- प्रा. डॉ. रविन्द्र मुन्द्रे
- विभाग प्रमुख, इतिहास विभाग
- श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, अकोला, महाराष्ट्र
प्रस्तावना:
प्राचीन भारतामध्ये सोळा महाजनपदांचा उल्लेख आहे. त्यामध्ये प्रमुख मगध साम्राज्य होते असे दिसून येते. या महाजनपदांमध्ये काही राजतंत्र तर काही गणराज्य होते. वज्जी (विज्जिका, व्रज्जी) हे प्रमुख गणराज्य म्हणून ओळखले जाते. काही इतिहासकार या गणराज्याला जगातील प्रथम गणराज्य म्हणून संबोधतात. वज्जी हे नाव प्रदेशाचे होते की तिथे राहणाऱ्या लोकांना वज्जी म्हणून संबोधत याबाबत मात्र ठोस मत मांडले गेले नाही. कारण वज्जीकुल हा शब्दप्रयोग अनेक ग्रंथांमध्ये आलेला आहे. या प्रदेशात राहणाऱ्या लोकांना लिच्छवी सुद्धा म्हटल्या जाई. वज्जीची राजधानी वैशाली असल्यामुळे वैशालीचे लिच्छवी असे सुद्धा म्हटल्या जाते.
बौद्ध भारतात (डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राचीन भारताच्या इतिहासाचे तीन कालखंड करतात. वैदिक भारत, बौद्ध भारत, हिंदू भारत) वज्जी हे प्रमुख गणराज्य असल्याने त्याविषयी जाणून घेण्यासाठी प्रत्येक भारतीय उत्सुक असतो. वज्जी हे गणराज्य म्हणून कसे उदयास आले निश्चित सांगता येणार नाही. परंतु तथागत बुद्धांनी एकदा वज्जींना पराभूत होऊ न देणाऱ्या सात गोष्टींचा उपदेश केला होता. तो अंगुत्तर निकायाच्या सारन्ददसुत्तात आला आहे.
एकदा तथागत वैशालीमधील सारन्दद चैत्यामध्ये विहार करीत होते. तेव्हा बरेचसे लिच्छवी त्यांच्याकडे आले आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला बसले. त्यावेळी तथागत बुद्ध त्यांना म्हणाले, मी तुम्हाला अशा सात गोष्टींचा उपदेश देतो, की ज्यांचे पालन केले असता तुमचा पराभव होणार नाही.
“१) जोपर्यंत वज्जी अखंडपणे एकत्रित जमत राहतील, विशाल संख्येने ऐक्य राखतील, तोपर्यंत त्यांच्या वृध्दीचीच आकांक्षा बाळगता येईल, त्यांचा ऱ्हास होणार नाही.
२) ते एकजुटीने एकत्र जमत राहतील, एकजुटीने बैठकीतून उठतील आणि एकजुटीने वज्जींच्या प्रजेबद्दलची कर्तव्ये पार पाडतील, तोपर्यंत…
३) ते कायदा म्हणून न ठरविलेल्या गोष्टींना जोपर्यंत कायदा म्हणून अमलात आणणार नाहीत, कायदा म्हणून ठरविण्यात आलेल्या गोष्टी मोडणार नाहीत आणि वज्जींची जुन्या काळापासून चालत आलेली नियमावली मान्य करून वागत राहतील तोपर्यंत…
४) ते जोपर्यंत आपल्यातील वयस्कर लोकांचा मान राखतील आणि त्यांचा सल्ला ऐकतील तोपर्यंत…
५) ते जोपर्यंत कुलस्त्रियांना, कुलकुमारींना पळवून आणून जबरदस्तीने आपल्या घरात ठेवणार नाहीत, तोपर्यंत…
६) ते जोपर्यंत गावात असलेल्या वा गावाच्या बाहेर असलेल्या चैत्यांचा सत्कार व गौरव करतील, त्यांच्या बाबतीतील पूर्वीपासून चालत आलेली धम्मकर्तव्ये पार पडतील, तोपर्यंत…
७) ते जोपर्यंत अरहंतांना धम्मविषयक संरक्षण देतील, त्यामुळे पूर्वी तेथे न आलेले अरहंत तेथे येत राहतील आणि आलेले अरहंत सुखाने राहतील, तोपर्यंत…”१
या सात गोष्टी सांगून झाल्यानंतर या गोष्टींचे पालन केल्यास वज्जींची वृद्धीच होईल,ऱ्हास होणार नाही. हे तथागतांनी पुन्हा एकदा निर्धारपूर्वक स्पष्ट केले.
