भारताच्या उद्योग क्षेत्रातला देवमाणूस हरपला
मुंबई :
Ratan Tata Passed Away
उद्योपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तामुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे. रतन टाटा 86 वर्षांचे होते. प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी टाटा यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीची माहिती दिली होती.
भारताच्या उद्योग क्षेत्रातील बापमाणूस, प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालं आहे. रतन टाटा यांना रविवारी (6 ऑक्टोबर) रात्री उशिरा साडेबारा ते एक वाजेच्या दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर टाटा यांनी सोमवारी (7 ऑक्टोबर) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास स्वत: ट्विट करत आपल्या प्रकृतीची मीहिती दिली होती. “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली आहे. पण माझे वय लक्षात घेता आणि सध्याची माझी प्रकृती पाहता माझ्या काही वैद्यकीय तपासण्या केल्या जात आहेत. त्यामुळे काळजी करण्यासारखं कोणतेही कारण नाही”, असं रतन टाटा म्हणाले होते. टाटा यांना दाखल केल्याची बातमी समोर आल्यानंतर तिसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांची प्रकृती जास्त खालावल्याची माहिती समोर आली. प्रकृती खालावल्यामुळे रतन टाटा यांना ब्रीच कँडी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती.
रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला होता. त्यांचं नाव भारताच्या उद्योग क्षेत्रात अभिमानाने घेतलं जातं. रतन टाटा यांनी फक्त उद्योग क्षेत्रात नाव कमवलं नाही तर त्यांनी माणसं जपली. कोरोना काळात देशावर मोठं संकट कोसळलं होतं. त्यावेळी रतन टाटा (RATAN TATA) यांनी आपल्या हॉटेल्स राज्य सरकारला रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी मोफत दिलं होतं. त्यांच्या या मदतीमुळे राज्यातील कोट्यवधी नागरिकांना मोठी मदत झाली होती. रतन टाटा यांच्याकडे एक खरे देशभक्त म्हणून पाहिलं जायचं. त्यांच्याकडून प्रचंड सामाजिक कार्यदेखील झालं. याशिवाय त्यांनी टाटा TATA ग्रुपच्या विविध कंपन्यांना यशाच्या सर्वोच्च शिखरावरही पोहोचवलं. त्यामुळे रतन टाटा यांचं नाव उद्योग क्षेत्रासोबतच सर्वसामान्यांमध्येदेखील आदराने घेतलं जातं. अशा या दिग्गज उद्योगपतीचं निधन झाल्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे.