युद्ध : का ? कशासाठी ?

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

    “आज जग भयान अंधारलेल्या गर्द डोहात आहे. जगात मूठभर धनिकांचे आर्थिक आणि राजकीय साम्राज्य आहे. मानवी जीवनाच्या सर्व यंत्रणा मुठभर वर्गाच्या ताब्यात आहेत. कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात या वर्गाची दहशत आहे. सूचनांच्या कत्तलखान्यात आपण आजही जगत आहोत .दहशतवादाचे जागतिकीकरण झाले आहे. कित्येक राष्ट्र आजही गुलामीच्या उंबरठ्यावर आहेत. मानवी जीवनाचा केव्हा हिरोशिमा-नागासाकी होईल ते सांगता येत नाही. आपण युद्धाच्या रणांगणावर आजही उभे आहोत. आपण अणुबॉम्बच्या दहशतीत आजही मरण यातना भोगत आहोत. आपण पहिले महायुद्ध पाहिले. दुसरे महायुद्ध ही अनुभवले.आता तिसरे महायुद्ध आपल्यापुढे चक्रीवादळापेक्षाही भयंकर राहणार आहे आणि हे महायुद्ध खून, धमक्या, बलात्कार महामारी यांचे राहणार आहे. हे तिसरे महायुद्ध आजही धगधग पेटत आहे. हे महायुद्ध भाकर आणि धर्माच्या नावाने पुढे आणखी निखा-यासारखे ज्वालाग्रही होणार आहे .”

    – दीपककुमार खोब्रागडे

    दोन वर्षाच्या कोरोना महामारीच्या झळा संपावयाच्या पूर्वीच जगात मानव निर्मित युद्धाची घोषणा झाली आहे. रशियाने स्वतःच्या बलाढ्य सैनिकाच्या दबावाने आण्विक शस्त्र सज्जतेने छोट्या यूक्रेन राष्ट्रावर हल्ला केला आहे. ही घटना अत्यंत निंदनीय आहे. तसेच ती लोकशाही व्यवस्था नष्ट करणारी आहे. कोरोनाविषाणूच्या प्रर्दुभावाने जग एक होत असताना स्वतःच्या अहंकारापाई व स्वतःच्या बलाढ्य सामर्थ्यशाहीमुळे रशियाने आपले विस्तारवादी धोरण अवलंबले आहे.

    आज जगात लोकशाही देशापुढे मोठे आव्हान उभे झाले आहे. ते वर्चस्ववादी एकछत्री राजवटीमुळेच. चीन ,रशिया या देशातील सरकारने लोकशाही व्यवस्थेला समाप्त करून स्वतःच्या फायद्याचे कायदे केले आहेत .सैनिकी सरकारच्या मदतीने नवी रक्तरंजित क्रांती करण्यासाठी त्यांचे मनसुबे आहेत. रशिया, अमेरिका व चीन हे देश नेहमी मानवतेचे ढोल पीठत असले तरी स्वतःचे विस्तारवादी धोरण व आर्थिक उन्नतीचे षडयंत्र करुण छोट्या राष्ट्रांना अंकित करत आहेत.

    युक्रेन हा एक चिमुकला देश आहे. ज्याने आपले स्वतःचे अस्तित्व उभे केले ते अमेरिका व नाटो यांच्या मदतीने. पण युद्धाच्या वेळी अमेरिका व नाटो राष्ट्रे मदत करत नाही. जगात शांती होण्यासाठी संयुक्त राष्ट्र काम करतो पण हा संघ मोठ्या राष्ट्राचे गुलाम झालेले आहे. नावापुरतेच देशाचे राजदुत त्या ठिकाणी चर्चा करतात .त्याचा प्रभाव शून्यवत होत आहे. आज संयुक्त राष्ट्रसंघाने नव्याने कार्य करण्याची गरज आहे .जे राष्ट्र छोट्या राष्ट्रांवर युद्ध लादत असेल तर त्या राष्ट्रावर सारे निर्बंध लादून बहिष्कार करायला हवा. सर्वसामान्य मानवाचे जीवन उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घेणे संयुक्त राष्ट्राचे परम कर्तव्य आहे.

    युद्ध हा मार्ग जगाला विनाशाकडे नेणारा आहे. पण युद्ध व दंगे प्रत्येक दिवशी होत आहेत. ते दंगे व युद्ध घडवणाऱ्या माणसाची मानसिकता एकच आहे असे लक्षात घ्यावे.

    युद्ध हा पर्याय का ? वापरला जात असेल तर युद्धातून स्वतःचे सामर्थ्य जगाला दाखवावे, आपली सैनिकी व्यवस्था मजबूत करणे ,आधुनिक तंत्रज्ञानाचे परीक्षण करणे ,आर्थिक व्यवस्था मजबूत करणे, राष्ट्रवादाची नशा देशवासीयांना पाजणे, लोकशाही व्यवस्थेला उध्वस्त करणे, एकछत्री अंमल लागू करणे व्यापाराचा विस्तार करणे, जगात स्वतःच्या कर्तव्याचा ठेंबा मिरविणे .अशा प्रकारच्या फायद्यासाठी युद्ध लादले जाते. यातून स्वतःचा हेतू साध्य करता येतो. जगाने बुद्ध समजून घेतला असता तर त्यांच्या डोक्यात युद्धाने जन्म घेतला नसता, पण डोक्यात बुद्ध नसल्याने व असला तरी त्याच्यात विचार नसल्याने आज संपूर्ण पृथ्वीला विकृत व्यवस्था नष्ट करण्याच्या मार्गावर आहे. बहुसंख्य लोकांचा नरसंहार व वित्तहानी यामुळेच होताना दिसते.