तथागत बुद्धाने सांगितलेल्या सात गोष्टीचे विश्लेषण केल्यास असे दिसून येते की, त्यांनी पहिला नियम ऐक्याचा सांगितला आहे. वज्जी जोपर्यंत विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमत राहतील आणि ऐक्य राखतील, तोपर्यंत त्यांची वृद्धीच होईल, असे त्यांनी म्हटले आहे. कोणताही समाज जेव्हा काही महत्त्वाच्या धाग्यांनी एकत्र गुंफलेला असतो, तेव्हा बाहेरच्या शत्रूंना शिरकाव करणे अवघड असते. एकमेकांवर प्रेम करणारी, एकमेकांची काळजी घेणारी, एकमेकांसाठी कोणताही त्याग करायला सिद्ध असलेली माणसे ज्या समाजात असतात, त्या समाजाला जिंकणे सोपे नसते. त्यांनी सांगितलेला दुसरा नियम हा पहिल्या नियमाचाच एक महत्त्वाचा पैलू स्पष्ट करणार आहे. नुसते एकत्र जमणे महत्त्वाचे नसते, एकत्र जमल्यानंतर कलह करीत, एकमेकांना शिव्याशाप देत, हाणामारी करीत बाहेर पडण्याचे प्रकारही घडत असतात. वस्तुतः, काही मतभेद असले, तरी त्यांच्यावर मात करीत, समान उद्दिष्टाचे मुद्दे बळकट करीत आपल्या समस्या सोडविणे, सहमतीने एखाद्या निर्णयापर्यंत येणे, असे येथे घडते, तेथे निर्णयांची अंमलबजावणी प्रभावी रीतीने होऊ शकते आणि समाजाचे स्वास्थ्य टिकून त्याच्या जीवनाला गतीही येते.
नव्या गोष्टींचे स्वागत करण्याची तयारी ठेवून देखील काळाच्या कसोटीवर उतरलेल्या, त्या त्या समाजाला त्याची ओळख देणाऱ्या अशा पूर्वीपासून चालत आलेल्या काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असते. वयस्कर लोकांचा मान राखणे, याचा अर्थ त्यांच्या चुकीच्या गोष्टींपुढे झुकणे नव्हे. अज्ञानामुळे अथवा आणखी कुठल्या कारणाने त्यांनी सांगितलेल्या अनिष्ट व अपायकारक गोष्टी कौशल्याने नाकारायलाच हव्यात. पण हे करताना त्यांच्याविषयी कृतघ्नपणा प्रकट करणे वा त्यांचा तिरस्कार करणे, ही पद्धत स्वीकारली असता तो समाज निकोप रीतीने वाढू शकत नाही. स्त्रियांच्या संदर्भात सांगितलेला नियम स्वयंस्पष्ट आहे. स्त्रियांवर जबरदस्ती करणाऱ्या समाजाचा ऱ्हास वा विनाश झाल्याखेरीज राहत नाही. अगदी शत्रूंच्या स्त्रियांचेही शील जपले पाहिजे. असा तथागतांनी लिच्छवींना चारित्र्याचा हा नियमही जपण्याचा सल्ला दिलेला आहे.
गावातील चैत्यांच्या बाबतीतील आपली कर्तव्ये पार पाडणे आणि अरहंतांना आपल्या गावात येण्यास राहण्यास अनुकूल वातावरण निर्माण करणे, या गोष्टी समाजधारणेसाठी महत्त्वाच्या आहेत. तथागतांना अभिप्रेत असलेल्या चैत्याचे स्वरूप शोषणाचे, अन्यायाचे वा अनीतीचे केंद्र बनलेल्या वास्तूंपेक्षा वेगळे आहे. पिढ्या- पिढ्यांचा वारसा, माणूसकीची भावना आणि निकोप संस्कृती यांच्याशी निगडित स्थळे, असे त्यांचे स्वरुप आहे. भारतीय समाजात तथागतांच्या आधीपासूनच चैत्यांचे अस्तित्व होते, हे यावरून स्पष्ट होते. चैत्यांच्या बाबतीत तेच अरहंतांच्या बाबतीत. माणसामाणसांत भेद करणाऱ्या तत्त्वांचा पुरस्कार करणारे लोक आणि समता व माणुसकी यांना प्रोत्साहन देणारे अरहंत यांच्यामध्ये फरक आहे. स्वाभाविकच, अशा प्रकारच्या अरहंतांना मानाचे योग्य ते स्थान दिले असता ते लोकांच्या मनावर उमद्या नैतिकतेचे संस्कार करत राहतील. असा संस्कार मिळालेले लोक स्वार्थ, संकुचितपणा, द्वेष, फितुरी अशा मार्गांकडे वळणार नाहीत.
