आज ही शिवाजी महाराज हवे हवेसे का वाटतात ?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    खरं म्हणजे सरंजामशाही आणि राजेशाही ही कालबाह्य झालेली समाज रचना आहे. शिवाजी राजे हे सुध्दा सरंजामी राजे होते. आपण राजेशाही नाकारली आणि त्या जागी लोकशाही स्वीकारली शिवाजी महाराजा नंतर जे राजे महाराजे आपण बघितले राजे राजवाडे बघितले त्यांच्या अन्यायकारक आणि जुलमी राजवटीला आपण कंटाळलो. म्हणूनच ती समाजव्यवस्था आपण नाकारली. भांडवशाही ब्रिटिशाविरुद्ध भारतातील सरंजामशाही राज्ये तग धरू शकली नाही. या वरून सरंजामशाही व राजेशाही समाजव्यवस्था टाकाऊ होती हे सिद्ध होते. आपण लोकशाही स्वीकारली आणि ती स्वीकारल्यानंतर सुध्दा सरंजामशाही व राजेशाहीतला राजा आपल्या चेतना आणि स्पूर्ती का देतोय? का आपण त्यांचा जय जयकार का करतो?

    शिवाजी महाराज यांच्या आधीही आणि नंतर ही अनेक राजे महाराजे होऊन गेले तरी फक्त शिवाजी महाराज यांचीच जयंती साजरी का करतात? त्यांचेच स्मरण त्यांचीच जयंतीला आपल्याला एवढं स्पूर्तिदाई का वाटावं?

    इतर राजांच्या जयंत्या मयंत्या त्यांचे वंशज वैगरे करतही असेल नाही असे नाही. परंतु रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या एवढी विस्तृत आणि व्यापक प्रमाणात का साजरी व्हावी? इतर राजात आणि शिवाजी महाराज यांच्यात असा काय फरक होता? म्हणुन शिवाजी महाराजांना आपण नीट समजून घेतले पहिजे.

    छत्रपती शिवाजी महाराज हे असे राजे होते ज्यांना कुणी आयतं राज्य कुणी निर्माण करुन ठेवलेलं नव्हतं. म्हणजे शिवाजी महाराज हे आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे राजे नव्हते. थोडक्यात म्हणजे आयतोबा नव्हते. वारसा हक्कने अनेक राजे होऊन गेले पण शिवजी महाराज असे राजे होते ज्यांनी स्वकर्तुत्वने स्वराज्य स्थापन केले. ते ही आश्या वेळी जेव्हा स्वराज्याचा विचार सुध्दा इतरांच्या मनात येत नव्हता. फक्त लाचारी पत्करून इनाम आणि जहागिरी मिळवायची यातच ते धन्यता मानणारे अनेक जण होते. शिवाजी महाराजांच्या काळात रयतेला राज्य आपलस वाटत असे. आजची लोकशाही लोकातून निर्माण होऊन सुध्दा जनतेला ती आपलीशी वाटत नाही ही वस्तुस्थिती आहे. पण शिवाजी महाराज यांचे कार्य रयतेला आपलेसे वाटत असे. याचे उदाहरणचं द्यायचे असेल तर आपण पन्हाळ्याच्या वेढ्याचे देऊ शकतो. भक्कम फौजे सह सिद्दी जौहर अन् फाजल खान यांनी पन्हाळ्याला वेढा दिला असता. एका गरीब शेतकरी कुटंबातील शिवा न्हावी खोटा शिवाजी का बनला?

    आपला मृत्यु समोर दिसत असतांना सुध्दा आत्महुतीची प्रेरणा कुठून आली असेल? हे काही कुठल्या जहागिरीच्या लोभा पायी नाही तर आपण मेलो तरी चालेल पण शिवाजी राजा जगला पाहिजे यासाठी.कारण शिवाजी राजा करतो ते कार्य आपल आहे. रयतेचे कार्य आहे ही खात्री त्या शिवा न्हाव्याची होती.

    शिवाजी महाराज पन्हाळगडावरून निसटले आणि विशाळगड गाठण्यासाठी वाऱ्याच्या वेगाने मोजक्याच मावळ्यांसह निघाले. सिद्दि जोहर सावध झाला अन् पाठलाग सुरू झाला. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहचण्यापूर्वीच सापडले असते तर खैर नव्हती. पण तिकडे घोडखिंडीत बाजीप्रभू देशपांडे हे आपल्या मूठभर मावळ्यांसह पहाडा सारखे उभे ठाकले. आपली जान कुर्बान करण्यासाठी ते सर्व सवंगडी तयार होतात घनघोर युद्धात सपासप कापले जातात. अनेकांचे तर नावं ही इतिहासाला माहीत नाही. ह्या सर्वांनी आपल्या प्राणांची आहुती देण्यासाठी का उभे ठाकले असेल? जहागिरी साठी कि इनामा साठी?

पु

    न्हा तीच भावना… शिवाजी राजा करतो ते कार्य आपल आहे. आपणं मेलो तरी चालेल पण! शिवाजी राजा जगला पाहिजे. आपल कार्य पूर्ण व्हायला हवे. अशी अनेक उदाहरणं इतिहासात सापडतात.

