मागील महिन्यात बस स्टॅड वर वर्तमान पत्र आणायला गेलो असताना, कडूलिंबाच्या पारावर काही सेवानिवृत्त शिक्षक मंडळी बसलेली दिसली. त्यांना नमस्कार करून घराकडे जात असताना मला अचानक बेंद्रे सरांची आठवण आली. आणि मी घरी न जाता सरांच्या घरी गेलो. सर जेवण करीत होते मला सुद्धा त्यांनी जेवणाचा खूप आग्रह केला पण मी नुकतेच जेवण करूनच निघालो होतो, त्यामुळे मी नकार दिला तसं त्यांना मागील पंधरा दिवसापासून बरे नव्हते. पांढरीशुभ्र दाढी वाढली होती. त्यांनी आता अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं होतं. तरीही जवळपास एक तास त्यांनी माझ्याशी दिलखुलास चर्चा केली. त्यातून जी माहिती मिळाली आणि प्रसंग मला आठवले तेच मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहो.
धनंजय उर्फ वसंत शेषरावआप्पाजी बेंद्रे असं त्यांचं पूर्ण नाव. घरची परिस्थिती सामान्यच घरी दहा एकर शेती होती, वडील कारंजा नगर परिषदेमध्ये परिचर पदावर होते. कारंजाला त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर 1966 ला यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. सुरुवातीला बाणायत नंतर मोझर आणि नंतर1969 ते 1985पर्यंत तब्बल सोळा वर्ष ते करजगाव लाच होते. याशिवाय महातोली, करंजी ब्रम्हनाथ, आणि शेवटी वागद बुद्रुक येथे 2004 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. बेंद्रे सर सेवारत असताना त्यांना सदाशिवराव भोयर, सालपे गुरुजी, भालेराव गुरुजी, आणि गायकवाड गुरूजी इत्यादी मुख्याध्यापकांच्या हाताखाली काम करण्याची संधी मिळाली तसेच आठवले सर, कुटे सर ,जानराव भोयर सर, नांदेकर सर, चिरडे सर, नवरे सर आणि पेठकर सर यासारखे सहकारी लाभलेत. बहुतेक मुख्याध्यापक आणि सहकारी शिक्षकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध राहिलेत. तसेच विद्यार्थी आणि पालकांशी सुद्धा स्नेहाचे संबंध राहिलेत
सरांचे व्यक्तिमत्व आणि अध्यापनाची शैली सुद्धा आकर्षक होती. ज्या काळात इंग्रजी शिकवायला शिक्षक तयार नसत. त्याकाळी त्यांनी इंग्रजीच्या सखोल ज्ञानाच्या जोरावर करजगावच्या शाळेत इंग्रजी शिकविण्याचे शिवधनुष्य पेलले होते.
- मऊ मेणाहूनी आम्ही विष्णुदास। कठीण वज्रास भेदू ऐसे ।।
या अभंगात संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे सर जेवढे शांत होते तेवढेच शिस्तीच्या बाबतीत कठोर सुद्धा होते. याचा अनुभव मला आला होता 1973 मध्ये मी सातवीत असताना सर आमचे वर्गशिक्षक होते. कडू निंबा कडील खोलीत आमचा वर्ग बसत असे. त्याच खोलीलाअलमार्या लावून मुख्याध्यापकाचे कार्यालय बनवण्यात आले होते. त्या काळी मी जरा खोडकरच होतो. शिक्षकाचे शिकवणे झाल्यावर फळ्या खाली जे खडूचे तुकडे पडायचे त्याने मी शिक्षक वर्गात नसताना फळ्यावर काहीतरी गमतीने लिहायचो. त्यामुळे वर्गातील मुले हसायची आणि शिक्षक वर्गात येण्यापूर्वीच मी ते पुसून टाकायचो त्यामुळे मुलांचे चांगलंच मनोरंजन होई. ही गोष्ट सरांना माहीत झाली होती. एकदा सरांची इंग्रजीची तासिका संपल्यानंतर फळ्या खाली पडलेल्या छोट्या खडूच्या तुकड्याने मी फळ्यावर ‘पुंद’ हा शब्द लिहिला .विशेष म्हणजे अनुस्वार ऐवजी मी त्या ठिकाणी *काढला ..त्यामुळे मुले वर्गात मोठमोठ्याने हसायला लागली परंतु ते पुसायच्या आधीच शंकर जाणू चव्हाणन मला घट्ट पकडले आणि फत्तुसिंग जानूसिंग जाधवने बेंद्रे सरांना बोलावून आणले लिहिलेले सरांनी पाहिल्यावर मला सर्व मुलामुलींसमोर इतके झोडपले की बी.एड्ला जाईपर्यंत मी कधीच फळ्यावर लिहिण्याची हिंमत केली नाही. गावच्या शाळेत असताना बेंद्रे सर नेहमी शालेय सहली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करायचे, नाटक बसवायचे, ‘मी नावाचा भदाजी तेली’ या नाटकाचा प्रयोग सुद्धा त्यांनी मारवाड्याच्या माडी समोर केला होता. अशा प्रकारचे सहशालेय उपक्रम राबवून त्यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला होता.
करजगावच्या शाळेत काम करताना खऱ्या अर्थाने शिक्षकांचा कस लागायचा. त्यातल्या त्यात बेंद्रे सर इंग्रजी विषयशिक्षक होते. जिथं शिक्षणाचं साधं महत्त्व सुद्धा विद्यार्थी आणि पालकांना कळत नव्हतं अशा काळात अद्यापन करताना त्यांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. पण त्या सर्वावर मात करून आपल्या जवळपास चाळीस वर्षाच्या सेवाकाळामध्ये आपले विद्यार्थी ‘माणूस ‘कसे बनतील हाच विचार करून त्यांनी आदर्श नागरिक घडविण्याचा प्रयत्न केला. त्याकाळी जातीयतेच्या बाबतीत समाज मन तेवढं बदललं नव्हतं मी शाळेत असताना शालेय सहभोजनाचा कार्यक्रमात गावातील मुलं अंतर राखून बसायची. एखाद्या कार्यक्रमात मुलांना अक्षदा लावायचे पण माझ्या हातावर वरूनच अक्षदा टाकायचे ही बाब माझ्या बालमनाला फारच खटकत होती. पण सर काही काळ करजगावला राहायला आल्यानंतर मुद्दामहून माझ्या हातून ते घरचे दूध बोलवायचे तेव्हा मला ते फारच महान वाटायचे. मला त्यांचा अभिमान वाटायचा.
कामाला देव मानून विद्यार्थ्यात ईश्वर शोधण्याचा प्रयत्न बेंद्रे सरांनी केला. कोणत्याही पुरस्काराची किंवा बक्षिसाची अपेक्षा न बाळगता निरपेक्ष वृत्तीने त्यांनी आपले अध्यापनाचे कार्य प्रामाणिकपणे केले. सरांचे असंख्य विद्यार्थी आज मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत .आदर्श नागरिक बनलेत. हीच त्यांच्या कार्याची पावती आहे. सर सुरुवातीच्या काळात रेल्वेने ये-जा करायचे. त्यावेळी रेल्वे सुद्धा फारच वक्तशीर होती. त्यांनी कारंजा ते वरुडखेड अशी पासच काढली होती. परंतु नंतर मात्र ते करजगावलाच रहायला आले. सुरुवातीला भिंगरी जवळच्या मारवाड्याच्या खोलीत, नंतर नथू पाटलाच्या कैचीत, काही काळ विश्वनाथ हिरवे यांच्या गोठ्यात आणि शेवटी वेणुताई ची बदली नेरला झाल्यानंतर त्यांच्या खोलीतच ते वास्तव्यास होते .”सर्वांशीच माझे प्रेम व आपुलकीचे संबंध राहिलेत. कोणीही परके वाटले नाही. मात्र दिले तर तुम्ही चांगले, नाही दिले तर वाईट ही प्रवृत्ती सर्वत्रच पाहायला मिळते , बाकी गाव फारच चांगले आहे असे गौरवोद्गार त्यांनी करजगावाबद्दल काढले. सर आता 75 वर्षाचे झालेले आहेत. त्यांच्या दोन मुली व एका मुलाचे लग्न झाले आहे. मोठी मुलगी वर्षा ही वाशीमला असते. तर लहानी वैशाली ही यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथे आहे. लहान मुलगा विशाल हा औरंगाबादला महानगरपालिकेमध्ये ठेकेदारी करतो. तर मोठा मुलगा प्रफुल्ल हा त्यांच्या जवळच आहे. त्याला तेवढा व्यवहार कळत नाही. सद्यस्थितीत खाणेपिणे फिरणे आणि वाचन करणे अशी त्यांची एकंदरीत दिनचर्या आहे. “बरेच दिवसापासून मित्रमंडळीच्या भेटी गाठी नाही. प्रवास करणे सुद्धा जिवावर येते. आयुष्याचे एकेक दिवस मोजणे चालू आहे.” अशी भावना त्यांनी भेटीदरम्यान व्यक्त केली. अशा ध्येयवेड्या आणि ‘माणूस’ घडविणाऱ्या शिक्षकाच्या जिद्द आणि चिकाटी ला मानाचा सलाम .
- शब्दांकन –
- प्रा. रमेश कृष्णाजी वरघट
Attachments area