मगधराजा अजातशत्रू हा वज्जीवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तेव्हा त्याने आपला मुख्यप्रधान,वस्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून त्याला बुद्धाकडे निरोप पाठवताना सांगितले की,” अजातशत्रू वज्जीवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जीकुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे.”२ अजातशत्रू पुढे म्हणाला,”भगवान, जे काही पुढचे भविष्य होईल ते सांगतील. ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द न शब्द मला निवेदन कर. कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात.”३ वस्सकार ब्राह्मण सर्व सूचना ऐकून तथागतांना भेटण्यासाठी गेला. तथागत तेव्हा राजगृह येथील गृधकुटावर वास्तव्यास होते. वस्सकाराने अजातशत्रूचे निवेदन तथागतांना जसेच्या तसे सांगितले. त्यावेळी स्थविर आनंद तथागतांच्या मागे उभे होते. तथागत त्यांना म्हणाले,”आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात हे तू ऐकले आहेस काय? आनंदाने उत्तर दिले,”होय भगवंत, मी ऐकले आहे.”४ यावर भगवंत पुढे म्हणाले, “आनंद जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवीत असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाहीत. उलट त्यांची भरभराट होत राहील. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे ठाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्ये करतात. जोपर्यंत कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वमान्यता मिळाली आहे ते वर्ज्य समजत नाहीत आणि गतकाळात वज्जीकुळाने जे नियम केले आहेत त्या नियम-परंपरेप्रमाणे आचरण करतात, जोपर्यंत ते वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात, जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवत नाहीत आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाहीत, जोपर्यंत वज्जी धम्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात, तोपर्यंत, हे आनंदा, वज्जीकुळाची अधोगती होणार नाही. उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही.”५ तथागतांच्या या उपदेशांमध्ये प्रजातंत्राचे वैशिष्ट्ये दिसून येतात. जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील प्रजातंत्रकाप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकट स्पर्श करू शकणार नाही, असे तथागताने स्पष्ट केलेले दिसते.
वस्सकाराने अजातशत्रूला बुद्धाशी झालेल्या संवादाचा प्रत्येक शब्द कथन केला. वज्जी जोपर्यंत तथागतांच्या उपदेशांचे पालन करतील तोपर्यंत युद्धाच्या मार्गाने त्यांना जिंकने शक्य नाही हे अजातशत्रूच्या ध्यानात आले. म्हणून वस्सकाराच्या सल्ल्याने अजातशत्रूने एक षडयंत्र रचले. त्यानुसार, राजाने आपल्या दरबारात वज्जींना जिंकण्याचा विषय उपस्थित करावा, असे वस्सकाराने त्याला सुचविले. तुम्ही त्यांना कशाला त्रास देता, वज्जींचे हे राज्यकर्ते आपापली शेती, व्यापार, करून जगू देत. असे म्हणून मी बाहेर पडेन, असे तो त्यांना म्हणाला. हा ब्राह्मण वज्जी वगैरेंविषय चर्चेला खो घालीत आहे, असे तुम्ही म्हणावे, त्यानंतर मी वज्जींसाठी काही नजराणा पाठवीन, तो पकडून तुम्ही माझ्यावर आरोप ठेवावा आणि कैद व मारहाण न करता वस्तऱ्याने मुंडन करून माझी नगरातून हकालपट्टी करावी, असा सल्ला त्याने राजाला दिला. त्यावेळी आपण काय म्हणू ते त्याने राजाला पुढीलप्रमाणे सांगितले, “मी तुझ्या नगरातील तटबंदी आणि खंदक करविले आहेत, मी तुझी दूर्बलस्थाने आणि बलस्थाने जाणतो, लवकरच मी तुला सरळ करीन. आपले ते बोलणे ऐकून, ‘जा’ असे राजाने म्हणावे, असेही त्याने सांगितले”.६ षडयंत्र जसेच्या तसे कृतीत उतरविले गेले.
