मद्यपान करणं हा आजकाल ट्रेंड बनत आहे. पण कधीतरी केलेलं मद्यपान सवय कधी बनते हे समजतही नाही. मद्यपान सोडल्यानंतर कोणते सकारात्मक बदल होतात याविषयी जाणून घेतलं तर ही घातक सवय सोडणं सोपं जाईल.
सततच्या मद्यपानामुळे शरीरात पाणी आणि अतिरिक्त फॅट्स जमा होतात. दारू सोडल्यानंतर साधारण दोन आठवड्यात फॅट्सचं प्रमाण दोन टक्क्यांनी कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढतं. मद्य सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये कोलेस्टेरॉलचं प्रमाण दोन टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. मद्यपानामुळे शरीरात विषारी द्रव्यं जमा होतात. पणं सोडल्यानंतर दोन आठवड्यांमध्ये याचं प्रमाण दहा टक्क्यांपर्यंत कमी होतं. झोप न येणं, ताणतणाव अशा समस्या मद्यपानामुळे निर्माण होतात. दारू सोडल्यानंतर या समस्या सुटू शकतात.
दारूमुळे तोंड, यकृत आणि पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. दारू सोडल्यास ही शक्यता बर्याच प्रमाणात कमी होते. मद्यपानामुळे नैराश्याची समस्या निर्माण होते. हे व्यसन सुटल्यास नैराश्य बर्याच प्रमाणात कमी होऊ शकतं. दारूमुळे यकृताचं नुकसान होतं. मद्यपान सोडल्यास यकृताचं आरोग्य राखलं जाईल. दारू सोडल्यास डोकेदुखी, स्नायूंचं दुखणं, सांधेदुखीसारख्या समस्या दूर होतात. मद्यपान सोडल्यास हृदयविकाराची शक्यता कमी होते.