बरेचदा इंटरव्ह्यू म्हणजे नेमकं काय याबाबत विद्यार्थी आणि नोकरेच्छूक उमेदवार अनभिज्ञ असतात. त्यामुळे मुलाखतीला सामोरं जाताना विनाकारण तणाव येतो. हे टाळायचं असेल तर मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरं गेलं पाहिजे. एखाद्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही तर आपण अपात्र ठरतो हा गैरसमज दूर केला पाहिजे. सामान्यत काही पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांची मुलाखत घेतली जाते. एक म्हणजे त्याला आपल्या संस्थेविषयी माहिती आहे की नाही हे मुलाखतीद्वारे तपासता येतं. म्हणून मुलाखत घेताना पॅनलवरील ज्येष्ठ अधिकारी उमेदवाराला कंपनीविषयी माहिती विचारतात. याद्वारे त्यांना उमेदवाराला आपल्या कंपनीत काम करण्याची इच्छा आहे की नाही हे तपासून बघायचं असतं. मुलाखतीद्वारे उमेदवाराची तांत्रिक क्षमताही तपासली जाते. ज्या कामासाठी अर्ज केला त्याचं कौशल्य उमेदवाराकडे आहे की नाही याचा शोध कंपनी घेत असते. त्यामध्ये कामाची आवड आणि आवश्यक कौशल्य या गोष्टीही तपासून पाहिल्या जातात. खेरीज नोकरी दिल्यास उमेदवार कंपनीत किती वर्षे टिकेल हेही कंपनीला पाहायचं असतं. त्यामुळे तसे प्रश्नही विचारले जातात. या प्रश्नांची तयारी केली की मुलाखतीचा ताण येणार नाही.