पांगलेला गाव.!

पांगलेला गाव.!

नदी काठावरून दुरवर नजर जाईल जिकडे तिकडे हायब्रीडच हायब्रीड पेरलेली हिरवीगार शेतं.नदीकाठच्या डबक्या, डबक्यात साचलेल्या पाण्यावर ऑईल इंजिन बसवून वांग्याची ,टमाटयाची हिरवीगार डुंगे बहरलेली दिसायची.तयार होवून निंघालेली वांगी टमाटी विकायसाठी गावच्या आठवडी बजारात शेतकरी लोकं मांडायची.गावात पिक पाणी तसं चांगलं होतं.चांगली आबादानी होती. जो तो आपल्या मेहनतीत व्यस्त रहायचा. शेणपाणी आटपून रंगरावनं गोठ्यातील बैल मोकये सोडून त्याईच्या पाठीवर दोर टाकले. बैलांनी पाणी प्याले सरका नदीचा मार्ग धरले‌ला. बादशाहा भाईच्या नदीपल्याडच्या मईच्या वावरात आज हायब्रीडच्या वावरात डवऱ्याचा फेर होता.कायाभोर मईच्या वावरात कायभोर हायब्रीड चांगलं टोंग्या,मांड्या,बसलं होतं. वावरंही तसं ताकदचं म्हणजे हेल्याचं मस्तकच होतं. साजरं शेणखत व पुराच्या पाण्यामुळे येणारा सुपीक गायवटी भाग असल्यानं व घरच्याच दहा बारा बैलाईचं शेणखत असल्यानं वावरही चांगलं खतोनं होत होतं.पिकलं तं ढोरासारखं पिके.नाही तं काही नाही.सारं वरच्या पाण्याच्या भरोशावर असलेली शेती. डवऱ्याचा फेर काढासाठी रंगरावनं डवऱ्याईचे जानकुळं सरके सुदे करासाठी फलाटात रायणाऱ्या शामराव वाड्या जोळ डोक्शावर सकाऊनच जाऊन डवरे नेऊन टाकले होते.शामराव वाडी मस्त सपरीत बसून फुररर्य करत च्या वढत उन्हात पाय ताणून बसला होता.बशीत त्याच्या पांढऱ्या मिशांचा झूपका म्हैसीनं पाण्यात बसल्यावर वर यावं तशा वरखाली करत होत्या. त्याची बायको बायजा बाजूलाच वसरीत बांधलेल्या गाईच्या शेणापासून गवऱ्या थापत होती. रंगरावनं खाकरून पायजा शामराव भाऊ वखतावर कामात पाडजा,’नाहीतं ऐन वक्तावर पाडसानं आऊत राजेहो” शामरावनं एका हातात बशी पकडून

“तुमचं वखतावरच लगन असते काय बे,”त्या शालीकरामचे जानकुळं भराचे हायेत. त्याचं झाल्या शिवाय होणार तुहय काम होणार नाही ”

असं म्हणत डीवऱ्या म्हैसीसारखं डोये फिरून रंगरावकडे पायलं.रंगरावनंही मंग

“धूत तीया मायची खटखट तं अर्जंट आहे म्हणूनच पायटून तुमच्या घरी सती पळाले आलो ना राजेहो”

शामरावनं लाल डोये करून

“मायचं चूकलं लेका,मले काय माहीत तुमचा वखतावरच नवरदेव काढा लागते काय तं”

असं म्हणत वासला घेऊन तरतरं आऊतपाशी आला.”व जानकुळावर धागा लाऊन आंगताकदीनं वासल्याचे टोले देण्यास सुरुवात केली.रंगरावनं

“जरा अरामशीर मोडसान,गीडसान काय जानकुळं आणसान वाढवा?

