वंशाचा दिवा.!
पंधरा वर्षांपूर्वीचा तो दिवस होता, नातेवाईकांत एकच चर्चा सुरू होती, पहिली मुलगी आहे तर दुसऱ्यांदा गर्भजल तपासणी करून घ्या उगीच रिस्क नको, कायद्याने जरी गर्भजल तपासणी करणे गुन्हा होता, बंदी होती तरी पण चोरून गर्भजल तपासणी सुरू होती, जसं आता कायद्याने गुटखा बंदी आहे पण सगळीकडेच गुटखा भेटतो, गुटखा भेटत नसता तर सगळीकडे भिंतीवर गुटख्याच्या निशाणी असत्याच, असो पण तेव्हा नातेवाईक बोलत असले तरी त्या गोष्टीला माझा सक्त विरोध होता. स्त्री भृण हत्या मला अजिबात मान्य नव्हती.
त्यावेळी घरात वयस्कर माझी आजी होती, तिचा निर्णय घरात अंतिम होता, तेव्हा आजी बोलली ” इष्णू जे होईल ते होईल, देव जे देईल ते देईल, अजिबात चेक करायचं नाही, जिता जीव पोटात मारायचा नाही, पोरगा जरी वंशाचा दिवा असला तरी पोरी पण काही कमी नाही, दुसरी मुलगी झाली तर तिच्या लग्नाचा खर्च मी करेल काही काळजी करू नगस, दिव्याला वात असली ती वात तेलात भिजली तरच दिवा पेटतो अन् प्रकाश देतो, तेव्हा दिव्याची वात ही पाहिजे ” या आजीच्या वाक्याने निर्णय पक्का झाला, नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर नऊ ऑक्टोबरला मला दुसरी मुलगी झाली तिचे नाव सानिका ठेवले गेले, त्याच माझ्या आजीने तिला सांभाळले.
सानिका बारा वर्षाची होईपर्यंत आजीचा सानिकाला सहवास लाभला, आज सानिका पंधरा वर्षाची झाली सानिका बारा वर्षाची असताना माझी आजी देवा घरी गेली, पण आजी शिकलेली नसतानाही तिचे विचार मात्र उच्च होते मुलगा व मुलगी हा भेदभाव तिने केला नाही, स्त्री भ्रूण हत्येला विरोध केला, आज सानिकाचा पंधरावा वाढदिवस, आज मात्र आजी नाहीये ती जरी नसली तरी मुलगी सुद्धा वंशाचा दिवा होऊ शकते हा तिचा विचार मात्र आज जिवंत आहे, आता नवरात्र उत्सव सुरू आहे, आजी देखील एक दुर्गामातेचेच रूप होते, असचं मला वाटतं, आपल्या विचारांनी तिने समाजासमोर एक आदर्श निर्माण केला, सानिकाला मोठी झाल्यावर तिला तिच्या जन्माची कहाणी सांगितली, तेव्हापासून सानिका पणजीला म्हणजे माझ्या आजीला खूप जीव लावू लागली, पणजीच्या हातचा दूध भाकरीचा चिवंदलेला काला सानिकाला खूप आवडायचा, पणजीचे संस्कार पणतीवर झाले.
आता सानिका स्वतःच्या विचारांनी लेखणी हातात घेऊन लेख लिहू लागली आहे, याचा आनंद होतो आहे पण सानिकाचे कौतुक करण्यास आज मात्र माझी आजी नाहीये याचे दुःखही होते आहे, सानिका तुझ्या लेखणीने समाज प्रबोधन होत राहो, तू शिकून खूप मोठी हो, याच तुला आज वाढदिवसाच्या वृक्षमय शुभेच्छा.!
वृक्षमित्र विष्णू वाघ