अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजकांसाठी योजना
धनगर समाजातील महिलांनाही मिळणार लाभ
बुलडाणा : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातंर्गत केंद्र शासनाच्या स्टँण्ड अप इंडिया योजनेचा लाभ देण्यात येत आहे. या योजनेतून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक तसेच धनगर समाजातील महिलांना लाभ देण्यात येणार आहे. या योजनेच्या लाभासाठी 23 नोव्हेंबर 2020 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सकाळी 10.30 ते सायं 5.30 वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी यादिवशी उपस्थित राहून सदर घटकातील नवउद्योजक व धनगर समाजातील महिलांनी कागदपत्रांसह अर्ज सादर करावे. योजनेच्या लाभासाठी उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र, बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेत सवलतीस पात्र नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेतंर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येणार आहे. तरी योजनेच्या लाभासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक व धनगर समाजातील महिला अर्जदारांकरीता 23 नोव्हेंबर रोजी शिबिर आयोजित केले आहे, तरी या शिबिरात उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्य आयुक्त, समाजकल्याण डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.