कृषी महर्षी-शिक्षण महर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या दि.२७ डिसेंबर २०२२ ला असलेल्या१२४ व्या जयंतीनिमित्त लेखक प्रा.अरुण बुंदेले यांचा भाऊसाहेबांच्या क्रांतिकारी कृषी कार्यावरील लेख येथे प्रकाशित करीत आहोत.
- -संपादक
- —————————–
रंजल्या गांजल्या कृषकांचे दैवत झालेले कृषीक्रांतीचे अग्रदूत,कृषी पंडित,शिक्षणाने केवळ उपजीविकेचे प्रश्न सुटत नाहीत तर जीवनातील जटिल प्रश्न सोडविण्यासाठी शक्ती प्राप्त होते अशी शिक्षणविषयक विचारधारा असल्यामुळे संपूर्ण समाजाला विद्येची दालनं मुक्त करणारे शिक्षण महर्षी, प्रशंसनीय व बहुजनांकरिता कार्य करणारे ‘मी विदर्भातील एकच व्यक्ती ओळखतो ती म्हणजे डॉ. पंजाबराव देशमुख ‘असे गौरवोदगार पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ज्यांच्या विषयी काढले ते कर्मयोगी, वैदिक वाङ्मयात धर्माचा उगम व विकास या प्रबंधाचे लेखन करणारे थोर लेखक, अस्पृश्यता निवारण बील मध्यप्रांत वऱ्हाडचे मंत्री असताना कायदे कौन्सिलमध्ये पास करून घेणारे तसेच प्रत्यक्ष जीवनात आचरणातून अस्पृश्यता निवारण करणारेअस्पृशोधारक, सामान्य माणसांचे जीवन स्वाकष्टाने अमृतमय करणारे जनक्रांतीचे लोकमहर्षी, श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या कल्पवृक्षाची स्थापना करून ज्ञानाग्नी प्रज्वलित करून ज्ञानदीप चेतवून शेतीच्या दारात ज्ञानाची गंगा पोहोचविणारे थोर शिक्षणमहर्षी, धन-दौलत-वैभव -समृद्धी -मानसन्मान या सर्वांचा जनकल्याणासाठी त्याग करणारे स्वप्रयत्नातून एका नव्या युगाची निर्मिती करणारे युगनिर्माता डॉ .पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना आज दि.२७ डिसेंबर २०२२ ला असलेल्या १२४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
कृषीमहर्षी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी भारतीय कृषकांचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवून त्यांचा विकास करण्यासाठी इ.स. १९२६ पासून अमरावती येथे वकिलीला सुरुवात केली. इ.स. १९२८ मध्ये शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी व न्याय मागण्यांसाठी मध्यप्रांत आणि वऱ्हाड शेतकरी संघ स्थापन केला तो कृषकांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी.डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख जीवनभर कृषकांच्या हितासाठी कार्य करीत राहिले.
- कृषकांचे राजा । शेतकरी दाता ॥
- भूषण भारता । पापडचे ॥
मध्यप्रांत आणि वऱ्हाड शेतकरी संघाच्या वतीने डिस्टिक .कौन्सिल मध्ये प्रवेश करून इसवी सन १९३० मध्ये डिस्टिक कौन्सिलचे अध्यक्ष झाल्यावर एक लाख रुपये खर्च करून विहिरी खोदून अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणीपुरवठा करून शेतकऱ्यांची पाणी समस्या दूर केली अशाप्रकारे त्यांनी भू सुधारण्याची सुरुवात स्वतःच्या घरापासून व जिल्ह्यापासून केली .जनकल्याणकारी योजना राबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. “शेतकरी सुखी तर देश सुखी “अशी त्यांची विचारसरणी होती. सन १९३२ मध्ये मध्यप्रांत वऱ्हाडच्या कायदे कौन्सिल समोर हिंदू देवस्थान संपत्ती बिल आणण्यामागील उद्देश हिंदू देवस्थानातील असलेल्या संपत्तीचा उपयोग आरोग्य आणि शिक्षणासाठी व्हावा हा होता .सन १९१८ साली जो दुष्काळ पडला त्यात शेतकरी होरपळून निघाला होता. शेतकरी ओल्या कोरड्या दुष्काळात भरडत होता,अशावेळी कर्जाची परतफेड करू शकत नव्हता. सावकाराकडे कर्जापोटी गहाण टाकलेल्या शेतामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता . नऊ – दहा पट अधिक व्याज देऊनही वडिलांचे कर्ज फेडण्यातच मुलाचा जन्म खर्ची जाऊनही शेती वाचवू शकत नव्हता. सन १९२० नंतर कापूस बाजारात इतकी जागतिक बंदी आली की २५० रुपयावरून २५ रुपयावर कापसाचा भाव आला. अशावेळी सावकार शेतकऱ्याच्या घरातील जनावरेच नाही तर भांडीकुंडी सुद्धा हर्रास करू लागले त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. भाऊसाहेबांना हे कसे सहन होणार त्यांनी कर्जलवाद बील मांडून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा प्रयत्न केला परंतु हे बील ज्यांच्यासाठी होते ते शेतकरीच या बिलाला विरोध करू लागले, हे बघून भाऊसाहेबांनी आपला शेतकरी इतका भोळा आहे की पुष्कळदा तो नकळत आपल्याच कल्याणाच्या विरोधात हात उगारतो. अशा शब्दात खेद त्यांनी व्यक्त केला.
