विदर्भातील यावली या गावाने एक सुपुत्र जन्माला घातला. आणि संपूर्ण विश्व माझे घर आहे असा व्यापक विचार करणारा राष्ट्रसंत या विदर्भात उदयास आला. समाजसुधारणेसाठी बेभान झालेल्या त्या अवलीयाचे नाव होते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.
राष्ट्रसंताच्या घरी त्यांचे कुलदैवत पंढरपूरचा विठोबा मानत असत.त्यामुळे लहानपणापासून विठ्ठल भक्तिचे बाळकडू त्यांना घरीच मिळाले. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज यांच्या कार्याचा ठसा बालपणीच राष्ट्रसंताच्या मनात रोवल्या गेला.राष्ट्रसंताचे मूळ नाव माणिक होते.माणिकने वर्ग तिसरीतून आपली शाळा सोडून दिली व ध्यान, प्रार्थना, भजन यामध्ये बाल माणिक रमू लागला. एक दिवस माणिकचे गुरू श्री आडकुजी महाराज यांच्याशी त्यांची भेट झाली. आणि आता इकडे तिकडे भटकणारा माणिक गुरू आज्ञे प्रमाणे अभंग रचू लागला.लोक आता माणिकला तुकडोजी महाराज या नावाने ओळखु लागले. ईश्वरभक्ती, सामाजिक जनजागृतीचा प्रसार करण्यासाठी महाराज कीर्तने करत गावोगाव हिंडू लागले. आपल्या कीर्तनात ते स्वरचित गीते खंजेरीच्या साथीवर म्हणत असत. कीर्तन, खंजेरीचा उपयोग महाराजांनी आपल्या स्वतःच्या भल्यासाठी न करता समाजसेवेसाठी केला.समाजात अशिक्षितपणा जास्त असल्याने अनेक रुढी परंपरा यांचा पगडा होता.मग यातूनच जातीधर्म ,पंथभेद, अंधश्रद्धा या गोष्टी फोफावू लागल्या. या सर्वांवर तुकडोजी महाराज यांनी आपल्या अनमोल वाणीतून घणाघाती प्रहार केला.ईश्वराचे खरे रूप त्यांनी समाजापुढे ठेवले. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यामुळे अनेक धर्माचे लोक त्यांचे शिष्य बनू लागले.जीवन योग्य तऱ्हेने जगले पाहिजे असा त्यांचा उत्तम विचार होता. म्हणून त्यांनी शरीरसंपत्ती कमविण्यासाठी व्यायामाचा आग्रह धरला. प्रत्येक कीर्तनात ते व्यायामाचे महत्त्व आवर्जून स्पष्ट करून सांगायचे. जेव्हा त्यांचा संपर्क महात्मा गांधी यांच्याशी आला तेव्हापासून ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय झाले.1942 च्या आंदोलनात सहभाग घेऊन तुरुंगवास भोगणारे हे महान संत होते.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विनोबा भावे यांची भूदान चळवळ, जातिनिर्मूलन इ. सारख्या कामातही महाराज सक्रिय होते.विश्वधर्म व विश्वशांती परिषदेसाठी ते जपानला गेले व भारतीय समाजात कशी एकजूट आहे याचा आवाज त्यांनी जपानमध्ये गाजवला.
● हे वाचा – देवस्थान इनाम वर्ग 3 जमीन आणि वंचित विमुक्त व भटक्या जमाती, भिक्षेकरी भटक्या जमाती..!
20 व्या शतकात राष्ट्रसंताचे साहित्य हे भारतासाठी अनमोल असे संस्कारधन आहे.त्यांच्या अनेक ग्रंथापैकी एक लोकप्रिय झालेला ग्रंथ म्हणजे ग्रामगीता.आणि याच ग्रामगीतेत महिलोन्नती या अध्यायामध्ये स्त्री विषयक सुंदर विचार राष्ट्रसंतानी प्रस्तुत केले आहे. महाराजांचे स्त्री विषयक विचार हे शास्त्रशुद्ध,प्रागतिक व पुरोगामी स्वरूपाचे आहेत.त्यांच्या मते स्त्री ला सुद्धा पुरुषांप्रमाणे समाजात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.म्हणूनच महाराज आपल्या ग्रामगीतेत म्हणतात की आज ही स्त्री कोणत्याही बाबतीत कमी नाही,
- निरिक्षोनी जी जी घरे पाहिली
- तेथे सरसता अनुभवा आली
- चातुर्य – लक्षणे अधिक दिसली
- महिलांमाजी ||
महाराजांनी भारतीय संस्कृती व विज्ञान युगाच्या जडणघडणीच्या समन्वयातून निर्माण होणारी सुशिक्षित, सुरक्षित, सुसंस्कृत, संपन्न अशी सर्वांगीण विकसीत आदर्श स्त्री निर्माण व्हावी यासाठी आपला स्त्री विषयक दृष्टिकोन ठेवला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रीय एकात्मतेच्या आशयाची अनेक भजने लिहिली. शालेय अभ्यासक्रमात त्यांचे ‘या भारतात बंधुभाव नित्य वसू दे’ हे सुपरिचित असलेले भजन समाविष्ट आहे. राष्ट्राचे आधारस्तंभ असलेल्या युवकांवर अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या भजनाचा सुसंस्कार होणे,हे राष्ट्र आमचे सर्वांचे आहे याचे रक्षण करण्यासाठी व आमच्या संस्कृतीची जोपासना करण्याची जबाबदारी आमची आहे ही भावना सर्व युवकांच्या मनात निर्माण होने काळाची गरज आहे.राष्ट्रसंताच्या स्वप्नातील भारत जर उभा करायचा असेल तर मानवता हा एकच धर्म मानला पाहिजे,म्हणून राष्ट्रसंत म्हणतात,
- नांदोत सुखे गरिब अमीर एकमतांनी,
- मग हिंदू असो,ख्रिश्चन वा हो इस्लामी,
- स्वातंत्र्य सुखा या सकळा माजी वसू दे,
- दे वरची असा दे ||
खरोखरच आपला भारत देश महान आहे.त्याची महानता अणुबॉम्बच्या प्रगतीवर, येथील प्रचंड लोकसंख्येवर,संपत्तीवर निश्चितच नाही.आम्ही सर्व भारतीय एक आहोत.राष्ट्रीय एकात्मतेची भावना हेच आमच्या राष्ट्राचे खरे वैभव आहे.असे आम्ही मानले पाहिजे,ते आचरणात आणले पाहिजे तरच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना आदरांजली ठरेल.त्यांच्या या महान कार्याची ज्योत आजही गुरुकुंज मोझरी येथून अविरतपणे जळत आहे.अशा या महान संताला मौन श्रद्धांजली महोत्सवाच्या निमित्ताने विनम्र अभिवादन..!
- -अविनाश अशोक गंजीवाले (शिक्षक)
- जि प प्राथमिक शाळा करजगाव
- पं स तिवसा जि अमरावती
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- – बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–