तिकडे वज्जीमध्ये वस्सकारासोबत अजातशत्रूने कसा व्यवहार केला यावर वादविवाद सुरू झाला. अजातशत्रूने त्याला हाकलून दिल्याचे ऐकून लिच्छवी एकमेकांना म्हणाले, “हा ब्राह्मण लबाड आहे; त्याला गंगा पार करू देऊ नका. परंतु त्यांच्यापैकी काहीजण म्हणाले, आपल्या बाजूने बोलल्यामुळे त्याच्यावर हा प्रसंग आला आहे. त्यांनी तसे म्हटल्यावर ,मग येऊ द्या, असे बोलणे झाले. तो तेथे पोहोचल्यावर, कशासाठी आलात, असे लिच्छवींनी त्याला विचारले. तुमची बाजू घेतल्यामुळे माझ्यावर हा प्रसंग ओढवला, असे त्याने सांगितले. छोट्याश्या गोष्टीसाठी असा मोठा दंड करणे योग्य नव्हे, असे म्हणून लिच्छवींनी त्याला विचारले, तेथे तुमचे पद काय होते? तो म्हणाला, मी विनिश्चयमहामात्य होतो. येथेही तुम्ही त्याच पदावर राहा”७, असे लिच्छवी त्याला म्हणाले. तो चांगल्या रीतीने न्याय करू लागला. राजकुमार त्याच्याकडे शिक्षण घेऊ लागले.
काही दिवसांतच लिच्छवींमध्ये त्याने आपला जम बसविला. मग एके दिवशी त्याने एका लिच्छवीला एका बाजूला बोलावून नेले आणि म्हटले, “तुमचे तरुण शेती करतात ना? त्याने होकारार्थी उत्तर दिल्यावर ‘दोन बैल जुंपून करतात का’ असे त्याने विचारले. त्यालाही त्याने होकारार्थी उत्तर दिले. एवढे बोलून तो निघून गेला. त्या लिच्छवीला दुसऱ्या लिच्छ्वीने विचारले, आचार्य तुला काय म्हणाले?, त्याने घडलेला वृत्तांत सांगितला. पण विचारणाऱ्याचा विश्वास बसला नाही. ‘हा काही मला खरे सांगत नाही’,८ असे वाटून त्याच्या मनात अविश्वास निर्माण झाला. त्यानंतर एके दिवशी ब्राह्मणाने आणखी एका लिच्छवीला बाजूला नेऊन, ‘जेवणात काय खाल्लेस’ असे विचारले. त्यालाही एका लिच्छवीने या प्रसंगाविषयी विचारल्यावर त्याने खरे सांगितले. पण विचारणाऱ्याचा विश्वास बसला नाही आणि त्याचे मन बिनसले. आणखी एके दिवशी ब्राम्हणाने एका लिच्छवीला एका बाजूला नेले आणि “खरोखरच तुझी दुरवस्था झाली आहे का, असे त्याला विचारले. ‘असे कोण म्हणाला’ असे त्याने विचारले असता ‘अमुक लिच्छ्वी’ असे त्याने सांगितले. आणखी एकदा ‘तू खरोखरच भित्रा आहेस का’ असे एका लिच्छवीला बाजूला नेऊन त्याने विचारले. ‘असे कोण म्हणाला’ असे त्याने विचारल्यावर ‘अमुक लिच्छ्वी’ असे त्याने उत्तर
दिले”.९ अशा रीतीने एकाने जे म्हटलेले नाही ते दुसऱ्याला सांगत राहण्याचा प्रकार त्याने तीन वर्षे केला. त्यामुळे वज्जींच्या राज्यकर्त्यांमध्ये एवढी फाटाफूट झाली, की त्यांच्यापैकी कोणीही दोघे जण एका मार्गाने जाईनासे झाले. त्यानंतर एकत्र जमण्यासाठी नगारा वाजविण्यात आला. पण, ‘जे प्रमुख आहेत त्यांनी जमावे, जे शूर आहेत त्यांनी जमावे’ असे म्हणून कोणीही लिच्छवी एकत्र जमले नाहीत.
एवढे झाल्यावर ब्राह्मणाने अजातशत्रूला निरोप पाठविला. ”आता योग्य वेळ आहे, ताबडतोब या.”१० ते ऐकून राजा युद्धासाठीचा नगारा वाजवून त्याच्या नगरीतून बाहेर पडला. वैशालीच्या वज्जींना हे कळले. राजाला गंगा पार करून द्यायची नाही, असे म्हणून नगारा वाजविण्यात आला. परंतु त्याचा आवाज ऐकूनही ‘जे शूर राजे असतील त्यांनी जावे’. यासारखी वक्तव्ये करणारे वज्जी एकत्र जमले नाहीत. ‘राजाला नगरात शिरू द्यायचे नाही, वेशीचे दरवाजे बंद करून ठामपणे उभे राहू या’ असे म्हणून नगारा वाजविण्यात आला. परंतु एकजणही जमला नाही.अजातशत्रू खुल्या दरवाजातून प्रवेश करून आला आणि सर्वांची धूळधाण उडवून गेला.
