपाण्यात दोनचार कुत्री बसलेली असायची. याच मंदिराच्या पायऱ्याजोळ उन्हाळ्यात सोनखेड भुईखेडचे भोई मोठ्या डालपाटीत खरबूज टरबूज घेऊन पिंपळाच्या झाडाच्या थंडगार सावलीत आरामात बसलेले असायचे.दहीहंडय़ाचा आईसकांडीवाला तुटक्या सायकलीवर खोका घेऊन यायचा.तेव्हा पाच ते दहा पैशात आईसकांडी भेटे. पोटटे आईसकांडी चोखत चोखत सारा मनीला रंगुन टाकायचे.गावात दर मंगळवारी आठवडी बाजार भरायचा.बाजारा च्या दिवशी एखादी बाहेरगावची पिकलेल्या आंब्याची बंडी हमखास असायची.गवतात झाकलेली आंबे लोकं कौतुकाने पहायची.ईकणारा आंबा चोऊन रस प्रत्येकाच्या हातावर वाटायचा.
ग्रामपंचायतीला लागूनच आठवडी बाजार भरायचा फार मोठा नसला तरी लोकांच्या गरजा पूर्ण होतील अशी सर्व दुकानं बजारात रहायची.भोजाभाई, पानवाला,वहाबभाई भातक्यावाला,जैनपुरचा शामराव भजेवाला भजे काढाच्या अगोदर आपल्या तुटक्या फुटक्या कायाकीट,तेलकट संदुकातून स्टोव्ह काढून त्याले पीन भरून चांगला फक्कड चहा बनवून हातात चार कप व जर्मनची कॅटली हातात पकडून साऱ्या बेपाऱ्याईले पाजायचा.चपला शिवणारा महादू चांभार, शालिकराम म्हाल्याचं दाढी कंटीगचं पोतं टाकून जमीनीवरच बैठक मारलेलं चालतं फिरतं दुकान,दहिहांडयाचा सादिक मामू आरशा डाबलेवाला,ईरफान कटलरीवाला.भाजीपाला ईकणारी परगावचे चार, दोन बेपारी. अशी मजा बजाराची होती.
गावखेडयातील लगन सराईही साधी,सिंपलच होती.होती.लगनात टाकलेल्या मंडपाची कसे बांधाय पासुन तर पाण्याच्या कोठया जमा करेपर्यंत पावण्या रावण्याईचीही मदत व्हायची. ह्या पाणी भरलेल्या कोठया स्वच्छ धोतराच्या फडक्यानं बांधल्या जायच्या. लग्नातील वांग्याची गरम भाजी व बुंदी सेवाची पंगत ठेवलेलीच असायची. उन्हाच्या वावटया सुटल्या की पातरवयीतली मीठ भातात जायचं,पंगतीतून वरणासाठी पोयीचा काठ तोडून धरण बनवा लागायचं,नाही तर वरन भाजीले जाऊन गळाभेट घ्यायचं. तसे पंगतीच्या अगोदर फफ्फुळयावर बकेटीत पाणी शिपायची पद्धतच होती. परंतु पानं वाढल्यावर अंगारी पंगतीत फिरल्यावर लोकंही गिलासातलं पाणी फिरवायची. बहुतेक तेव्हा पासूनच देवही होतो.व पात्राचा धुळ्ळयापासूनही बचाव होतो यासाठीच ही जेवणाच्या पानाभोवती पाणी फिरवायची बहूतेक पद्धत पडलेली असावी, श्लोक म्हणणाऱ्याईची मी किती मोठ्या अवाजात म्हणतो यासाठी चढाओढ लागलेली असायची.खुप मजा यायची.
