नुकताच नवनाथ रणखांबे सरांचा ‘प्रेम उठाव’ हा कविता संग्रह वाचला. शारदा प्रकाशन ठाणे यांनी प्रकाशित केलेला छोट्या मोठ्या एकूण ३९ कवितांचा संग्रह आहे.’अस्वस्थ’ या कवितेत कवी भावनिक अस्वस्थ होऊन आपल्या अव्यक्त कविता भावनांना कवितेतून वाट मोकळी करून देत आहे. कवी म्हणतो,-
- ह्या काळ्या काळोखाला
- मानवाच्या आर्त दुःखाला
- आणावेच लागेल
- कवितेत तूला, कवितेत तुला
कवी’उठाव’ या कवितेत कवी समतेचे युग यावे असे म्हणतो. तर ‘निळे निशाण’ या गजले मध्ये कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऋणाचे आभार मानतो. संविधान लिहिल्याने गावकुसाबाहेरच्या माणसांना माणुसत्व प्राप्त झाले,अन्यथा त्यांचे जीवन जनावरांहून बिकट होते. म्हणून कवी म्हणतो, …
- बाबा फक्त माझ्या हृदयात ठाम आहे
- प्रत्येक स्पंदनावर त्यांचे विधान आहे
- ठोकून आज छाती नवनाथ हेच सांगे
- कायम निळेच त्याने धरले निशान आहे
‘साखळदंड’ या कवितेत स्त्रियांवरील अन्यायाला वाचा फोडली आहे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रियांवर आजही कित्येक अत्याचार होत आहेत आणि अनेक स्त्रिया त्यात बळी जात आहेत. ‘टाकू नको डाव फसवा’ या कवितेतून कवी खऱ्या प्रेमाची अपेक्षा करतो. प्रेमाचे नाटक करून अथवा खेळ करून कुणीच कुणाला धोका देऊ नये, फसवू नये असे कवी आर्जव करतो आणि हृदयातून प्रेम करण्याची विनंती करतो. ‘आभाळ होताना माय’ या दीर्घ कवितेत कवी आईच्या कष्टप्रद जीवनाची व हलाखीच्या परिस्थितीचे वर्णन करतो. तरीही न डगमगता आपली आई खंबीर पणे दुःखाशी परिस्थितीशी झगडत राहते. आपली गहाण जमीन सोडवण्यासाठीचा संघर्ष, जगण्यासाठी करण्याचा संघर्ष तेव्हाच संपला जेव्हा मुलं भीमरायांची शिकवण आचरू लागली.
- कविता उदास हातमध्ये…
- तुला कार्ड देताना वेगात
- गेली सायकल पुढे जोरात
- आतुरलेला तुझा उदास हात
- मनात होता तडफडत तडफडत
- आजही अबोलाच !
- मागचे पाऊल
- मागेच राहिलं
- पुढेचे पाऊल
- पुढेच गेलं
- आज ही आहे पण भळभळती जखम !
‘उदास हात’ या कवितेत वरील प्रमाणे कवी एका निश्फल प्रेमाचे वर्णन करतो. प्रेयसीला भेटकार्ड देताना ती काहीशी उदास अबोल होते आणि प्रेमाची जखम नेहमीच भळभळत राहते.
- कविता सुजलाम सुफलाम मध्ये —-
- सुजलाम सुफलाम करू चला
- देश प्रगतीवर नेऊ चला //
- देशातील सर्वांगीन समतोल साधूया /
- उणिवा शोधून उपाय करू चला //१//
- आपण सारे भेद टाळूया /
- विषमतेला मूठमाती देऊ चला//
‘सुजलाम सुफलाम’ या कवितेत कवी देशातील विषमतेची दरी संपून देश सुजलाम सुफलाम होण्याचे स्वप्न पाहतो. या नी अशाच सुंदर सुंदर कवितांसाठी ‘प्रेम उठाव’ संग्रह नक्की वाचावा.या कविता संग्रहाचे मुखपृष्ठ सतीश खोत यांनी उत्कृष्ट काढले असून ते आकर्षक आहे. पुस्तकाचे प्रास्ताविक डॉ. प्रेरणा उभाळे यांनी लिहिले असून पाठराखण प्रा. डॉ. विठ्ठल शिंदे यांनी लिहिली आहे. डॉ. गंगाधर मेश्राम, प्रा. योगिता कोकरे, प्रतीक्षा थोरात, भटू हरचंद जगदेव यांनी पुस्तकावर अभिप्राय लिहिले असून यामुळे पुस्तकाचा आशय आणि विषय समजण्यास वाचक वर्गास सुलभ गेले आहे. या सर्व अभिप्रायाने पुस्तकाला उंची प्राप्त झाली आहे.
- पुस्तक परीक्षण लेखिका -: सुचित्रा पवार, तासगाव/ सांगली
- प्रकाशन -: शारदा प्रकाशन ठाणे
- पुस्तक -: प्रेम उठाव
- कवी -: नवनाथ रणखांबे
- पाने -: ६२
- किंमत -: ९०/- ₹
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–