गुरूकुंज.!
(वं.राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ह्यांच्या ५६ व्या पुण्यतिथीनिमित्त भावांजली)
*****
धन्य धन्य ते गुरुकुंजश्री
गुरुदेवाचे कुंजवन
जेथे विसावला राष्ट्रसंत
अश्विनमासी।.
मानवतेचे मंदीर येथे
सर्वांकरिता असे खुले
विश्वस्नेहाचे नंदनवन
गुरुकुंजी या।
देवभक्ती अन देशभक्ती
ग्रामशक्ती अन ग्रामभक्ती
अर्पिला ग्रामगीता बोध
ग्रामनाथाला।
समुदाय प्रार्थनेचा मंत्र
ग्रामसुधारणेचे नवे तंत्र
स्थापिले सेवामंडळ
ग्रामाग्रामासी।
अध्यात्म आणि विज्ञान
ह्याच्या सुंदर संयोगातून
प्रतिपादीला सुखाचा मार्ग
भजनातून।
बंधूभाव नांदण्या भारती
सुखी ठेवण्या सकलांसी
मागितला वर जगदीशासी
तुकडोजीने।
हिंदभूच्या लेकरां जागविले
देशभक्तीचे दिले धडे
जोशवीले गोऱ्यांविरुध्द
स्वातंत्र्यासाठी।
चिमूर-आष्टी स्वातंत्र्य संग्राम
मोहवीले खंजरीने तरुणांस
स्वतः घेतली उडी रणसमरात
तुकडोजीने।
झाडझडुले शस्त्र बनेंगे
पत्थर सारे बाम्ब बनेंगे
भजनातून त्वेषाने बरसला
इंग्रजांवर।
देवभक्ती अन देशभक्ती
स्वातंत्र्यासाठी केली युती
तुरुंगवासही भोगला
श्री गुरुदेवाने।
देवभक्तीतून लोकसेवा
देशभक्तीतून राष्ट्रसेवा
झाला नाही जगी असा
राष्ट्रसंत हो।
गेला धावुनिया सीमेवर
सुनाविले चिन्या खडे बोल
वाढविण्या मनोधैर्य
शूरवीरांचे।
स्वातंत्र्यानंतरही सुराज्य येण्या
किर्तने-भजने-भाषणे गावोगावी
प्रिय मित्रा,म्हणून समजावले
भारतीयांना।
रोज न वाजे खंजरी
असे न घडले कधी
सुधारण्या जनतेसी
भारतभूच्या।
भजने भाषणे प्रभावी
ठाव घेई जनाहृदयी
मधूर वाणी बोलता
स्वरभाष्कर।
राम कृष्ण हरी मंदीर
अभ्यासकांचे माहेर
विश्वशांतीचा संदेश
मिळतो येथे।
हे विश्वची माझे घर सांगुनी
वदिले एकचि ईश्वरतत्व जगी
हर देशमे तू हर भेषमे तू..
भजनातून।
देण्या मानवतेचा महामंत्र
केले जगी भ्रमण निरंतर
शरीरे अंती विसावला
गुरुकुंजात।
भेटता सारे लहानथोर
म्हणती जयगुरु सत्वर
मिळतसे उर्जा अपार
गुरुकुंजात।
दिसे विराट जनसागर
घडे विशालतेचे दर्शन
वाटे तुकड्याचा भास
विराटतेत.
जैसे देवे रचिले पंढरपूर
तैसे येथं रचिले गुरुकुंज
निर्मीला गुरुकुंजाश्रम
उद्धारी जना।
अश्विन कृ.पंचमीशी
येता महासमाधीशी
मंगल ते दर्शन घडते
जडजीवांसी।
श्रद्धासुमनांचे अश्रू पडे
महासमाधीत दर्शन घडे
अंतरात्म्यात प्रकटे माझा
श्री गुरूदेव।
जयगुरु जयगुरु जयगुरु
सेवक भक्तांचा आधारु
अखंड कृपेचा सागरू
श्री गुरुदेव।
आबासाहेब कडू,
पेठ मांगरुळी
ह.मु.अमरावती(९५११८४५८३७)