आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

आधुनिक भारताचे सामाजिक क्रांतिकारक- राष्ट्रपिता जोतीराव फुले

(राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिन निमित्त विनम्र अभिवादन.! त्यानिमित्ताने हा लेख ‘भारताचे महानायक महानायिका’ पुस्तकातून देत आहे.-  लेखक:रामेश्वर तिरमुखे,जालना 9420705653.- संपादक)

महात्मा जोतीराव फुले हे महान क्रांतिकारक होते.जी क्रांती त्यांनी मानवाच्या स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि न्याय यावर आधारित राष्ट्रनिर्माण,जी क्रांती सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, साहित्यिक सह मानवी जीवनाच्या सर्वांगीण विकासासाठी होती.

जोतीराव फुले यांचा जन्म 11एप्रिल 1827 ला पुणे येथे झाला.त्यांच्या आई चिमनाबाई तर वडील गोविंदराव होत. जोतीराव रांगत असतांनाच त्यांच्या आईचे निधन झाले होते.सगुणाबाई क्षीरसागर या मावस बहिणीने जोतीराव यांचा सांभाळ करण्यासाठी मदत केली होती.गोविंदराव शेती आणि फुलांचा व्यवसाय करत होते. वयाच्या 7व्या वर्षी जोतीराव यांना शाळेत घातले होते.अतिशय तल्लख, बुद्धीमान यामुळे वर्गात ते पुढे राहिले.त्याकाळात त्यांच्या घरी शेती, फुलं आणि इतर व्यवसाय यांचे हिशोब लिहिण्यासाठी एक पूर्णवेळ ब्राह्मण कारकून होता. त्याला जोतीराव यांची ही शिक्षणातील प्रगती सहन झाली नाही.त्याला जोतीराव शिकून मोठा झाल्यावर आपली नोकरी जाईल ही भीती वाटली.त्यामुळे त्याने गोविंदराव यांना मुले शिक्षणामुळे बिघडतात, जोतीराव शिकल्यास, शेती बुडेल असे बिंबवून जोतीराव यांची शाळा शिकणे बंद केले. जोतीराव आता शेती,बागकाम करू लागले. वयाच्या14व्या वर्षी 1840 ला जोतीराव आणि सावित्रीमाई यांचा विवाह झाला. जोतीराव यांच्या फुलबागेशेजारी राहणाऱ्या गफार बेग मुन्शी व लिजीटसाहेब यांच्या सहवास, आग्रहामुळे त्यांनी जोतीराव यांना पुन्हा शाळेत घालण्यासाठी गोविंदराव यांना सुचवले आणि 1841साली पुन्हा जोतीराव 1ली इंग्रजी वर्गात गेले.दरवर्षी वर्गात प्रथम क्रमांक मिळवत गेले. 7 वी इंग्रजी परीक्षा 20व्या वर्षी 1847ला पास झाले. या काळात त्यांनी अनेक पुस्तके वाचली. त्यांना मराठी,हिंदी, इंग्रजी, संस्कृत,उर्दू, मोडी भाषा लिहिता, बोलता, वाचता येत होत्या. याच दरम्यान सदाशिव गोवंडे या मित्राने त्यांना शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचायला दिले.थॉमस पेन यांचे Rights of Man हा ग्रंथ वाचला.या ग्रंथातुन शिक्षणामुळे मनुष्य समृद्ध जीवन जगू शकतो हा निष्कर्ष काढला. याचवेळी 1847 ला “अमेरिकन निग्रो लोकांनी पुकारलेले स्वातंत्र्ययुध्द “या घटनेचा ही विधायक परिणाम झाला.
(2)अपमानास्पद वागणूक:-
याच दरम्यान सखाराम हरी परांजपे या मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीत जोतीराव यांचा माळी या ‘शूद्र’जातीमुळे प्रचंड अपमान केला,”चांडाळ स्पर्श केलास” असे म्हणून हाकलून दिले,या घटनेने जोतीराव यांच्या मनावर खूप परिणाम झाला. जोतीराव फुले यांनी यावर संत तुकाराम महाराज यांच्या प्रमाणे विचारमंथन,चिंतन, मनन करून याचे मूळ बहुजनांच्या अज्ञानात आहे,इथल्या ‘मनुस्मृती’मुळे आहे.
