नातं लहूच्या माशामधलं.!
कार्यक्रम दुपारी तीन वाजता होता.आणि मी स्टॅण्ड वर बस मधून उतरलो तेव्हा बारा वाजले होते. मी तीन तास आधी पोहचलो होतो.संयोजकाला याची काही कल्पना मी दिली नव्हती.हातातली पिशवी घेऊन मी स्टॅण्डच्या बाहेर आलो.पाहतो तर चौकात माझा फोटो असलेलं बॅनर लावलेलं होतं.त्या दिवशी होणाऱ्या संमेलनाचा मी प्रमुख पाहुणा होतो.हे प्रमुख पाहुणा वैगेरे असलो की मला जरा कायम अवघडल्यागत होत असतं.लोकांनी ओळखू नये म्हणून तोंडाला रुमाल बांधला.तसा रुमाल बांधला नसता तरी कुणी ओळखलं नसतं कारण बॅनरवर लावलेला फोटो फिल्टर करून गोरापान बनवलेला होता.
एकाला कार्यक्रम जिथं होता तिथला पत्ता विचारला.त्याने सांगितलं रिक्षा करून जा.खूप लांब आहे त्याने रस्ता बोट करून दाखवला.मनात म्हणलं, “रिक्षा करून इतक्या लवकर जाऊन करायचं काय? जाऊया चालत जरा पाय मोकळं करत ..” म्हणून मी चालायला लागलो.अर्धा एक किलोमीटरवर गेल्यावर एक पूल लागला.पुलाच्या खालून संथ गतीने ओढा वाहत होता.आणि त्या पुलावर एकजण गळ टाकून मासे धरण्यासाठी उभा होता.आणि नेमकं त्याच पुलाच्या दुसऱ्या टोकावर अजून एक बॅनर लावलेला होता आणि त्यावर ही माझा फोटो स्पष्ट आणि ठळकपणे दिसत होता. आपलं बॅनर बघितल्यावर मनाला जरा गुदगुल्या झाल्यागत वाटलं.
मला लहानपणापासून गळ टाकून मासे धरायची लै हौस.मुळात हा मासे धरण्याचा नाद लै बेकार असतो.आणि मला तो अफाट होता.पण उभ्या जिंदगीत माझ्या गळाला एकही मासा लागला नव्हता.पण मनात जपलेली ती आवड मात्र काही कमी झालेली नव्हती.कधी ना कधी आयुष्यात आपल्या बी गळाला मासा लागेल हे मात्र मनात पक्कं बसलेलं होतं.
माझी पावलं आपोआप त्या माशेवाल्या जवळ जाऊन थांबली.आणि मी त्याच्या बाजूला उभा राहून खाली पाण्यात बघू लागलो.त्याने फक्त माझ्याकडे तिरकं बघितलं आणि गळाची दोरी हलवायला लागला.तेवढ्यात संयोजकाचा फोन यायला लागला.कार्यक्रमाला बराच उशीर होता.मनात म्हणलं जर याला सांगितलं आलोय इथं तर हा गाडी पाठवणार आणि नेणार गेस्टहाऊस वर.तिथं जाऊन गुदमरत कशाला बसायचं? म्हणून मी त्याचा फोनच उचलला नाही.आता सगळा वेळ इथच मासेवाल्या जवळ घालवायचा असं ठरवलं आणि हातातली माझी पिशवी मी हळूच खाली ठेवली.आणि त्याला विचारलं ” काय सापडलं का नाय अजून..? त्यावर तो म्हणला दोन अडीच किलो होईल एवढे सापडले बघ.बाजूला एका पोत्यात त्याने मासे ठेवले होते.मी ते हळूच उघडून बघितले.” मी म्हणलं मासा भारिय की राव.” तसा तो पण म्हणाला “चवीला लै भारिय रं इथला मासा.” आणि आमच्यात संवाद सुरू झाला.