हंगामाच्या दिवसात नळाजवळ पाण्याची सोय पाहून खाती(लोहार) आपले पाल टाकायचा. खात्याचं म्हणजे लोहाराचं काम लोक तासनतास कौतुकानं त्याचं हे आंगमेहनतीचं काम बारकाईने न्याहाळीत बसायचे.बारके पोटटे ही भट्टीतुन निघालेल्या धुराकडे निरखून तासनतास पाहत बसायचे. उन्हायात लग्नसराईचे दिवस पाहुन कासाराचं भांडय़ाच दुकान गावात यायचं , तांब्या,पितळीची खुप सुंदर नक्षीकाम केलेली भांडी असायची. गावातल्या बायाबापडया घरातली जूनी मोळ देऊन नवीन गंज ,समया, पाण्याची गुंड,कोपरं,ताटं, ताटल्या, वाट्या, प्लेटा खरेदी करायच्या. ग्रामपंचायतच्या खालच्या बाजूला मोठा धर्मायाचा गुराढोरांना पाणी प्यायला सिमेंटचा हौद होता.याच हौदावर चिंगरी चांगरी बारकी लेकरं एकमेकांच्या आंगावर थंडगार पाणी ऊडवायची, तासनतास पोहत बसायची.तिथंच सावलीत खापराच्या बैलगाडीत निबांच्या निंबोयाची खरे आंबे समजून कौलाची बैलबंडी करून खेळत असायची.भयानक रखरखीत उन्हात वावराची उलंगवाडी झाली म्हणजे फरदळीच्या पराटीच्या शेतात ढोरं चारायची मजा यायची.
शहानूर नदीला पावसाळ्यात मोठा पूर यायचा.तो नदीचा पूर पहायला पाहायला सारा गाव जमा व्हायचा. नदीच्या पूरात वाहत आलेली लाकडं पकडणं मुरय शेगां पकडणं पाण्यात पोहणं झडी पाण्याचं आंग ओलं होऊ नये म्हणुन डोकशावर एखादं खताचं पोतं अंगावर घेऊन नदीवर जाणं. कधीकधी पावसानं चोपडया झालेल्या रस्त्यावर तांब्या घेऊन घसरून पडणं नित्याचंच असायचं. नदीजवळ मोठा विटाचा पजाया होता.बाहेरगावची पोट भराया आलेली मजूरलोकं किर्र अंधारात आपल्या खोपडया करून रहायची.विटा उचलायची मजूरी दहा रुपये शेकडा रहायची.
शाळेतली पोरं ही सुट्टीच्या दिवसात विटा उचलायले जायची.नवीन कंपास घ्यायला किंवा नवीन पेन घ्या पुरतं फक्त आम्ही तेवढं जात असो.थंडीच्या दिवसात तर नदीचं पाणी थंडगार असायचं.नदीच्या पाण्यात उतरायची पाण्यात पोहायची हिम्मत होत नसायची. थंडगार पाणी व कडक थंडी हातपाय गारठून जायचे.तरी काही पट्टीचे पोहणारे पोट्टे मासोळी सारखे सरसर पोहायचे.काही मोठे पोरं बारक्या चिरक्या लेकरांना नदीत बुचकाया देत त्यात त्यांना खुप मजा वाटायची.नदीले पूर असला म्हणजे शाळेत बाहेरगावाहून येणाऱ्या पोरांची पंचाईत व्हायची. बाजूच्या गावातील पोरं नदीच्या पात्रातुन एकमेकांना आधार देत शाळेत कशीबशी यायची.पंधरा पंधरा दिवस नळाले पाणी यायचं नाही. नदीच्या पात्रात झिरे करून वेळ मारून नेण्या शिवाय दुसरा पर्याय नव्हता.शाळेत चहा करायला व गुरूजींना पाणी प्यायला नदीचंच पाणी असायचं.
