हरतालिका व्रत ; स्रीयांवर बंधन ठेवू नये.

    दरवर्षी हरतालिका येते व सौभाग्यवती स्रीया तसेच कुमारिका मुलीही हा व्रत करतात.कशासाठी? तर इच्छित पती मिळावा. हा इच्छित पती मिळावा म्हणून कुमारीका, तर सौभाग्य अखंड टिकावं म्हणून सौभाग्य वती स्रीया हा व्रत करीत असतात. या दिवशी दिवसभर स्रीया उपवास करतात. रात्रीही त्यांना उपवास असतो. मग शरीरातील पोषकतत्वे कमी झाल्याने चक्कर येतात. यातच जीवही जावू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही! याच काळात उपवास केल्यानं शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाल्यास येणा-या संभाव्य धोक्याला कोणताच व्यक्ती वाचविणार नाही नव्हे तर वाचवायला येणार नाही. मग ज्या देवासाठी उपवास केला. तो देवही वाचविणार नाही.

    हरतालिका व्रताची कथा काहीशी अशी आहे. पर्वतराजाची मुलगी ही भगवान शंकरावर प्रेम करीत होती. पण पित्याची इच्छा होती की तिनं श्रीविष्णूशी विवाह करावा. मग आपले वडील आपल्या मनात असलेल्या आपल्या पतीला मिळू देणार नाही. जबरदस्तीनं आपला विवाह विष्णूशी लावून देतील. या संभाव्यानं पार्वती मैत्रीणीच्या माध्यमातून पळून गेली. पण भगवान शंकर हे तपश्चर्येत लिन होते. ते काही तिच्याकडे पाहायलाही तयार नव्हते. त्यामुळे त्यांना प्रसन्न करण्यासाठी पार्वतीनं भाद्रपद तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले. त्यावेळी हस्त नक्षत्र होतं. त्यानुसार भगवान शंकर प्रसन्न होवून पार्वतीशी त्यांनी विवाह केला.

    या व्रतामागचा उद्देश असा की जर हा व्रत केल्याने भगवान शंकर पार्वतीला मिळू शकते तर मग आपण जर हा व्रत केला तर आपल्याला इच्छित वर का मिळणार नाही. म्हणून त्या वेळपासून हा व्रत करण्याची प्रथाच सुरु झाली. या व्रतामागे कल्पना आहे की हर म्हणजे महादेव, प्रत्यक्ष शंकर. हरिता म्हणजे म्हणजे जिला नेले. ताली अर्थात यामध्ये आली म्हणजे सखी असा अर्थ घेवून सख्यांच्या मदतीने नेली. असा अर्थ घेवून हरतालीका या शब्दाचा अन्वयार्थ लावला आहे. काही लोक याला हरतालिका आणि हरितालिकाही म्हणतात. पण हरि चा अर्थ विष्णू होत असल्यानं या व्रताला प्रक्रिया हेच नाव आहे.

    पृथ्वीवर घडणारे पाप लक्षात घेवून या सणाला स्रीया दरवर्षी साजरा करीत असतात. त्यांच्या मतानुसार हा व्रत केल्यानं इच्छीत व्रत तर मिळेलच. तसेच सौभाग्यही तर अखंड राहील. तसेच आपल्या हातून घडणारे पापही नष्ट होईल. याच उद्देशानं द्वापर युगात इंद्रप्रस्थचं वैभव पूर्णतः द्यूतक्रिडेत पांडव हरल्यानंतर जेव्हा ते वनात गेले. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने कुंतीला म्हटले की तिनं हे व्रत करावे. जेणेकरुन तिच्या हातून घडलेले पाप नष्ट होईल व तिला परत राजवैभवाची प्राप्ती होईल. कुंतीनं ज्यावेळी हे व्रत केलं. त्यानुसार तिला परत राजवैभव प्राप्त झालं असं लोकांचं मानणं. दरवर्षी वटपौर्णीमा, हरतालिका व्रत येत असते. मग हा व्रत करण्यासाठी स्रीयाच पुढाकार घेत असून त्या आपल्या पतीचं आयुष्य वाढावं, तसेच आपल्या कुटूंबात सुख, शांती व समृद्धी नांदावी. आपला पती तसेच आपली मुलंबाळं सुखी राहावी. म्हणून सारख्या अशा प्रकारचे व्रत करुन राबत असतात नव्हे तर कडक उपवासही करीत असतात. पुरुष मात्र ते करीत नाही. तरीही अशा प्रकारचे व्रत करुनही असे पुरुष त्या स्रीयांना काय देतात तर वेदना, क्लेष, अपमान. सतत दुःखात झिजत असतात त्या अबला. कोणासाठी? तर आपला पती सुखी व्हावा. आपली मुलंबाळं सुखी व्हावी!

    सारीच बंधनं स्रीयांवरच. स्रीयांनी हे करावं, हे करु नये. असं वागावं, असं वागू नये आणि स्रीयाही हे सगळं सहन करुन अशा प्रकारची व्रतं करीत असते सातत्यानं. रुढी परंपरा, चालीरीती, जप तप, व्रतवैकल्ये सारंच ती करीत असते. मात्र एवढं सगळं केल्यानंतरही ज्या भगवान शंकरासाठी ती व्रत करते. तो भगवान शंकर तरी तिला पावतो का? तर याचं उत्तर नाही असंच आहे. कारण ही व्रतं केल्यानंतरही त्या स्रीचा पती तिला मारझोड करतो. कोणी तिला जाळतो. सतत दारु पिवून येणे आणि पत्नीला शिव्या देणे हे सगळं येतं पतीला.