तोंडाला रुमाल बांधलेला होता.गरम होत होतं.म्हणलं हा काही आपल्याला ओळखणार नाही.म्हणून मी रुमाल काढला आणि खिशात ठेवला.त्यानेही माझ्याकडे बघितलं पण ओळखलं नाही.मी म्हणलं … “हाय का एखादा गळ शिल्लक.”.? जरा संशयानेच त्याने माझ्याकडे बघितलं.आणि म्हणला “हाय एक पण काठी बघ एखादी.” मी पुलाच्या खाली उतरून एक झाडातली काठी आणली.माझा हुरूप बघून त्यालाही चेव आला.गळाला दानवे लावून त्याने काठीला तो बांधला आणि माझ्या हातात दिला.पण मला माहित होतं कारण उभ्या आयुष्यात आपल्याला एकही मासा धरता आलेला नाही.मी लैच अनुभवी असल्यागत गळ इकडं तिकडं फिरवायला लागलो.आणि काठी जड लागायला लागली.मी पटकन वर उचललं.आणि बघतोय तर काय..? चांगली अर्ध्या किलोची चिलापी गळाला लागलेली होती.मला लै आनंद झाला.मी हळूहळू मासा वर घेतला.तो माझ्याकडे एकटक बघायला लागला.आता त्या गळात अडकलेला मासा काढायचा कसा हेच मला जमत नव्हतं.मी त्याच्या जवळ गेलो आणि म्हणलं ” काढ ना हे..” तो म्हणाला ” तुला नको का??’ मी म्हणलं “मला नको घे तुलाच.मी सहज टाईम पास करायला आलोय.” त्याने तो मासा काढून पोत्यात घातला.मी त्या माशाला एकटक एकदा बघून मनात भरवून घेतलं.आयुष्यात पकडलेला माझा पहिला मासा होता तो.पण मी तो खाऊ शकणार नव्हतो.दुसऱ्यांदा गळ टाकला.दुसरा मासा लागला गळाला.तो ही वर काढला.लैच आनंद होत होता.तो ही खुश होत होता.मला म्हणला लैच पट्टीचं हाय ओ तुम्ही. मी मान हलवून होय होय म्हणलं.मस्त वेळ चालला होता.
चांगलं चार पाच किलो मासे झाले.त्याने गळ गुंडाळायला सुरवात केली.मला म्हणाला ” आता बास लै झालं. तु बी निघ..” मी म्हणलं , “थांब की थोडावेळ चांगलं सापडायला लागलंय.तर तो म्हणला ” बक्कळ झालं राव एवढं खपत नाही” चल बास कर”.. माझा नाईलाज झाला.तो आवरत होता.मी त्याला विचारलं ” काय रे ते स्वागत हॉल इथून किती लांब आहे.” तसा तो म्हणाला, “आरे याच रस्त्याने पुढं गेलं की बाजूलाच हाय.” मी तिकडंच जाणार हाय की.आज कार्यक्रम हाय तिथं.” मला जरा धस्स झालं.म्हणलं तु त्या कार्यक्रमाला जाणार हाय का..? तर त्यो म्हणला होय ” अहो तिथं खुर्च्या लावायला आम्हीच असतोय बघा.” आज ते कुठला कवी येणार हाय त्याचं भाषण हाय.सगळ्या तालुक्यात चर्चा हाय त्याची.. येणार हाय त्याच्या कवितेचा कार्यक्रम हाय.” मी लगेच म्हणलं “होय का मग मी बी येतो तुझ्यासोबत चल..” असं म्हणून मी माझी पिशवी त्याच्या सायकलच्या हॅण्डलला अडकवली.मासे भरलेले पोते मागच्या बाजूला केयरज वर मी अलगद ठेवलं.आणि आम्ही चालू लागलो.
हाताचा माशाचा वास घुमत होता.आणि मी पण माशेवाल्या सारखा दिसू लागलो होतो.पुढच्या चौकात त्याने सायकल थांबवली.तिथं त्याची बायको थांबली होती.त्याने माशाचं पोतं तिच्याकडे दिलं आणि तिला म्हणला … “मी येतो खुर्च्या लावून तोवर धुवून घे आणि लाव माल आणि बस..” त्याने बायकोला बोलण्याच्या ओघात सांगितलं.”याने पण लै मासे धरून दिलं बघ.”. माझ्याकडे पाहून ती फक्त बारीक हसली.आणि पोतं घेऊन निघून गेली.मी आयोजकाला फोन लावून सांगितलं मी वेळेत जागेवर पोहचेल काळजी करू नका..
