सध्याचा जमाना संगणकाचा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रात संगणकाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रोबोटक्सचा विचार करायला हवा. खरंतर ही विज्ञानाची एक शाखा आहे. यात मॅकेनिकल, कॉम्प्युटर इंजिनिअर्सना भरपूर संधी आहे. रोबोटिक्समध्ये रोबोची रचना, त्यांचं कार्य, नव्या अँपची निर्मिती यासारख्या कामांचा समावेश होतो. यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी उपयुक्त ठरणार्या रोबोंची निर्मिती केली जाते.
सध्या औद्योगिक क्षेत्रात रोबोंचा मोठय़ा प्रमाणावर वापर होतोय.
रोबोटिक्स या विषयात आर्टिफिशिअल इंटेलिजन्सला महत्त्व दिलं जातं. कॉम्प्युटरला माणसासारखा मेंदू बसवण्याचं हे आव्हानात्मक काम आहे. विविध समस्या सोडवणार्या कल्पक मेंदूची निर्मिती रोबोटिक्समध्ये करावी लागते.
रोबोटिक्स शिकण्यासाठी इंजिनिअरींगची पदवी घेणं गरजेचं आहे. मॅकेनिकल, कॉम्प्युटर तसंच इलेक्ट्रॉनिक्स या विषयात इंजिनिअरिंगची पदवी मिळवणारे विद्यार्थी या क्षेत्रात करिअर घडवू शकतात. या क्षेत्रासाठी गणितावर प्रभुत्व हवं. बारावीला फिजिक्स आणि गणित हे विषय घेतलेले विद्यार्थीही या क्षेत्राचा विचार करू शकतात. यासोबत सतत नवं काही तरी घडवण्याची विचारशक्ती आणि कल्पकताही असायला हवी.
रोबोटिक्स प्रशिक्षणानंतर इस्रोसारख्या संस्थेत संधी मिळू शकते. मायक्रोचीप तयार करणार्या कंपन्यांमध्येही यांना मोठी मागणी आहे. इतर क्षेत्रांमध्ये रोबोटिक्स इंजिनिअर्सना संधी आहेत. त्यामुळे नवा शोध लावण्याची इच्छा असेल तर रोबोटिक्सचा पर्याय निवडता येईल.