संभाजी ब्रिगेड ३० वर्षांपासून एक वैचारिक कृतीशील संघटना म्हणून कार्यरत आहे. २०१६ पासून संभाजी ब्रिगेडने राजकीय भूमिका घेतली असून नोंदणीकृत पक्ष स्थापन करून ‘समाजकारण हेच राजकारण’ या सुत्रात काम करीत आहेत. शिवराय – फुले-शाहू-आंबेडकर ते भारतीय संविधान ही विचारधारा स्वीकारून समाजात एकता निर्माण करण्यासाठी सतत प्रयत्नशिल आहे. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रातील दशहतवादाचे उच्चाटण करून समता, स्वातंत्र्य, न्याय व बंधूता या संवैधानिक मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी कटिबद्ध आहे. शेती, शिक्षण, आरोग्य, महिला, युवक, कामगार, उद्योग, रोजगार आदि क्षेत्रात खुप प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी संभाजी ब्रिगेड सातत्याने आंदोलन व प्रबोधन करीत आहे. हिंदु-मुस्लिम, दलित-दलितेत्तर तसेच भाषा अथवा प्रांत इत्यादी जातीय व धार्मिक दंगली थांबवून त्यांना हक्क, अधिकार व प्रगतीच्या प्रश्नासाठी संघर्ष करण्याची प्रेरणा दिली आहे. महाराष्ट्र व देश दंगलमूक्त रहावा हा सकल्प आहे.
आर. एस. एस. १९२५ पासून देशात विषमतावादाचा पुरस्कार करत असून २०१४ पासून भाजपच्या माध्यमातून अधिक आक्रमकपणे मानवद्रोही अजेंडा राबवायला सुरूवात केला आहे. त्यामुळे भारतीय लोकशाही व संविधान संकटात आहे. विधीमंडळ, न्यायपालिका, प्रशासन यावर कब्जा करून हुकूमशाही लादली जात आहे. धर्माच्या नावाखाली सर्व प्रादेशिक पक्ष व अस्मिता संपविण्याचे हे कुटील कारस्थान आहे. सर्व समतावादी, पुरोगामी पक्ष, संघटनांनी एकत्रीतपणे लढा देवून लोकशाही वाचवणे गरजेचे आहे. वर्तमान परिस्थितीत ‘भांडवलदार मालामाल शेतकरी व सामान्य जनता कंगाल’ ही अवस्था निर्माण झाली आहे. भांडवलदार, त्यांचे समर्थक राज्यकर्ते, सर्वधर्माचे पुरोहित यांच्या अभद्र युतीतून माणुस व समाज नागवला जात आहे.
शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर यांचा विचार प्रबोधनकार ठाकरे यांनी अत्यंत आक्रमकपणे मांडला आहे. धर्माच्या नावाखाली नागवणाऱ्यांचे बुरखे आपल्या सत्यवादी लेखणीने टरकावले आहेत. वर्तमानकाळात शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी हाच पुरोगामी विचार अत्यंत परखडपणे अधोरेखित केलेला आहे. ही महाराष्ट्राच्या व देशाच्या समाजकारण, राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना व संभाजी ब्रिगेड ही युती निश्चितच ऐतिहासिक ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा ते लोकसभा या सर्व ठिकाणी शिवसेना व संभाजी ब्रिगेड ही राजकीय युती मित्रपक्ष म्हणून एकत्र लढणार आहे.शिवसेनेची इतर राजकीय पक्षासोबत युती झाली तर संभाजी ब्रिगेड शिवसेनेच्या कोट्यातून व बरोबर राहणार आहे.सर्व प्रकारच्या निवडणूकांमध्ये संभाजी ब्रिगेड सत्तेत निश्चित आपला ठसा उमटवेल.
संभाजी ब्रिगेड ही युवकांची क्रांतीकारी पक्ष-संघटना आहे. ग्रामीण समाजाचे शोषण, ही प्रस्थापित व्यवस्था आहे. भारतात ही व्यवस्था पुरातन काळापासून आहे. काही अद्वितीय अर्थज्ञ आणि राजनितिज्ञानी फार पूर्वी सांगून ठेवले आहे -ते म्हणतात की ,जो राजा ग्रामीण प्रजेचे जेवढे जास्त शोषण करेल तेवढे जास्त दिवस त्याचे राज्य टिकेल. अडाण्यांचे शोषण करून बुध्दीवाद्यांना जो खुष ठेवील तो टिकेल असा त्याचा सोपा अर्थ आहे. आता राज्ये गेली, राजे गेले, प्रजेचे राज्य आले, तरी अडाण्यांच्या म्हणजेच कष्टकऱ्यांच्या शोषणाची व्यवस्था आहे तशीच आहे व ते अत्यंत भयानक आहे,म्हणून क्रांती करण्याशिवाय दुसरा मार्गच नाही.
- क्रांती कोण करणार ?
रक्त निवलेले जिवंत मढे कधी क्रांती करत नसतात. लोकांच्या लाथा-बुक्या खायचे ज्यांच्या अंगवळणी पडलेय ते थोराड क्रांती करत नसतात. दुसऱ्यांच्या श्रमावर जगणारी बांडगुळे क्रांती करत नसतात. ज्यांचा भूतकाळ हालाखीत गेला, वर्तमानकाळ चिंतेत जातो आहे आणि भविष्यकाळ अंध:कारमय आहे, असे अन्यायाच्या वणव्याने वेढलेले युवक क्रांती करू शकतात. वणव्याच्या बाहेर पडायची हिम्मत करू शकतात !
ग्रामीण युवक चोहोबाजूंनी पिचलाय, असहाय बनलाय, आयुष्याच्या मृगजळाकडे तो आशाळभूतपणे बघतोय, पण मृगजळ ते शेवटी मृगजळच,नुसती कोरडी आशा! कोणीही यावे, चार थापा माराव्या, लालचीत पाडावे, आणि स्वार्थाचे गाठोडे बांधून पसार व्हावे, आम्ही आहे त्याच फुफाट्यात आहोत ! वर्षानुवर्षे गेली, आम्ही उराशी बाळगलेल्या आशा फोल ठरल्या. आम्हाला तारण्याची नियत अजूनतरी कोणात दिसली नाही. दिसणारही नाही, कारण ज्यांनी तारले पाहिजे ते सर्व मजेत आहेत. सामाजिक ध्रुविकरण करून आपापल्या राजकीय पोळ्या भाजून घेणे,खोटे आश्वासने देणे,येनकेनप्रकारे सत्तेत राहणे व वेळ मारून नेणे हे चक्र चालूच आहे.
ग्रामीण युवकांचा सर्वात मोठा कमकुवतपणा आहे शिक्षण ! स्वतःच्या पायावर उभे राहता येईल असे शिक्षण त्याना मिळतच नाही. जे मिळते ते येवढे तकलादू असते की जीवन तरायला त्याचा काडी येवढा सुध्दा उपयोग नाही.आपल्याला मिळत असलेले शिक्षण ही फार मोठी फसवेगिरी आहे. आपल्या कुटूंबाचे आर्थिक शोषण अन्यायकारी व्यवस्थेने करून आपल्याला भुके-कंगाल केले आहे. आपल्या कामाच्या संधी आपल्यापासून दडवून ठेवल्या आहेत. आपले मानसिक खच्चीकरण केले आहे,झाले येवढे अन्याय फार झाले. आता इथून पुढे अन्यायाला कायमची तिलांजली देऊ .सध्याची जीवघेणी परिस्थिती बदलायची ताकद तुमच्या मनगटात आहे. कष्टकऱ्यांच्या पवित्र कुशीतून जन्मलेले तुम्ही छावे आहात, डोळे मिटून आयते दूध पिणाऱ्या मांजरांची भेकड अवलाद नाहीत. अन्यायरूपी राक्षसाच्या मानगुटीवर बसून त्याच्या नरडीचा घोट घ्यायची बहाद्दुरी तुमच्यात आहे. संघटित व्हा ! सैनिकी शिस्त शिका ! संभाजी ब्रिगेडची तत्वे नीट लक्षात घ्या, कृतिकार्यक्रम समजून घ्या, उताविळपणा न करता धीर गंभीरपणे परिस्थितीला सामोरे जा, पक्ष-संघटनेचे कार्य वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा. संभाजी ब्रिगेडच्या कार्यावर डोळस निष्ठा ठेवा. त्याग व कठोर परिश्रम करून इच्छित ध्येय गाठा.
माणसाला मन आहे, भावना आहेत, समृध्दीची महत्वाकांक्षा आहे म्हणून गरीबीने गांजलेल्या माणसाच्या चित्ती समाधान राहू शकत नाही. चित्ती असो द्यावे समाधान हा खोटा दिलासा आहे. जे आपल्या अवती-भोवती आहे ,पण आपल्या जवळ नाही त्याचे दुःख होणारच ! चांगल्या तत्वज्ञानाचा गैरअर्थ सातत्याने लोकांच्या मनावर बिंबवून गावातली जनता स्वत्व हारवून बसली आहे, कंगाल झाली आहे. ह्या मरगळलेल्या लोकांना जागृत करण्साठी महामानवांच्या कृतिविचारांची व संतांची सत्शिल परंपरेच्या माध्यमातून प्रबोधन करून त्यांच्यात चेतना निर्माण करणे, त्यांना ध्येय धुंद करणे, विकासासाठी त्यांची मने पेटवणे हा संघटनेचा महत्वाचा कार्यक्रम आहे.