    पुर्वीही या पतींसाठीच असे सण उत्सव साजरे व्हायचे. तरीही सतीप्रथा, बालविवाह, केशवेपन, विधवा पुनर्विवाहाला बंदी होती. ह्या वाईट प्रथा समाजात जोर धरुन होत्याच. माणूस त्या प्रथांना विरोध करु शकत नव्हता. कारण ज्या माणसानं किंवा स्रीनं या प्रथांना विरोध केला, तर त्या कुटूंबांना वाळीत टाकण्याची किंवा त्यांची घरं जाळून टाकण्याचीही एक कुप्रथा समाजात अस्तित्वात होतीच. कारण समाजावर जुन्या परंपरा व रुढींचा पगडा होता. मग काय चितेवर महिलांना त्रास होवो की अजून काही होवो. जीवंतपणी तिला पतीच्या चितेवर जळावंच लागत होतं. कल्पना करा की त्यावेळी तिला कसं वाटत असेल. म्हणूनच संयुक्त कुटूंबात राहतांना स्रीयांना अशा प्रथा पाळाव्याच लागत. हे झालं सतीप्रथेचं. पण यावरुनही मोठी प्रथा होती. ती म्हणजे केशवेपन. ती तर महाभयंकर प्रथा. सतीप्रथेतून एकदाचे मरण पत्करुन स्रीया मरुन तरी जात. आपल्या आयुष्यात पुढे येणा-या संभाव्य वेदना समाप्त करीत. पण या समाजात जीवन जगतांना व वावरतांना केशवेपनात आपली स्वतःची टक्कल करुन गावात फिरणे, त्यातच लोकांचं टाँगटिंग ऐकून जीवन कापणे नव्हे तर एखाद्या वेळी एखाद्या नराधमाकडून बलत्काराचे शिकार होणे. त्या बलत्कारानंतरही तो झालेला बलात्कार उजागर न करणे. यासारख्या गोष्टी सतत तिच्यासोबत घडतांना नाकीनव यायचं. त्यातच काही काही स्रीया असं दुःख सहन न झाल्यानं आत्महत्याही करीत. पण त्या आत्महत्येबाबत कोणी जाब विचारत नव्हता वा कोणी त्या आत्महत्या रोखू शकत नव्हता.

    बालविवाह प्रथेतही तिच गोष्ट होती. अगदी कौमार्य काळात स्वतःचे मायबाप आपल्या मुलीचा विवाह जबरदस्तीनं तिला समजदारीपणा येण्याच्या पुर्वीच एखाद्या म्हाता-या माणसाशी लावून देत. मग काय त्यावेळी समजत नसतांनाही काही सासरकडील मंडळी त्या बालिकांना छळत.त्यांच्याकडून आपल्या पुरुष असणा-या पतीसाठी व्रतवैकल्ये करुन घेत. त्यांना समजत नसतांनाही. कारण या व्रतवैकल्यातून पुरुषाचं आयुष्य वाढते असा गैरसमज होता. ती मुलगी परायाघरची असल्यानं तिचं आपल्या मुलासाठी काहीही नुकसान होवो. चालेल अशी भावना ठेवून अगदी लहान वयापासून या प्रथा स्रीयांच्या अंगवळणी पाडल्या गेल्या. मग ह्या प्रकारची व्रतं केल्यानं त्या काळातील स्रीया सुखी झाल्यात का? तर याचंही उत्तर नाही असंच आहे.

    आजही प्रथा परंपरेनुसार स्रीया अशा प्रकारची व्रतं करतात. पण किती स्रीया सुखी आहेत असा जर सर्वे केलाच तर त्यांची संख्या बोटावर मोजण्यासारखी येईल. मग विचार येतो की देश जरी स्वतंत्र्य झाला असला तरी स्रीयांवर आजही अशा गुलामीपणाच्या प्रथा परंपरा का लादाव्या? हं एक गोष्ट ठीक आहे की हा सण साजरा करावा. पण कशासाठी? तर आनंद म्हणून. पण जबरदस्तीनं ह्या प्रथा पाळून घेणे आणि स्रीयांना मुळात बंधनात ठेवणे. प्रथा परंपरेंचं हे भूत पाठीमागे लावून.हे काही बरोबर नाही. तेव्हा हरतालिका व्रताच्या निमित्यानं सांगणं आहे की शरीराला झेपेल तेवढंच करावं. विनाकारण पुरुष म्हणतात म्हणून व्रत करु नये. नाहीतर या कोरोनाच्या काळात ग्लानी येवून तुमचाच जीव धोक्यात येईल. कारण उपवासानं जीव नेहमी चक्रावत असतो.हे लक्षात घ्या. पुरुषांनाही सांगणं आहे की सारीच बंधनं स्रीयांवर लादू नये. नाहीतर तुम्हालाही ह्या कोरोनाच्या काळात समस्या येवू शकतात. मग वाचविणाराही कोणी भेटू शकणार नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.

    -अंकुश शिंगाडे
    नागपूर
    ९३७३३५९४५०

Leave a comment