एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.!
या एस.टी चं आणि माझं नातं फार जिव्हाळ्याचं झालं आहे.मला आणि माझ्या कवितेला ही एस.टी.आमच्या आयुष्याला फार जवळची झाली आहे. महाराष्ट्रभर याच एस.टी.ने मी हिंडत असतो. प्रवासात सगळी सर्व सामान्य माझ्यासारखी माणसं असतात. थोडंस सोशल मीडियामुळे मला बरीच सामान्य लोकं ओळखू लागल्यामुळे अनेकजण मी एस.टी.मध्ये किंवा स्टँडवर दिसलो की माझ्यासोबत सेल्फी वगैरे काढतात. कुणी चहा पाजतात. तर कुणी काहीतरी खायला हमखास देतात. याच एस.टी. मध्ये सामान्य लोकांची वेदना समजून घेता येते. मला वाटतं सगळ्या जाती धर्माची माणसं या एस.टी मध्ये भेटतात. पण, खरं सांगू का? या डब्यात फक्त आणि फक्त माणुसकीचा सुगंध दरवळत असतो. बसायला जागा भेटावी, भेटली तर खिडकीजवळ भेटावी या हट्टाशिवाय दुसऱ्या कुठल्याही मुद्द्यावर इथं भांडण होत नाही.ज्याला आधी जागा भेटलेली असते नंतर तोच प्रवासी उभ्या असणाऱ्या आणि थोड्यावेळापूर्वी वाद झालेल्या प्रवाशाला हळूच सरकून जागा देताना मी जेव्हा पाहतो तेव्हा मनाला समाधान वाटतं.
या एस.टी.मध्ये माझ्या कवितेला विषय भेटतात.अनेक कविता मला या प्रवासात सुचतात.माझा कच्चा माल मला या डब्ब्यात भरपूर भेटतो. हा एक स्वार्थच आहे म्हणा. बाकी गाडी कधी पंचर होते, तर कधी बंद पडते. पण सगळे प्रवासी समजून घेतात. बाकी अनेकदा माझी गाडी चुकली किंवा उशीर झाला तर अनेक एस.टी.स्टँड वर मी रात्रभर झोपतो. सत्कार करताना खांद्यावर घातलेली शाल रात्रभर अंगावर घेऊन झोपण्यात जी मज्जा आहे ती बाकी कशात नाही.
बाकी हा प्रवासाचा अनुभव आता इतका दांडगा झालाय की, महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यातल्या स्टॅंडवरून कुठली गाडी किती वाजता कुठल्या मार्गे जाते, किंवा शेवटची गाडी किती वाजता कुठं जाणारी आहे हे मला तोंडपाठ झालेलं आहे. आणि बरेच चालक वाहक आता ओळखीचे झाले आहेत. मी बऱ्याच कर्मचाऱ्यांना आता नाव गाव आणि डेपो सहित ओळखू लागलोय.
ही मला मिळालेली जी जिंदगी आहे ती फार सर्वोत्तम आहे. असं मी मानतो. प्रसिद्ध किंवा मोठं होण्यापेक्षा आपल्या क्षेत्रात आपण आपल्या कलेशी प्रामाणिक आहोत. ही भावना आयुष्य जास्त सुंदर करून जाते. बाकी आता या महिन्यात बऱ्याच नवीन गाड्या दाखल झालेल्या आहेत. त्यांचा रंग लाल आहे. आसनव्यवस्था फार छान आहे. त्यात गाणी लागतात. त्याबद्दल राज्यसरकारचे आभार आहेत. आणखी एक वय वर्षे 75 पूर्ण झालेल्याना जो मोफत प्रवास दिला आहे त्याबद्दल ही खूप सरकारचे खूप धन्यवाद आहेत.
बाकी, मोफत प्रवास करणे माझ्या नशिबी आहे की नाही हे माहीत नाही पण, जोपर्यत श्वास आहे तोपर्यत या सरकारी वाहनावर माझं नितांत प्रेम असणार आहे हे नक्की. कारण कविता माझं जगणं आहे आणि आम्हा दोघांचा जीव ही एस.टी.आहे.