विद्येविना मती गेली,
मतीविना नीती गेली ,
निती विना गती गेली,
गती विना वित्त गेले,
वित्त विना शूद्र खचले ,इतके अनर्थ एका अविद्येने केले.” 1 जानेवारी 1848 ला पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.आणि 1851 पर्यंत पुणे परिसरात या 20 शाळा सुरू झाल्या,यात काही अस्पृश्य मुलांसाठी ही होत्या.धुराजी रामा चांभार,रानबा महार यांना शिक्षक बनविले.मुली,शूद्र यांना शिक्षण देणे, सावित्रीमाई, फातिमा शेख यांना शिक्षिका करणे, याचा ब्राह्मण मंडळीना प्रचंड राग आला.विरोध केला पण जोतीराव ऐकत नव्हते तेव्हा त्यांनी गोविंदराव यांना धमकी दिली. त्यामुळे जोतीराव आणि सावित्रीमाई घराबाहेर काढुन दिले.सनातनी लोकांच्या भीतीने कोणत्याही हिंदू कुटुंबातील व्यक्तीने यांना भीतीपोटी सहारा दिला नाही.त्यावेळी उस्मान शेख या मित्राने घर रहायला दिले. जोतीराव आणि सावित्रीबाई करत असलेल्या या कामाची दखल इंग्रज सरकारने घेतली 16 नोव्हेंबर 1852 ला इंग्रज सरकारच्या वतीने विश्रामबागवाडा येथे मेजर कँडी यांनी जोतीराव आणि सावित्रीबाई यांचा जाहीर सत्कार केला, शालजोडी,रोख दोनशे रुपये, गौरव उदगार, मानपत्र दिले. ज्ञानप्रकाश, पूना ऑब्झर्व्हर या नियतकालिकात हे वृत्त प्रसिद्ध झाले.19 ऑक्टोबर 1882 ला हंटर कमिशन ला जोतीराव फुले यांनी इंग्रजीत आपले म्हणणे मांडले आणि एक विस्तृत निवेदन इंग्रजीत दिले जे A Statement for the information of Education Commission या नावाने सादर केले होते.त्यात ते म्हणतात की “बहुजनांच्या सर्व मुली,मुलांना 12 वर्ष वयापर्यंत प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत द्यावे.सरकारला मिळणारा महसूल बहुजनाचा आहे,या महसुलावर ब्राह्मण शिक्षण घेतात पण बहुजनांना शिक्षण घेण्यास विरोध करतात.”
आता तरी तुम्ही मागे घेऊ नका,
धि:कारूनी टाका मनुमत,
विद्या शिकताच पावाल ते सूख,
घ्यावा माझा लेख जोती म्हणे ।
(3)आदर्श पती:-
जोतीराव आणि सावित्रीबाई याना लग्न होऊन अनेक वर्षे झाली तरी मुलबाळ होत नाही ,लोकं सावित्रीला वांझोटी म्हणून नावे ठेवत.सावित्रीबाई यांचे वडील जोतीराव यांना मूलबाळ होण्यासाठी दुसरे लग्न करा, सावित्रीला ‘सवत’ आणा त्यासाठी मी पुढाकार घेतो. त्यावेळी जोतीराव म्हणतात मामा जर दोष माझ्यात असेल तर त्यापेक्षा सावित्रीला दुसरा नवरा करून द्या मी त्याला “सवता” म्हणून स्वीकार करील. काय बोलणार सासरे त्यांनी जोतीराव यांना नमन केले.सावित्रीबाई फुले यांनी सुध्दा काव्यफुलें1854ला प्रसिद्ध झाला आहे.याचबरोबर जोतिबांची भाषणे, सावित्रीबाईचे पत्रे, बावन्नकशी,सुबोध रत्नाकर, मातूश्री सावित्रीबाईची भाषणे ही पुस्तके लिहिली, संपादित केली.