लहू सायकल धरून पुढं चालू लागला.मी त्याच्या मागे होतो.मी दोन पावलं लांब टाकली आणि त्याच्या सोबत झालो आणि त्याला त्याचं नाव विचारलं.तो म्हणाला, “माझं नाव लहू.” आम्ही दोघ बी नवरा बायको मासे विकतो इथं चौकात.मी मान हलवली.त्याने मला विचारलं “तुझं नाव काय..?” मी फक्त नितीन म्हणलं.त्याला काही कळलं नाही.पण अर्धा किलोमीटर चालत असताना आमच्यात गप्पा झाल्या आणि आमच्यात मैत्री झाली.एका जागी चहा घेतला..मी बिल द्यायला दहा रुपये बाहेर काढले तोवर लहू म्हणाला, “नाय नाय ठीव ती नोट आत..तू एवढं मासं धरून धरून दिलं आणि बिल बी तू देणार होय.. ठिव पैसे आत असा त्याने दमच भरला..मी पैसे परत खिशात टाकले.त्याने तंबाखू खाल्ली.गुटख्याच्या दोन पुड्या घेतल्या खिशात टाकल्या.मला विचारलं त्याने “तुला काय घ्यायचं का..?” मी नाय म्हणलं,” मी नाय खात असलं काही.” त्यावर त्याने खांद्यावर जोरात दणका देत म्हणाला “असला कसला रे तू.?” मी फक्त हळूच हसलो..आणि पुढे चालू लागलो.
आम्ही त्या स्वागत हॉल जवळ आलो.दोन वाजलेले होते.दोघेजण आधीपासूनच त्याची वाट बघत थांबले होते.आले.लहुला कमरे खालच्या शिव्या देत दोघे बी चिडून म्हणाले “चल बे लवकर”. लहू हसत हसत त्यांच्यासोबत चालायला लागला.मी कुठं एकटं थांबायचं इथं. म्हणून त्याच्यासोबत आत गेलो.संयोजकामधील तिथं कुणी नव्हतं.सगळे वरच्या मजल्यावर होते.आणि लहू त्या दोघांच्याबरोबर एका रांगेत स्टेज समोर खुर्च्या लावायला लागला.ज्या स्टेजवर मी थोड्यावेळाने कविता सादर करणार होतो आणि याच रिकाम्या असणाऱ्या खुर्च्या माणसांनी भरणार होत्या.आणि इथूनच टाळ्यांचा कडकडाट होणार होता.लहूला माहित नव्हतं की मीच तो कवी.तो त्याच्या तंद्रीत खुर्च्या लावत होता.स्टेजवर लावलेल्या माझ्या बॅनर वर माझी नजर एकटक थांबलेली होती.
मी त्याच्या बाजूला घुटमळत होतो.हातातली पिशवी मी बाजूला ठेवली आणि लहूच्या हातातली एक खुर्ची घेऊन मी रांगेत लावली.लहूने माझ्याकडे बघितलं.त्याच्या नजरेत मित्रत्वाची भावना दिसून आली.आणि त्याने हळूच दुसरी खुर्ची माझ्याकडे सरकवली.म्हणजे न सांगता त्याने मला कामाला लावला.आता लहूला नकार तरी कसा द्यायचा.म्हणून मी खुर्च्या लावायला लागलो सुद्धा.ज्या खुर्च्यांवर लोकं मला ऐकायला बसणार आहेत त्या खुर्च्या मी पुसत पुसत एका रांगेत लावू लागलो.का कुणास ठाउक पण लै भारी वाटायला लागलं.
