गरीबाचं पोरगं एकटं खेळलं.!
बाप गेला, आई गेली. तरीही कष्ट करत, असेल त्यात हार न मानता जगत राहिला. सरळमार्गी स्वप्न बघत राहिला.. कधी कुणाच्या शेतात ओझी उचलत राहिला तर कधी स्वतःच स्वतःची पाहिलेली स्वप्न कुचलत राहिला.. जगण्याच्या आरुडात तो शोधत राहिला मनाला विरंगुळा.. कधी अर्धपोटी तर कधी उपाशीपोटी.. कधी निवद नारळ खाऊन तर कधी फाटकं तुटकं लेऊन.. आहे त्या परिस्थितीत काहीतरी बदल होईल या आशेवर एकेक दिवस येत होता, जात होता.. तरीही खचला नाही.. ना कुणाच्या वळचणीला गेला, ना कुणाला काही त्रास दिला.. तो चार भिंतीच्या शाळेत कमी अन् भाकरीच्या शोधात जास्त शिकत राहिला.. बरं.. आई बाप गेल्यानंतर त्याचा आधार होता तो त्याच्या पाच बहिणी व आत्याचा.. त्याही रोज जगण्याची लढाई लढत बिकट परिस्थितीतून वाट काढत चाललेल्या.. फाटक्याला तुटक्याचा आधार असेच म्हणता येईल.. पण त्याचे भाचा व भाची त्याला काहीबाही सांगत होती.. शिकवत होती.. आत्या व बहिणी लक्ष ठेवत होत्या.. कामाव्यतिरिक्त असलेल्या वेळेत तो घराजवळच असलेल्या मरीमातेच्या परिसरात मोबाईल हातात घेऊन सोशलमिडियात आला.. ना रुप, ना रंग, ना ड्रेपरी, ना शिक्षण, ना स्पष्ट बोलणे, ना कुणी गॉडफादर.. तरीही तो रील बनवत गेला.. रील स्टार झाला..
साध्या घरात राहून पाहिलेल्या स्वप्नात तो बिग बॉस च्या घरात कधी पोचला ते त्यालाही कळले नाही.. लोकं नावं ठेवत होती, नको नको त्या कमेंट करत होती पण तो बिनधास्त होता.. ना कौतुकाने हुरळून गेला ना ट्रोल केल्याने खचला.. त्याचे कारण लोक त्याचे कौतुक करतात की ट्रोल करतात हे त्याच्या कळण्यापलिकडचे होते.. त्याला अक्षर ओळख नसल्याने लिहिता वाचताच येत नाही तर बाकी प्रश्नच येतो कुठे…
“दिस येतील, दिस जातील
भोग सरल सुख येईल”
या ओळी त्याच त्याच्या भोळ्याभाबड्या पण निखळ, अस्सल जगण्यातून आज खऱ्या ठरल्या आहेत..
आता तो स्टार झालाय.. बिग बॉस ची ट्रॉफी तो जिंकून आलाय.. रंग द्यायलाही पैसे नसलेल्या श्रीमंत घरात ती ठेऊन दिलीय.. कधी कुणाच्या ध्यानी मनी नसलेला तो कष्टकरी पोरगा आज लोकांच्या तुडुंब गर्दीत कौतुकाच्या धबधब्यात न्हाऊन निघतोय.. बाकी काही असो.. त्याला कामं मिळत राहोत.. आज त्याचे लाखो चाहते आहेत त्यांचे प्रेम मिळत राहो.. येणारा आयुष्याचा टप्पा हा सुखाचा होवो.. याच अपेक्षा..!
तो ज्या भागात राहतो त्याच भागात माझे अनेक नातलग असल्याने व पुढे माझ्या मुलीचे लग्न झाल्यानंतर माझे सतत मुर्टी मोढव्यात येणे जाणे होतेच.. येता जाता अनेकदा सुरजला पाहिले होते.. आज आवर्जून भेटलो.. एक गरीबाचं पोरगं एकटं खेळलं, पण अनेक गरीबांच्या खचलेल्या पोरांना हार न मानण्याची प्रेरणा देऊन गेलेय…! सुरज अभिनंदन व खूप शुभेच्छांसह अजून मोठा हो.!
– हनुमंत चांदगुडे
सुपे, (बारामती)
9130552551