(4) मारेकरी पाठविणे:- जोतीराव फुले हे व्यवस्था परिवर्तनाचे काम थांबवत नाही. म्हणून ब्राह्मण मंडळी नी 1856 ला जोतीराव यांची हत्या करण्यासाठी रोडे रामोशी आणि धोंडीराम नामदेव कुंभार यांना दोन हजार ची सुपारी दिली.पण त्यांना जोतीराव आणि त्यांचे काम कळल्यानंतर त्यांचे मतपरिवर्तन झाले.ते फुलेंचे अनुयायी बनले जोतीराव यांनी मार्गदर्शन केले व धोंडीराम काशी येथे जावून मोठा पंडित झाला.त्याने 12फेब्रुवारी 1884 ला गोंदवले जि. सातारा येथे शृंगेरी पीठाचे शंकराचार्य व अखिल ब्रह्मवृन्दास वेदांत वादात जिंकले.शंकराचार्य याने लोटांगण घेऊन पंडितराव हा किताब अर्पण केला,सत्यशोधक समाजास ताम्रपत्र लिहून त्यावर सही शिक्कामोर्तब केले.
(5)काशीबाई नातू विधवा:-
काशीबाई नातू ही विधवा ब्राह्मण स्त्री होती,तिचे पाऊल चुकल्यामुळे ती गर्भवती झाली आणि लाकडी पुलावरून आत्महत्या करणार त्यावेळी तिला जोतीराव वाचवितात. सावित्रीला सर्व हकीकत सांगून तिचे बाळंतपण करून मुलगा दत्तक घेतात,जो पुढे डॉ यशवंत बनतो.1863 ला अनाथ बालसुधारगृह,भ्रूणहत्या प्रतिबंधकगृह मुळे खूप मोठा आधार स्रियांना मिळाला. जवळपास बळी ठरलेल्या 100 स्त्रीयांचे बाळंतपण याठिकाणी झाले. यानंतर जोतीराव आणि सावित्रीबाई यांनी न्हावी बांधवांचा संप घडवून आणून केशवपन ही प्रथा बंद केली,तसेच विधवा पुनर्विवाह सुरू केले.”बोले तैसे चाले” या उक्तीप्रमाणे ते वागत होते,तर तात्विक समर्थन करणारे महादेव गोविंद रानडे यांनी पहिली पत्नी वारल्यानंतर प्रौढविधवेशी विवाह न करता, अल्पवयीन कुमारिकेशी विवाह केला होता. महात्मा फुले यांच्या शाळेतील मुक्ता साळवे चा निबंध 15 फेब्रुवारी 1855 ला प्रसिद्ध होतो,ज्याची नोंद घेतल्या जाते. ताराबाई शिंदे 1882ला स्त्री ‘पुरूष -तुलना ‘हा ग्रंथ लिहते, तर तानाबाई बिर्जे वृत्तपत्र संपादिका होऊन “दीन बंधू ” चालविते.तर रमाबाई अनंत डोंगरे ही ब्राह्मण पंडित कन्या बिपीन बिहारीदास मेधावी या शूद्र तरुणाबरोबर विवाह करते,ख्रिश्चनधर्म स्वीकारते, शारदासदन द्वारे काम करते त्यावेळी रानडे,टिळक तिच्यावर टीकास्त्र चालवितात. त्यावेळी सत्यशोधनाच्या निमित्ताने पंडिता रमाबाईला म. फुलेच आधार देतात.1868 ला पुणे येथे पाणीटंचाई होती. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्य यांना पाणी भरण्यास बंदी होती,त्यावेळी स्वतःच्या वाड्यातील हौद खुला करून दिला.