शामराव वाड्यानंही मंग

“अबे किती करय आहे ते, एकाईकूनच वळते ना.वायणाऱ्याचा दिवसभर पुरा जीव घेते,निरा एक आंगी वळते ना!”बैला गिलाले पास लागली काही दुखापत झाली तं मंग म्हणाचं नाही मले आताच सांगून रायलो”

रंगरावचाही नाईलाज झाला त्यानं

“करा ईचीबीन तुमच्या मनानं”

म्हणत तथीच खाली फफुळळ्यावर बैठक मारली.बाजूच्या आखरपट्टीतून हागनदारीत गेलेला रिकामं तमरेट हालवत,हालवत आलेला शालीकराम म्हालीही घडीभर बसाले त्याईच्या पाशी आला. इकडच्या तिकडच्या गोष्टी माता झाल्या तोपर्यंत शामराव मिस्त्रीचं बरंच काम हाताखाली आलं होतं. दांडी शिलसाल करून आऊतात पाचरा मारून बसोली.रंगरावनं दुप्पटयाची चुंबय करून डोकशावर उचलून कनंकनं घराची वाट धरली.शामराव वाड्यानं त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे पाहून

” रंगराव भाऊ पायलीभर जवारी पाठवजा राजेहो,आताच मले चक्कीत जा लागते भाकर तुकड्यालेही घरात पीठ नाही राजेहो, अर्जंटचं हातचं काम सोडून पयले तुमचं केलं बावा’

असा मांगलमेटया अवाज देला.रंगरावनंही

‘हवंहवं बरं बरं’

