राखा मूत्रपिंडांचे आरोग्य

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मूत्रपिंडांचं आरोग्य उत्तम राखणं खूप आवश्यक आहे. मूत्रपंडांच्या कार्यावर शरीराचं सर्वांगिण आरोग्य अवलंबून असतं. मूत्रपिंडाशी संबंधित अनेक व्याधी आणि आजार आहेत. मूतखडा ही अत्यंत वेदनादायी अशी व्याधी आहे. अमेरिकेतल्या शास्त्रज्ञांनी नुकतंच याबाबत एक संशोधन केलं.
मूतखड्याच्या रुग्णांमध्ये हाड मोडण्याचा धोका अधिक असतो, असं या संशोधनातून समोर आलं आहे. स्टेनफोर्ड विद्यापीठातल्या संशोधकांनी हे संशोधन केलं असून यामुळे मूतखडा झाल्यानंतर हाडांची अधिक काळजी घ्यायला हवी, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. २00७ ते २0१५ या कालवधीतल्या ५,३१,४३१ मूतखड्याच्या रुग्णांवर संशोधन करण्यात आलं.
यापैकी २३.६ टक्के रुग्णांमध्ये ऑस्टओपोरोसस तसंच फ्रॅक्चरसारख्या समस्या दिसून आल्या. म्हणूनच मूतखड्याच्या उपचारांदरम्यान तसंच त्यानंतरही हाडांच्या घनतेची चाचणी करणं आवश्यक असल्याचं तज्ज्ञ सांगतात. या चाचणीमुळे हाडं कमकुवत झाली आहेत किंवा नाही हे कळू शकतं. त्यातही प्रौढांनी ही चाचणी करून घेणं अत्यंत आवश्यक आहे.
पोटाच्या खालच्या भागात वेदना जाणवणं, उलटी, मळमळ, मूत्रातून रक्त येणं, ताप येणं, घाम येणं, मूत्रातून दुर्गधी येणं ही मूतखड्याची लक्षणं आहेत. आपण आपल्या मूत्रपिंडांची काळजी घ्यायला हवी. मूत्रपिंडांचं आरोग्य राखण्यासाठी रक्तदाब नियंत्रणात असायला हवा. आहारातलं मीठाचं प्रमाण कमी करा. उगाचंच जास्तीचं मीठ खाऊ नका.
फळं आणि भाज्या अधिक प्रमाणात खा. नियमित व्यायाम करा. तेलकट, मसालेदार पदार्थ कमी खा. कोलेस्टरॉलचं प्रमाण नियंत्रणात ठेवा. मूत्रपिंड निकामी झाल्यानंतर डायलिसिस हा एकमेव उपाय आहे. हा अत्यंत खर्चिक असा उपाय करण्याऐवजी मूत्रपिंड निरोगी ठेवण्यावर भर देणं अधिक योग्य ठरतं. उपचारांपेक्षा प्रतिबंध कधीही चांगला असतो. त्यामुळे मूत्रपिंडं खराब होणार नाहीत, याची दक्षता घ्यायला हवी. कुटुंबात मूत्रपिंडांशी संबंधित व्याधींचा इतहास असेल तर वेळोवेळी तपासणी करून घ्यायला हवी. गंभीर स्वरुपाच्या विकारांचा धोका आधीच लक्षात आल्यास लवकर उपचार करता येतील.
मधुमेहींनी अधिक दक्षता घेणं आवश्यक आहे. अनियंत्रित मधुमेहाचा शरीरातील अन्य अवयवांसह मूत्रपिंडांवरही विपरित परिणाम होत असतो. म्हणूनच मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासोबतच रक्तातल्या साखरेची वेळोवेळी चाचणी करून घ्यायला हवी. बैठी जीवनशैली सोडून अधिकाधिक शारीरिक हालचाल करा. स्थूलपणामुळे अनेक गंभीर आजार जडू शकतात. मूत्रपिंडांचं कार्य उत्तम सुरू ठेवण्यासाठी स्थूलपणा कमी करायला हवा. धूम्रपान, मद्यपान टाळायला हवं. भरपूर पाणी पिणंही आवश्यक आहे.

Leave a comment