शाळेत मधल्या वेळेत जेवणाची सुट्टी भेटायची., ऐखे बुढ्ढाचा सेलवरचा रेडिओ मोठयानं एक चाळीसचे गाणे म्हणत बसायचा. आकाशवाणीचं हे जळगाव केन्द्र आहे.एक वाजून चाळीस मिनींटाची दुपारची गाणी सारा गाव दणाणून सोडायचा. गावाले लागूनच शहानूर नदी.जेमतेम पावसाळ्यात फक्त पाणी एरव्ही कोरडीठाक पडलेली.गावातील टुमदार कौलारू घरे कुणाची माडी धाब्याची. नदीला लागुनच लोकांची घर असल्यानं पावसाळ्यात नदीचा सो सो आवाज कानात घुमायचा.रातचे रातकिडे किर्र किर्र करायचे.कायाशार अंधाराने आमची घाबरगुंडी उडायची.नदीला लागुनच खयवाडी होती खयवाडी म्हणजे शेतीतला तुर हरभरा जवस सुर्यफुल,ज्वारी ईतर धान्य तयार करायची जागा.गोठाणा च्या खाली संपूर्ण गावातील ढोरं बसायची जागा. ढोरकी गावातील संपुर्ण ढोरं तिथं सावलीत बसवायचा.समोर ढोरांना नदीचं प्यायला डबरा डबरात साचलेलं शेवायानं हिरवट झालेलं पाणी.समोर मोठं गोठान. गोठानावरच ‘खयवाडी’ ऐन हंगामात पिकवलेला माल तयार होण्ण्यासाठी खयवाडीत बैलगाडी नै खयवाडीवर आणला जायचा.तुरी च्या भरावर बसून यायची मजा फोरहिलर पेक्षा ही काही औरच होती. तुर ठोकून झाली की तेथेच बंडीत तडव टाकून आम्ही रात्री आकाशातल्या चांदण्या मोजत झोपत असो. शेजारी मसनवटी असल्याने खुप भिती वाटायची. वाळलेल्या हरभरा व गव्हाच्या ओंब्यांची भाजायची मजा यायची. कामासाठी सुट्टीच्या दिवशी वावरात जायचं.दिवसभर घरच्यांच सोबत काम करायचं.वावराच्या रस्त्यावर दिवसभर लोकांची ये जा असायची बैलाच्या गळ्यातील कसांडीचा आवाज कानामधे घुमायचा.
सर्व लोकांना खयवाडी ही आपली हक्काची वाटायची सर्व एकोप्याने गुणया गोविंदानं खयवाडीत राहायची. धान्य तयार करण्याची जागा सारवून स्वच्छ करायला लागायची. मध्यभागी मोठा रोवलेला जाड खांब असायचा. त्याला चार पाच बैलाईची पात जुतायची.लहान मुलांना खयवाडीत बैलाची पात हाकलताना मजा यायची मोठे मोठया कास्तकाराईचा माल खयवाडीत आणल्या जायचा.गावातील या नांदणाऱ्या मोठ्या खटल्याईची भरभराट होती अनेक गरीब लोकांना त्यांच्या खटल्याचा अधार होता. कित्येक गडी माणसा च्या मुलांची शिक्षणे मुलीची लग्न या खटल्या च्या भरवशावर पार पाडली होती गावातील खयवाडीवर गडी माणसाचा राबता होता. धान्य तिकांडयावर वाऱ्याचा झोत पाहून पाटीत घेऊन उफणल्या जायचं. माल तयार होईपर्यंत तर मातेरं नेईलोक जवळपास आठेक दिवस खयवाडीत मुक्काम असायचा. खयवाडी रिकामी झाल्या वरही बाणु बुडी सारख्या दोन तीन बुढ्ढया मातेरं वेचून वर्षे भराचा दायदाणा करून ठेवायच्या.
या खयवाडीनच त्यांना जगण्याचा आधार देला होता.नवीन धान्य पीठगिरणीतून दऊन आणल्यावर नवं टाकून देवाला नैवेद्य दाखवून मगच घरातील सर्वानी हे खायचं. त्याला नवं टाकणं असं म्हणत. गावातल्या जनजिवनाशी ही खयवाडी जणु समरस व एकजीव झाली होती.
-विजय जयसिंगपुरे
अमरावती
९८५०४४७६१९