आंबेडकरवादी कविता सर्वंकष बदलांचा महामूल्यवान प्रकल्प आहे. मानवांना मानवी अधिकार मिळवून देणारा सूर्यप्रकाशमय महामार्ग आहे. बनावटीचे सारे मुखडे उजागर करणारी कविता जागतिक माणसाच्या उन्नयनाची क्रांतिगीत गाणारी आहे. धर्मग्रंथाने व मनुव्यवस्थेने नाकारलेल्या सर्वंकष मानवाला ज्ञान लिपीची अक्षर पहाट देणारी वर्धिष्णू ऊर्जावाहिनी आहे. मानवाला विद्रूप करणाऱ्या मुळांना बेचिराख करणारा अग्नीज्वाळ आहे. माणूस नाकारणाऱ्या सर्वच ग्रंथाचा निषेधनाम आहे.
साठोत्तरी कवितेने मराठी कवितेचे विश्वच बदलून टाकले आहे. रंग-रूप, लय ,ताल ,निसर्ग ,फूल ,चंद्र ,चांदणे, संध्याकाळ ,सावली ,सौंदर्य ,कल्पकता अशा अंगाने मराठी कविता मोहरून येत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या व राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विद्रोही कार्यतेजाने इथला आंबेडकरवादी समाज क्रांतिगीत लिहू लागला. मराठी कवीने रूपकांचा व रसिद्धांताच्या आधारावर कविताचे लेखन केले पण माणसाच्या वास्तव जीवनावर कविता लिहिली नाही. यामध्ये काही अपवाद असू शकतात .बहुजन माणसाच्या दुःखाचे व वेदनेचे विषय त्यांचे झालेच नाही. कारण त्यांचे दुःख त्यांनी कधी समजूनच घेतले नाही .पण महात्मा ज्योतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन अनुभवातून, संघर्षातून चेतना जागृत झाली.यामुळे प्रस्थापित मराठी कवितेला जबरदस्त आव्हान मिळाले.जी मराठी कविता भारतातही स्वतःचा ठसा उमटू शकली नाही ती आंबेडकरवादी मराठी कविता जागतिक पातळीवर आपली भूमिका भक्कमपणे उभी केली. मराठी कवितेला क्रांतीतेज देण्याचे काम हे आंबेडकरवादी कवितेने केले आहे. आपण हे नाकारू करू शकत नाही.
साठोत्तरी साहित्यातील अण्णासाहेब साठे,नामदेव ढसाळ ,केशव मेश्राम,दया पवार,वामन निंबाळकर, बाबुराव बागूल, प्रल्हाद चेंदवनर,ज.वी.पवार यानी अनेक क्रांतिकारी कविता लिहली आहे. याच काळात यशवंत मनोहर हे नवे वादळ बनून आपला उत्थानगुंफा कवितासंग्रह मराठी प्रांत घेऊन आले. या कवितासंग्रहाने त्यांच्यामधील बंडखोरवृत्ती व विद्रोही पणा यांची नवीन ओळख मराठी कवितेला करून गेली. कलावादी भूमिका घेणाऱ्या कवितेवर आसूड ओढून जीवनवादी व वास्तवगर्भी संवेदनात्मक आशयगर्भी कविता त्यांनी लिहून प्रश्नांची श्रृखंला निर्माण केली .त्यांच्या प्रश्नांची उत्तरे अजूनही मराठी कवितेला देता आली नाही.
आज ते महाराष्ट्रातच नाही तर जागतिक पातळीवर मराठी कवितेला नवक्रांती विचारांचे प्रगल्भ तत्वज्ञान देणारे कवी आहेत. उत्थानगुंफा ते भीमराय आणि शिवराय हे त्यांचे कवितासंग्रह म्हणजेच त्यांच्या अंतर्गत खदखदणारा विद्रोहाचा ज्वालामुखी आहे. माणसाला विद्रुप करणाऱ्या साऱ्या वहिवाटांना उखडून माणूसमय जीवनाचा नवा अविष्कार आहे.
