आईची शिकवण म्हणजे चालते -बोलते विद्यापीठ.!
माझी आई शाळेत कधीच गेली नव्हती परंतु तिने आम्हाला दिलेली शिकवण जगातल्या कोणत्याच विद्यापीठात मिळणार नाही. जीवनाची नितिमुल्य नकळत तिच्याकडून शिकत गेलो. आगदी माझ्या लहानपणी जेंव्हा गिरणी नव्हत्या किंवा पावसामुळं किंवा इतर कारणामुळं गिरणी बंद असायच्या तेंव्हा ती पहाटेच उठुन जात्यावर दळायची. तीच्या मांडीवर डोकं ठेवून तीची जात्यावरची गाणी ओव्या ऐकताना तहानभूक हरपत असारची. तिची माहेरची गाणी किंवा कुटुंबातील व्यक्तीवर म्हटलेली गाणी ऐकुण कधी-कधी टचकन डोळ्यात पाणी ही यायचं आताही येतं. तिला वाचता -लिहिता येत नव्हतं तरी केवळ गाणी ऐकुण तिची पाठ झाली होती. हे विषेश कुटुंबातील प्रत्येक घडणार्या प्रसंगावर तिच्याकडे गाणं होतं. ऐकणारं अगदी मञमुग्ध होऊन ऐकत असे.
दिपावलीला गावी आलो, आई शेजारी बसुन आईचा हात हातात घेतला आणि मला भडभडून आलं. आईनं जीवनात घेतलेलं कष्ट, मेहनत, तिनं सचोटीनं केलेला संसार, तिनं वडीलांकडं कधीच कोणत्या गोष्टीचा हट्ट केला नाही. भाऊंची परिस्थिती तिला ठाऊक होती. भाऊंना तिला एखाद्या सणाला साठी-चोळी नाही आणता आली तरी तिनं कधी ञागा केला नाही की कधी हिरमूसली नाही. आणि तिचा त्याग आठवला व नकळत डोळ्यातुन अश्रू वाहु लागले. ती आपल्याकडं हे नाही ते नाही म्हणुन कधीच दु:खी कष्टी दिसली नाही. उलट मला सोन्यासारखी सहा पोरं आहेत हीच माझी अनमोल संपत्ती आहे हिच तिची धारणा होती व ती शेवटयर्यंत राहिली. आईसोबतची दिपावळी अविस्मर्णीय असायची. ती आता थकली आहे. सध्या वय ८५ च्या पुढं आहे. त्यामुळं काही गोष्टी तिला आता आठवत नाहीत. शेतातील घरात ती आण्णांकडे रहाते.सध्या आण्णा तीची खुप काळजी घेतात.
आईचा स्वभाव फार कडक म्हणुन तिचं व इतर कोणाचचं फारसं जमलं नाही. फक्त मंगलताई तिचा जीव की प्राण, तसं सर्वच आम्हा सहा भावंडांना तीनं खुप प्रेम माया दिली . ती जगात कोठेच भेटणार नाही. त्याचे मोल आपण करुच शकत नाही ते अनमोल आहे,माझे शिक्षण चालु असताना व आण्णा नगरला मांडे शेठकडे सालानी होते. तेव्हा माझे बाबा म्हणजेच आमचे भाऊ थकले होते, एका जागेवर बसुन होते. मी सातवीत शिकत होतो. तेंव्हा आंबळ्याला आम्ही गावी रहात होतो. आमच्या तोडक्या-मोडक्या संसारीची सर्व धुरा बाईच्या हातात होती. आई -बाबा अतिशय मेहमती होते. त्यांच्या उमेदीच्या काळात पंचवीस वर्ष मोलमजुरीकरुन त्यांनी आम्हासाठी दोन शेतं घेऊन ठेवली होती. ती आम्ही दोघं -दोघं नोकरीकरुनही घेऊ शकत नाही. ती अतिशय मेहनती होती. पहाटे कोंबडा कोकला की उठत असायची. पहाटेच सर्व स्वयंपाक करायची व दिवसभर कोठेतरी लागेल तेथे मोलमजुरी करायची, मला जेंव्हा सुट्टी आसारची तेंव्हा मुंबईला जाऊन मी दोन पैसे भाजीचा दंधा करुन कमऊन आणायचो. बाकी तिच्या मजुरीवर व तीनं पाळलेल्या कोंबड्यांवरतीच आमचे घर चालायचे. असे साधारण दहा वर्ष गेले (सन १९८८-९८) या सर्व संघर्षातुन मी आठ्यान्नवला ग्रामसेवक म्हणुन नोकरीला लागलो. तेव्हा आई-बाबांना झालेला आनंद शब्दांत सांगता येत नाही, मी आडाणी आहे. गोबाडी आहे पण माझा लेक साहेब झाला हे ती सर्वांना अभिमानाने सांगायची.
मला नोकरी लागली तेंव्हापासुन अगदी कोरोनापर्यंत म्हनजे सन २०१९ पर्यंत मी तिला नियमीत मनिआॅर्डर पाठवत असे . प्रत्येक महिन्याची दहा तारिख आली की ती माझ्या मनिआॅर्डरची आतुरतेने वाट पहात असायची. भाऊ सन २००८ ला गेले त्यानंतरही ती वाडीवरच्या घरात एकटीच रहायची . तीला एकटीला रहायला आवडायचे. दिवसभर तीची चुल चालु असायची, मनाला वाटेल ते करायची. मनिआॅर्डर आली की रविवारी न्हावरेचे बाजारला जायची तिला हवं ते आणायची गावातुन चालत घरी यायची पण आपण एवढे चाललो म्हणुन मनात कसलाही दमलेला भाव नसायचा उलट आपण बाजार घेऊन आलो त्याचेच अप्रुप तिला जास्त असायचे.
कधी- कधी गावी आलो तर कर्ड्याहुन मी तिला किराणा वगैरे भरुन द्यायचो. तिची लोखंडी पेटी कायम सामानानं भरलेली असायची. त्यात सुखी मच्छी बोंबिल, सुकट सह सर्वच वस्तु अगदी भरभरुन ठेवलेल्या असायच्या. मी नोकरी करत असलेल्या कोकणात तिला चार-पाच वेळा सोबत नेहले परंतु तिचे मन तिकडे कधीच रमले नाही.महिना भर राहिली कि तिला गावाकडची ओढ लागायची. माझ्या कोंबड्या- कोंबड्या करत रहायची. तिचे मन येथे रमत नाही हे पाहुन तिला पुन्हा गावाकडं पाठवावी लागायची. तिला गावाची आणि वस्थीवरच्या घराची विशेष आवड होती. वस्तीवरच्या बायका कधी-कधी पंढरपुर, आळंदी, काळुबाई असा देवाला जाण्याचा बेत आखायच्या त्यात आमची बाई हमखास जायची. नको जाऊ म्हटलं तरी परत-परत जात असे. देवाची तिला विशेष आवड होती. त्यामुळे देवाला जायचा तीनं कधीच कंटाळा केला नाही. मी जेंव्हा -जेंव्हा गावी जातो आईला भेटतो तेंव्हा मला पुन्हा कामावर येऊन काम करण्याची हजारो पटीनं ऊर्जा मिळते. मी निघालो की पुन्हा कधी येणार कबुल करुन घेते. पुन्हा येणार म्हणुन माझ्या वाटेकडे डोळे लाऊन बसते.
– तानाजी धरणे
कादंबरी हेलपाटा
9975370912