माश्यांद्वारे काही विकारांच्या विषाणूंचा प्रसार होतो, याविषयी आपण ऐकलं आहे वा वाचलं आहे. खरंतर माशी अनेक घातक रोग पसरवण्यास कारणीभूत ठरते. अस्वच्छ जागी घोंघावत असणार्या माशा खाद्यपदार्थांवर बसून रोगजंतू पसरवतात. या किटकांमुळे टायफॉइड, हगवण, आमांश, कॉलरा, जंत, पोलिओ, डोळे येणं, खुपर्या इत्यादी रोग संक्रमित होतात. प्राण्यांची वा मानवी विष्ठा, कचरा, सडलेली फळे आणिे भाज्या विपुल प्रमाणात असतात तेथे माशांची पैदास होते. त्यांना चावता येत नाही पण त्या कायम चरत राहतात. त्या सारख्या उलटी आणि संडास करतात. एका जागी न बसता इकडून तिकडे भ्रमंती करतात. रुग्णाची विष्ठा, डोळ्यातील स्त्राव, जखमेतील पू इत्यादींत अनेक जीवजंतू असतात. माशा त्यावर बसतात. नंतर त्याच माशा घरात येऊन अन्नपदार्थावर बसतात. सहाजिकच त्यांच्या पायांना, पंखांना चिकटलेले जीवजंतू अन्न पदार्थांमध्ये मिसळतात. अशा अन्नपदार्थांचं सेवन केल्यास रोगजंतू शरीरात प्रवेश करतात. माशांचा नायनाट करण्यासाठी उघड्यावर शौचास बसणं, घरात वा घराभोवती केर कचरा जमा होऊ देणं, अस्वच्छता या गोष्टींचा नायनाट करायला हवा. दुसरं म्हणजे नेहमी घरातले अन्नपदार्थ झाकून ठेवावे. बाहेरचे उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत. माशा मारण्यासाठी किटकनाशकांचा वापरही करता येतो; पण सर्वात महत्त्वाचं स्वच्छता राखणं. स्वच्छ घरात माशांचा शिरकाव होत नाही.