कोविडची नियमावली काटेकोर पाळावी
– विभागीय आयुक्त पियूष सिंह
* राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक
अमरावती, दि. 3 : अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. या निवडणुकीमध्ये राज्य शासनाने कोविड संदर्भात दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आज विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, उपायुक्त संजय पवार, तहसिलदार वैशाली पाथरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्री. सिंह यांनी सुरवातीला निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, दि. 5 नोव्हेंबर 2020 रोजी प्रसिद्ध होईल. नामनिर्देशन पत्र गुरूवार, दि. 12 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत भरता येईल. या दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी शुक्रवार, दि. 13 नोव्हेंबर 2020 रोजी करण्यात येईल. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. 17 नोव्हेंबर 2020 रोजीपर्यंत मागे घेता येणार असल्याची माहिती दिली.
कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसारच ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करतेवेळी दोन वाहने आणि उमेदवारासह दोन व्यक्तींना प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच प्रचार करतांना परस्परांतील अंतर पाळावे लागणार आहे. राज्य शासनाने दिलेल्या निर्देशाचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी विहित नमुन्यातील अर्ज पूर्णपणे भरावा लागणार आहे. एक उमेदवार जास्तीत जास्त चार अर्ज दाखल करू शकेल. सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांना दहा हजार रूपये तर अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील उमेदवारांना पाच हजार रूपये अनामत रक्कम भरावी लागेल. तसेच उमेदवारी अर्जासोबत शपथपत्र सादर करावे लागेल.
सध्यास्थितीत 34 हजार 690 मतदारांची नोंदणी झालेली आहे. या निवडणुकीसाठी मतदारांची नोंदणी सुरू आहे. त्यामुळे ज्यांना नोंदणी करावयाची आहे, त्यांनी तातडीने नोंदणी करावी. या निवडणुकीसाठी 77 मतदान केंद्र प्रस्तावित आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडची लागण झालेल्या मतदारांना पोस्टल मतपत्रिका पुरविण्यात येणार आहे. त्यासाठी नियमावली विहित केली आहे. तसेच मतदान केंद्रावर दोन व्यक्तींमध्ये परस्पर अंतर पाळण्यात येणार असल्याची माहिती श्री. सिंह यांनी दिली.