    युक्रेनवर रशियाने युद्ध करून तेथील नागरिकात दहशत फसरवली आहे. तसेच जगात सुद्धा एक भयकंपित वातावरण निर्माण केले आहे .अमेरिकेचे धोरण व चीनचे धोरण हे नक्कीच रशियाला मदत करणारे दिसते .कारण चीनने हांगकांगवर व तिबेटवर आपला दावा केला आहे .येथील नागरिकांना नेहमी दहशतीत वावरावे लागते .अमेरिकेने सुद्धा आशियातील व युरोप खंडातील अनेक देशांना स्वतःच्या सैनिक व्यवस्थेतने पोळले आहे. इराक, इराण पॅलेस्टाईन, अफगाणिस्थान,जॉर्डन अशा देशांना मदतीच्या नावाखाली मोठे शोषण केले आहे. जगातील महाशक्ती ओळखलेले हे देश फक्त स्वतःच्या देशातील लोकांचे भले व्हावे असेच वागतात.

    युक्रेनवरील युद्ध लादले गेले हे युद्ध जग थांबवू शकले असते. पण शक्तिशाली देशातील सरकारने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने पुतीन यांनी स्वतःच्या अहंकाराला खतपाणी देऊन युद्धाला सुरुवात केली. युद्ध हे जरी दोन राष्ट्रात व दोन चार दिवसाचे असले तरी युद्धातून घडून आलेली मानवहानी आणि वित्तहानी भरून निघू शकत नाही. युद्धातून पुन्हा नव्या युद्धाचे ढग जमा होतात. ते सातत्याने निर्माण होत असतात. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्याने बाहेरील देशातील विद्यार्थ्यी जे शिकायला गेले त्यांचे मोठे हाल होत आहेत साऱ्या वाटा बंद झाले आहेत .मार्शल लाॅ लागला आहे. अफरातफर माजली आहे. कुणी कुणाला वाचवू शकत नाही. देशाचा राष्ट्रपती सुद्धा आज युद्धावर योग्य नियंत्रण मिळू शकत नाही. दोन देशांच्या या युद्धातून संपूर्ण जग महायुद्धकडे प्रस्थान करेल का हा मला प्रश्न पडलेला आहे. जर असे झाले तर हे युद्ध तिसऱ्या महायुद्धाची एक नांदीच राहील.

    भारताचे वीस हजार विद्यार्थी शिक्षण युक्रेनमध्ये घेत आहेत. त्यांना आणण्यासाठी एअर इंडियाने रेस्क्यू ऑपरेशन करायला हवे पण नुकतीच एअर इंडियाचे खाजगीकरण करण्यात आले .या खाजगीकरणामुळे जाण्या-येण्याची टिकीट अव्वाच्या सव्वा वाढल्याने विद्यार्थ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे. देशाचा प्रधानमंत्री व राष्ट्रपती देशाचे विद्यार्थी आणू शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. खाजगीकरणाचे दुष्परिणाम किती मोठे असते याची प्रचिती आज देशाला आलेले आहे .पण देशातील अंधभक्त सरकारचे गुलाम असल्याने त्यांना त्यांचे काही वावगे नाही. त्यांच्या घरावर डाॅका टाकत असतानाही देशाच्या नीतीचा ते उदोउदो करतात. भारतीय देशातील लोकांचे मेंदू गुलाम होण्याचे लक्षण आहे.

    बुद्धाने युद्धाला वर्ज्य मानले आहे, कारण युद्ध हे वर्चस्ववादी पणाचा अहंकार आहे. तृष्णेचा मायाजाल आहे .फसव्या राष्ट्रवादाचा पोकळ वासा आहे. त्यामुळे आज साऱ्या जगाने पुन्हा नव्या विचारमंथनाने संयुक्त राष्ट्रातील बड्या राष्ट्राचे अधिकार कमी करावेत. युद्धाला जो पेटवेल व युद्धाला खतपाणी घालणार अशा राष्ट्रावर निर्बंध लादले जावे मग ते राष्ट्र कितीही ताकतवर असो.छोट्या राष्ट्रांची मदत करणे हे संयुक्त राष्ट्राचे ध्येय धोरण असले पाहिजे. मानवाधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या राष्ट्राचा आर्थिक दंड देण्याचे धोरण असावे. जेणेकरून पुन्हा युद्ध नावाचा जगात विचार होणार नाही .पृथ्वी व मानव जातीच्या कल्याणासाठी युद्धाला खरा पर्याय द्यायचा असेल तर शांती आहे. शांती म्हणजे बुद्ध आणि बुद्ध हाच जगाला विनाशापासून वाचवणारा हा खरा मार्ग आहे. जगाने आता नक्कीच बोध घ्यावा .या बोधातून जगाला शांती आणि समतेचा नवा संदेश पोहोचावा.सगळे राष्ट्र मानवहितासाठी काम करतील अशी भूमिका घ्यावी. तरच आपण एक जग म्हणून काम करू शकू. या युद्धात प्राण गेलेल्या निरपराध बांधवास विनम्र अभिवादन…..!

    -संदीप गायकवाड
    नागपूर
    ९६३७३५७४००

Leave a comment