आज एक वर्ष पूर्ण झाले दीपक आणि आरती अमेरिकेला जाऊन”. गोविंदराव पत्नी रत्नाबाईंजवळ आपली खंत व्यक्त करत होते. चार वर्षांपूर्वी गोविंदराव सरकारी खात्यातून निवृत्त झाले होते. दिवसभर इवलीशी नातवंडे जय आणि राज सोबत खेळताना ते आपले वयही विसरून जात.आरती आणि दीपक आय.टी. कंपनीत मोठ्या हुद्द्यावर कार्यरत होते. त्यामुळे सकाळीच दोघे कामावर जात.जय नि राज ही जुळी भावंडे अवघ्या तीन वर्षाची. रत्नाबाई आणि गोविंदराव त्यांना फुलांसारखे जपत. त्यांची सर्व कामे दोघे आनंदाने करत. परंतु आताशा रत्नाबाईंचे गुडघे कुरकुर करू लागले होते. म्हणून आरतीने घरातील कामासाठी गंगुबाईंना ठेवले होते. आता घरचे काम नसल्याने रत्नाबाई रिकाम्या असत. त्यामुळे नातवंडांशी गुज गोष्टी करत त्या दिवसभर आपला वेळ घालवत असत. संध्याकाळी आरती घरी आल्यावर गोविंदराव नि रत्नाबाई नातवंडांना घेऊन शेजारच्या बागेत जात. मुलांसोबत घसरगुंडी, पळापळी करत मौजमस्ती चाले. घरी आले की हात-पाय धुऊन मुले देवापुढे शुभंकरोती म्हणत आणि आजीकडे गोष्टीसाठी हट्ट करीत. त्यादेखील नातवंडांना गोष्टी सांगत दिपकच्या बालपणात रमून जायच्या,मनाशीच बोलायच्या, “एवढासा होता जन्मला तेव्हा. कापसाच्या पेटीत ठेवलेले डॉक्टरांनी. थोडा मोठा झाल्यावर आत्तापर्यंत आपण तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपलेय दिपकला”.
अशा भूतकाळात रमून गेल्या की नातवंडे कोलाहल करत, “आजी गोष्ट सांग ना? बाबांच्या बालपणीची नको हं! ती आता आम्हाला ती पाठ झालीय. नवीन काहीतरी सांग ना?” मग रत्नाबाई गोविंदरावांना आग्रह करीत,”अहो, तुम्ही सांगा आजची गोष्ट. मी माझा पुराणातील अध्याय वाचून परत येते”. मग मुले गोविंदरावांच्या शेजारी कडीपाटावर फतकल मारून बसत. गोविंदरावांना राजकारणात रस. त्यांना गोष्टी सांगणे इतके जमायचे नाही. मग ओढून-ताणून रामायणातील एखादी कथा सांगायचे. आरती स्वयंपाक आटोपून मुलांना आवाज द्यायची, “चला जय आणि राज. सारखा आजी आजोबांना त्रास देऊ नका. ते थकलेत आता”. अशा खेळीमेळीच्या कुटुंबात भाग्याचे दिवस नुसते पळत होते.
