संधिवात खूपच त्रासदायक ठरतो. या व्याधीवर आधुनक वैद्यकशास्त्राऐवजी आयुर्वेदिक उपचार घेण्यावर अनेकांचा भर असतो. शारीरिक वेदनांना वातदोष कारणीभूत असतो, असं आयुर्वेद सांगतं. संधिवात हा वातविकार असल्याने उपचारांच्या माध्यमातून शरीरातल्या वाताचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यावर आयुर्वेद भर देतं.
पचनसंस्थेशी संबंधित तक्रारींमुळे शरीरात आम हा विषारी घटक तयार होतो. आमामुळे शरीरातल्या वातनिर्मितीचा वेग वाढतो. हा आम संपूर्ण शरीरात पसरतो आणि शेवटी सांध्यांमध्ये स्थिरावतो. या आमामुळे प्रभावित झालेल्या सांध्यांमध्ये संधिवाताची समस्या निर्माण होते.
या त्रासावर शिल्लक आणि गुग्गुळ या औषधी घटकांचं सेवन करण्याचा सल्ला आयुर्वेदिक तज्ज्ञ देतात. या घटकांनी युक्त कॅप्सुल्समुळे रुग्णाला आराम मिळतो. या कॅप्सुल्स दिवसातून तीन वेळा घेतल्याने वेदनांचं प्रमाण कमी होतं. या औषधी वनस्पतींच्या सेवनाने शरीराचा दाह कमी होण्यासोबतच हाडांना बळकटी मिळते. शरीराची लवचिकता वाढते.
त्रिफळामुळे आतड्याची स्वच्छता होते. संधिवातात वातशामक आहार घ्यायला हवा. मसालेदार, गरम पदार्थ टाळा. बटाटा, वांगी, फ्लॉवर, दुग्धजन्य पदार्थ, कोबी, ब्रोकोली वातकारक असल्याने त्यांचं प्रमाण कमी असावं. हिरव्या भाज्या, फळं, फळांचे रस, घरगुती सार यांचं सेवन करावं.