डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाची विविध पैलू आहेत.एक महान समाज क्रांतिकारक,शिक्षणतज्ञ अर्थतज्ञ,परराष्ट्र नितीतज्ञ म्हणून भारताच्या जडणघडणीत त्यांचे अत्यंत महत्वपूर्ण असे योगदान आहे.विसाव्या शतकातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणासाठी ही तितकेच महत्वपूर्ण असे योगदान आहे.शोषित,पीडित,वंचित घटकाच्या उद्धाराबरोबरच महिलाच्या उत्कर्षासाठीही त्यांनी आपले आयुष्य खर्ची घातले,त्यांच्या हक्कासाठी पोटतिडकीने लढलेत,झटलेत, झिजलेत.सर्वधर्मीय महिलांना त्यांच्या अधिकार व हक्काची जाणीव करून दिली.अधिकार व हक्काच्या लढाईसाठी प्रेरित केले. सर्वांगीण विकासाची वाट मोकळी करून दिली.डॉ.आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वामुळेच आजच्या समस्त महिला वर्गाच्या आयुष्यात सोनियाचा दिवस उगवला हे सूर्यप्रकाशाइतके सत्य कुणीच नाकारणार नाही.
भारतातील वर्णव्यवस्था अन जातीव्यवस्थेने शूद्र आणि समस्त महिला वर्गावर अनेक जाचक अशी बंधने लादली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात शूद्र आणि स्त्रियांची स्थिती जवळपास एकसारखीच होती.दोन्ही घटक शोषित,पिडित अन वंचितच होती.अनिष्ट आणि घातक कुप्रथा परंपरा आणि अंधश्रदेने ही बंधने अधिक घट्ट होत गेली.समाजव्यस्थेत समान संख्येने असलेल्या स्त्रियांना पुरुषप्रधान/पितृसत्ताक संस्कृती आणि मनुस्मृती सारख्या विषमतेचे समर्थन करणाऱ्या ग्रंथाने शूद्र आणि स्त्रियांना स्वातंत्र्य अन मानवी हक्कच नाकारले होते.स्त्रियांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करित आपल्या विकृत,विभित्स आणि विघातक अशा स्वभावाचा परिचय दिला.स्त्री ही उपभोग्य वस्तू समजून सोयीनुसार वापर करण्याचा/अन्याय करण्याचा हा एकप्रकारे परवानाच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पतीला पत्नीचा त्याग करण्याचा, गहाण ठेवण्याचा,वेळप्रसंगी विक्रय करण्याचा अधिकार होता मात्र स्त्रियाना साधे स्वातंत्र्यही हेतूपुरस्पर नाकारले होते.इतकेच नव्हे तर स्त्रियांना व्यक्तिगत संपत्ती बाळगण्याचा आणि विवाहाच्यावेळी आपला जोडीदार निवडण्याचा अधिकार सुद्धा नव्हता.स्त्रियाना अपवित्र ठरवून तिचे सर्वच अधिकार हिरावून घेण्यास कसलीच कसर सोडली नव्हती.शोषित,पीडित,वंचित असलेल्या शूद्र आणि स्त्रियांना स्वातंत्र्य बहाल करणे हे जातीव्यवस्था आणि वर्णव्यवस्था बळकटी करण्याच्या दृष्टीने परवडणारे नाही याची जाणीव सनातनवाद्याना नक्कीच होती. बालविवाह,जरठ विवाह,केशवपन परित्यक्ता,सतीप्रथा यासह विविध मार्गाने स्त्रीयांवर अन्यायकारक बंधने लादण्याची प्रक्रिया बाबासाहेबांच्या पचनी पडले नाही.अशी जाचक बंधने दूर केली पाहिजे अशी आग्रही भूमिका डॉ.आंबेडकर यांनी वेळोवेळी घेतली.म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या सर्वच हक्कावर गदा आणणार्या मनुस्मृती सारख्या ग्रंथाचे २५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे जाहीररीत्या दहन करित स्त्रीमुक्ती चळवळीसाठी एक पाऊल पुढे टाकले होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे तथागत भगवान गौतम बुद्ध,संत कबीर आणि क्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांना गुरुस्थानी मानत.तथागत गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्त्री-पुरुष समानतेवर भर दिला.संत कबीर हे स्त्री-पुरुष यातील भेद हा शरीराचा भेद मानत.