आमचाही एक जमाना होता.!

आमचाही एक जमाना होता

बालवाडी हा प्रकार नव्हता, पुढे 6 वर्षा नंतर स्वतःच शाळेत जावे लागत असे , सायकलने/ बसने पाठवायची पद्धत नव्हती, मुलं एकटी शाळेत गेल्यास काही बरे वाईट होईल अशी भीती आमच्या आई वडिलांना कधी वाटलीच नाही.

पास / नापास हेच
आम्हाला कळत होतं…
टक्केचा आणि आमचा
संबंध कधीच नव्हता.

शिकवणी लावली,
हे सांगायला लाज वाटायची….
कारण  “ढ” असं
हीणवलं जायचं…

 

पुस्तकामध्ये झाडाची
पानं आणि मोरपिस ठेवून
आम्ही हुशार होऊ शकतो,
असा आमचा दृढ विश्वास
होता…

कापडाच्या पिशवीत आणि नंतर चैन म्हणून पत्र्याच्या पेटीत पुस्तकं आणि वह्या रचण्याचा शिरस्ता हे आमचं एक निर्मिती कौशल्य होतं.

 

दरवर्षी जेव्हा नव्या इयत्तेचं दप्तर भरायचो त्याआधी, पुस्तकं आणि वह्यांना कव्हर्स घालणे, हा आमच्या जीवनातला
एक वार्षिक उत्सव असायचा…

 

वर्ष संपल्यानंतर पुस्तके विकणे आणि विकत घेण्यात आम्हाला काहीही लाज वाटत नसे. आई वडिलांना आमचे शिक्षण त्यांच्यावर फारसा बोजाही नव्हते.

 

कोण्या मित्राच्या सायकलच्या पुढच्या दांड्यावर व दुसऱ्याला मागच्या carrier वर बसवून,आम्ही रस्तोरस्ती किती फिरलो हे आता आठवतही नाही…

 

सरांचा शाळेत मार खाताना आणि पायांचे अंगठे धरुन
उभं राहताना,कान लाल होऊन पिरगळला जाताना आमचा
‘ईगो’ कधीही आडवा येत नव्हता, खरं तर आम्हाला ‘ईगो’ काय असतो हेच माहीत नव्हतं…

 

मार खाणं, ही आमच्या दैनंदिन जीवनातील एक सामान्य प्रक्रिया होती. मारणारा आणि मार खाणारा दोघेही खुष असायचे. मार खाणारा यासाठी की, ‘चला, कालच्यापेक्षा तरी
आज कमी धोपटला गेलो म्हणून आणि मारणारा आज पुन्हा हात धुवून घ्यायला मिळाले म्हणून……

 

बिनचपला ,बुटांचे कोणत्याही चेंडू आणी लाकडी बॅट ने वेळ मिळेल तेव्हा ग्राउंडवर क्रिकेट खेळण्यातले काय सुख होते ते आम्हालाच माहीत होते.

 

आम्ही पॉकेट मनी कधीच मागितला नाही, आणि वडिलांनी कधी दिला नाही. आमच्या म्हणून काही गरजाच नसायच्या. छोट्याशा असल्याच तर घरातले कोणीतरी पुर्ण करून टाकायचे. सहा महिन्यातून कुरमुरे फरसाण खायला मिळालाच तरी आम्ही बेहद खुश होतो. दिवाळीत लवंगी फटाक्यांची लड सुटी करून एकेक फटका उडवत बसणे यात काही अपमानास्पद आम्हाला वाटायचं नाही.

 

आम्ही आमच्या आईवडिलांना कधी सांगूच शकलो नाही की, आम्ही तुमच्यावर किती प्रेम करतो, कारण आम्हाला ‘आय लव यू’ म्हणणं माहीतच नव्हतं…

 

आज आम्ही असंख्य टक्के टोमणे खात, संघर्ष करत दुनियेचा एक हिस्सा झालोय. काहींना जे हवं होतं, ते त्यांनी मिळवलंय
तर काही ‘काय माहीत….? ‘शाळेतील ते डबल/ ट्रिपल सीट वर फिरवलेले ते मित्र,
कुठे हरवलेत ते…!

आम्ही जगात कुठेही असू पण हे सत्य आहे की, आम्ही वास्तव दुनियेत जगलो, आणि वास्तवात वाढलो……..

 

भाकरी आणि कालवनाशिवाय मधल्या सुटीतला काही डबा असतो हे आम्हाला माहीतच नव्हतं.

आपल्या नशिबाला चुकूनही दोष न देता आम्ही आनंदाने आजही स्वप्नं पहातोय. कदाचित ते स्वप्नच आम्हाला जगायला मदत करतायत.

जे जीवन आम्ही जगलो त्याची वर्तमानाशी काहीच तुलना होणार नाही.,,,,,,,,

 

आम्ही चांगले असू किंवा वाईट, पण आमचाही
एक ‘जमाना’ होता…..

विशाल आडे 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram