दिवाई…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

दिवाई…

दोन दिवसावर दिवाई येऊन ठेपली होती.बजारहाटेत लोकाची सामानसुमान खरेदीसाठी करण्यासाठी निरानाम गर्दी ही गर्दी दिसायची.सणासुदीच्या दिवसात कित्येकांच्या घरादाराची सुरू असलेली साफसफाई व रंगरंगोटी संपत आली होती. कपडेलत्ते,फळे,फटाखे,फरायाची दूकाने मस्त सजली होती. प्रत्येकाच्या चेहरयावर सणासुदीचा आनंद झळकत होता.लहानापासून तर मोठया पर्यत सारीच दिवाईच्या सणानं कामाले लागली होती.

यशोदीलेही अजून चारपाच घरची धुणीभांडी करायची होती.मोठया लगबगीने ती कामासाठी पायटीच निघाली होती.सपासप पावल टाकत अंतर कापत होती.डोकं मात्र विचारान सुन्न झालं होतं. झाकटीतच उठल्या पासून नीरा नुसती धावाधावच तीच्या पाचवीला पुजली होती.कामानं तीचं सार आंग आंबून गेल होत.कामान आलेला थकवा तीच्या हाडकुळया ,निस्तेज चेहऱ्यावर व क्षीण झालेल्या देहावर क्षणोक्षणी जाणवत होता. कुपोषणाने शरीर गलीतगात्र झालेलं, नेहमी एकच मळकट साडी, मध्यम बांधा पायात फाटकी,तुटकी चप्पल असा तीचा अवतार होता.काबाडकष्ट करण्यात ती मागं नव्हती. पण दैवाने तीच्या नशीबी हालअपेष्टाच लिहुन ठेवल्या होत्या की काय? तीच्या जीवनाची वाकई जागोजागी फाटली होती. त्यामुळे जागोजागी फाटलेल्या वाकईले ठिगय कुठीकुठी लावणार.वर्षभरा पूर्वीच तीचा नवरा देवाघरी गेलेला. त्याला कारणही तसंच होतं दिवसभर हमालीचं काम करणारा तरणाबांड गडी दारूच्या आहारी जाऊन आपला संसाराचा सत्यानाश करून बसला होता.त्यामुळे पोरासोराचा संसाराचा भार तीच्या एकलीवर आलेला.पोटासाठी व लेकरासाठी यशोदी दिवसरात राबराब राबत होती.

शहरांच्या बाहेर असलेल्या एका नझुल च्या झोपडपट्टीत ती रहायची.घर कसलं खुराडच ते,खेटून खेटून ऊभारलेली पन्नया, मेनकापड,बैनर टाकून पाण्या पावसापासून बचाव करण्यासाठी केलेली झोपडीच ती. सगळीकडून चिखल घाण कूबट वास डूकरं लोळत पडलेली.आरोग्याविषयीची कूठलीच व्यवस्थां नसलेली झोपडपट्टी.अवतीभवती झाडझूडपं वाढलेली. अश्या जीवघेण्या परिस्थितित ही माणसे जीव मुठीत धरून जगत होती.कुपोषणाने हाडकुळी झालेली ही कष्टाळू वस्तीतील माणसं दिवस निघाला की कामाधदंयासाठी पळत सुटायची. तीखट,मीठाचा जाळ पोटात ढकलून कसेतरी दिवस काढायची.झोपडपट्टीतील वातावरणही तसंच भितीदायकच होतं. काही आपण भलं व आपलं घर भलं असं चांगलं मेहनती जीवन जगण्यासाठी धावाधाव करणारी चांगलीं माणसं तर काही व्यसणी,गंजाटी ,जुगारी भांडण तंटे करणारी, बारमाही जेलची हवा खाणारी माणसेही झोपडपट्टीनं मोठ्ठं मन करून आपल्या पोटात सामावून घेतली होती. वरलीमटका ,दारू यात बुडून कर्जबाजारी झालेली.ज्यांना कष्टाची जाणीव होती. ती अशा कामापासून जरा लांबच रहायची.यशोदीले चारदोन घरची धुणीभांडी करून तीखठमीठाची सोय व आपल्या फाटक्या संसाराला चार,दोन पैसे गाठीले संगयत.कधी भाजीले लसन नाही तर कधी कांदा नाही. तर कधीकधी तीखटमीठावरच असा संसाराचा गाडा ती निमूटपणे हकालत होती. संग दोन लेकरं मोठी पोरगी मुनसीपालटीच्या सहाव्या वर्गोंत तर पोरगा चवथीत शिकत होता.कधीमधी कामाधदंयाले हातपदर लावाले यशोदीची पोरगी मदत करायची.पण यशोदीनं पोरीले कामासाठी कधीही कोणाच्या घरी एकट सोडलं नव्हता.मागच्या गल्लीतली गंगीची लहान बारा वर्षाची पोरगी अशीच घरकामासाठी बाहेर गेली असताना कूणी नाही बघून घरातल्यां म्हाताऱ्यानं बळजबरी करून बलात्कार केला होता.कोवळी पोरं झालेल्या या प्रकारणं पार हादरून गेली होती.जगात असेही हरामखोर लोकं असतात या जाणीवेने कायम दहशतीत वावरत होती. अनेकांनी हा गंभीर विषय दाबण्याचा प्रयत्न केला परंतु सामाजिक संस्था एकवटल्यानं तीच्या आजीनं जे होईन ते होईन कंबर कसून पोलिसात तक्रार केल्यावर अखेर पोलिसांनीही कारवाही केलीच. म्हातारा गजाआड झाला.अशा गोष्ठी यशोदीच्या कानावर अधुनमधून पडायच्या,त्यामुळे ती जरा दचकुनच होती.

