आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

आई वडिलांचे आई वडील होता आले पाहिजे !

एक दिवस येतो आणि दोघांपैकी एकाला घेऊन जातो
जो जातो तो सुटतो , परीक्षा असते मागे राहणाऱ्याची
कोण अगोदर जाणार ? कोण नंतर जाणार हे तर भगवंतालाच माहीत
जो मागे रहातो त्याला आठवणी येणं , अश्रू येणं हे अगदी स्वाभाविक असतं !
आता प्रश्न असा असतो की ही आसवं हे रडणं थांबवायचं कुणी ?
मागे राहिलेल्या आईला किंवा वडिलांना कुणी जवळ घ्यायचं ?
पाठीवरून हात कुणी फिरवायचा ?
निश्चितपणे ही जवाबदारी असते मुलांची , मुलींची , सुनांची ….
थोडक्यात काय तर
दोघांपैकी एकजण गेल्यानंतर
मुलामुलींनाच आपल्या आई वडिलांचे आईवडिल होता आलं पाहिजे !
लक्षात ठेवा लहानपणी आई वडिलांनी नेहमी अश्रू पुसलेले असतात
आजारपणात अनेक रात्री जागून काढलेल्या असतात
स्वतः उपाशी राहून , काहीबाही खाऊन आपल्याला आवडीचे घास भरवलेले असतात
परवडत नसलेली खेळणी आणि आवडीचे कपडे घेतलेले असतात

म्हणून आता ही आपली जवाबदारी असते , त्यांच्या सारखच निस्वार्थ प्रेम करण्याची
असं झालं तरच ते जगू शकतील
नसता ” तो माणूस म्हणजे वडील ” किंवा ” ती स्त्री म्हणजे आई ” तुटून जाऊ शकते , कोलमडून पडू शकते !

आणि ही जवाबदारी फक्त मुलं , मुली आणि सुना यांचीच असते असे नाही
तर ती जवाबदारी प्रत्येक नातेवाईकाची , परिचिताची , मित्र मैत्रिणींची …….सर्वांची असते !

फक्त छत , जेवणखाणं आणि सुविधा देऊन ही जबाबदारी संपत नाही तर अशा व्यक्तींना आपल्याला वेळ आणि प्रेम द्यावेच लागेल तरंच ही माणसं जगू शकतील !

आयुष्याचा जोडीदार गमावणं म्हणजे नेमकं काय ? हे दुःख शब्दांच्या आणि अश्रूंच्या खूप खूप पलीकडचं असतं ……म्हणून अशा व्यक्तींना समजून घ्या !
केवळ माया , प्रेम आणि आपुलकीचे दोन गोड शब्द एवढीच त्यांची अपेक्षा असते ती जरूर पूर्ण करा
त्यांच्या जागी आपण आहोत अशी कल्पना करा आणि त्यांना वेळ द्या !
उद्या हा प्रसंग कोणावरही येऊ शकतो
म्हणून नेहमी सर्वांशी प्रेमाने,मायेने आणि आपुलकीने वागा !

विशाल आडे 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
YouTube
Pinterest
LinkedIn
Instagram