( 6)पहिली शिवजयंती :1869 ला जोतीराव यांनी सहकारी मित्रांसह रायगडावरील समाधी शोधली यानंतर ‘शिवसमाधी जीर्णोद्धार कमिटी’ स्थापन करून चाफळकर स्वामी,कृष्णराव भालेकर ,नारायण लोखंडे सह पुणे येथे 19 फेब्रुवारी1870 ला पहिली शिवजयंती सार्वजनिक रुपात साजरी केली. यावेळी टिळक 13वर्षाचे ‘बाळ’च होते बर का!कुळवाडीभूषण शिवराय कार्य,कर्तृत्व प्रचारासाठी 900ओळीचा शिवचरित्रपर पोवाडा जून 1869ला लिहिला व ओरियनटल छापखान्यात छापून प्रसिद्ध केला. याचबरोबर हजरत महंमद पैगंबर यांच्यावर ही एक दीर्घ पोवाडा लिहिला.
(7) जोतीरावांची महाश्रीमंती :-
जोतीराव हे जगातील निवडक विद्वानांपैकी एक होते.त्यांचा विविध क्षेत्रातील अभ्यास होता.ते आर्थिक दृष्टीने श्रीमंत होते, शारीरिक बलवान होते.ते काही काळ पुणे पालिकेचे सभासद ही होते.मांजरी येथील 200एकर शेती तसेच एक उत्तम कंत्राटदार होते.बांधकाम साहित्य पुरवठा करणे,येरवडा येथील दगडी पूल,कात्रज -सातारा बोगदा, खडकवासला धरण, मुंबई फोर्ट भागातील अनेक इमारती, बोरिबंदर रेल्वे स्टेशन ही कामे त्यांच्या पुणे कमरशियल अँड काँट्रकटिंग कंपनी ची आहेत. त्याकाळात त्यांचे भांडवल निश्चित टाटापेक्षा जास्त होते.पण त्यांनी ते सर्व महिला,पीडित बहुजनांच्या उद्धारासाठी खर्च केले.जुलै1883 मध्ये महात्मा जोतीराव यांनी ‘शेतकऱ्याचा असूड” हे पुस्तक लिहून पाच प्रकरणे, दोन परिशिष्ट जोडली आहेत.शेती,शेतकरी आणि सुधारणा यासाठीचे मार्गदर्शन आहे. या ग्रंथाचे छ.शाहु महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात सामूहिक वाचन घेतले होते..मात्र आज आमच्या 85%शेतकऱ्यांनी तो ग्रंथ पहिलाच नाही,वाचन तर दूर.तो जर वाचला आणि अंगिकरला तर शेतकरी आत्महत्या तरी होणार नाहीत. या ग्रंथाला काउंटर करण्यासाठी रानडे नी मे 1885 मध्ये “पूर्वीपेक्षा आता शूद्र शेतकऱ्यांची स्थिती बरी “असे व्याख्यान दिले,अहवाल कळविला. याबाबत 1ऑक्टोबर 1885ला जोतीराव फुले यांनी “इशारा”ही पुस्तिका लिहून शेतकऱ्यांची दैन्य दुःख, दारिद्रय याबाबत चे वास्तव विवेचन केले.सुरुवात करतांनाच
जिस तन लागे वही तन जाने ।
बीजा क्या जाने गव्हारा रे ।।
तसेच ड्युक ऑफ कॅनॉटच्या सत्कार प्रसंगी भारतीय शेतकरी, त्यांचा पोशाख स्वतः घालून शेतकरी हाल हे सत्य सांगितले. त्याचबरोबर राजा बळी यांच्यावर अखंड लिहून ,आदर्श बळी राजास या दुष्ट वामनाने कसे फसवणूक करून पाताळात घातले आहे. आजही आम्हांला पाताळात घालीत आहेतच,हेच समजत नाही.