असं म्हणत डोक्शावर आऊतभांडे घेऊन तरंतरं घरं जोळ केले.गावात बादशाहा भाईचा खटला खुप मोठा होता. चुन्याच्या व निळया मातीनं सारवलेल्या मोठ्या घराच्या भिंती. घरी कोंबड्या पाळलेल्या. घरामांग गोदरी व गोदरीजवळून शेताकडे जाणारा दहिहांडा गाडरस्ता. बादशहा भाई म्हणजे खुप मोठा असामी माणूस स्वभावानं ही सरका सुदा होता.पांढरे शुभ्र कपडे सदरा पायजामा, पांढरी दाढी वाढलेली. टोपी, खांद्यावर चट्टेरी,पट्टेरी गमछा म्हणजे छापी,पायात कोल्हापुरी चपला हातात चकचकीत लाकडी बेत असा रूबाबदार भारदस्त शरीरयष्टीचा लोण्यासारखा मऊ माणूस होता. एक इन्नुशाचा बाप अब्दूल सोडला तर सारा हिंदु मजूर खटल्यात कामाले होता पण कोणालेही जातीधर्माच्या नावावर राजकारण कराले घडीभर फुरसत नव्हती. सारी एका छताखाली आनंदनं नांदत होती.टिनाच्या बैठकीत मोठी ज्वारीची कणगी होती.तीचं झाकण वर सरकून झर धार लागली.व रंगरावनं दुपट्टयात बांधून शामरावच्या घरी नेऊन देली.शामरावनं लागलीच दयनाचा डबा चक्कीत ठेऊन म्हाल्या जोळ हजामत कराले चालता झाला.दिवसा मांगुन झरझर दिवस जात होते.आता पयल्या सारखी परिस्थिती रायली नव्हती.जुणी पिढी व आधुनिक पिढी यांच्या विचाराची दरी खुप रूंदावली होती. पोटापान्याच्या कामाधंदयातही बराच बदल झाला होता. शाळेजोळ असलेल्या रोडटच आखरपट्टीत शिकलेल्या सुशिक्षित पोरासोरांनी धाबे खानावळी टाकल्या होत्या. त्यांचं तरी काय चुकलं होतं. आलेल्या परिस्थितीशी बदलनं तर गररजेचं होतं.गावच्या शाळाही ओस पडण्याच्या मार्गावर होत्या. बरीचशी गावातली पोरसोरं शहरात असलेल्या शाळेकडे गेलेली राहिलेली दहा,विस मोलमजुरी,कामधंदा करणाऱ्यांची.आधुनिक कामाधंदयात पारंपरिक पद्धतीने केलेली कामधंदेही बंद पडली होती. शामराव वाळयाजोळ आता पयल्या सारखी कामं येत नव्हती. म्हणजे आता जिकडे तिकडे वेल्डिंगची दुकानं लोखंडी वखरा डवऱ्याच्या अवजार बनवण्याचा जमाना आल्यानं त्यामुळे त्याचीही कामधंदा हाताले नसल्यानं उपासमार होत होती. सततच्या बदललेल्या हवामानाच्या वातावरणानं कधी ओला दुष्काळ तर कधी कोळळा दुष्काळामुळे हल्ली शेतीही परवडेनासे झाली होती.बादशा भाईनं एवढी मोठी शेतीवाडी, मोठं घरदार सारं ईकटाक करून तालुक्यातल्या नातेवाईकांच्या जवळ आपला जम बसवला होता.शालीकराम म्हालीही आता थकला होता. पयल्या सारखी हजामतीची गिऱ्हाईक आता त्यालेही भेटत नव्हती .एक काळ असा होता की त्याच्या मारोतीच्या पाराजोळ निंबाच्या झाडाखाली पोत्यावर बसाले नंबर लावा लागायचा. ईतवारी तं कंटीग कराले शाळेच्या लेकराईचं चांगलीच धूम राहायची.शहरात मोठमोठी स्टॅण्डरड दुकानं सोडून कोण याच्या जोळ पोत्यावर बसून हजामत कराले येईल हो.हाताले काम धंदा नसल्यानं तोही आपलं धोपटीबेलनं घेऊन पोराजोळ सुरतले गेला होता.शामराव वाळीही घरादाराले कुलूप लाऊन शहरात मुल्तानशेठ मारवाडयाच्या घराच्या बांधकामावर चौकीदरकी करायले हप्त्यानं मकानाले पाणी माराले गेला होता.गावातली कर्ती धरती पोरं पोट भरायसाठी पुण्या, मुंबईले पांगली होती. गावातल्या पाटलाच्या ट्रॅक्टर काम करणारा मध्या तालुक्यातील मोठ्या कॉन्टॅक्टरच्या ईकडे जेसीबी चालवायला रोजंदारीवर लागला होता.गावात काही पोट भराले दुसरा उद्योग उरला नव्हता. लोकप्रतिनिधी आमदार, खासदाराईनं मस्त आपली घरं लोकाईच्या जीवावर भरून घेतली होती.एक दोन गावगुंडांना दारू, सट्ट्यासाठी पैसा अडका देऊन त्या दबदब्यावर गावाचं राजकारण टिकऊन ठेवत होती.