बुलडाणा : आगामी दिपावली सणानिमित्ताने विदेशातून अनधिकृतपणे आयात केले जाणाऱ्या फटाक्यांची साठवणूक व विक्री करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील फटाके विक्री करण्यासाठी परवाने देणारे सर्व यंत्रणांना याबाबत अप्पर जिल्हादंडाधिकारी कार्यालयाने सूचना निर्गमीत केल्या आहेत.
संबंधित यंत्रणांनी विदेशातून आयात केलेल्या फाटाक्यांची विक्री होणार नाही, याबाबत दक्षता घेवून नियमित तपासणी करावी. विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याची बाब निदर्शनास आल्यास त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी. सर्व फटाका आस्थापनांनी सर्व समावेशक तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात,जेणेकरून विदेशी फटाक्यांची साठवणूक व विक्री होणार नाही. सर्व ई कॉमर्स कंपनी व स्थानिक विक्रेते यांच्यामार्फत विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेल्या फटाक्यांची तसेच स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादित केलेल्या फटाक्यांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. अनधिकृत फटाक्यांच्या दुष्परीणामांविषयी समाजात जनजागृती करावी.
विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले आणि स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादीत केलेले फटाके जवळ बाळगणे, त्यांचा साठा करणे आणि त्यांची विक्री करणे कायद्यानुसार अवैध आणि दंडनीय असल्यामुळे विदेशातून अनधिकृतपणे आयात केलेले व स्थानिक पातळीवर अनधिकृतपणे उत्पादीत केलेले फटाके, जर कुणी जवळ बाळगत असेल, त्याचा साठा करीत असेल किंवा त्यांची विक्री करीत असेल, अशी बाब जनतेच्या निदर्शनास आल्यास जनतेने स्वयंप्रेरणेने त्यांच्या क्षेत्रातील नजीकच्या पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार करावी. आगामी काळात दिवाळी सणाच्या कालावधीत पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन व मुख्याधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रात भरारी पथकांची नियुक्ती करावी. सदर भरारी पथकाने विदेशी फटाक्यांची साठवणूक, विक्री व वितरण होत असल्याच्या बाबी निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ कारवाई करावी, असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांनी परिपत्रकान्वये कळविले आहे.