महात्मा फुले हे समानतेचे आणि स्त्री-स्वातंत्र्यचे कट्टर समर्थक/पुरस्कर्ते होते.स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे मानसन्मानाने प्रतिष्ठेचे जीवन जगता यावे म्हणून स्त्रियांना पुरुषप्रधान/पितृसत्ताक संस्कृतीच्या दास्यातून मुक्त करण्याचा त्यानी विडा उचलला होता.एकोणिसाव्या शतकात जोतिबानी स्त्रियांच्या उन्नतीसाठी उल्लेखनीय असे कार्य केले आहे.मानवी हक्क मिळवून देण्यासाठी लढलेत.तथागत गौतम बुद्ध आणि संत कबीर यांच्या संकल्पनेतील स्त्री-पुरुष समानता,स्त्री स्वातंत्र्य तसेच जोतिबा फुलेनी रुजविलेले स्त्रीमुक्तीचे हे बीज मानवजातीच्या कल्याणासाठी झटणारे थोर कर्मयोगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सनातन्यांशी कडवी झुंज देत/ प्रखर संघर्ष करीत हे बीज तितक्याच ताकतीने वाढविले आणि फुलविले सुद्धा.त्याचीच फलश्रुती आज स्त्रियांना मान-सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग सुकर झाला.याचे सर्वस्वी श्रेय हें डॉ आंबेडकर यांच्या कार्यकुशलतेलाच जाते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे मातृहृदयी होते.मुलाचे दुःख वेदना बघून आईंना जसा त्रास होतो तसाच त्रास हतबल महिलांची दैनावस्था बघुन डॉ आंबेडकर यांना होत होते.स्त्रियांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा त्यांनी जणूकाही पणच घेतला होता.त्यांनी सर्वधर्मीय महिलांचे कल्याण आणि उन्नतीचा ध्यास घेतला होता.कुटुंब प्रमुखाची दडपशाही/हुकूमशाही व स्त्रियांची गुलामगिरी हा सामाजिक विषमतेच्या आधाराचे तसेच अनिष्ट प्रथा परंपराचे समूळ उच्चाटन केल्याशिवाय महिलांना प्रतिष्ठा आणि स्त्री पुरुष समानता प्रत्यक्ष व्यवहारात उतरविणे अवघड बाब आहे याची जाणीव डॉ.आंबेडकरांना होती.म्हणून त्यांनी विविध धार्मिक ग्रंथ आणि स्त्रियांना समान हक्क नाकारणार्या रूढी,प्रथा,परंपरा आणि गुलामगिरीच्या खाईत लोटणार्या अन्य बाबींचा त्यांनी चिकित्सक वृत्तीने अभ्यास केला. मानव निर्मित गुलामगिरीविरुद्ध रणसिंग फुंकले.आवाज उठविलला.गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली.स्त्री मुक्तीसाठी लढा आरंभला.”अन्याय करने वाले से,अन्याय सहनेवाला जादा दोषी होता है” ही जाणीव करून दिली.महिलांना न्याय हक्का साठी लढण्यास प्रवृत्त आणि प्रेरित केले.सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीत आणि वेगवेगळ्या आंदोलनात तसेच परिषदा/व्याख्यानामध्ये स्त्रीमुक्ती आंदोलनाविषयी आपली प्रभावी भूमिका विषद करण्यास ते कधीच विसरले नाहीत.विदेशी स्त्रियाप्रमाणेच भारतीय स्त्रीसुद्धा शिकली पाहिजे.उच्चशिक्षित झाली पाहिजे.पुरुषाप्रमाणे तिलाही प्रतिष्ठान प्राप्त झाली पाहिजे.असे त्यांचे उदात्त उच्च विचार होते.विविध आंदोलन प्रसंगी आणि संधी मिळेल तेव्हा तेव्हा डॉ.आंबेडकरांनी आपली स्त्रीमुक्ती विषयक भूमिका जोरकसपणे मांडलीत. स्त्रियांमध्ये जनजागृती व्हावी त्या अनुषंगाने आणि त्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी विविध परिषदा भरविल्यात.आंदोलने केलीत.आवश्यक त्या ठिकाणी कायद्याचा आधार घेतला. म्हणूनच डॉ.आंबेडकर सारखा प्रगल्भ आणि धुरंधर नेता आपल्या हक्कासाठी/उन्नतीसाठी सनातन्यांचा कडवा विरोध पत्करून पोटतिडकीने लढतायेत हे बघून सर्व स्तरातील महिला भगिनी सुद्धा तितक्याच तळमळतेने बाबासाहेबाच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहिल्यात.वेगवेगळ्या आंदोलनात/परिषदात सहभागी होऊ लागल्या होत्या.
सामाजिक परिवर्तन आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याबरोबरच स्त्री मुक्तीचा लढा त्यांनी १९२४-२५ च्या दरम्यान पासूनच आरंभला होता.अनिष्ट प्रथा आणि मानव निर्मित अमानवी बंधनांना त्यांनी जोरदारपणे कडवा विरोध दर्शविला.तत्कालीन जातपंचायती मध्ये महिलांना अजिबात स्थान नव्हते.देवदाशी,मुरल्या जोगतीनी सारख्या प्रथा महिलांच्या माथी लादल्या होत्या.या कुप्रथाच मुळासकट उखडून फेकण्याचे त्यांनी वेळोवेळी आव्हान केले होते.जोपर्यंत महिला स्वतःहून या प्रथा झुगारणार नाहीत तोपर्यंत महिलांना असे अधिकार व न्याय कधीच मिळणार नाही याची जाणीव डॉ.आंबेडकरांनी वेळोवेळी महिला भगिनीना करून दिली.बाबासाहेबाचे हे आव्हान अधिकांश महिलांनी अंगीकारलेत.परिणामतः१९२७ च्या महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातील महिलांचा लक्षणीय सहभाग त्याचेच द्योतक म्हणावे लागेल.१३ जून १९३६ रोजी परळ येथील दामोदर हॉलमध्ये देवदासी मुरल्या जोगतिनी आणि वेश्यांची परिषद लक्षवेधी आणि परिणामकारक अशी ठरली.विरोधकांना धडकी भरेल इतका जनसमुदाय उपस्थित झाला होता.आंदोलनात अनेक महिलांनी सक्रिय सहभाग नोंदविला आणि पाठिंबा दर्शविणारे पत्रे सुद्धा पाठविलीत.१९ व २० जुलै १९४२ मधील नागपुरातील विशाल परिषद “न भूतो न भविष्यती”अशी ठरली.२० जुलै च्या खास महिला परिषदेत पंचवीस हजाराच्या जवळपास महिलांनी हजेरी लावली.स्वअस्तित्वासाठी पेटून उठलेल्या या महिला डॉ.आंबेडकर यांच्या प्रभावी विचाराने प्रभावित झाल्या आणि तितक्याच पोटतिडकीने त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी होऊ लागल्यात हे विशेष !
डॉ.आंबेडकरावर भगवान गौतम बुध्दाच्या विचारांचा प्रचंड प्रभाव होता.बुद्धाच्या प्रज्ञा,शिल, करुणा या तत्वावर त्याचे निसीम असे प्रेम होते.चारित्र्य आणि नीतिमत्ता हे केवळ महिलांचेच अलंकार आहे असे नाही तर ते पुरुषासाठी सुद्धा तितकेच महत्त्वपूर्ण आणि आवश्यक आहे असे ते मानत.शिल व नीतिमत्तेच्या अनुषंगाने त्यांनी स्त्री चारित्र्याला अधिक मान दिला.कुटुंबाची प्रतिष्ठा आणि नावलौकिक हा स्त्रियांच्या शीलावर अवलंबून असतो.१९३६ च्या परळ येथील देवदाशी,मुरल्या,जोगतिनी आणि वेश्याच्या आयोजित परिषदेमध्ये मनोगत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब म्हणतात की,”तुम्हाला या नरकातून निघायचे आहे का?तुमची इच्छा असेल तर तुम्हीच या अशा जगण्याचा त्याग करा,स्त्री जात समाजाचा अलंकार आहे.प्रत्येक समाज स्त्री चारित्र्याला अधिक मान देतो.म्हणून तुम्ही या मलीन आयुष्याचा त्याग करा.आपला आणि समाजाचा दर्जा तसेच नावलौकिक वाढवा.मी तुम्हाला हे निंद्य जीवन सोडण्यास सांगतो.याचा अर्थ तुमच्या अर्थाजनाची/उपजीविकेची साधने तुमची तुम्हालाच ठरवावी लागतील.पैसा कमी मिळाला तरी चालेल पण प्रतिष्ठित कामधंद्याला लागा.द्रौपदीने नवऱ्याबरोबर राहण्यासाठी दारिद्र्य पत्करले. तीच निष्ठा तुम्हाला बाळगावी लागेल.त्याने तुम्हाला समाजात प्रतिष्ठा मिळेल.स्वाभिमानाची भाकरी हि जास्त रुचकर असते. त्याचा आस्वाद घ्या.कष्ट करण्याची मानसिकता ठेवा.कष्टाने माणूस मरत नाही तर तो इतरांसाठी आदर्श ठरतो.संपत्तीपेक्षा चारित्र्य महत्त्वाचे आहे”डॉ.