झोळी आत्मकथन.. मला स्वतः च्या मनाला चटका लावून गेले. साहित्य क्षेत्रात कार्यरत लेखक, साहित्यीक, कवी, समीक्षक, प्राध्यापक, वाचक ,विद्यार्थी यांची आकलन वेगवेगळे अर्थ काढून मांडणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.सरांनी अत्यंत मार्मिक झोळी आत्मकथन पर कादंबरीला साजेशी प्रतिक्रीया नोंदवली आहे. ती मला विशेष भावली आहे. ती आतून लिहलेली आहे त्यामुळे वास्तव दर्शन अधिक व्यापक अर्थाने विचार करून बघावा यासाठी मदत होते. सरांचे व्यापक आकलन वाचून दुसऱ्या आवृत्तीची प्रस्तावना सरांनी लिहावी असे वाटते आहे…..
झोळी आत्मकथन वाचकाला अंतर्मुख करणारे लेखन. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असतांना तळागाळातल्या समाजाला कितपत न्याय मिळाला असा प्रश्न उपस्थित होतो. पारंपारीक व्यवसायाप्रमाणे आपली उपजिविका भागविणारा नाथपंथी डवरी गोसावी समाज आजच्या काळात कुठल्या स्थितीत वावरतो आहे. याचं विदारक चित्र झोळी आत्मकथनातून प्रत्ययास येतं. कृषी संसकृतीचा -हास होताना हा समाज झपाटयानं वाढणा-या शहरीकरणाच्या लाटेत वाहवत गेला.
गावखेड्यात कृषी संस्कृती मुळ धरुन होती तेव्हा भटक्या समाजाचा गाडा त्यावर हाकला जात होता. बळीराजाचे पाठिराखे आणि देणेकरी म्हणून त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन निकोप होता. खळ्यावर साचलेल्या राशीतून त्यांना भरभरुन दान दिलं जात असे. भविष्याविषयी दोहोही सतर्क नव्हते. आणि दानाने बरकत येते असा समजही रुढ होता. अवघा समाज गुण्यागोविंदानं नांदत होता. पुढे निसर्गात चमत्कारीक बदल झाले आणि त्याची पहिली झळ बसली ती शेती क्षेत्राला. झोळीत भिक्षा टाकणा-या अन्नदात्यावरच विन्मुख व्हायची वेळ गुदरल्याने त्याला उदरनिर्वाहासाठी शहराकडे स्थलांतर करावे लागले. तालेवार घराण्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागल्या. शेती व्यवसाय करणा-यांना उत्पादन खर्च भागेना. मजूराचा खर्च वाढला. याचा अनिष्ट परिणाम उत्पादनावर झाला. परिणामी शेतक-यांवर अवलंबून असलेला समाज, बलुतेदार, आलुतेदार, गोसावी, गोंधळी, वासुदेव, बहुरुपी इत्यांदींवर गंडांतर आले. त्यांना मदत होईनासे झाली. काही समाजाने पारंपारीक व्यवसाय सोडून उपजिविकेसाठी वेगळया वाटा धरल्या. काही प्रमाणात तो यशस्वीही झाला.
यात सर्वात मोठी कुचंबना झाली ती भटकंती करणा-या या सारख्या वंचित समाजाची. तो पारंपारीक चौकट मोडून बाहेर येण्यास तयार नव्हता. आपल्या अस्तित्वाचा कुठलाही ठावठिकाणा नसताना पोटापाण्यासाठी मैलोंमैली भटकंती करणा-या समाजापैकी एक नाथपंथी डवरी गोसावी समाज. हा समाज भगव्याकफनी आड आपलं पोट झोळीत टाकून दारोदारी भटकत होता. त्याला ना भुतकाळ होता ना भविष्यकाळ. दारोदार पुंजून मिळवलेल्या टुकड्यांवर तो आपली गुजराण करुन विसाव्याला गावकुसाबाहेरच्या जागेत स्थिरावयाचा. या जमातीचं भयावह तसंच डोळ्यात झणझणीत अंजन घालणारं चित्रण लेखकाने केल्यावर महाराष्ट्राच्या पुरोगामित्वपणावर संशय निर्माण होतो.
लेखकाने नमूद केले आहे की, “एका बाजुला आमाला देव मानत्याती आन् दुस-या बाजुला आमच्या जमातीच्या पाचवीला पुजल्याली भटकंती हाय” आमचे आजवर फक्त वैदिक गौरवीकरण झाले आहे. लोक संस्कृतीचे उपासक म्हणून पिढ्यान् पिढ्या अवहेलना वाट्याला आली आहे. एका बाजूला सन्मान आणि लेखक व त्याच्या कुटुंबाला गावच्या हागांदरीत राहण्यास भाग पडत आहे. ही अवस्था कोणी केली, तो प्रश्न सामाजिक व्यवस्थेला विचारात आहे.
पोटापाण्यााठी गावोगाव भटकंती करणा-या या जमातीला स्थैर्य नाही. समाज सगळीकडे विखुरला गेल्याने सुख दु:खात एकत्र येण्याच्या शोधात त्यांची होणारी दमछाक पीळ पाडणारी आहे. लेखक याच जमातीतला असल्याने त्यांनी ही बिकट परिस्थिती जन्मापासूनच अनुभवली आहे. जन्माच्या दाखल्यापासून, शाळा प्रवेश ते पी.एच.डी. मिळेपर्यंत आलेला अनुभव, आपबिती लेखकाने कुठल्याही तक्रारीचा पाढा न वाचता नमुद केलेली आहे. यावरुन लेखकाचा संयम तसेच जीवनाविषयी पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन वाचकांना काही शिकवून जातो.
प्रतिकुल परिस्थितीमध्ये संघर्षाचे एकेक अडथळे धीरोदत्तपणे पारकरत लेखकाने पी.एच.डी.चे एव्हरेस्ट सर केले. ही अभिमानाची बाब आहे. एकीकडे शिक्षण पुर्ण करण्याचा केलेला निर्धार तर एकीकडे कुटूंबाची वाताहात. पुर्णपणे अंधार. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आश्रम शाळा, महाविद्यालयीन शिक्षण, एम.फिल. तर पुढे पी.एच.डी. पर्यंतचा प्रवास मन थक्क करणारा आहे. या शैक्षणिक प्रवासात लेखकांवर अनेक संकटं परीक्षा पाहणारे ठरले. सगळयात मोठा प्रश्न आ वासून उभा रहायचा तो आर्थिक कमजोरीचा. या जमातीच्या माणसांनं चालता-बोलता ठीक असलं पाहिजे अन्यथा जमातीतल्या कुंटूबाचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. याचं बोलकं उदाहरण त्यांनी टिपलं आहे ते हे की, आईला गाडीवाल्यानं धडक देऊन जखमी केलं, दादाचं व्यसनाधिनतेमुळं झोळी बंद झाल्यानं कुटूंबाची झालेली परवड. त्यांना खासगीत उपचार परवडत नाही. सरकारी सवलतीसाठी पिवळं कार्ड नाही. किंवा लॅपटॉपची हार्डडिस्क् निकामी झाल्यावर त्याचा बॅकअप घेण्यासाठी दुरुस्तीसाठी येणारा अवाढव्य खर्च, ते टाळण्यासाठी पुन: चार वर्षाचा रेकॉर्ड हातानी लिहून घेणं, पी.एच.डी.सिनोप्सिसच्या प्रिंटचा खर्च, संशोधनाचं गठ्ठेच्या गठ्ठे साहित्य पालावर वाहुन नेण्यासाठी रेल्वेनं केलेला प्रवास व झालेली फजिती हे केवळ खर्चाला शॉर्टकर्ट करण्यासाठीच केलेली धडपड होती.
टाटा सामाजिक विज्ञान संस्था, मुंबई येथे पीएचडीच्या पदवीदान समारंभास आपल्या मुलाने खडतर परिस्थितीतून साध्य केलेल्या सर्वोच्च डिग्री प्रदानाच्या नेत्रदीपक सोहळ्यास आई वडील उपस्थित राहून आनंदात सहभागी होऊ शकत नाही, कारण त्या दिवशी भिक्षा मागायला गेलो नाही तर घरची चूल पेटणार नाही या भीतीनं आई वडील आपल्या मुलाचा कौतूक सोहळा पाहण्यास अनुपस्थित राहतात. हे वाचून अपराधीपणाची भावना निर्माण होते. या समस्यांना तोंड देत लेखकाचं पी.एच.डी.चं शिक्षण टिस मध्ये सुरुच होतं. महाविद्यालयात तसेच होस्टेलमध्ये मित्रांना त्यांचा आपल्याविषयी पाहण्याचा दृष्टिकोनात बदल होऊ नये म्हणून त्यांनी पालावर राहत असल्याचे कधीच सांगितले नाही. त्यांनी स्वाभिमान जागता ठेवला.
