हल्ली हृदयविकाराचं प्रमाणही वाढू लागलं आहे. त्यादृष्टीने काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपल्या हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांची अहोरात्र गरज असते. या पेशींमध्ये रक्तप्रवाह सुरू ठेवण्याचं काम तीन धमन्या करतात. यापैक दोन धमन्या हृदयाच्या डाव्या बाजूला असतात. त्यातील प्रमुख धमनी पुढच्या भागात असते. हृदयविकाराच्या एकूण झटक्यांपैकी ६0 ते ७0 टक्के झटके हे पुढच्या धमनीतल्या रक्तप्रवाहात अडथळे निर्माण झाल्याने येतात.
बैठी जीवनशैली, तेलकट, गोड पदार्थांचं सेवन, व्यायामाचा अभाव यामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढू लागतं. हे कोलेस्टेरॉल धमन्यांच्या भिंतींमध्ये साठू लागतं. यामुळे धमन्यांच्या भिंतींची लवचिकता निघून जाते. या भिंतींवर प्लेटलेट्स साठायला सुरूवात होते. त्यामुळे धमन्यांच्या छिद्रांचा आकार लहान होत जातो आणि अखेर ही छिद्रं बंद होतात. रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्याने रक्तप्रवाहास अडथळे येतात.
हृदयाला व्यवस्थित रक्तपुरवठा होत नाही. यामुळे हृदयाच्या पेशींना ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वांचा पुरवठाही होत नाही. इथूनच या पेशी मृत होण्याची प्रक्रिया सुरू होते. पेशी मृत होण्याआधी डाव्या बाजूला प्रचंड वेदना होतात. या वेदना खांद्यापासून संपूर्ण डाव्या हातात जाणवतात आणि हृदयविकार बळावतो.