खुर्च्या लावून झाल्यावर मी संयोजकाना फोन केला आणि हॉल मध्ये आल्याची कल्पना दिली.तसं वरच्या मजल्यावरून लोकांचा आवाज यायला लागला.पंधरा वीस जण खाली जिन्यातून चालत येताना दिसले.मी पटकन रांगेत लावलेल्या एका खुर्चीवर बसलो.लहू म्हणला ” दमलास काय..” मी काहीच बोललो नाही. तेवढ्यात ते पंधरा वीसजण जवळ आले.मी तोंडाचा रुमाल झटक्यात काढला.आणि संयोजकांने मला ओळखलं. ” तो इतक्या जोरात ओरडला आणि म्हणला ” ओ चंदनशिवे सर तुम्ही कधी आला …. ? असं म्हणत तो जवळ आला.हातात हात दिला.बाकीचा सगळा घोळका माझ्या बाजूला उभा झाला.सगळ्यांना मी नमस्कार करायला लागलो.आणि लहू लांबूनच माझ्याकडे एकटक पाहायला लागला.तो माझ्याकडे एकदा बघायचा आणि स्टेज वर लावलेल्या बॅनर कडे एकदा बघायचा.त्यावर माझा फोटो होता.ते संयोजक मला वर घेऊन चालले.मी त्यांना थांबवलं.मी लहुजवळ गेलो.म्हणलं “लहू कार्यक्रम संपल्याशिवाय जाऊ नकोस.तुझा नंबर दे .लहू भांबावलेल्या अवस्थेत होता.त्याने मला नंबर सांगितला.मी डायल केला त्याला माझा मिस कॉल गेला.मी त्याचा नंबर लहू मासेवाला असा सेव्ह केला . आणि संयोजकाच्या सोबत जिन्याने वरच्या मजल्याच्या दिशेने चालू लागलो.मी मागे वळून पुन्हा पुन्हा त्याच्याकडे हसत बघत होतो आणि तो माझ्याकडे बघून त्याच्या त्या दोन मित्राना काहीतरी सांगत होता.
साडेतीन वाजता मी स्टेजवर प्रमुख पाहुण्याच्या खुर्चीत होतो.गावातली नामांकित लोकं बाजूला होती.समोरच्या सगळ्या खुर्च्या भरून लोकं मागच्या बाजूला उभी होती.या रांगेत लावलेल्या खुर्च्या थोड्यावेळा पूर्वी मी माझ्या हाताने पुसलेल्या आहेत हे फक्त मला आणि लहूलाच माहित होतं.गर्दीत माझा मित्र लहू उभा असलेला दिसत होता.त्याची एकटक नजर माझ्यावर खिळलेली होती.तो दुसरीकडे बघतच नव्हता.माझा सत्कार वैगेरे झाला.आणि मी माईकवर आलो.कविता सादर व्हायला लागल्या.मी गर्दीकडे कमी पण लहुकडे जास्त बघत होतो.लहू जोरात टाळ्या वाजवत होता आणि बाजूला उभ्या असलेल्या लोकांना काहीतरी सांगत होता आणि लोकं त्याचं काही ऐकत नव्हते.पण काही कविता सादर होताना लहूचे पाण्याने भरलेले डोळे मला दिसत होते.दिड तास मी बोललो.माझ्या बोलण्यात मी माझा मित्र लहू या ठिकाणी उपस्थित आहे हे बोलून गेलो..तेव्हा लहू डोळे पुसताना दिसला मला ही त्यावेळी हुंदका आला.पण आतल्या आत दाबून ठेवला.माझं बोलणं संपलं तेव्हा शेवटचा टाळ्यांचा कडकडाट जोरात झाला.लहू हात उंचावून टाळ्या वाजवताना दिसला.
कार्यक्रम संपला.लोकांनी सेल्फी घ्यायला माझ्या भोवती गर्दी केली. लहू लांबून पाहताना दिसला.त्याला जवळ बोलावून घेतलं.त्याचा हात हातात गच्च धरून लोकांना सेल्फी दिले.संयोजकांना मी सांगितलं.माझं मानधन इथच द्या.मी निघतो.इथं माझं घर आहे .माझ्या भावाच माझ्या मित्राचं घर आहे.मी तिथच मुक्कामी थांबून सकाळी निघेल.माझी काळजी करू नका.मी लहुची परवानगी न घेता हे सगळं बोललो.लहू हळूच म्हणाला, “ सर माझं घर लै बारीक आहे..गावाच्या बाहेर राहतो आम्ही..हाल होतील तुमचे..मी म्हणलं,एक चटई आणि उशी मिळेल ना..बास झालं..आणि मी धरलेले माशे तू काय फुकाट खाणार का..? लहू हसला..त्याने माझा एक हात गच्च धरला..दुसऱ्या मोकळ्या हातात आयोजकांनी मानधन असलेले पाकीट ठेवले.त्यावेळी पैशांनी भरलेल्या पाकिटापेक्षा लहुचा हात हातात असलेला हात लाखमोलाचा वाटून गेला.