ग्रामीण माणूस दारिद्र्याला कंटाळला आहे, परिवर्तनाची एकदा लाट उठू द्या. बघता बघता गावात चैतन्याचे वारे वहायला लगतील, लोकांच्या जीवनातले नैराश्य जाऊन नवा उत्साह, नव्या उमेदी, नव्या महत्वाकांक्षा निर्माण होतील, आज रिकामटेकडेपणा करणारे अंग झटकून कामाला लागतील. आजची नाकर्ती माणसे कर्तव्यदक्ष नागरिक बनतील. आज काम टाळण्यात लोक स्वत:ला धन्य समजतात, तेच युवक तीच माणसे कामातून मिळणाऱ्या आनंदाने बेहोष होतील. स्वतः काम करून निर्मिती करणारांचा स्वाभिमान दुजावेल. उद्योग व्यवसायात गावातल्या प्रत्येक लायक व्यक्तीच्या हाताला काम मिळेल. बेकारी नष्ट होईल. लोकांचे राहणीमान उंचावेल. मग त्याना चांगली घरे असावी वाटतील. गावातले रस्ते सुधारावे वाटतील. गाव स्वच्छ, सुंदर, निरोगी रहावा वाटेल. शाळा सुधारेल. मुलांना चांगले शिक्षण मिळेल. सर्वांचेच जीवनमान उंचावल्यामुळे सामाजिक भेदाभेद गळून पडतील. ग्रामीण जनतेने निर्धार केला तर हे सुंदर स्वप्न संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून प्रत्यक्षात अवतरायला वेळ लागणार नाही.
ही लोकचळवळ’ पुढे नेण्यासाठी वडिलधाऱ्यांनी मार्गदर्शन करावे, बुध्दीवंतांनी कल्पना द्याव्यात, स्त्रियांनी प्रेरणा द्यावी, युवक-युवतींनी स्वतःला कामाला जुंपून घ्यावे, सुधारणेच्या व विकासाच्या ह्या लोकचळवळीवर टिका करण्याऐवजी तिला सर्वांच्या मनात आदराचे, मानाचे स्थान मिळेल असे वातावरण निर्माण करावे. चळवळ आपली आहे, आपल्या कल्याणाची आहे, तिच्यावर दृढ निष्ठा ठेवावी, तिच्यावर प्रेम करावे, चळवळ ही आपली सर्वश्रेष्ठ देवता समजावी. चळवळीत आपण जे परिश्रम करू, योगदान देऊ, तीच आपल्या आराध्यदेवतेची पूजा, प्रार्थना आणि पूण्यकर्म समजावे.आपल्याला अंधारातून प्रकाशात जायचे आहे, एकमेकांचे हात धरून, एकमेकांना सांभाळून,संघटित शक्तीने या दलदलीतून बाहेर पडायचे आहे.संभाजी ब्रिगेड चा मिशन १०० हा कृतिकार्यक्रम गावागावात व शहराशहरात राबवा व पक्षसंघटन मजबुत करा.
गाव तेथे शाखा, गाव तेथे अभ्यासीका, गाव तेथे वाचनालय, गाव तेथे व्यायामशाळा, गाव तेथे शासकीय कल्याणकारी योजनांची उजळणी, गाव तेथे संभाजी ब्रिगेड जनगनणा राबविणे.तसेच,संभाजी ब्रिगेड महिला आघाडी, संभाजी ब्रिगेड विध्यार्थी आघाडी, संभाजी ब्रिगेड कामगार आघाडी, संभाजी ब्रिगेड चित्रपट आघाडी, संभाजी ब्रिगेड शिक्षक आघाडी, संभाजी ब्रिगेड उधोग आघाडी, व ईतर युनियन करून कृतिशील कार्यक्रम राबवत संभाजी ब्रिगेडचे जाळे मजबुत करू. लोकप्रश्न घेवून सातत्याने आंदोलनात रहावे लागणार आहे.लोकजागृती व लोकजानिव करावी लागेल. संभाजी ब्रिगेड व शिवसेना युती चे संयुक्त मेळावे हे तालुका,जिल्हा,विभागीय व राज्य पातळींवर मोठ्या प्रमाणात घ्यायचे आहे.हे सर्व मेळावे १२ जानेवारी नंतर सुरू होतील. या राज्यात संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतिच्या संघशक्तिने सर्व निवडणूकीत विजयश्री खेचत लोकविकास हा संकल्प घेउन पुढे जाऊ!!
- जय जिजाऊ!!
- -ॲड मनोज आखरे.
- अध्यक्ष,
- संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र.
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–