यशवंत मनोहर यांच्या कवितासंग्रहात सूर्य ही प्रतिमा अत्यंत चोखदळपणे वापरली आहे. त्यांच्या जगण्याचा मोहर व बहार सूर्यप्रतिमा मधून व्यक्त झालेला आहे. तोच धागा पकडून प्रकाश राठोड यांनी यशवंत मनोहर यांच्या कवितेतील सूर्यप्रतिमा हा ग्रंथ वाचकांना उपलब्ध करून दिला .त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.
या ग्रंथाची प्रस्तावना डॉ. अमोल शेंडे यांनी लिहली आहे. ते लिहितात की, ‘शोषणाच्या गॅसचेंबरमधील कल्लोळ नाहीसा करून प्रकाशपर्व जन्मास घालणाऱ्या आविष्कार म्हणजेच आंबेडकरवादी कविता होय .पुढे ते लिहितात की,” मनोहरांच्या कवितेतील विचासूत्रांची चिकित्सा करणारे तरल व भावस्पर्शी लेखन आहे. त्याचबरोबर वाचकांची संवेदनशीलता चाळवणारे हे लेखन असून ,आकलनाच्या कक्षा रुंदावणारे आहे. हे लेखन म्हणजे मनोहरांच्या कवितेला सत्यम, शिवम ,सुंदरम या मातृविचारांचे संशोधन आहे .या विचारांतील सत्यम शिवम सुंदरम हे वाक्य प्रतिगामीचा उदो उदो करणारे आहे. या वाक्य ऐवजी “सत्य सर्वांचे आदी घर ।सर्व धर्माचे माहेर ।।”हे ज्योतिराव फुले यांचे वाक्य प्रस्तावनेत घेतले असते तर फार बरे झाले असते असे मला वाटते. कारण हिंदू परंपरेतील शब्दांना यशवंत मनोहर यांनी फाटा दिलेला आहे. त्यांच्या कवितेच्या संदर्भात हे अधोरेखितपणा योग्य वाटत नाही. आपल्या मनोगतात प्रकाश राठोड लिहितात की,”मनोहरांची कविता ही या मूल्यार्थाचीच कविता आहे. त्यांच्या कवितेतील या जीवनकेंद्री मूल्यार्थाने मानवी जीवनाला मृतप्राय करणाऱ्या सर्वच शोषकसत्ताक आणि सर्वच सत्तास्वामींच्या विरोधात जाहीर युद्ध छेडले आहे” ही निरीक्षणे अत्यंत सत्यनिष्ठ व मूल्यसापेक्ष आहेत.
यशवंत मनोहर हे आंबेडकरवादी सूर्यकुलाचे प्रतिभावंत कवी आहेत. माणसाची पुनर्रचना हा त्यांच्या कवितेचा अंतःस्वर राहिला आहे. त्यासाठीच त्यांच्या कविता माणसाला अमाणूष करणाऱ्या यंत्रणावर आसूड ओडतात. कवी यशवंत मनोहर हे नखशिखांत कवितामय जीवन जगतात. त्यांच्यातील प्रतिभा अत्यंत उच्च कोटीतील आहे .माणसाचे उन्नयन व जीवसृष्टीचे उन्नयन करणाऱ्या सूर्याचे त्यांनी विविध रूपे आपल्या कवितेतून रेखाटलेले आहेत. यशवंत मनोहर हे दोन सूर्य मानतात. एक अंतराळातील अग्नीसूर्य तर पृथ्वीवरील मातृकाळजाने तळमळणारा डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा दुसरा सूर्य .ही भूमिका कवीच्या सूर्य प्रतिमांची महती प्रकट करणारी आहे.
प्रकाश राठोड यांनी या कवितेतील प्रतिमाचा अत्यंत सूक्ष्म अभ्यास केलेला आहे. त्यांचे संशोधन हे नक्कीच प्रेरणादायी आहे. सूर्य प्रतिमाचा जन्म कसा होतो हे खालील ओळीवरून समजून घेता येईल.