निष्कर्ष: वर-वर पाहिले असता ही घटना अगदी सर्वसामान्य वाटते पण बारकाईने विचार केला असता, हा केवळ वज्जींचा इतिहास नसून हा एकूण भारतीय समाजाचा हजारो वर्षांचा जिवंत इतिहास आहे. परस्परांवरील अविश्वास आणि त्यातून निर्माण झालेला ऐक्याचा अभाव यांच्यामुळे समाजाची बाकीची सर्व गुणवत्ता मातीमोल होते, सगळे सामर्थ्य मोडीत काढली जातात आणि गैरसमजापोटी एकमेकांच्या जिवावर उठलेले सगळेजणच शत्रूपुढे गुडघे टेकून त्यांचे गुलाम होतात. या सर्व प्रकारात एक अत्यंत क्लेशकारक बाब आहे. ती अत्यंत विघातक आहे आणि ते विघातक असल्याने माहीत असूनही लोक तिच्या सापळ्यात अडकत आले आहेत. तथागत वज्जींना अत्यंत जवळचे होते. त्यांच्या रक्तमांसाचेच होते. वज्जींविषयी तथागताच्या मनात अपार प्रेम होते. वज्जींनी ऐक्य राखावे, असे त्यांनी त्यांना परोपरीने सांगितले होते. ऐक्य राखल्यास कोणी तुमचे काही वाकडे करू शकणार नाही, असे त्यांनी त्यांना समजावले होते. वज्जींकडे तशा प्रकारचा पराक्रम होता. ते अजातशत्रूपेक्षा कितीतरी पटींनी अधिक चपळाईने हालचाली करण्यात पटाईत होते. त्यामुळे ऐक्य राखल्यास तुमची वृद्धी होईल, हा तथागतांचा सल्ला वस्तुस्थितीवर आधारलेलाच होता. याउलट, वस्सकार हा वज्जींच्या शत्रूचा विश्वसनीय सल्लागार होता. तो धूर्त आहे, डावपेच करणारा आहे, हेही वज्जींना माहीत होते. पण वज्जींनी काय केले? आपल्या जीवाभावाच्या माणसाने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगितले असा सल्ला त्यांनी धाब्यावर बसविला आणि आपली राखरांगोळी करण्याचा निश्चय केलेल्या माणसाला मस्तकावर घेतले. त्याला विषाची पेरणी करण्यासाठी आपल्या हृदयाची सुपीक भूमी अर्पण केली. त्याला आपल्या बुद्धीमध्ये संशयाची आणि द्वेषाची जाळी विणता यावीत, म्हणून आपली बुद्धी त्याच्याकडे गहाण टाकली. अशा प्रकारच्या कृत्याला काही स्वादिष्ट फळ मिळेल, अशी अपेक्षा कशी करता येईल? आपल्या कल्याणासाठी रात्रंदिवस तळमळणार्या माणसाचा सल्ला धुडकावून लावणारे आणि आपल्या विध्वंसाचे कारस्थान नियोजित पद्धतीने यशस्वी करू पाहणाऱ्याला आपल्या जीवनाचा सर्वेसर्वा बनवणारे लोक आपले स्वातंत्र्य आपला स्वाभिमान आणि आपली समृद्धी यांची जपणूक कधी तरी करू शकतील काय?
संदर्भ:
१) सूर्यकांत भगत ( संपा.), धम्मपद, सुधीर प्रकाशन, वर्धा, २०१२, पृ. २१९
२) डॉ.भीमराव रामजी आंबेडकर, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, सिध्दार्थ प्रकाशन, मुंबई, १९९५, पृ. ३१२
३) तैत्रव, पृ. ३१२
४) तैत्रव, पृ. ३१३
५) तैत्रव, पृ. ३१३
६) आ.ह. साळुंखे, सर्वोत्तम भूमिपुत्र : गोतम बुद्ध, लोकायत प्रकाशन, सातारा, २००७, पृ. ३०९.
७) तत्रैव, पृ. ३०९.
८) तत्रैव, पृ. ३०९.
९) तत्रैव, पृ. ३१०.
१०) तत्रैव, पृ. ३१०.