( 8)जोतीराव यांचे साहित्य:- नाटककार,पोवाडे ,ग्रंथ,लेख, पत्रे,काव्यमय अभंगरूप ‘अखंड’ असे अनेक जागृतीसाठी प्रबोधनपर क्रांतिकारक साहित्य लिहिले.1855 साली लिहलेले तृतीयरत्न हे नाटक होय. हे देशातील पहिले सामाजिक नाटक आहे.तो मान मात्र आजही जाणीवपूर्वक दडविला जातो.हे त्याकाळातील प्रभावी माध्यम होते.या नाटकात ब्राह्मण भिक्षूक; हा माळी, कुणबी यांच्या घरातून ग्रहदशा,भविष्यकथन,ब्राह्मण भोजन यासाठी कुणबी बाईला फसवितो.घरात पैसे नसताना..
ग्रहधाक पीडा म्हणे कर्ज काढू
भांडीकुंडी मोडू सुखासाठी
जप अनुष्ठान यथाविधी केला
मूढ नागविला ग्रहमीषे”।
लग्नप्रसंग,लज्जाहोम, मांडवखंडणी याप्रसंगी –
ब्राह्नणांचे येथे नाही प्रयोजन
द्यावे हाकलून जोती म्हणे।’
वास्तूशांतीच्या अखंडात ,
जळो जळो तुमचे जिणे
उधोगा आधी ताजे खाणे ।।
हे बा कृत्य लाजिरवाणे
समजोत कपटी शहाणे ।।
स्वकष्टाने पोटे भरा
जोती शिकवी फजितखोरा।।
1869ला ‘ब्राह्मणाचे कसब’ हा ग्रंथ लिहिला.यात काव्यमय रचना आहे.बामणी कावा बाबत त्याकाळात आलेले अनुभव, यातुन जागृतीसाठी चा मार्ग सांगितला आहे. 1जून 1873ला गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला.यात जोतीराव व धोंडिबा सवांद आहे जो 16 भागांत अनेक विषय आहेत.जर आपली आजची गुलामगिरी जर संपवायची असेल तर आता तरी वाचा रे बंधू बहिणींनो ! समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी,पर्यायी व्यवस्था निर्माण करण्यात आली.अवैदिक शिवराज्यभिषेक तारीख प्रेरणा घेऊन 200 वर्षांनंतर 24 सप्टेंबर 1873ला जोतीराव फुले यांनी ‘सत्यशोधक समाजाची स्थापना केली.त्याच माध्यमातून पुढे सत्यधर्माची घोषणा झाली. गावोगावी प्रचार केला. सत्यधर्मात 33 कलमे आहेत. ‘सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक’ हा ग्रंथ पूर्ण करत असताना उजवा हाताने आजारपणामुळे शक्य झाले नाही म्हणून त्यांनी डाव्या हाताने तो 1एप्रिल1889 ला पूर्ण केला.ज्यात सत्यशोधक पध्दतीने करायचे लग्न विधी,वास्तू विधी,अंत्यविधी,श्राद्ध,पुण्य,पाप,स्वर्ग,पूजा,प्रार्थना बाबत ची माहिती, सत्य सांगितले आहे.
सत्य सर्वांचे आदी घर।।
सर्व धर्माचे माहेर।
जगामाजी सुख सारे।
खास सत्याची ती पोरे।।
सत्य सुखाला आधार ।
बाकी सर्व अंधकार।
आहे सत्याचा बा जोर।
काढी भनडाचा तो नीर।।
अखंड:-जोतीराव फुले यांनी संत नामदेव तुकाराम यांचा प्रबोधन वारसा अभंग प्रमाणे अखंड रचना करून पुढे चालविला.यात 6 विभाग करून रचना करण्यात आली आहे. हे सर्व अखंडरचना सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या ग्रंथाच्या शेवटी प्रकाशित केलेली आहे.