व याच भरोशावर दरवर्षी निवडून येत होती. सडकीपाशी गोंधन खालचा घर असणारा शेजव बुढयाचा बाजा ईनायचा,नवीन गोऱ्ये ठेसून द्यायचा. त्या बद्दलात त्याला कोरभर भाकर व पायलीभर ज्वारी भेटायची तोही धंदा आता बंद पडला होता.तोही पोराजोळ परगावी निंघून गेला होता. प्लास्टीकच्या जमान्यात गावातल्या काशीनाथ कुंभाराचं गाडगेमडके करायचं चाकंही जागच्या जागी थांबलं होतं.तसा नदीवर धरणं बांधल्याने नदीला पयल्या सारखा पूरही जात नव्हता पूर न गेल्याने पायजे तसा गाळ ही पडत नव्हता. नाही तं पयले दिवाई सणासुदीच्या पासून तं लग्नसराई पासून मातीची मापलं, उजयन्या, नांदा, गंगायं, राजणं घरोघरी पोहचून त्याबद्दल्यात धान्य, पैसाअडका भेटायचा तोही कायमचा बंद झाला. यांत्रीक शेतीने लोकाईनं बैल,ढोरं वासरं ईकटाक केल्यानं गावातला जानराव ढोरकीही बेकार झाला होता.शेवटी तो टाईमपास म्हणून घरच्या सयपाक पाण्यासाठी गोठाणावरची इंधनकाडी तोडून आणून पोरांच्या संसाराले तेवढाच हातपदर लावून मारुतीच्या देवळावर आपली नातवंडं सांभाळीत घरादाराची रखवाली करायचा.लोकाईनं ठोक पीकाईवर लक्ष केंद्रित केल्यानं भावराव भाऊचा ही सोकारीचा धंदा पयल्या सारखा चालत नव्हता.तोही दुप्पट घेऊन शाळेच्या आवारातल्या गोंधनच्या झाडाच्या थंडगार सावलीत मस्त ताणून द्यायचा.गावात खांद्यावर पोतं घेऊन पोंगापंडीत ईकणारा अन्वरभाई गावात फिरून घरात असलेल्या चिल्यापाल्याचं पोट भरून गुजरान करायचा त्याचाही अलीकडे थांगपत्ता नव्हता. भैय्यासाहेबाच्या खटल्यात शेणपाणी करून व कंटोलच्या दुकानात घडीभर मदत करणारा व पोटाची खळगी भरणारा तुयशीराम आता देवाघरी गेला होता.खटल्याच्या भरोशावर आपला प्रपंच सांभाळणारी तरणी ताठी पोरं आता हाताले काम नसल्यानं डीमार्ट, वालमार्ट कडे रोजगाराच्या शोधात कधीचीच रवाना झाली होती.काही पेट्रोल पंपावर राहून घरातल्या लोकाईची गुजरान करत होती. महात्मा गांधीनं खेड्याकडे चला हाक देली होती. बाबासाहेबांनी शिका,संघटीत व्हा, संघर्ष करा अशी हाक देऊन गावच्या गावं जागृत केली होती.शेतकऱ्याची पोरबाळं ही आता परिस्थितीचा ईचार करून साजरी शिकली होती.किसन्याचा एम.ए बी.एड शिकलेला पोरगा वावर ईकून शाळेवर मास्तर लागला होता.पण शाळा शंभर टक्के अनुदानीत झाल्यावर दुसरा शिक्षक याच्या पेक्षाही वरचढ मिळाल्यानं संस्थाचालकानं घराकडे पाठवून म्हणजे जवळजवळ हकालूनच देला होता.शेवटी लेकराबाळांच पोट भरायसाठी तालुक्यातील तहसीलच्या वऱ्यांहडयांत पोतं टाकून दहा वीस रूपयात लोकाईचे अर्ज भरून आपली गुजराण करत होता.सरकारी शाळा तर पार मोडकाईस आल्या होत्या. इंग्रजी शिक्षणाची व खाजगी शाळांनी जिकडे तिकडे आपापली दुकानं थाटली होती. कधीकाळी गरीबीमुळे दहावीची परिक्षा फी न भरून शकलेल्या सद्याची फी गावच्या घाटे मास्तरांनं भरली होती.पण आता शिक्षणाचं व्यवसाय झालेल्या शाळेनं त्याच्याच नातवाची वार्षिक फी न भरल्याने दाखला त्याच्या हाती देला होता.जो तो आता पैसा कमावण्यासाठी गावापासून कोसो दूर गेला होता.रात्री थकून भागून ग्रामपंचायतीच्या ओट्यावर व देवळाच्या पारावर सय- संध्याकाई हरिपाठासाठी तडव टाकून एकत्र होणारा व गोष्टीबाता करून दनदन बोलणारा गाव आता सामसूम होऊन पोट भरण्यासाठी नवनवीन धंद्याच्या शोधात दूरवर पांगला होता.

विजय जयसिंगपुरे
९८५०४४७६१९

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram