पौष महिन्याच्या शेवटी शेवटी म्हणजे आमच्या ग्रामीण बोली भाषेत या महिन्याला पूस म्हणत. मकरसंक्रांती (तीसकरात हे तीळसंक्रांतीचा झालेला अपभ्रंश) सरली म्हणजे महिलांना वाणात वाटायला हिरवाकच हरभरा लागायचा. बस काही हप्त्यात बऱ्याच लोकांची हरभऱ्याची शेतं सोगांयला तयार असायची. एरव्ही दिवाळी पासून दोन महिने सलग शिदोरी सोबत घेतली म्हणजे वावराची सोकारी करायला लागायची.तसा फक्त गवत कापणाराईचा व कापूस वेचणाऱ्या बायाईचा बराच काव असायचा. आता खायची गोष्ट तर खाणाचं तुम्ही सोकारी करा की आणखी काही करा.पंरतु मायेच्या भारे नेणाऱ्यांची संख्याही काही कमी नसायची.बरं हरभरा घेतांना दिसलाच व आपण हटकलंच तर
“बस मुठभरच घेतो भाकरसंग खायले” असं बोलून मोकळं व्हायची एवढं बोलल्यावर आपण काय डोक्सं आपटणार. असा तो मजेशीर किस्सा असायचा. आमच्या धुऱ्यावरच कुऱ्हाडे बुडण्याच्या मेरीवर बाभुळचं गर्द हिरवगार झाड अजूनही शाबूत आहे. त्या बाभुयवयर वर काही लाकडं कडब्याघी पेंडी नेऊन सुंदर मावचा बनवायचा व त्यावर मस्त पोतं आथरून वर बसून इकडं तिकडं लक्ष ठेवायचं व घरून फडक्यात बांधून आणलेली चटणी भाकर व हरभऱ्याचा घोयना करून मस्त चटणी भाकरी सोबत व हरभऱ्याच्या डाकोई सोबत खायची मजा यायची व सोबत कॅनीतलं थंडगार पाणी दिवस मावळतीला लागेपर्यंत पुरवायला लागायचं. सुर्य लालभडक झाला म्हणजे वर शेंड्यावर चढून शेतातली माणसं वारासार झाली की नाही याचा अंदाज घेतल्यावर झाकट पडली रे पडली म्हणजे सायकलवर टांग मारून घर जोळ करायचं. तेव्हा कुठं व्यवस्थीत राखणदारी व्हायची व राखणदार ठेवलाच तर तो दहा बारा हरभऱ्याची शेतं मिळून राखणदारी करायचा व त्या बदलात आठवडी बाजाराच्या दिवशी हप्त्यावारी २५ रूपये घ्यायचा.
हरभरा वायला म्हणजे लोकं कळपं आणुन मस्त सावलीत झाडाखाली भाजायची व पोटभरून तोंड काळं होईपर्यंत खायची.(येथे तोंड काळं चा शब्दशा अर्थ न घेता लक्षार्थाने तो घ्यावा नाही तर पंचाईत होईल) अशी ती गंमत होती. त्याला आम्ही उया भाजणं असं म्हणायचो.हा सोंगून झालेला हरभरा शेतातून बैलगाडीत भरून त्याचा भर रस्त्यानं आरामशीर गावच्या गोठाणावरील खयवाडीत पोहचायचा. बैलबंडी खाली झाली म्हणजे बैलांना नदीवर पाणी पाजून आणून तेथेच सावलीत बांधून आणलेल्या हरभऱ्याची परत तयार होईपर्यंत सोकारी एवढी की रातच्याला झोपण्यापासून बाजीसह बाड,बिस्तरा झोपासाठी आणायला लागायचा. सकाळच्या रिकाम्या वेळात उया भाजून खायची वेगळी मजा होती.घरधनी हजर नसला म्हणजे पोरसोरं हरभऱ्याचा कवटा चोरून दूर चॉंदखेड पेंडावर नेवून तो घरच्यांच्या चोरून खिशात अंगार डब्बी नेवून खायकुटारपणा करायची. माकडावानी सरसर रामकाटीवर चढायची व तिथून नदीच्या पात्रात उड्या मारायची व पेंडावरच्या टेकडीवरून मस्त नदीत घसरत यायची व घसरगुंडीचा खेळ खेळायची.
हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!
शाळेच्या कपड्यांची तर पार वाट लागायची.खाकी पॅन्ट ढुंगणावर फाटला म्हणजे गावच्या टेलर जवळून रफफू मारून आणायची.तोच पॅन्ट शाळेत न्यायची. तेव्हा परिस्थितीच सर्वसाधारण असल्याने गुरूजीही काही म्हणायचे नाही.शाळेला सुट्ट्या लागल्या म्हणजे बाजाराच्या दिवशी मंदिराच्या ओट्यावर बसून बाजार बघण्याची वेगळी मजा होती. चपला शिवणाऱ्या चांभाराच्या कामाची पद्धत निरखून पाहणे व लिंबाच्या झाडाखाली सावलीत पोतं आथरून हजामत करणाऱ्या शालिकराम म्हाल्याचा गिऱ्हाईकाच्या दाढीवरचा सरसर चालणारा वस्तरा पाहण्याची गमंत बघायची.खेडयावरचा भातक्यावाला आवरसावर करून डब्बे घेऊन निघून गेला म्हणजे खाली पडलेलं व वाऱ्यानं आजूबाजूला उडालेली पेपरचे तुकडे गोळा करून ती सम्पूर्ण वाचून काढायची ते झालं की विमानं तयार करून ती मंदिरात उडवायची.अजूनही आठवते असंच कागदाचं विमान आठवडी बाजारात मंदिराच्या पायथ्याशी पिंपळाच्या झाडाखाली भजे तयणाऱ्या शामरावच्या कढईत जाऊन पडलं होतं. तो झ्यारा घेऊन आमच्या मागं लागला तेव्हा पासून तेही बंद झालं.घरच्यांना काम असलं म्हणजे घरची असलेली ढोरं चारायला घेऊन बाजूच्या उलंगवाडीतील खाली झालेल्या शेतात न्यायची व मस्त पोटभर चरे पर्यंत चारायची व घरी हकालत आणायची. पण आता यांत्रिकीकरणात खयवाडी नेस्तनाबूत होऊन शेतातच माल तयार होऊन तो मार्केटले न्या जोगा तयार होऊ लागल्यानं ग्रामीण भागातील खयवाडया कायमच्या बंद झाल्या म्हणजे जवळजवळ हद्दपारच झाल्या व पर्यायाने आताच्या पिढीला हरभऱ्याचा व गव्हाच्या उंब्याचा उया खाणं कायमचा बंद झाला असंच म्हणावं लागेल.
– विजय जयसिंगपुरे
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९