- सूर्य पाहिला प्रथम तेव्हा
- मातीला या फुटली नाती
- उजेड नव्हता समजत जेव्हा
- नाव दिले मी श्वास तयाला
- सुर्य जन्मलो माझ्या पोटी
- अशी संतती मी सूर्याची….
अंधाराला नाकारणारा हा कवी उजेडाची बाराखडी प्रयुक्त करताना दिसतो. अग्नीचा आदीबंध यामधील सूर्य संदर्भात एक कविता आहे .ती अत्यंत अप्रतिम आहे. ते लिहितात की,
- तुमच्या हातातील उल्का
- मोजायला मला
- फुरसत नाही
- मी सूर्यातले आणि माझ्यातले
- अंतर मिटवून टाकण्यात
- यशस्वी झालेला आहे …
- तर युगमुद्रा यामध्ये लिहितात की,
- सूर्य भेटावेत परस्परांना
- तशी माणसे भेटतात परस्परांना
- अशावेळीच शब्दात उगवतो कवितेचा दिवस
- त्या दिवसाची वाट पहात
- मी उभा क्रांतीच्या दारात….
मी आता सूर्यच बनलो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञानक्रांतीने मला वणव्यातील कवी बनवले अशी रास्त भूमिका त्यांनी घेतली.
आंबेडकरवादी कवीने ज्या प्रकारचे काव्य निर्मिती केली तिला तोड नाही. बदलत्या सामाजिक संवेदनाचा उत्स्फूर्त आविष्कार यशवंत मनोहर यांच्या कवितेतून प्रकट झालेला आहे. सूर्य ही प्रतिमा त्यांनी अत्यंत चपखलपणे आपल्या कवितेत बसवली आहे. उसने शब्द ते घेत नाही कारण “आणि मी पुन:पुन्हा जमीन फोडून बाहेर आलो सूर्याच्या बीयासारखा….” हा रास्त अभिमान त्यांना आहे.
प्रकाश राठोड यांनी अत्यंत संशोधनवृत्तीतून हा ग्रंथ लिहिला आहे. सूर्यप्रतिमा वर एखादा ग्रंथ निर्माण व्हावा हीच आंबेडकरवादी कवितेतील ताकत आहे. अनेक प्रतिभा व प्रतिकांचा वापर यशवंत मनोहर यांनी केलेला असला तरी प्रकाशपुंकजाचा सूर्यदीप त्यांच्या कवितेतून ज्वालाग्रही ऊर्जावान विद्रोह सातत्याने अधोरेखित होताना दिसतो. त्यांच्या सर्वच कवितासंग्रहामध्ये सूर्य ही प्रतिमा आली आहे .या ग्रंथांमध्ये सूर्यप्रतिमा बरोबर डॉ. यशवंत मनोहर यांच्या मुलाखत घेतलेल्या आहेत .तसेच यशवंत मनोहरच्या कवितेतवर संशोधन करणाऱ्या लेखकाची माहिती दिलेली आहे. हा संग्रह वाचकाला नव्या संशोधकाला जन्मजाणिवांचा आविष्कार करणार आहे .मनोहरांच्या कवितेत सूर्य प्रतिमांचा मूल्यजागर करणार आहे .हा ग्रंथ मराठी वाचकाला इहवादी सूर्यदीप्ताचा ऊर्जोत्सव बहाल करणारा आहे. वाचकांनी या ग्रंथाचे स्वागत करावे ही आशा आहे. प्रकाश राठोड यांना पुढील साहित्यनिर्मितीसाठी लाख-लाख मंगलकामना चिंतितो…!
- * ग्रंथाचे नाव :यशवंत मनोहर यांच्या कवितेतील सूर्यप्रतिमा
- *लेखक :डॉ. प्रकाश राठोड
- *प्रकाशक :लेखणी पब्लिकेशन नागपुर
- *सहयोगमूल्य:९० रूपये
- *९९२३४०६०९२
- *संदीप गायकवाड
- *नागपूर
- *९६३७३५७४००