“लोकांनां गरीबाची इज्जत नीरा भाजीपालाच वाटते.  “आपल्या  सारख जगणं आपल्या लेकरायच्या नशीबी येऊ नये याकरिता ती रात्रंदिवस झटायची.कोणाच्या भरवश्यावर लेकरांना एकटदुकटं सोडत नव्हती जगाचा काय भरोसा. एखादा चांगला घरमालक सणासुदीला अंगाला कपडा लत्ता द्यायचा. तर कधी खायाप्यायचं सामाण मिळायचं. त्यामुळें चारदोन भांडे जास्तीचं आले तरी तीची कूरबूर नसायची. म्हणुनच तीले चार घरचं कामही मिळायचं. आज लवकरच दूपार पर्यत घरकाम आटोपून ती लवकरच घरी येउन आपल्या चुणचुणीत पोरीले सामान,सुमानाची लीस्ट करायला लावली.हातात झोरा घेऊन दोघी मायलेकी पायदळच दुकानात तरंतरं निघाल्या.कोणतं सामान कुठी सस्त भेटते याचा तीले पुरेपूर अभ्यासही होता. लाईफबाय साबण,पाच रूपयाची इलायची,रवा.मैदा,बेसन,पावभर सोयाबीन खाचं तेल, उदबत्ती सारं एकेक पाव घेतलें. मुठी तल्या पैशाचा अंदाज घेत ती सामान घेत होती.काय सुटलं म्हणून पोरगी चिठ्ठी वाचून सांगायची.बरोब्बर तंतोतंत सामाण घेतलं.बाकी कंटोलचा साखऱ्या,तांदुय बापाने मागच्या चकरातच तीले आणुन देला होता. आलेल्या परिस्थितीनं समजदार झालेल्या लहान पोरानं एक चाकलेटही मायले घेऊन मागीतलं नाही. ही सर्व जाण या इवल्या इवल्याशा पोरांना परिस्थितीनं आली होती. महागडया दुकानात न जाता पोराले एक गाडीवरचा सस्त सदरा व पोरीले फ्राक घेतला.स्वतासाठी जुण्या साडीवरच राहणं तीनं पसंत केलं होतं.दोन टीकल्याईचै पैकेटं फक्तं तीनं घेतले,पण पोरानी बंदुकीसाठी हट्ट केला नाही. नेहमीच्या सरावाने ती दगडावर आपटून ते फोडायची.

दिवाईच्या दिवशी झाकटीतच उठून यशोदीनं हापशीहुन पाणी आणून सडापाणी,सारवन करून घेतलं.पोरांना वयनाटीत खोसलेल्या पुडीतला किकसा लावून आंघोळी घातल्या.संध्याकाळी पूजा,जेवण खावणं आटोपून तीची दिवाई पार पडली.दुसऱ्या दिवशी यशोदीचा बाप नातवांना व पोरीले घ्यायला लगबगीनं घरी आला होता.यशोदीही बऱयाच दिवसापासून माहेरी गेली नव्हती.चारदोन दिवस आमासाक तेवढाच अराम, हवापालट म्हणून यायला तयार झाली. पाचच्या एसटीनं संध्याकाई घरी आल्यावर लेकीले पाहुन मायलेही लयच हरीख झाला.भागरथी व यशोदीनं पाट्यावर दाय वाटून मस्त ताकातले कडीगोये केले साऱ्याईची जेवणं झाल्यावर लय रातलोक गप्पा गोष्ठी चालल्या. बापाची परीस्थिती मजूरीवरच होती.जगदेव दुसऱ्याच्या वावरावर सोकारी करायचा. आलेल्या मजुरीच्या पैशात तिखट, मीठ भागवायचा.

दुसऱ्या दिवशी जगदेवरावनं पायटीच घराबाहीर सायकल काढली. सायकलच्या हॅण्डलवर ईवा खोसला होता. सायकलच्या कॅरीवर मांग एखादा गवताचा भारा अडसासाठी कामातून गेलेला रिकामा ट्यूप संग घेतला होता. त्या टयुपचा उपयोग त्याले वावरातून कापसाचं गठोळं आणासाठीही व्हायचा. त्यानं वावरात पोचल्या बरोबर भराभर खच्याटून चांगला गवताचा भारा काहाढला. दात मनगटं खाऊन तो उचलून सायकलच्या मांग कॅरीवर ठेवला.व ईवा घेऊन कडबा पेरलेल्या नाल्यात उतरून साजरे भरलेले कडाऊचे हुळ्ळयासाठी कणसं काढले. नातवांसाठी व पोरीसाठी हुळ्ळयासाठी कणसं काहाढतांना त्याले चांगलाच हुरूप आला होता. तीच्या घरी ना वावर ना शिवर नवऱ्याची हातमजुरीच होती.

“खातील लेकाचे नवयीचं चार दिवस” असं म्हणत पायजामाचा घोय करुन त्याच्यात बोरीची पिकलेली बोरं,चीचा,वायकं,शेंगा,भेंडं, पिकलेल्या आंबट शेरन्या, हरभऱ्याचा घोयना घेतला व घराचा रस्ता धरला. सय -संध्याकाई दिवेलागण झाली.लोकांनी घरापासून तर खतापर्यंत मस्त दिवे लावली होती. नंतर साऱ्यांची जेवणं उरकली.

पायटून सुर्याचा गोया अधिकच लालभडक दिसत होता.तसं त्यांन काडी कचऱ्याचा कवटा घेऊन शेकोटी पेटोली. पेटोलेली शेकोटी पाहून घरातून पोरगी, नातू,बायको ही आंग शेकाले बाहीर आली होती. तसेच त्यांन आरात हुळळयाची कणसं भाजली व पोतं आणून साजरे ईटकरांन कणसं लगडलागड करून साजरा ताटभर गरम हुळळा पाडला. त्याच्या बायकोनं म्हणजे भागरथीनं चायणी,व सुप आणून गाऊन ते पाखडपुखड करून व त्याच्या संग साजऱ्या हिरव्या मिरच्या आणुन तापात भाजून तोंडी लावाले पीलेटीत मीठ आणून त्यांची मस्त हुळळा पार्टी रंगली.ते सर्व गरम हुळळा खात असतांना जग्याचं मन मात्र आनंदानं तुडुंब काठोकाठ भरलं होतं.मायबापाले तरी लेकरांशिवाय आणखी दुसरं काय हवं असतं.जगदेवनं मस्त तापातली गवरी काढून दात घासाले सुरूवात केली होती.तशी त्याले शेतातलं काही खा प्यायची काहीही नवई नव्हती.तसाही तो वावरात खटल्यात सोकारीचं काम करायचा. वावरात गेला म्हणजे हुळळा, गव्हाच्या ऊंब्या, वायलेल्या हरभऱ्याचा उया भाजणं ,हा त्याचा दररोजचाच दिनक्रम होता.

गावात कार्तिक निमित्ताने काकडा आरतीची समाप्ती होती. दुसऱ्या दिवशी गावातून पालखी निंघाली होती. सुपो महाराजाचं मंदिर म्हणजे शिव रस्त्यावर गावापासून एक फर्लांग लांब मस्त चिचेच्या झाडाखाली होतं. चिंचेच्या झाडावर दिवसरात्र माकडं बसलेली असायची.बाजूले नदी व हिरवगारं झाडोन होतं. याच नदीनं भर उन्हायात आजूबाजूची पिकं जगवली होती. याच नदीच्या पाण्याचा गावच्या सुनवायऱ्याईले धूणं धूवायले व ढोरावासराईले प्यायले,विटा,पजायाले उपयोग होत होता.गावातून जागोजागी रांगोया,फोटो भजन मंडळींचं स्वागत सारा गाव दणाणून गेला होता.गावात जत्राही भरली होती.लहान पोरांची खेळणी, लाह्या बत्तासे, भातक्याची दुकानंही साजरी सजली होती.साऱ्याईनं देवदर्शन घेऊन काला घेतला.व पयल्याच पंगतीत महाप्रसाद भेटला. प्रत्येकाच्या घरी पावणे रावणे आले होते. पंचक्रोशीतील भजनी मंडळीही काल्याच्या कीर्तनासाठी आवर्जून हजर होती. साऱ्या गावात प्रत्येकाच्या घरून भाकरी मागवल्या जात होत्या. पतरावयीवर साजरी गरम भाकरी व उळदाचं तिखट वरण घेऊन व जेवणं करून त्याईनं घराचा रस्ता धरला. पोरांनाही मस्त मजा आली होती.पोरीनं बापाच्या घरी दोन चार दिवसाची रहायची हौस पुरी करून घेतली एटायातील दिवाई निमित्ताने आलेल्या पोरीसोरीची, वर्ग, मैत्रीणींची,पावन्या,रावन्याईची वयखपायख झाली, भेटीगाठी झाल्या एकमेकींच्या घरी जाऊन फराय पाण्याचा आनंद घेतला.तीचाही भार हलका झाला शेवटी आपल्या घरी जायची तयारी झाली. नाश्त्यासाठी भागरथीनं घराच्या कौलावर पोत्यावर वाऊ घातलेली मांगची हुळ्ळयाची कणसं साजरी मोंगरीनं कांडली. त्यातून रायलेल्या ज्वारीच्या कण्या एका तवेलीत रांधल्या व पीलेट पीलेट साऱ्याईले ताटलीत देल्या.भागरथीनं लगबगीनं सयपाक केला. सपरीत बसून साऱ्याईनं संगमंग जेवणं केली.संगमंग जेवणं उरकल्यावर बापानं आपल्या लेकीसाठी आधल्या दिवशीच तुरीच्या शेंगांन भरलेला झोरा तीच्या हातात दिला होता.ती नाही नाही म्हणत.

‘शहरात काय सस्स्त भेटटे वं माय’ म्हणत तीच्या मायनं सात आठ चांगली भोरटलेली गावरान ज्वारीची कणसं संग झोऱ्यात देली. पोरीले गरिबीतही आपल्या बापाचा दिलदारपणा जाणवला होता. जगदेवनंच आपल्या पोरीले चार दिवस हवापालट होते म्हणून दिवाई निमित्ताने माहेरी आणलं होतं. आपल्या परीनं तीचं कपड्या, लत्तानं,चोईबांगडीनं स्वागत केलं होतं. बापाच्या घरी दररोजच्या कामाच्या किटकीटी पासून सुटका होऊन साजरं दोन चार दिवस यशोदीचं रायणंही झालं होतं. गरीबीतही माय,बापाच्या मायेची उब तीनं अनुभवली होती. पुरणाच्या पोई पेक्षाही चटणीभाकरचा प्रेमाचा हाच पाऊणचार तीले लाखमोलाचा वाटला. बाप दुसऱ्याच्या शेतात सोकारी करायचा तर माय दुसऱ्याच्या शेतात राबायची. यशोदीले आपलं बालपण आठवलं घरं,बकऱ्या,शाळा,गुरढोरं नदी अवतीभवतीचा वयखीचा बघून या नैसर्गिक वातावरणात चार आठ दिवस कसे गेले ते कळलंच नाही.वयखीचा परिसर तीचा ऊर भरून आला होता. या दिवाई व हुळ्ळयाच्या कणसा निमीत्तानं तीची आपल्या जन्मदात्या मायबापाची भेट झाली होती.नातवालेही आबाच्या घरी लय हरिख वाटला होता. शेवटी झोरे हातात घ्यायची वेळ झाली. दुपारची बाराची एसटी स्टँडवर आली होतीच तसं त्यांचं सायकलवरचं सामान घेऊन एसटी स्टॅण्डवर नेऊन देऊन एसटीत त्याईले जागा करून देली. जगदेव दूसरयाच्या शेतात सोकारी करून आपल्या घरादाराचं पोट भरायचा‌.पण अशाही परिस्थितीत तो समाधानी होता. बाप पोहचून देतो म्हणून नाही म्हणलयावरही तो संग आला होता. फाटयावर दोघी मायलेकी एकमेकीस पाणावलेल्या डोळयांनी पाहत होत्या.. शेवटी एकदाची मोठं धुपट फेकून एसटी धकली.यशोदीले हुंदका दाटून आला.न राहवून तीच्या मायनंही डोयाले पदर लावला.दूरलोक मायबापाकडे वाट चुकून हंबरून हंबरून तोंडाले फेस आलेल्यां वासरासारखी आपल्याले एसटीत पोहचवून खाली माना घालून संग चाललेल्या आपल्या थकलेल्या मायबापाकडं कूठलोक ती एकटक पाहतच होती.

– विजय जयसिंगपुरे.

अमरावती.
भ्रमणध्वनी-९८५०४४७६१९