लहूच्या घरी आलो.दोन खोल्याचं त्याचं पत्र्याच घर.बाहेरच्या खोलीत एक खाट त्यावर त्याची आई बसलेली होती.मी तिथंच बसलो.लहू ने ओळख करून दिली आणि सगळं सांगितलं.त्याच्या आईला खूप आनंद झाला.लहू म्हणाला ” सर फ्रेश होऊन बसा मी आलोच तिला घेऊन ” मी म्हणलं निवांत ये गडबड करू नकोस.निवांत जेवण करू.आणि सर बिर काय म्हणू नको म्हणलं.” लहू काहीच बोलला नाही तसाच निघून गेला.
तासाभराने लहू आला सोबत त्याची बायको होती.त्याने तिलाही सगळं सांगितलं होतं.तोवर आईशी गप्पा होऊन मी तिच्यात केव्हाच मिसळून गेलो होतो.ना त्यांना मी परका वाटत होतो ना मला ते परके जाणवत होते.लहूच्या बायकोने मस्त मासे तळायला सुरवात केली.वास दरवळत होता.थोड्यावेळाने मी,लहू त्याची बायको आणि आई चौघेजण एकत्र जेवायला बसलो होतो.आणि हसत खेळत मी माशावर ताव मारत होतो.
जेवण झाल्यावर लहू म्हणाला सर तुम्हाला बघा इथं झोपायला अवघड जाईल.तुमची चांगली सोय गेस्टहाऊस ला होईल.चला सोडतो तिकडं.मी डोळे वटारून त्याला म्हणलं ” ये बाबा मला काही अडचण नाही.हाकलून द्यायला लागला का आता.झोपू दे म्हणलं इथच.जेवलोय लै.” अस म्हणून खाटेवर आडवा झालो.लहूने टेबल फॅन माझ्या कडे फिरवला.त्याची आई आणि बायको आतल्या खोलीत झोपल्या.आणि लहू खाली म्हणजे फरशीवर झोपला आणि मला त्या माझ्या मित्राच्या घरात नव्हे माझ्याच मी मिळवलेल्या घरात मला शांत झोप लागली.
सकाळी आवरलं.लहूच्या बायकोने पोहे बनवले होते.पोटभर खाल्ले.चहा घेतला आणि निघालो.तेवढ्यात लहूची बायको बाहेर आली.एका फडक्यात तिने चार चपात्या मटकीची उसळ बांधलेली होती.माझ्या हातात देत म्हणाली, “दादा चार चपात्या हायत्या.बाहेरचं खाऊ नका काही.गाडी थांबली की हे खावा.” पाठची बहीण जशी काळजीने बोलते तशीच लहूची बायको बोलत होती.आणि मला आतून भडभडून यायला लागलं होतं.डोळे तुडुंब भरले.लहूच्या डोळ्यात ही पाणी आलं.त्याच्या आईने माझ्या डोक्यावरून हात फिरवला.त्याची बायको ही पदराने डोळे पुसत म्हणली.”तुम्ही एवढं मोठं हायसा दादा.पण आमच्यात तुम्ही राहिला.आमच्यात जेवला.मी तिला म्हणलं ” अहो वहिनी माझं ही घर असच आहे.” मी म्हणलं,”मी ही तुमच्यासारखा साधाच आहे म्हणून इथं आलो.आणि काल मी धरलेले मासे खायचे होते.म्हणून आलो इथं.” ती हसली आणि म्हणली” दादा मासे कसे झाले होते “? मी म्हणलं “खूप छान.त्या माशाला चव होती की नाही माहीत नाही पण वहिनी तुमच्या हाताला चव आहे.”
पाणावलेल्या डोळ्यांनी लहुचा आणि त्याच्या कुटूंबाचा निरोप घेत होतो.लहू माझी पिशवी घेऊन बाहेर पडला मी त्याच्या मागून चालू लागलो.त्याची आई आणि बायको दोघीही नजरेपासून दूर जाईपर्यत दारात उभ्या होत्या.मी मान मागे वळवून बघत होतो. हात करत होतो. आणि आतल्या आत हुंदका दाबून घेत होतो.आणि माणसावर प्रेम करणाऱ्या कवितेला मी कुरवाळत मातीत पावलं उमटवत निघालो होतो.
दंगलकार नितीन चंदनशिवे.
मु.पो.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.
मो.7020909521