आंबेडकराच्या या भाषणाने सर्व स्त्रियांनी हे नरक जीवन त्यागले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांच्या दास्याचे आणि तिच्या अवनतीचे मूळ कारणे शोधून काढलीत तसेच त्यावर उपाययोजना सुद्धा सुचविल्यात. त्याच अनुषंगाने त्यांनी “हिंदू कोड बिला”चा मसुदा तयार केला होता.१२ ऑगस्ट १९४८ ला हिंदू कोड बिल कायदे मंडळापुढे सादर केलेत.२५ फेब्रुवारी १९४९ ला भारत सरकार तर्फे बिलाच्या स्वरूपात हे विधेयक मांडले.सामाजिक विषमता,अनिष्ट प्रथा,भेदभाव आणि अमानवी नियमाचे समूळ उच्चाटन करणे हा या बिलाचा मुख्य उद्देश होता.या बिलामध्ये भारतीय स्त्रीला सर्वोच्च असे स्थान दिले.या बिलाद्वारे समस्त भारतीय स्त्रीला एक माणूस म्हणून समान अधिकार देण्याचा आणि स्त्रियांच्या हक्कांना कायद्याच सुरक्षा कवच देण्याचा डॉ.आंबेडकरांचा मानस होता. “हिंदू संहिता विधेयक म्हणजे भारतीय स्त्रीमुक्तीचा जाहीरनामाच” म्हणावे लागेल.स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री म्हणून डॉ.आंबेडकरानी २१ सप्टेंबर १९५१ रोजी हिंदू कोड बिल मांडले.या बिलामुळे समस्त भारतीय स्त्रियांना; दत्तक विधान, विवाह विच्छेद,घटस्फोट, घटस्फोटाचा अधिकार,वारसा अधिकार,पोटगी,अज्ञानत्व व पालकत्व असे अधिकार मिळणार होते.त्यांनी या संहितेचे जोरदार असे समर्थन केले होते.परंतु सनातन्यांच्या बहुमतासमोर बाबासाहेबाच्या संकल्पनेतील स्त्री मुक्तीचा जाहीरनामा मंजूर करता आला नाही.सनातनी लोकप्रतिनिधींना स्त्रियांचे स्वातंत्र्य पचनी पडले नाही. सनातन्यानी या विधेयकास प्रचंड असा विरोध दर्शवित हे विधेयकच हाणून पाडले.लोकशाही विरोधी पुराणमतवादी वृत्तीमुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. त्यामुळे बाबासाहेब अत्यंत दुःखी झाले.त्यातच त्यांनी २७ सप्टेंबर १९५१ रोजी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला.महिलांच्या हक्कासाठी मंत्री पदाला ठोकर मारणारे ते भारतातील एकमेव लोकप्रतिनिधी/मंत्री ठरलेत. त्यांचा हा त्याग महिलांना कायम ऋणात ठेवणारा आहे! बाबासाहेब आंबेडकरांनी तब्बल १९४७ पासून ४ वर्षे १ महिना २६ दिवस अहोरात्र कष्ट करून हा स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा तयार केला होता.त्यात १३९ कलमे व (१) परिशिष्ट होते.संविधान निर्मिती इतकेच महत्त्व त्यांनी हिंदू कोड बिलाला दिले होते.भारतीय राज्यघटनेने जात,धर्म,पंथ किंवा लिंग भेद नाकारून स्त्री-पुरुषांना समान दर्जा प्रदान केला असताना हिंदू कोड बिल का मंजूर होऊ नये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.हिंदू कोड बिलाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की;समाज व्यवस्थेतील वर्गा-वर्गातील विषमता,स्त्री-पुरुष विषमता,कायम ठेवून आर्थिक समस्येशी निगडीत सतत कायदे करणे म्हणजे आपल्या संविधानाची चेष्टा करण्यासारखे आहे.शेणाच्या ढिगाऱ्यावर राजमहाल बांधण्यासारखे आहे. असे स्पष्ट मत व्यक्त करीत त्यांनी हिंदू संहितेला अधिक महत्त्व दिले.कालांतराने १९५५ मध्ये हिंदू कोड बिलाला अनुसरूनच; हिंदू विवाह कायदा,हिंदू वारसा हक्क कायदा,हिंदू अज्ञान व पालकत्व कायदा आणि हिंदू दत्तक पोटगी कायदा असे कायदे मंजूर झालेत.हिंदु कोड बिल बाबासाहेबाच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता.कारण हिंदू कोड बिलामुळे समस्त स्त्री जातीच्या स्वातंत्र्याचा मार्ग सुकर होणार होता.म्हणून ते स्त्री मुक्ती चळवळीचे उदगाते ठरते.
