मॉडर्न ते गोल्डन

आम्ही परसाकडे जात होतो तेव्हा,

तुम्ही शौचालय गाठलं

आम्हालाही वाटलं

तुमच्यात यावं

म्हणून,

आम्ही पण शौचालयाजवळ आलो

पण तुम्ही,

ते सोडलं आणि

बाथरूम मध्ये गेलात

आम्हीच आम्हाला मागास ठरवून

बाथरूम मध्ये येणारच

तोवर तुम्ही टॉयलेटकडे पळालात

मग,

आम्ही पण धावत टॉयलेट जवळ आलो

पण तेवढ्यात तुम्ही

वॉशरूम घेतलं

आम्ही वॉशरूम पर्यंत यायच्या आधीच

तुम्ही,

डायरेक्ट फ्रेश व्हायला निघून गेलात…

तुमचा पाठलाग करून

आम्ही थकून गेलो

तुम्ही आम्हाला गावंढळ समजून

लांब ठेवलं…

आम्ही मिरच्या भाजून

झणझणीत ठेचा कुटला

तेव्हा तुम्ही सॉस घेतला

आम्ही आळणी वाढणार

तेवढ्यात तुम्ही सूप पिले

पातीचा कांदा आम्ही ताटाला लावला

तर तुम्ही सॅलड मागवलं..

आम्ही चुलीवर

पिठलं भाकरी बनवून दिली

तुम्ही पिझ्झा बर्गर जवळ केला..

साजूक तुपातली खिचडी घेऊन

आम्ही तुमच्याजवळ आलो

तुम्ही चायनीज नुडल्सची ऑर्डर दिली

तुमचा पाठलाग करून

आम्ही थकून गेलो

तुम्ही आम्हाला गावंढळ समजून

लांब ठेवलं

आम्ही भारतातच राहिलो

तुम्ही इंडियामध्ये सामील झालात

पण एक लक्षात ठेवा

तुम्ही कितीही मॉर्डन झालात तरी

फ्रेश होऊन

पिठलं भाकरी खायला

तुम्हाला भारतातच यावं लागेल…

आम्ही मॉडर्न होण्याचा नाद सोडलाय

आम्हाला कळून चुकलं आहे

आम्ही गोल्डन आहोत

आम्ही गोल्डन आहोत

आम्ही गोल्डन आहोत….

नितीन चंदनशिवे

कवठेमहांकाळ

जि.सांगली

070209 09521

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram

Leave a comment