या बिलाविरुद्ध वातावरण तयार झाले हे माहीत होताच भाऊसाहेब व त्यांच्या शेतकरी संघाने प्रचार दौरे केले व ग्रामातील झोपडी झोपडीत जाऊन कर्जलवादब बील शेतकऱ्यांचा उद्धार कसा करू शकते हे शेतकऱ्यांना पटवून दिले. या जनजागृतीमुळे शेतकरी जागा झाला त्यामुळे भाऊसाहेब कर्जलवाद बील कायदेमंडळात पास करू शकले. कायदेमंडळात संमत झाल्यावर हे बील १९३३ चा कर्जलवाद कायदा म्हणून घोषित झाला. हा कायदा संमत झाल्यामुळे जे हजारो कर्जबाजारी शेतकरी होते त्यांची ९० टक्यापेक्षा जास्त शेती वाचू शकली,अशाप्रकारे शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यातून भाऊ साहेबांनी कर्जमाफी कायद्याने बाहेर काढले व हजारो शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन वाचून ते कृषकांचे खरे प्राणदाता ठरले, कृषकाचे कैवारी झाले.
- कर्जलवादाचा । कायदा हा केला ॥
- कृषकांना दिला । प्राणदान ॥
याच काळात शेतकऱ्यांच्या मुलांना फी ची सवलत मिळावी म्हणून एक विधेयक मंजूर करून घेतले. शेतकऱ्यांची सर्वांगीण सुधारणा करण्याकरिता त्यांनी ग्राम सुधारणा मंडळाची स्थापना केली व गुरांचा रोगप्रतिबंधक कायदा कायदेमंडळासमोर मांडून मंजूर करून घेतला. स्वातंत्र्यानंतर भारतीय संसदेच्या १९५२ मध्ये निवडणुका झाल्या भाऊसाहेब अमरावती मतदारसंघातून बहुमतांनी निवडून आले.हा त्यांच्या कार्यकर्तृत्व व सदविचारांचा विजय होता. सन १९५२ च्या ऑगस्ट महिन्यात ते भारताचे पहिले केंद्रीय कृषिमंत्री झाले. भारताचा कृषिमंत्री होण्याचा भारतीय शेतकऱ्यांना पहिला मान भाऊसाहेबांच्या रूपात मिळाला. कृषीमंत्रीपदी असताना कोलंबो प्लॅन प्रमाणे निरनिराळ्या देशात शेतकरी पाठविण्याची योजना आखली याशिवाय इंटरनॅशनल फार्म युथ एक्सचेंज कार्यक्रम भारतात सुरू करून अनेक शेतकऱ्यांना दुसऱ्या देशातील शेतीची लागवड पद्धती पाहण्याची आणि प्रात्यक्षिक करण्याची संधी प्राप्त करून दिली.
● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य
अमरावती येथे कपाशी-ज्वारी संबंधिचे संशोधन सुरू केले तथा इतर ठिकाणच्या संशोधन केंद्रास प्रोत्साहन दिले.धान्याच्या भरपूर उत्पादनासाठी भारतीय शेतीचा विकास त्यांना करायचा होता. अवाढव्य असलेल्या कृषीप्रधान भारत देशाने अन्नधान्याकरिता अमेरिकेची मदत घ्यावी ही गोष्ट त्यांना चिंताग्रस्त करीत होती. भाऊसाहेब कृषीमंत्री झाल्यावर मात्र भारताला अन्नधान्याची टंचाई भासली नाही, याचे कारण एकच ते म्हणजे भाऊसाहेबांचे योग्य कृषीधोरण अर्थात कृषीमंत्री पदाचा कृषक कल्याणासाठीच नव्हे तर भारतीय जनतेच्या सुखासाठी त्यांनी उपयोग केला. भाऊसाहेबांच्या या कृषी धोरणामुळे अन्नधान्याची निर्यात करणारे एक राष्ट्र म्हणून भारताला दर्जा प्राप्त झाला तो भाऊसाहेबांमुळेच. कृषिमंत्री झाल्यावर केवळ एका महिन्यात अधिक उत्पादन देणारी जपानी भात शेती योजना सुरू करणारे ते पहिले भारतीय कृषीमंत्री होते. सुमारे अडीच लाख भारतीय खेड्यात जपानी भातशेती योजनेचा त्यांनी प्रसार केला. भाऊसाहेबांच्या या जपानी भातशेतीच्या प्रयोगामुळे संपूर्ण भारतात भाताच्या उत्पादनामध्ये उच्चांक गाठला होता. असे करून भाऊसाहेबांनी भारतीय शेतीत कृषीक्रांतीकारी बदल घडवून आणला त्यामुळे भाऊसाहेब तांदूळ उत्पादनाच्या तंत्राचे एक तज्ञ म्हणून संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले. या भातशेती पद्धतीमध्ये भात बियाणे कमी वापरून विशिष्ट पद्धतीने कोळपणी व खतांची मात्रा देऊन अधिक उत्पादन कसे घ्यावे हे शेतकऱ्यांना पटवून दिले तसेच विक्रमी उत्पादन घेतले म्हणूनच १९५३ मध्ये आंतरराष्ट्रीय अन्न व कृषी परिषदेत भाऊसाहेबांचा विशेष गौरव करण्यात आला होता.
- कृषिमंत्रीपदी । योजना आखून ॥
- कृषक जीवन । सुखमय ॥
शेतकऱ्यांना शेतीशी निगडित उद्योगधंद्यांची नवी दिशा देण्याचा भाऊसाहेबांनी प्रयत्न केला. उदा.भारतीय मधुमक्षिका पालन संघटना,आंतरराष्ट्रीय धान्य मंडळ त्यांनी स्थापन केले .कृषिमंत्रीपदावर असताना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी स्वतःच्या शासकीय अधिकारात ज्या ज्या विकासात्मक योजना राबवता येतील त्या सर्वच योजना राबविण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला विशेष म्हणजे शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीकडे त्यांचे पूर्ण लक्ष होते म्हणूनच माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी अतिशय तळमळीने महान कार्य केले , असे म्हटले आहे .भारतीय शेतकरी संघटित झाला पाहिजे , जागृत झाला पाहिजे तेव्हाच त्याचा विकास होईल असे त्यांना नेहमीच वाटत असे.असे झाल्यास शेतकरी स्वतःच्या समस्येबाबत जागृत होऊन लढा देऊन संघर्ष करून स्वतःचा विकास करू शकेल हे लक्षात घेऊन सन १९५४ मध्ये “भारत कृषक समाज” ही राष्ट्रीय संघठना स्थापन केली. या भारत कृषक समाजाची उद्दिष्टे अतिशय महत्त्वपूर्ण असून आजही ती तितक्याच मोलाची आहेत. रोम येथे सन १९५३ मध्ये तर श्रीलंका येथे १९५४ मध्ये संपन्न झालेल्या परिषदांना पाठविलेल्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्वभाऊसाहेबांनी केले. वनमहोत्सवाची कल्पनाही त्यांनी अंतःकरणापासून राबविण्याचा प्रयत्न केला भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली सन १९५४ मध्ये भारतीय प्रतिनिधींचे मंडळ आंतरराष्ट्रीय भात आयोगासाठी जपानमध्ये टोकियो येथे पाठविले होते. कलकत्ता येथे भरलेल्या भात आयोगाच्या सत्राचे भाऊसाहेब अध्यक्ष होते.
डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी कृषकांच्या जीवनोद्धाधारासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. त्यांच्याच प्रेरणेतून दि. ११ डिसेंबर १९५९ ते दि.२९ फेब्रुवारी १९६० पर्यंत दिल्ली येथे पहिली जागतिक कृषी प्रदर्शनी भरली तेव्हा त्यांची शेती व शेतकरी यांच्या बद्दलची आस्था निदर्शनास आली . या कृषी प्रदर्शनीचे संयोजक व अध्यक्ष भाऊसाहेब होते ही दोन्ही पदे त्यांनी समर्थपणे सांभाळली. या कृषी प्रदर्शनीमध्ये पीक उत्पादनात विक्रम करणाऱ्यांचा गौरव व्हावा यासाठी विविध सन्मान व पदके देण्याची योजना आखण्यामागील उद्देश शेतकऱ्यांमध्ये विक्रमी उत्पादन करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी हा होता .या कृषी प्रदर्शनीचा लाभ भारतातील 80 टक्के शेतकऱ्यांनी घेतला.
- गाजली जगात। कृषी प्रदर्शनी ॥
- कृषी तज्ञ वाणी । दररोज ॥
जगातील आधुनिक व नवनवीन कृषी अवजारांची नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती प्रत्यक्ष मिळाल्यामुळे त्याचा उपयोग भारतीय शेतकऱ्यांनी शेती व्यवसायात करून कृषी उत्पादन वृद्धिंगत केले . या प्रदर्शनीमुळे भारताची प्रशंसा देश विदेशात झाली . या प्रदर्शनीला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर उपस्थित होते.
- कृषी ज्ञानदान । कृषी प्रदर्शनी ॥
- दिली संजीवनी । कृषकांना ॥
या जागतिक कृषी प्रदर्शनीनंतर राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय कृषी प्रदर्शनी कलकत्ता, मद्रास, अहमदाबाद येथे भाऊसाहेबांच्या नेतृत्वात संपन्न झाली. भारतातील विविध राज्यांच्या कृषीमंत्र्यांचे प्रतिनिधी मंडळ सन १९६० च्या ऑगस्ट महिन्यात रशियाला गेले .या मंडळाचे नेतृत्व भाऊसाहेबांनी केले आणि रशियातील सहकारी शेतीचा अभ्यास करून भारतीय शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून दिला. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात खरी कृषी क्रांती घडवून आणणारे भाऊसाहेब हे खरे महात्मा ठरले. विदर्भभूमीत अकोला येथे महाराष्ट्र शासनाने १९६९मध्ये कृषी विद्यापीठ स्थापन केले परंतु नंतर कायद्याने पुन्हा दुरुस्त करून डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठ असे नामकरण करून भाऊसाहेबांचा खऱ्या अर्थाने गौरव केला.भाऊसाहेबांच्या निस्वार्थ महान व व्यापक कार्याचा गौरव भारत सरकारने सन १९८६ मध्ये कृषीरत्न ही पदवी मरणोत्तर बहाल करून केला. अमेरिकेतील राष्ट्रीय कृषी संघटनेने १९६२ मध्ये आपल्या संस्थेचे आजीव सभासदत्व बहाल करून भाऊसाहेबांचा यथोचित गौरव केला. भाऊसाहेबांची शेतकरी निष्ठा बघून महात्मा गांधीजींनी शेतकरी व त्यांच्या प्रश्नाविषयी इतका जिव्हाळा व तळमळ असलेला नेता माझ्या पाहण्यात दुसरा नाही असे गौरवपूर्ण उदगार काढले होते. भारतातील पहिले आदर्श कृषी मंत्री डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना माझे जयंतीदिनी विनम्र वंदन..!
- भाऊंच्या कर्माला । करितो नमन ॥
- करांनी वंदन । कोटी कोटी ॥
- -प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले
- (डॉ.पंजाबराव देशमुख राज्यस्तरीय वाङमय पुरस्कार प्राप्त)
- रुक्मिणीनगर, अमरावती.
- भ्रमणध्वनी : ८०८७७४८६०९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–