डॉ.आंबेडकरांनी महिलांच्या प्रगतीचा अनेक अंगांनी विचार केला.सर्वांगीण विकासासाठी त्यांचा शिक्षणावर आत्यंतिक भर होता.स्त्री शिक्षित झाली तर संपूर्ण कुटुंब शिक्षित होईल म्हणून महिलांनी स्वतः ही शिकले पाहिजे आणि मुलींना सुद्धा शिकविले पाहिजे.जेणेकरून तिच्या भविष्याला योग्य आकार व दिशा मिळेल.डॉ.आंबेडकरांचा व्यवहारोपयोगी शिक्षणाकडे अधिक कल होता.
भारतातील पन्नास प्रतिशत महिला ह्या कष्टाचे जीवन जगतात.त्यांनी शिक्षित व्हावे,आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे अशी डॉ.आंबेडकर यांची तळमळ होती.त्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता. स्त्रियांचा विकास हा समाज व त्या राष्ट्राच्या प्रगतीचा आरसा असतो.”स्त्रियांनी किती प्रगती केली आहे यावरून मी त्या समाजाच्या व राष्ट्राच्या प्रगतीचे मोजमाप करतो’ अशी त्यांची भूमिका होती.ब्रिटिश सरकारात असताना आणि स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिलांच्या हित संवर्धनासाठी अनेक धाडसी निर्णय घेतले.घेतलेल्या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केली. मुंबई विधान परिषदेचे सदस्य असताना १९२८ साली भारतीय महिला कामगारासाठी “मेटरनिटी बेनेफिट बिल”पहिल्यांदा चर्चेसाठी आणले.त्यांच्याच प्रयत्नामुळे मॅटरनिटी बिल मंजूर झाले.त्यांच्याच प्रयत्नामुळे स्त्री-पुरुषांना समान वेतनाचा कायदा,प्रसुतीपूर्व काळात ठराविक विश्रांती आणि सेवा प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी कायदा केला.स्वतंत्र भारताचे पहिले मजूर मंत्री झाल्यानंतर कोळसा खाणीत काम करणार्या स्त्री कामगारांना पुरुषांच्या इतके वेतन,खाण कामगार स्त्रीला प्रसूती भत्ता,मजूर व कष्टकरी स्त्रिया साठी एकवीस दिवसाची किरकोळ रजा,एक महिन्याची हक्काची रजा,दुखापत झाल्यास नुकसान भरपाई,वीस वर्षाची सेवा झाल्यानंतर निवृत्तिवेतनाची तरतूद,बहूपत्नीतत्वच्या प्रथेला पायबंद तसेच पुढे भारतीय संविधानात संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदी सम्मिलित करून महिलांच्या हक्काला सुरक्षितता प्रदान केली.भारतीय संविधानात प्रामुख्याने कायद्यापुढे समानता,धर्म,वंश,जात,लिंग किंवा जन्मस्थळ या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई, सार्वजनिक सेवा योजनाच्या बाबींमध्ये समान संधी,भाषण स्वातंत्र्य व इतर अधिकाराचे संरक्षण,माणसाच्या अपव्ययावर आणि वेठ यांना मनाई,लोककल्याण संवर्धनावर समाज व्यवस्थेची स्थापना,राज्याने अनुसरावयाच्या धोरणाची तत्वे, समान न्याय व विधिविषयक मोफ़त साहाय्य, न्याय परिस्थिती आणि प्रसूती साहाय्य यांची तरतूद इत्यादीची तरतूद करून स्त्रियांना कायदेशीर सुरक्षा कवच प्रदान केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महिला आरोग्याचा विचार करून कुटुंबनियोजनाचा आग्रह धरला.त्यांनी छोट्या कुटुंबाची संकल्पना मांडली.स्त्रियांचा विकास करणे हा त्यामागील हेतू होता.लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकारने प्रभावी प्रचार मोहीम राबवावी असे त्यांचे मत होते.हिंदू कोड बिलानुसार एखाद्या स्त्रीला मूल जन्माला घालण्याची इच्छा नसल्यास तिला गर्भधारणा टाळण्याची मुभा असली पाहिजे.संतती जन्माला घालने हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे.
स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना मतदानाचा अधिकार सुद्धा नाकारण्यात आला होता. माँटेग्यू-चेम्सफर्ड धोरणानुसार १९१८ साली स्त्रियांना मतदानाचा अधिकार मिळावा अशी शिफारस करण्यात आली होती.मात्र त्यात काही अटी टाकण्यात आल्या होत्या.जी स्त्री विवाहित आहे, शिक्षित आहे आणि तिच्या कडे संपत्ती आहे अशाच स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.विशेष म्हणजे यासंबंधी कायदा करण्याचा अधिकार प्रत्येक राज्याकडे सोपविण्यात आला होता.१९३५ च्या कायद्यात काही अटी शिथिल करण्यात आल्या असल्या तरी सरसकट सर्वच महिलांना असा मतदानाचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांच्या नजरेतून ही महत्वपूर्ण बाब सुटली नाही.१९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि २६ जानेवारी १९५० ला भारतीय संविधान अस्तित्वात आले.भारतीय संविधानात समानतेचे तत्व समाविष्ट करून भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्व जाती धर्माच्या महिलांना मतदानाचा अधिकार बहाल करण्याचे खरे श्रेय हे डॉ. आंबेडकर यांनाच जाते.
आजच्या स्थितीत महिला सर्वच क्षेत्रात यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे.पुरुषांच्या बरोबरीनेच नव्हे तर त्याहीपेक्षा अधिक उंच झेप घेऊन लक्षवेधी भूमिका वठवित आहे.त्यामागे डॉ.आंबेडकराच्या कार्यकर्तृत्वाचीच पार्श्वभूमी आहे. डॉ.आंबेडकरांनी महिला सक्षमीकरणासाठी आणि उद्धारासाठी सामाजिक चळवळ चालविली.समाज प्रबोधन केले. महिलांना लढण्याचे बळ दिले. ऊर्जा दिली प्रेरणा अन शक्ती दिली.कायद्याचे सुरक्षा कवच दिले.आर्थिक व सामाजिक गुलामगिरी कायद्याच्या माध्यमातून नष्ट केली.कौटुंबिक आणि समाज पातळीवर विविध प्रश्नांची सोडवणूक केली.अन्यायकारक कालबाह्य नियम तसेच प्रथा परंपरा मोडीत काढल्या अन समस्त महिलांना न्याय मिळवून दिला अधिकार मिळवून दिलेत.सबंध भारतीय स्त्रियांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटले. म्हणून महिलांना अशा प्रकारची लक्षवेधी प्रगती साधता आली.उन्नती करता आली. सोबतच स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण करता आले.म्हणूनच भारतातील सर्वधर्मीय महिला वर बाबासाहेबांचे अनंत असे उपकार आहेत पण त्यांच्या कर्तृत्वाची अधिकांश महिलांना जाणीव नाही असे खेदाने म्हणावे लागते.एवढे मात्र खरे की डॉ.आंबेडकरांचे महिला सक्षमीकरणाचे धोरण महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले आहे.म्हणूनच डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर खऱ्या अर्थाने महिलांचे कैवारी ठरले आहे.
- प्रा.डॉ.नरेश शं.इंगळे
- अर्थशास्त्र विभाग प्रमुख
- श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा
- ता.धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती.
- ९९७०९९१४६४
- dr-nareshingale.blogspot.com
(Images Credit : Pintrest)