नाथपंथी डवरी गोसावी समाज, त्यांच्या चालिरीती, माणदेशी,बालेघाटी,गंगथडी तसेच भराडी जमात यांचा परस्पर रोटी-बेटी व्यवहार, देवादिक, एक गाव बाराचा कायदा, तीन गावबाराचा कायदा मौखिक स्वरुपात जीवापाड पाळायचा. यात कोणतीही खोट असता कामा नये याची जमात सतत दक्षता घ्यायची. याचं वर्णन अगदी सुक्ष्मतेने केले आहे.
लेखकाचं शिक्षण चालु असताना देवास्थानची पिढीजात जतन केलेल्या ईनामी जमीनीवर काहींनी कब्जा केल्यानंतर त्याच्या बचावासाठी केलेली फिर्याद व खटला चालवण्यासाठी केलेली कसरत ह्या बाबीं केवळ शिक्षणामुळे सज्ञान झालेल्या व समज आलेल्यांनाच तडीस नेता येते हे सिध्द करते.
मागील काळात या जमातीवर सोशल मीडियाच्या अतिरेकी वापरामुळे पोरं पळवणारी टोळी या गैरसमजातून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे प्रक्षुब्ध जमावाकडून अमानुष हत्याकांडात पाच निष्पाप भिक्षेक-यांचा बळी घेतला गेला तेव्हा अख्खं समाजमन हेलावलं होतं. कुठल्याही संशयाचं निरसन न करता त्यांची निर्घुन हत्या करण्यात आली होती. घरातले कर्ते गेल्यामुळे अनेक कुटूंब उघड्यावर पडलं होतं. घडलेल्या हत्याकांडाबाबत प्रचंड जरब बसल्याने, दहशतीच्या सावटाखाली अनेक दिवस जमातीतले लोक उपासमार सोसून पालाच्या बाहेर भिक्षा मागायची धाडस करीत नव्हते. या बाबत त्यांनी अतिशय पोटतिडकीनं आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.
लेखकाने सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रसंग चित्रीत केला आहे की,“मला शिळ्या भाकरी वाळवून पाण्यात भिजवून खाव्या लागायच्या” या वाक्यानी मन विषण्ण होतं. संसाराच्या ओढातानीतून त्यांची आई म्हणायची “ कुटल्या जल्माचा भोग म्हणून आपल्याला झोळी दिली आन् मागता धर्म दिलाय. आमाला बारा घरचा तुकडा मागुन खाल्ल्याबिगर पोट भरल्यावानी वाटत न्हांय” “ भटकण्यामुळं आमच्या सगळयांचे आयुष्य वावटुळासारखं गरगर फिरण्यात चाललं हुतं” अशा या कठीण परिस्थितीतही लेखकानी मानसिक धीर खचू दिला नाही. त्यांचा निर्धार अभंग होता.
झोळी मध्ये नमूद केलेली परिस्थिती वास्तवाचे भान दर्शविते त्यात कुठलीही अतिशयोक्ती वाटत नाही. उलट ते वाचून जगण्याच्या वेदना कमी करते. पण शिक्षण पुर्ण झाल्यानंतर देखील लेखकाची दैना संपलेली दिसत नाही. त्यांच्या जीवनात अद्याप स्थैर्य नाही. व्यवस्थेच्या अनास्थेपणामुळे पुन्हा माझ्या (त्यांच्या) नशीबी झोळी येते की काय ? असा प्रश्न ते समाजाला विचारतात. नव्हे, शिक्षणाने ते सजग झाले त्यांना नवी दृष्टी प्राप्त झाली त्यांना आधुनिक झोळी घेऊन पीडित, वंचितांसाठी गावोगावी जाण्याऐवजी सत्ताधा-यांच्या वेगवेगळया घटकांकडे जाऊन न्याय हक्काची भिक्षा मागावी लागेल. समाजाच्या माईलस्टोनच्या पालात राहून. सदर आत्मवृत्त अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरो ही शुभेच्छा…!
- -गणेश शेलार,
- औरंगाबाद.