    शहेनशहा औरंगजेब बादशहा चा इनामी सरदार मिर्झाराजे जयसिंह यांच्या समोर शिवाजी महाराज यांना नामुष्कीचा तह करावा लागला होता आणि आग्र्याला जावं लागलं होतं. आग्र्याच्या कैदेतून सुटकेचा मार्ग मिळेना. पण पुन्हा शक्कल लढवली. आणि महाराज पसार झाले. महाराजांच्या बिछान्यावर शिवाजी राजांचे सोंग घेवून मुल्लिम समाजाचा मदारी मेहतर आणी सोबत हिरोजी फर्जंद आपण बेमौत मारल्या जाऊ हे माहीत असताना सुध्दा त्या दोघांनी मृत्यू ला का कवटाळले? आपल्या प्राणाची आत्महुती द्यायला ते का तयार झाले? पुन्हा तीच भावना… शिवाजीराजांनी आरंभलेल कार्य मोलाचं आहे. ते पूर्ण व्हायला हवं. ते टिकायला हवं. आपण मेलो तरी चालेल. ही किमया शिवाजी राजांनाच का जमली? इतर राजांना का नाही?

    इतर राजांसाठी लोकं लढले नाही असे नाही पण हे लढणं मर्दुमकी गाजवून जहागिरी आणि इनाम मिळवण्यासाठी होतं. ते लढले आणि मेलेही जहागिरी साठी उदात्त कार्यासाठी नाही. म्हणुन लोभासाठी लढणाऱ्याची इतिहास दाखल घेत नाही. प्रोलोभानाविना मृत्यूला सामोरे जाणाराची पराक्रमी जतकुळी वेगळी असते.

    त्या काळी गावे स्वयंपूर्ण होती. गवगाड्यांची यंत्रणा स्वयंपूर्ण होती. पाटील कुलकर्णी ते बारा बलुेदार गावं चालवीत असत. राजा बदलला तरी लोकांना फार फरक पडत नव्हता. वतनदार भरमसाट वसुली करायचे लोकांवर जुलूम करायचे. त्यांच्या विरोधात दाद मिळत नसत आणि मिळत नाही म्हणून कुणी मागत ही नसत. राजा बदलला तरी पाटील कुलकर्णी वतनदार देशमुख जहांगीरदार तेच असत. हे सर्वजण पटापट निष्ठा बदलत आणि आपले वतन शाबूत ठेवत असत. सर्वच राजे लुटारू किंवा लुटारू चे म्होरके अशी लोकांची रास्त समजूत होती. म्हणुन ते राजा राजा त फरक करत नसत.

    पुणे परगणा शिवाजी महाराज यांचे वडील शहाजी राजे यांची जहागिरी होती शिवाजी राजांनी अगदी लहान पणातच परगण्याची व्यवस्था पहावी म्हणुन व्यवस्था केली होती. हा परगणा मोगल आणि आदिलशहा यांच्या सरहद्दीवरील प्रदेश असल्यामुळं वारंगवार एकमेकांच्या स्वाऱ्या होत असत त्यामुळे गावं ओस पडलेली होती. शेतीची अवस्था बिकट होती. उद्ध्वस्त झालेली गावे शिवाजी राजाने कौलनामे घेऊन पुन्हा वसवली. नव्याने जमीन कसायला येणाऱ्यांना बी बियाणे औतफाटे देऊन मदत करुन शेती कसायला प्रोत्साहन दिले. मन मानेल तसा महसूल वसूल करण्याचा शिरस्ता मोडून काढला. जमिनी मोजून काढल्या महसूल निश्चित केला. दुष्काळात महसूल माफ केला. पिकलेच नाही तर शेतकरी देणार कुठून? हे जाणलं. उलट दुष्काळगरस्तांसाठी मदत केली जाई.

    पुरातन वहिवाट महसूल पद्धत बंद केली. पूर्वी महसूल पाटील देशमुख देशपांडे कुलकर्णी खोत हे रयतेकडून जमा करत. तो बंद केला. वतनदार जमीनदार यांची अवस्था महाराजांनी पार मोडून काढली यांचे राजे राजवाडे जमीनदोस्त केली त्यांनी इतपर असले धंदे करू नयेत.रयेत सारखी घर बांधून त्यांचा समवेत राहावे असा हुकूम सोडला.शेतकऱ्याशी असा वागणारा राजा रयतेला आपला का वाटू नये?

    स्त्रियांच्या बाबतीत ही शिवाजीराजांचा दृष्टिकोन असाच होता. सरंजामदारी च्या काळात गोरगरिबांच्या स्त्रियांच्या अब्रू ला किंमत नव्हती. राजे राजवाडे व राजपुत्र तर सोडाच पण सरदार वतनदार यांच्या दृष्टीने गरिबांच्या पोरीबाळी म्हणजे हव्या त्यावेळी उपभोगण्याच्या वस्तूच होत्या. दिवसाढवळ्या अब्रू लुटल्या जाई. कुठं दाद मागणार? अश्या काळात शिवाजी राजांचा दृष्टिकोन मूलतः वेगळा होता.

    रांझ्याच्या पाटलाची गोष्ट सर्वश्रुत आहे. गरीब शेतकऱ्यांची तरणीताठी लेक यान दिवसाढळ्या उचलून नेली आणि भोगली. माती झालेल्या जिण्यापेक्षा मरण बरं म्हणुन पोरीणं जीव दिला. सारा गावं हळहळला पण मुकाच राहिला. शिवाजी राजांना जेव्हा ही बातमी कळली तेव्हा पाटलाच्या मुसक्या बांधून पुण्यात आणले आणि हात पाय तोडण्याची शिक्षाच नाही दिली तर ती अमलांत सुध्दा आणली.

    रयतेत आश्चर्य पसरले. वतनदार पाटलाला शिक्षा झाली होती. जी की त्या काळी फार अशक्यप्राय बाब होती. लोकं शिवाजी राजांच्या कार्यावर फिदा झाले होते. शिवाजी राजा करत असलेलं कार्य रयतेच्या अब्रू रक्षणासाठी असेल तर अशा कामासाठी लोकं मारायला ही तयार झाली.रांझाच्या पाटलाची गोष्ट ही अपवाद नाही. अशा इतर हि कथा आहेत.

    १६७८ साली सकुजी गायकवाड नावाच्या सेनापतीने बेलवडीच्या किल्याला वेढा दिला होता. या किल्ल्याची किललेदार एक स्त्री होती. तिचं नावं होत सावित्रीबाई देसाई या बहादुर स्त्रीने २७ दिवस किल्ला लढवला पण सकुजीने शेवटी तो जिंकला आणि विजयाच्या उन्मादात सुडभावनेने सावित्रीबाई वर बलात्कार केला. ही बातमी जेव्हा शिवाजीराजांना कळली तेव्हा राजे संतापले सकुजी गायकवाड यांचे डोळे काढण्यात आले आणि आयुष्यभर तुरुंगात डांबण्यात आले होते. आपल्या विजयी सेनापतीने शत्रू आसलेल्या स्रीवर बलात्कार केला म्हणुन गय केली नाही. स्त्रियांची इज्जत कायम राखली पाहिजे मग ती स्त्री कोणीही असो. अशी शिवाजीराजांची भूमिका होती. कोणत्याही लढाईत किंवा लुटीत मुसलमान किंवा हिंदू वा कोणत्याही धर्माच्या स्त्रिया हाती आल्या नंतर त्यांना तोशिस लागता कामा नये असा सक्त आदेश होता. कोणत्याही धर्माचा धर्म ग्रंथ मिळाला तर तो त्या धर्माच्या सैनिकाला सन्मानाने सोपवण्याचा आदेशही राजे देत. मग कुराण असेल तर ते मुसलमान सैनिकांकडे दिल्या जाई या वरून शिवाजी राजे इतर धर्माबद्दल किती सहिष्णू होते हे सिद्ध होते.

    कल्याणच्या सुभेदाराच्या सूनेच सौंदर्य बघून या राजाला आपली आई आठवते. आणि आमची आई एवढी सुंदर असती तर… असे उदगार निघावेत याला चारित्रसंपन्न आणि सौंदर्या संबंधीचा निकोप दृष्टीकोन आसावा लागतो आणि तो शिवाजी राजात होता म्हणुन शिवाजी राजा रयतेला आपला वाटतो. पण आजच्या आधुनिक लोकशाहीत बिल्कीस बानोच्या बलात्कार करणाऱ्यांना तुरुंगातून सोडलं जाते हार तुरे देऊन सत्कार केला जातो. म्हणुन आज पुन्हा पुन्हा शिवाजी राजांची आठवण येते. रयतेच्या भाजीच्या देठाला ही हात लावू नये. सैन्याच्या घोड्यांना दाना वैरण लागली तर शेतकऱ्यांना झळ न पोहोचवता रोख रक्कम देऊन खरेदी करा असा सक्त आदेश देणारा शिवाजी राजा कुठं? आणि आजच्या आधुनिक लोकशाहीत चलो शिव छत्रपती का आशीर्वाद म्हणुन आयात निर्यात धोरणात शेतकरी मारून त्याच्या मड्यावरचं पिकविम्याच लोणी खाणारे आजचे तथाकथित नेते कुठं? आणि म्हणूनच सरंजामशाहीतला शिवाजी राजा आम्हाला आमचा वाटतो.

    शिवाजी महाराज जुन्या जमान्याचे आयडॉल नाही उगवत्या सूर्याच्या किरणा सारखा स्पूर्तिदायी आणि ताजा आयडॉल वाटत राहतो. शिवाजी महाराज यांची आज ३९३ वी जयंती आहे. सर्व शिव प्रेमींना खुप खुप शुभेच्छा..!

    गजानन भिमराव पालवे
    मु. पो. अंढेरा
    ता. देऊळगाव राजा
    जिल्हा. बुलडाणा.
    भ्रमणध्वनी ९८५०३१२१२६
    ————–

    तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !

    ——————–

    आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!

    -बंडूकुमार धवणे
    संपादक गौरव प्रकाशन
    ——————–

Leave a comment