एके दिवशी दीपक ऑफिसमधून आला ते तोंड पाडूनच. क्षणभर रत्नाबाई चमकल्या. त्यांनी विचारले, “दीपक आज नाराज का आहेस ?काही बिघडलेय का?” तसे दिपक म्हणाला, “आई, कंपनीने एक वर्षासाठी अमेरिकेला जाण्याची ऑफर दिलीय, पण तुम्हाला या वयात एकटे सोडून जायचे जीवावर येतेय. प्रमोशनही सोडवत नाही आणि तुमचीही काळजी वाटतेय”. तसे गोविंदराव हसत म्हणाले,” दीपक बिनधास्त जा तू. एक वर्षाचाच प्रश्न आहे ना? आम्ही बघू आमचे. पण तुमचे करिअरचे वय! त्यात आडकाठी नको”. आता दीपकचा चेहरा जरा खुलला. रात्री झोपताना त्याने आरतीला ती बातमी सांगितली. आरतीलाही आनंद झाला. पण तिने विचारले, “दीपक आपण जाऊ पण आई बाबांचे काय! आता त्यांना आपल्या आधाराची खरी गरज आहे. हल्ली आईंनाही कामे होत नाहीत”. तसे दिपक म्हणाला, “अगं गंगु मावशींना सांगू, सकाळी येऊन रात्रीपर्यंत त्यांची काळजी घ्यायला. फक्त झोपायला जातील त्या आपल्या घरी”. आरतीलाही ते पटले. अमेरिकेची स्वप्ने पहात ते दोघे शांत झोपले. नंतर बरेच दिवस दीपक अमेरिकेला जाण्यासाठी लागणारी कागदपत्रे बनविण्यात गुंग होता. असे करता जाण्याचा दिवस जवळ येऊन ठेपला. रत्नाबाई नि गोविंदरावांनी जरी त्यांना जाण्याची परवानगी दिली होती तरी नातवंडांशिवाय राहायचे कसे याची रुखरुख लागून राहिली होती. नातवंडांनाही त्यांचा फार लळा लागला होता. परंतु दोघेही मनाची समजूत घालत. एका वर्षाचाच प्रश्न आहे. अस्से दिवस निघून जातील आणि आपली मुले आपल्याजवळच राहतील.
कालपासूनच रत्नाबाईंच्या पापण्या ओलावत होत्या.त्या आडबाजूला जाऊन डोळे टिपत होत्या. रात्री एक वाजताचे फ्लाईट होते. मुले रात्री दहा वाजता घर सोडणार होते. शेवटी दहा वाजता बाळांचे पापे घेऊन दीपक व आरतीला “लवकर परत या” असे सांगून त्यांनी निरोप दिला. आणि रिकामे घर खायला उठले. मनसोक्त रडून झाल्यावर दोघांनी एकमेकांना धीर दिला. आता दोघांचा एकमेकांना एकमेकांचा आधार! आज दीपक नि आरतीला जाऊन वर्ष झाले, याची आठवण गोविंद- रावांना झाली. एक वर्ष एका युगाप्रमाणे भासले होते त्यांना! आता चार आठ दिवसात ते परततील, या आशेने हे वृद्ध जीव दिवस मोजत होते. तसे मोबाईलवर व्हिडीओ कॉलिंगने रोज गप्पा होत असत परंतु सहवासाचे सुख हजारो किलोमीटरवरून काय असणार! इतक्यात फोन वाजला. कधी निघतात ते सांगायला फोन केला असेल म्हणून गोविंदरावांनी झटक्यात फोन उचलला. तिकडून दीपक बोलत होता,” बाबा कंपनीने येथे राहण्याची मुदत वाढवली आहे. अजून दोन वर्षे इथेच राहा म्हणून निक्षून सांगितले आहे. बाबा ऐकताय ना?” गोविंदरावांच्या हातून फोन गळून पडल्याचेही ध्यानात आले नाही. इतक्यात रत्नाबाईंनी येऊन फोन हातात घेतला. दीपक घाबरला होता.तो बोलला, “काय झाले आई? बाबा बरे आहेत ना? आज रात्रीची फ्लाईट आहे परत येण्याची. सहज गंमत म्हणून मी बाबांना दोन वर्षे इथे राहणार असे बोललो” असे ऐकताच रत्नाबाई आनंदाने नाचू लागल्या. गोविंदराव आ वासून त्यांच्याकडे पाहातच राहीले. तशी त्या म्हणाल्या,”अहो उठा,मुले पोहोचतील एवढ्यात.त्यांच्यासाठी मिठाई, खाऊ घेऊन या. गंगुबाईंना पुरणपोळीचा घाट घालायला सांगते” असे बडबडतच त्या तुळशीवृंदावनाशी दिवा ठेवायला गेल्या.
एक हासरी संध्याकाळ फक्त घरातच नव्हे तर मनामनात आणि अंगणातही जाणवत राहिली. संध्याकाळच्या थंड वार्याची एक सुंदर लहर वातावरणात भारून टाकली .
- सौ.भारती सावंत
- मुंबई
- 9653445835