“उईलपत्र “:-
याच बरोबर 10जुलै1887ला तयार केलेले मृत्यूपत्र चा सारांश.. “शूद्रादी अतिशूद्रास दासानुदास मानणाऱ्या आर्यभटब्राह्मण जातीसह त्यांच्या अनुयायांचीसुद्धा माझे शवावर व ततसंबंधी करीत असलेल्या विधीवर सावलीसुद्धा पडू देऊ नये,”
तसेच 1890ला अंतिम समयी जोतीराव उपदेश करतात,की ..”तुम्ही पेशवाईत जसे गुरांसारखे वागत होता तसे न वागता वाघासारखे वागा. गाईप्रमाणे कसायापुढे मान देऊ नका….विद्या ही माणसास मनुष्यत्व प्राप्त करून देते. सावित्रीने माझ्या चरित्राबरोबर पन्नास वर्षे प्रवास केला. तिच्यामुळेच मी लोकांचे भले करू शकलो.”
(9) कृतघ्न समाज व आजची माझी जबाबदारी:
जागतिक विद्वान डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जोतीराव फुले यांना आपले सामाजिक गुरू मानले आहे.त्यांचे कार्य,कर्तृत्व पुढे चालविले आहे.नेल्सन मंडेला त्यांना आदर्श मानतो, तर सयाजीराव गायकवाड महाराज त्यांना भारताचे वॉशिंग्टन,तर शाहू महाराज त्यांना मार्टिन ल्युथर असे म्हणतात.केशवराव जेधे,दिनकर जवळकर ,पंढरीनाथ पाटील सह अनेक त्यांच्या विचारांचे पाईक आहेत.

28नोव्हेंबर1890 ला जोतीराव यांचे निधन झाले त्यावेळी आमच्या लोकांनी डॉ.यशवंत ला अंत्यविधीचे संस्कार करू दिले नाही.त्यावेळी सावित्रीबाईने अग्नीसंस्कार केले.सावित्रीबाई व डॉ यशवंत यांच्या निधनानंतर यशवंत ची पत्नी चंद्रभागा आणि मुलगी सोनी अनाथ झाल्या.त्यांनी उदरनिर्वाह साठी जोतीराव यांची पुस्तके रद्दीत विकली, भांडीकुंडी विकली,शेवटी ऐतिहासिक घर फक्त शंभर रुपयास विकले. शेवटी उपाशीपोटी राहिल्यामुळे अंत झाला.बेवारस म्हणून पुणे पालिकेने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. आज जे आमच्या सर्व महिलांना,सर्व भारतीयांना मिळाले आहे ते केवळ आणि केवळ कसे मिळाले याचा विचार करून निर्णय घ्यावा. कृतघ्नपणा करायचा की कृतज्ञता. यासाठी आजही लागू ,प्रासंगिक जोतीराव फुले यांची सर्व पुस्तके वाचन करावीत.त्यांचे प्रत्येक पुस्तकं हे तीस ते पन्नास पेजेसचे आहे, ज्याची किंमत ही तीस ते पन्नास रुपये एवढीच आहे.कारण आजही पुणे येथे प्रसिद्ध काय?तर आम्हाला महात्मा फुले यांचा गंजपेठ येथील फुलेवाडा लक्षात येत नाही,आम्ही पुणे येथे गेल्यावर तिथे जात नाही.आमच्या अनेक बहिणीला ‘दगडूसेठ हलवायाचा गणपती’ माहीत आहे,पण क्रांतिस्थळ ‘भिडेवाडा’ माहीतच नाही.इथली ‘व्यवस्था’ त्याचे फार हाल करून नष्ट करत आहेच!कारण आजही विश्वभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यायोग्य क्रांतीकार्य,कर्तृत्व आहे.तरी ही केवळ बहुतेकांना ‘जात’ पाहूनच ‘भारतरत्न’ दिला, देण्यासाठी प्रसंगी नियमात बदल केला,हे यादी पाहिल्यावर विचार करू शकणाऱ्या मेंदूनाच सहज समजेल. कार्यसिद्धांतासह प्रचारक म्हणून अभिवादन करून थांबतो.. जय जोती जय सावित्री जय क्रांती.

रामेश्वर तिरमुखे,

जालना

9420705653.
(अधिक संदर्भ यासाठी महात्मा फुले समग्र साहित्य,महाराष्ट्र शासन प्रकाशित ग्रंथ पहावा.)

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram